गारांनी महाराष्ट्रात नुकताच धुमाकूळ घातला. एवढीशी म्हटली जाणारी गार विध्वंसक ठरली. या गारेचं अंतरंग भयंकर रंजक आहे. गार म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतील… गारांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. माहितीए का??
– अभिजित घोरपडे
गारा.. शहरी भागासाठी कुतुहलाचा विषय. ग्रामीण भागासाठी काळजीचा. त्यांच्या वर्णनावरूनच समजतं. शहरी कवितांमध्ये गारा छान–छान असतात. पण गावाकडं “गारपीट” ठरतात. कशा?? ते गेले दोन आठवडे गारांनी दाखवून दिलंच. संपूर्ण राज्यानं ते पाहिलं. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, ती अशी! असो..
या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. हे माहितीए का? गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. हे पापुद्रेच तिचा आकार वाढवतात. तिला मोठं मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठी. पुन्हा कांद्याशीच साम्य. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतील.
हे पापुद्र्यांचं रहस्य उलगडता येतं. त्यासाठी गारेची निर्मिती कशी होतं ते समजून घ्यावं लागतं. गार म्हणजे तसा पावसाचाच प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच काही घडावं लागतं. नाहीतर नेहमीच गारा पडल्या असत्या की. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. म्हणजे ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. हो.. ज्या ढगातून गारा तयार होतात ते जास्त उंचीवर जातात. नाहीतर काही कारणामुळे पाणी गोठण्याची पातळी खाली सरकलेली असते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.
पण गारेच्या पापुद्र्यांचं काय???
प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो. तेव्हा थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटून मोठे होतात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा. मधला भाग. आता ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली–वर होत राहते. ती फिरते, तसे तिच्या भोवती थर तयार होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. ती ढगात जितकी जास्त वेळ फिरेल तितके जास्त थर. तितका आकारही मोठा.
गारेचा हा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर– गारेचे वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचे वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे–किती हेलकावे खाल्ले, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.
एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही अडथळे असतात. तिला सामना करावा लागतो तापमानाचा. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात तुम्ही पावसाचे टपोरे थेंब पाहिलेत का? हे थेंब टपोरे का असतात, त्यामागं हेच रहस्य असतं.
ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठ्ठं कुतुहल असं की, गारा तासन् तास पडून राहतात, लवकर वितळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या दिसतात. का?? याची अनेक कारणं असतील. त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण गारेगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो, असं हवामान अभ्यासक सांगतात.
बघितली तर एवढीशी गार. तरी तिचं हे एवढं अजब विश्व.
खरं सांगू का… हवामानाचं आणि त्याच्यातील असंख्य घटकांचं असंच आहे. त्यात रंजकता ठासून भरलेली आहे, पण त्याच्याकडं कधी आपण तसं बघितलंच नाही. बघितलं ते रूक्षपणे.. दुर्दैव आपलं !
आता डोळे उघडून बघू या.. मग हवामानाची अनेक रहस्य तर उलगडतीलच. त्याहून महत्त्वाचं म्हणजे– त्याच्या आपत्तींचा तडाखा कमी करायलाही मदत होईल, कदाचित!
– अभिजित घोरपडे
Blog- www.abhijitghorpade.wordpress.com
Email- abhighorpade@gmail.com
या ब्लॉगचा उद्देशच आहे– निसर्ग, पर्यावरणातील रहस्य उलगडण्याचा. त्यांचं माणसाशी असलेलं नातं सांगण्याचा. अर्थातच, पुढच्या भागातही असंच काही तरी असेल. ते रंजक आणि आगळं वेगळं असेल हे निश्चित… पण काय??
यासाठी थोडीशी वाट पाहा.
– अभिजित घोरपडे
Interesting!! Gaarpit maharashtrala navi naahi. Gaar tayar honyasathi anukul vaatavaran ek doan divasch asaayche. Salag sumaare ek aathvada aani evadhya mothya bhu bhaagavar gaarpit hi prathamach zaali aahe. Gaarpitimaagche vaidnyan sopya bhaashet aamchyaparyant pochavlyabaddal dhanyavaad !!
Thank you.
You are true. Hailstorm is not new for us, but this time’s duration and intensity was unusual.
Great Abhijit, Its really useful information. The language used is also palatable and interesting. All the best
Thanx Satish..
अभिजित, अभिनंदन अगदी सोप्या भाषेत गारांच रहस्य आमच्यासमोर आणल्याबद्दल !
Thank you Machindra..
अभिजीत सर प्रथमत: धन्यवाद! इतक्या सोप्या भाषेत सहज गारपिटीमागील विज्ञान उकलवून सांगितल्याबद्दल. ग्लोबल वार्मिंग की कुलिंग या विषयी काही माहिती मिळाली तर नक्कीच वाचायला आवडेल.
Thank you sir.. sure.
very informative blog in simple marathi. congrats abhijit. looking forward for more information in same way
nice imformation sir,,,,, this blog use for refarences
Thanx Sachin… keep reading.