वर ढगाला लागली कळं…?

(या ब्लॉगवर सुरू असलेली कोयना भूकंप पुराणाची मालिका खंडित करून मुद्दाम गारांबद्दल लिहतोय. कारण विषय तातडीचा आहे. यानंतर भूकंपाचे पुराण नक्की असेल..)

सध्याची गारपीट हा ग्लोबल वॉर्मिंग / हवामान बदलांचा परिणाम म्हणायचा की आणखी काही? नेमकी काय कारण आहेत या आपत्तीमागं? ती शोधता येतील की “वर ढगाला लागली कळं” असं समजून गप्प बसावं लागेल?

– अभिजित घोरपडे

रस्ता महाराष्ट्रातला की काश्मीरमधला?

रस्ता महाराष्ट्रातला की काश्मीरमधला?

ना वेळ ना काळ.. गारपीट सुरूच. सलग दोन आठवडे होत आले. मार्चचा दुसरा आठवडा उजाडलाय. होळीचा सण तोंडावर आलाय. उन्हाचा कडाका सुरू होण्याचा काळ. पण राज्यातली गारपीट, वादळी पाऊस थांबेना.. कसं वर्णन करावं याचं?

खरंच दादा कोंडके यांची आठवण होते. वर ढगाला कळ लागलीय, पण थेंब थेंब पाण्याऐवजी टपा टपा गारा कोसळू लागल्यात. कुठं दीडदीड फुटांचा थर साचला. कुठं तासाभरात काश्मीर अवतरलं. आभाळंच फाटलंय. पाचसहा लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. द्राक्षासारखं नाजूक पीक गेलंच, दांडगट ऊससुद्धा लोळवला या गारपिटीनं. पीक आडवं झाल्याचं पाहून एक महिला गेली धक्क्यानं. कोपरगाव तालुक्यातली ही घटना. गारांच्या तडाख्यात अनेक लोक जखमी. बकऱ्या मेल्या. कोंबड्या मेल्या. पोपट, कावळ्यांसारखे पक्षी किती मेले याची तर मोजदादच नाहीकिती मोठी आपत्ती आहे, हे समजण्यासाठी आणखी वेगळं वर्णन काय हवं?

गारपिटीने बागाच्या बागा आडव्या केल्या आणि प्रचंड नुकसान घडवलं..

गारपिटीने बागाच्या बागा आडव्या केल्या आणि प्रचंड नुकसान घडवलं..

ढगांची, वाऱ्याची मनमानी सुरू आहे. पाऊसगारा कोसळत आहेत.. कळ लागल्यासारख्या. पण याचं कारण काय? हा लाखमोलाचा प्रश्न. तोच असंख्य लोकांच्या मनात आहे. रोजचा पाऊस, गारपीट पाहताना डोक्यात येतो तो. व्हॉट्स अॅप, फेसबुक, वर्तमान पत्रं, वाहिन्या यावर बरंच बोललं / लिहिलं जातंय. चर्चेचा काटा नकळत ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदलाकडं सरकतोय. काही ठिकाणी वाचताना तर हसावं का रडावं.. कळत नाही. “एक किलोमीटर उंचीवर उणे ३० ते ४० अंश तापमान“, “वाफेचे बर्फ झाले, त्याचे गोल तयार झाले“.. असं रंजक विज्ञानवाचायला मिळालं. असो.

एक मात्र निश्चित. याबाबत लोकांना भयंकर उत्सुकता आहे. ती शमली नाही तर हे असं चालणारच.. वस्तुनिष्ठ नाही तर असं काहीही चालतं मग!

आपल्या राज्यासाठी गारपीट नवी आहे का?.. अजिबात नाही. उन्हाळ्यात नक्की होते कुठं ना कुठं. विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र.. सगळीकडंच दोनतीन वर्षातून सर्रास ती होते. पिकाचा हातातोंडाशी आलेला घासही घेऊन जाते. कोणी १९८० च्या दशकातला अनुभव सांगतात, कोणी त्याच्या आधीच्या आठवणी देतात. पण जोरदार गारपीट लोकांनी अनुभवलीय. तिचं नुकसानही सहन केलंय.

मग आताच एवढं का बिचकायचं?

एवढ्याशा त्या गारा.. पण नुकसान भयंकर
एवढ्याशा त्या गारा.. पण नुकसान भयंकर

या बिचकण्याला कारण आहे. फेब्रुवारी महिन्यात / मार्चच्या तोंडावर, सलग दोन आठवडे आणि एकाच वेळी महाराष्ट्राभर इतक्या मोठ्या प्रदेशावर गारपीट झाल्याच्या नोंदी तरी नाहीतना वेधशाळेकडं, ना लोकांकडं. अनेकांशी बोललो पण तसं आठवणारेही भेटले नाहीत. म्हणून याला वेगळं म्हणायचं. मग याच्या पुढचा प्रश्न उरतोचहे कशामुळं?.. याचं उत्तर आताच्या हवामानाच्या स्थितीत दडलं आहे. खरंतर फार गुंतागुंत आहे यात. याबाबत नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक डॉ. . के. श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली.

सोप्या भाषेत एवढंचगारपिटीसाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एकतर हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी म्हणजे या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. गेले दोन आठवडे आपल्याकडं अशीच स्थिती आहे. पूर्वेकडून वारे येताहेत. ते बंगालच्या उपसागरावरून बाष्प आणत आहेत. एक निकष पूर्ण झाला. दुसरं म्हणजे हवा उंच जाण्यासाठीही अनुकूल स्थिती आहे. ती आणखी रंजक आहे. त्याला कारणीभूत आहेत वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे ९ ते १२ किलोमीटर उंचीवर. वर्षाच्या या काळात ते हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकले आहेत. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर आणि काही प्रमाणात मध्य भारतावर आहे. हे प्रवाह कोरडे आहेत. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती आहे. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे उंचापर्यंत घुसखोरी करतात. नाहीतर बाष्प गोठण्याची पातळी नेहमीपेक्षा खाली सरकते. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे.. ती गेले दोन आठवडे कायम आहे. तिच्यामुळे आपल्या भागावर गारांचा मारा सुरूच आहे.

काय?.. जम्मू-काश्मीर, नव्हे महाराष्ट्र !

काय?.. जम्मू-काश्मीर, नव्हे महाराष्ट्र !

कोणत्याही विज्ञानात प्रश्नातून प्रश्न निघत जातात. इथंही तसंच. ते जेट प्रवाह दक्षिणेकडंच का सरकले? पण हे उत्तर शोधण्यात आणखी गुंतागुंत आहे. एक मात्र निश्चित, हा हवामानाच्या केवळ स्थानिक घटकांचा परिणाम नाही. त्याला जागतिक परिमाणही आहे. उरला मुद्दा ग्लोबल वॉर्मिंग / हवामान बदलांचा. खरं सांगायचं तर हवामान हा स्थिर घटक नाहीच. ते सतत बदलत असतं. त्यातले कोणते बदल नैसर्गिक चक्राचा भाग आहेत आणि कोणते माणसाच्या उद्योगांमुळे घडत आहेत, हे सांगणं मुळी अवघड. लगेच आणि नेमकेपणाने सांगणं तर त्याहून कठीण. हवामानशास्त्राच्या सध्या तरी या मर्यादा आहेत. पुढील काही काळासाठी त्या राहतील. सर्वच प्रश्नांची तयार उत्तरं असतातच, असंही नाही.. निदान आता तरी ही मर्यादा स्वीकारावी लागेल.

तोवर हा वादळी पाऊस आणि गारपीट यांची कारणं सांगताना, “वर ढगाला लागली कळं” असं समजायला हरकत नाही!

अभिजित घोरपडे

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

(गारा कशा तयार होतात माहितीए?… त्या तयार होण्याची प्रक्रिया तर रंजक आहेच. पण मुळात गारांची रचनासुद्धा आपल्याला वाटते, त्यापेक्षा कितीतरी वेगळी असते. तिला अनेक पापुद्रे असतात, कांद्यासारखे. का आणि कशामुळे..?

जाणून घ्यायचंय.. तर मग पुन्हा इथंच भेट द्या, अगदी दोनच दिवसांत!

अभिजित घोरपडे

13 thoughts on “वर ढगाला लागली कळं…?

 1. Sushama Deo says:

  fascinating, amazing facts that too in simple marathi.
  congrats Abhijit. Keep it up. looking forward for new information everytime
  all the best
  Dr. Sushama Deo
  Dept. of Archaeology, Deccan College, Pune

 2. निलेश आंबेकर says:

  गारपीट……….
  कालच माझ्या मैत्रिणीनी फोटो पाठवले गारपीटी मुळे पूर्णपणे वाताहात झाली आहे.
  नुकसानीचा अंदाज बघितला तरी थरकाप होतो.
  सरकारी मदत मिळेल पण ……… किती आणि कधी .
  कित्येक लोक जखमी झाले आहेत. हॉस्पिटल मध्ये रांगा लागल्या आहेत
  बाकीच्या देशांमध्ये काही प्रमाणात तरी हवामानाचा अंदाज काही प्रमाणात तरी जवळ पास असतो
  आपल्यकडे तो पण आनंदी आनद
  लोक तर जागरूक नाहीतच वर आपल्याकडील आपत्कालीन व्यवस्था ही संकल्पना हास्यस्पद आहे.
  या तडाख्या मुळे आपण काय शिकणार हा प्रश मला सतावतो आहे.
  निलेश आंबेकर – ठाणे
  ९८२०० ३२७७२

 3. वर ढगाला लागली कळ …?
  या पोस्ट बद्दल…. हि माहिती उपयुक्त आहे, पण अभि सर , तुम्ही पर्यावरणाबाबत इतका अभ्यास करता,
  इतके सतत लिहिता, माहिती घेता, पण आपण लिहिलंय तसे,
  ” खरं सांगायचं तर हवामान हा स्थिर घटक नाहीच. ते सतत बदलत असतं. त्यातले कोणते बदल नैसर्गिक चक्राचा भाग आहेत आणि कोणते माणसाच्या उद्योगांमुळे घडत आहेत, हे सांगणं मुळी अवघड. लगेच आणि नेमकेपणाने सांगणं तर त्याहून कठीण. हवामानशास्त्राच्या सध्या तरी या मर्यादा आहेत. पुढील काही काळासाठी त्या राहतील. सर्वच प्रश्नांची तयार उत्तरं असतातच, असंही नाही.. निदान आता तरी ही मर्यादा स्वीकारावी लागेल.”
  हे जरी मान्य केले तरी गारपीट कधी होणार ? किती प्रमाणात म्हणजे नेमक्या केवढ्या आकाराच्या गारा पडतील, किती काळ गारपीट सुरु राहील याचा कसलाही अंदाज कोणाही तज्ञाला, अभ्यासकाला येवू नये हे कसे काय ? हा माझ्यासह सगळ्यांचा प्रश्न आहे. जर आगोदर गारपिटीचा अंदाज कळला असता तर होणारे नुकसान टाळता आले असते. किंबहुना मुकी जनावरे तरी वाचवता आली असती. असे शेतकरी आता म्हणत आहेत. एवाढे विज्ञान पुढे गेले आहे, प्रगती केली आहे तर असल्या हवामानाचा अंदाज यायला पाहिजे का नको ?
  आणखी एक पण नाव जरा खटकले.
  ” वर ढगाला लागली कळ …? ” हे नाव जरा खटकले.
  इतक्या गंभीर विषयावर आणि सध्याच्या महाराष्ट्रातील स्थिती बद्दल लिहिताना किमान आज तरी
  इतक्या “वल्गर ” नावाची गरज नव्हती. हे केवळ माझेच नव्हे तर माझ्या सारख्या अनेकांचे मत आहे.
  प्लीज असे लिहिण्या मागच्या आमच्या भावना समजून घ्याव्यात.
  ****ये कैसी बारिश है मौला, खून बह रहा है खेतों में..***

  • Dear Vijay,
   Thanx for comments.
   Yes, meteorologists should give forecast for hailstorms. Some people clam that. But they are not able to give it. Some institutions like IITM are working on it, but did not succeed in it.
   In future also they will be able to tell area in which it may occur. But don’t after how many years, we will get forecast for exact location.

   About heading of the article..
   Gammat mhanun he nav dilele nahi. Agadi gambharyane he lihilele aahe. Kharach atachya pavsache tantra bighadale aahe… mhanunach he naav yogya vatale. Tarihi Bhavana dukhavlya astil tar dilgiri vyakta karto.
   – abhijit.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s