भगीरथा, “जपानी गंगा” आण रे बाबा..!

नदीला देवी न म्हणताही तिचं पावित्र्य राखता येतं. आणि तिला कितीही आई-देवी म्हटलं तरी घाण करता येतं! एक उदाहरण जपानचं आणि एक आपलं. आपली दांभिकता उघड करणारं… जपानच्या दौऱ्यात तिथल्या किनुगावा नदीच्या पात्राला फिरलो. अन् आपल्याला लाजवणारं वास्तव पाहायला मिळालं.
– अभिजित घोरपडे

बऱ्याच वर्षांनी नदीचं भरभरून पाणी प्यायलो.. पण नदी होती जपानमधली.

बऱ्याच वर्षांनी नदीचं भरभरून पाणी प्यायलो.. पण नदी होती जपानमधली.

किनुगावा… जपानमधल्या एका नदीचं नाव. किनु म्हणजे ‘डेव्हिल’ अर्थात राक्षस आणि गावा म्हणजे नदी. तिला राक्षसी नदी म्हणायला हरकत नाही. नावाप्रमाणे ही नदीसुद्धा रौद्र. पूर्वी भयंकर नुकसान घडवायची. आता पूरनियंत्रणाचे उपाय केलेत. त्यामुळे नुकसान बरंच कमी करता आलंय. आता नदी बदलली खरी, पण नाव तिच्या इतिहासाची आठवण करून देतं.

किनुगावा... अर्थात राक्षसी नदी!

किनुगावा… अर्थात राक्षसी नदी!

जपानच्या दौऱ्यात तिथल्या काही गोष्टी आवर्जून पाहायच्या होत्या. त्यात एक होती- तिथली नदी. ती पाहण्यासाठीच किनुगावाचं पात्र गाठलं. ही नदी निवडायची कारणं दोन. १. माझा मित्र संदीप पुराणे राहतो, त्या ठिकाणापासून ती जवळ आहे. २. ती एका मोठ्या शहराजवळून वाहत येते. नदी तिच्या उगमाजवळ पाहून उपयोग नसतो. तिथं ती छानच असते. एखादं शहर ओलांडून पुढं गेली की खरं रूप समजतं.. नदीचं अन् तिथल्या माणसांचंसुदधा! जपानच्या बऱ्याचशा नद्या हिमाच्छादित पर्वतांमध्ये उगम पावतात. हिम वितळलं की त्यांचं पाणी मिळतं. शिवाय मुख्यत: जुलै-ऑगस्टमध्ये पडणारा पाऊसही त्यांचं पात्रं फुगवतो. किनुगावासुद्धा अशीच. ती उत्सुनोमिया शहरापासून वाहते. हे शहरंही मोठं. त्याच्या खालच्या बाजूला ही नदी पाहिली. शे-दीडशे मीटर रुंदीचं पात्र. सध्या पाणी कमी होतं. स्वच्छ निळंशार पाणी. खळखळणारा प्रवाह. पुढं एक भलं मोठं झाड आडवं पडलेलं होतं. नदीचं फार वर्णन करत नाही. तीनच गोष्टी सांगतो- १. पात्रात वाळू आहे तशीच होती, तळातली वाळूसुद्धा पाहता येत होती. २. पात्रात कसलीही घाण नव्हती, निर्माल्यसुद्धा नाही. ३. मी या नदीचं पाणी भरभरून प्यायलो.

खळाळती नदी आणि नितळ पाणी.

खळाळती नदी आणि नितळ पाणी.

एका मोठ्या शहरातन वाहून आलेली नदी अशी?? आपण भारतीयांना बुचकळ्यात टाकणारं हे वास्तव. जपानमध्ये नद्यांना नेमकं काय मानतात माहीत नाही. आपल्यासारखं आई-देवता मानतात का याचीही कल्पना नाही. पण नदी सांभाळावी ती जपान्यांनीच! पात्र आहे तसंच होतं. ना अडथळं, ना अतिक्रमणं. पात्र विस्तृत होतं. पण त्यात मोजून दोनच कॅन पडलेले दिसले. बाकी कचरा नाही, येऊन मिळणारी गटारं नाहीत, कडेला दुर्गंधी नाही. रविवार होता. त्यामुळे काही मंडळी पात्रात दिसली.

कशासाठी??

किनुगावा नदीत मासेमारी हा एक विरंगुळा ठरतो.

किनुगावा नदीत मासेमारी हा एक विरंगुळा ठरतो.

छंद म्हणून गळ टाकून मासे पकडण्यासाठी. काही सुट्टी घालवायला, ‘रिलॅक्स’ व्हायला आलेले. काही जण सहभोजनासाठी आले होते. ‘बार्बेक्यू’ करत होते. मस्त आनंद लुटत होते.. अर्थाच कोणतीही घाण मागे न ठेवता. नदीकाठी एक फलक पाहिला, “आनंद लुटा, पण आपला सर्व कचरा सोबत घेऊन जा.” तिथं सूचना मानल्या जातात. नियम पाळले जातात. चूल केल्यावर मागं राहणारी राखही लोक घेऊन जातात. इतर कचरा टाकणं तर दूरचीच गोष्ट. नदीचं कसलंही सुशोभिकरण केलेलं नव्हतं. सुधारणा केली नव्हती. एकच केलं होतं- हस्तक्षेप नव्हता. तिला तिच्या पद्धतीनं वाहू दिलं जात होतं.

नदीपात्रात बार्बेक्यू करा, पण आपला कचरा घेऊन जा..

नदीपात्रात बार्बेक्यू करा, पण आपला कचरा घेऊन जा..

हे वाचून कदाचित वाटेल, ते लोक आधीपासूनच तसे आहेत. पण त्यात तथ्य नाही. ते आपल्यासारखेच होते. तिथंही प्रदूषण, घाण पाणी, रोगराई होती. पण दुसऱ्या महायुद्धात त्यांना झटका बसला. त्यानंतर ते बदलले. किती बदलता येतं, याचं उत्तम उदाहरण. किनुगावा हे एकमेव उदाहरण नाही. सर्वच नद्या तशा आहेत. शहरातून वाहू दे, नाहीतर गावांमधून. त्यात सांडपाणी मिसळत नाही, ना कोणतीही घाण. नदीला देवी न म्हणताही तिचं पावित्र्य राखता येतं. आणि तिला कितीही आई-देवी म्हटलं तरी घाण करता येतं. एक उदाहरण त्यांचंआणि एक आपलं. आपली दांभिकता उघड करणारं.

आपली प्रत्येक गंगा अजूनही “मैली”च आहे. नद्यांना डोक्यावर घेणाऱ्या या देशात गंगा कधी सुधारणार, याची प्रतिक्षा आहे.. आधुनिक काळात भगीरथ असलाच तर त्याला वेगळीच विनवणी करावी लागेल.

“आपल्या गंगा सोडून दे. आता जपानीगंगा इकडं वळव रे बाबा…” अशी आर्जव करायची वेळ आली आहे.

– अभिजित घोरपडे
http://www.abhijitghorpade.wordpress.com
abhighorpade@gmail.com

16 thoughts on “भगीरथा, “जपानी गंगा” आण रे बाबा..!

  1. दांभिकता हा आपल्या भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्त्रीला देवी म्हणून पूजाकरणारे आणि घरातच नव्हे तर गर्भात पण स्त्रीचा खून पाडणारे आम्ही आमची संस्कृती जगात सर्वात महान म्हणून मिरवतो ! याचप्रमाणे नदीला आई आणि देवीची पदवी बहाल करणारे आम्ही भारतीय जगात ऎकमेव असावेत, पण भगीरथाच्या गंगेपासून ते गावगंगेपर्यंत सर्वच नद्दांना घाण कराण्याचा आम्हास जन्मसिध्द हक्क मिळालेला आहे याच आविर्भात आम्ही सर्व वावरत आसतो !
    फार मोठे प्राब्लेम नाहीत. एकच प्राब्लेम आहे, आम्ही कुटंबातील मोठी माणसं आणि समाजातील मोठी माणसं ” बोलतो तसे चालत नाही “. यामुळे आपली नवी पीढी शिकणार कोणाकडून ?

  2. शाम भागवत says:

    मस्त!
    खूप सोपी भाषा!
    उत्सुकता वाढवत सगळी पोस्ट न कळत वाचायला लावणारी!
    जेव्हा नक्की माहिती नसते तेव्हा वाचणारा वाचतोय तर द्या ठोकून असे न करता प्रांजळपणे माहित नसल्याचे तसे नमूद करणारी पोस्ट ही तर विशेष खासियत!

    थोडक्यात सांगायचे तर त्यामुळे मला सगळ्या पोस्ट एका दमात वाचायला लागल्या आणि link bookmark मधे समाविष्ट करायला लागली.

  3. अभिजीत सर, आपले निरीक्षण सुंदर आहे, असेच एक निरीक्षण–देव जन्माला येतता,,, पुण्यात,, खेड्यात, किवा देशातल्या कुठल्यही रस्त्या च्या कडेला,,, चौकात ,,,… फोटो किंवा दगडला शेंदुर लावून दिवा लावून ती जागा अतिक्रमाना साठी राखून ठेवली जाते…. या वर उपाय शोधुया…

  4. umesh jadhav says:

    नदी चि ही गोष्ट खुपच अवड़ली. भारतातही अशा प्रकरची शिस्त असति तर आपल्या नद्याही आज स्‍वछ राहू शाकल्य असत्या. पन आजची भारतातील नाद्यंची परिस्थिति खुपच निराशाजनक आहे.

  5. Abhay Joshi says:

    Dear sir, aapli ha talk pharach aawdla…… abhinandan

    Pratyekane pahayla wa aaikayla hava…

    link:
    Senior Journalist Abhijit Ghorpade on Drought in Maharashtra

Leave a comment