आव्वाज करायचा नाय…!

दोन तासांचा प्रवास. पण एकदाही हॉर्नचा आवाज कानावर पडला नाही. प्रवास होता, जपानमधला. वाटलं इथल्या वाहनांना हॉर्न नसतात की काय? नंतर समजलं तिथं बस, ट्रेनमध्ये मोबाईलवर बोलायला बंदी आहे. किती काळजी घेतात इतरांची! कसं जमतं बुवा त्यांना??
– अभिजित घोरपडे

बसमध्ये मोबाईलवर बोलायलाही बंदी..

बसमध्ये मोबाईलवर बोलायलाही बंदी..

साधारण दोन तासांचा प्रवास. सुमारे १०० किलोमीटरचा. बरेच सिग्नल लागले. काही सिग्नलला बरीच वाहनं. त्यामुळे मध्ये काही मिनिटं थांबून राहावं लागलं… पण चुकल्या-चुकल्यासारखं वाटत होतं. का माहितीए?? अख्ख्या प्रवासात एकदाही हॉर्नचा आवाज कानावर पडला नाही. नाही म्हणजे नाहीच. इथल्या वाहनांना हॉर्न नसतात का? अशी शंका येण्याइतपच हे वेगळं होतं. पुण्यात राहणाऱ्या माझ्यासाठी तर धक्काच..

हा प्रवास होता जपानमधला. टोकिओजवळचं नरीटा विमानतळ ते अकासाका एक्सेल हॉटेल या दरम्यानचा.

पुणं काय किंवा मुंबई काय?.. सांगली, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, ठाणं.. कोणतंही शहर घ्या. आमच्याकडं स्पर्धाच असते वाहनांना हॉर्न लावण्याची. मोठ्या आवाजाचे, कर्कश्श, चित्रविचित्र, क्षणात बिचकवून सोडणारे, हृदयाचा ठोका चुकवणारे.. वाट्टेल तसे हॉर्न असतात. ते वाजवण्याच्या तऱ्हाही अनंत. अशा वातावरणातून गेल्यावर दोन तास हॉर्न ऐकायला न मिळणं.. याच्याइतका मोठा धक्का तो कोणता असेल?

दोन तासांचा प्रवास अन् एकदाही हॉर्न ऐकायला मिळाला नाही... हीच ती बस!

दोन तासांचा प्रवास अन् एकदाही हॉर्न ऐकायला मिळाला नाही… हीच ती बस!

१९ मार्चला नरीटा एअरपोर्टला पोहोचलो. त्यानंतर लिमोझीन बसमधून प्रवास सुरू झाला. दोन तास उलटले तरी आवाजच आला नाही, चालकाचं बोलणंही खालच्या पट्टीतलं. चुकल्या-चुकल्यासारखं वाटलं.

जपानमधल्या अनेक गोष्टी लक्षात राहण्याजोग्या आहेत.. सिग्नलला सर्वजण थांबतात, सायकलवरचा माणूससुद्धा. रस्त्याचा पदर (लेन) ओलांडून कोणीही इकडं तिकडं घुसत नाही. इथं नियम पाळण्यासाठी असतात.. इथला माणूस नमस्कार करताना काटकोन होईपर्यंत कमरेत वाकतो(गंमत पाहा ना, तिथं असं. तर आपला बाणा म्हणजे- मोडेन पण वाकणार नाही..) तिथं बस, टॅक्सी किंवा बुलेट ट्रेनसाठी आपल्याकडच्या विमान प्रवासापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. (शंभर किलोमीटरसाठी बसचे तिकिट ३००० येन म्हणजे १८०० रुपये झाले.) इथं निवांत चाललेला कोणीच दिसत नाही. पायाला चाकं लावल्यासारखे भरभर इकडून तिकडं ! बस, ट्रेनमध्ये एकमेकांशी बोलणारी माणसं शोधावी लागली. जास्तीत जास्त लोक मोबाईल-लॅपटॉपमध्ये गुंग. बसले रे बसले हातात मोबाईल येतोच. काहीजण एअरफोन लावून काहीतरी ऐकण्यात गुंग. काहींच्या नाकासमोर पुस्तक. काहीच नसेल तर डुलकी घेतील.. आपल्याकडं गप्प बसायला सांगावा लागतं.. तिकडं ”अरे, बोला रे” असं सांगूनही ते बोलतीलच याची खात्री नाही.

धुम्रपानास बंदी.. तशीच मोबाईलवर बोलण्यासही!

धुम्रपानास बंदी.. तशीच मोबाईलवर बोलण्यासही!

पण धक्का होता तो हॉर्नचा आवाज न ऐकल्याचा. पुढं चार दिवसांनी हलकासा हॉर्न ऐकायला मिळाला. तोसुद्धा एक मोटार सिग्नल संपता संपता पुढं निघाली म्हणून समोरच्याने इशाऱ्यासाठी वाजवला. तिथं सर्व वाहनांना हॉर्न असतात, पण ते वापरले जात नाहीत. त्याची गरज पडणार नाही याची काळजी लोकच घेतात.

हा मुद्दा एवढ्यापुरताच नाही. लिमोझीन बसमध्ये भारतातले आणखी तीन पत्रकार भेटले. ते सुद्धा माझ्यासारखेच. संयुक्त राष्ट्रसंघाच्या “वॉटर अॅन्ड एनर्जी नेक्सस” या कार्यशाळेसाठी आलेले. बसमध्ये मोठ्यानं कोणीच बोलत नव्हतं. मोबाईलवरही नाही. आवाज होता आमच्याच गप्पांचा. आणि बसचा थांबा आलाकी, बसमधील उद्घोषणांचा. त्यासुद्धा माफक आवाजात. असं कसं? अस्वस्थ होऊन इकडं-तिकडं पाहिलं. तर बसमधलं एक चिन्ह नजरेला पडलं- धुम्रपानाला मनाई आणि मोबाईलवर बोलायलाही मनाई! सार्वजनिक वाहनात ही बंदी. आपल्या बोलण्याचा इतरांना त्रास नको म्हणून.. पुढं काही दिवसांनीशिनकान्सेन म्हणजे तिथल्या बुलेट ट्रेनमध्ये बसलो. उद्घोषणा झाली . त्यात महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यातलीएक होती, “मोबाईलवर बोलू नका. बोलायचंच असेल तर त्यासाठी डब्याबाहेर विशिष्ट जागी जाऊन बोला.” त्याच्याही पुढंची बाब अशी- बसल्यावर समोर काही सूचना होत्या. पुन्हा आश्चर्य वाटलं. लिहलं होतं, “लॅपटॉप वापरताना आजूबाजूच्या प्रवाशांचा विचार करा, कीबोर्डच्या आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या ..”) जरा जास्तच विचार करतात हे लोक.. नाही??

अशीही सूचना- आपल्या लॅपटॉपच्या कीबोर्डचा शेजारच्याला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या..

अशीही सूचना-
आपल्या लॅपटॉपच्या कीबोर्डचा शेजारच्याला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या..

प्रसिद्ध अकासाका एक्सेल हॉटेलमध्ये उतरलो होतो. टीव्ही सुरू केला. आवाज वाढला, पण विशिष्ट मर्यादेपर्यंतच. २५ आकड्याच्या पुढे जाईनाच. तिथंसुद्धा आवाजावर बंधन होतं. इतर हॉटेलमध्ये असं आहे का ठाऊक नाही, पण इथं आहे.. ग्राहकाच्या हाती रिमोट दिला, पण आवाजाच्या मर्यादेसह !

तिथंही दंगा करता येतो. पण कॅसिनो, पब, तशा बारमध्ये. आपली मर्जी असेल तरच. दुसऱ्या कोणाच्यामस्तीचा त्रासनाही!

तुलना नकोच. तरीही आपल्याकडचं चित्र डोळ्यासमोर येतंच. नुसत्या हॉर्नबद्दल सांगायचं म्हटलं, तर तो वाजवण्याची असंख्य कारणं. विनाकारणही. कधी अक्कल गहाण ठेवल्यामुळं, कधी मज्जा म्हणून, कधी मुद्दाम त्रास देण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी. पुढं जाताना, अचानक वळताना, पुढच्याला ”इशारा” देताना, खोड म्हणून, कधी बोटांचा चाळा म्हणून, नाही तर सवयीचा भाग म्हणूनही हॉर्न वाजवला जातो. वाहतुकीची कोंडी असेल तर.. मग डोक्यालाच हात लावायची वेळ येते.

रात्री-अपरात्री असो, सार्वजनिक ठिकाणी असो, स्वत:चेच पार्किंग असो, रुग्णालय असो, शाळा असो, नाहीतर वाट्टेल ते.. हॉर्न वाजतोच, तोसुद्धा खणखणीत! वाहन चालवताना ”डॉल्बी”वर आवाजात गाणी लावणं- मग ती रात्र असो नाहीतर दिवस.

ध्वनिप्रदूषणाबाबत नियम-कायदे नाहीत का? सर्व काही आहे, पण कागदावर. प्रदूषण करणाऱ्यांबाबत तक्रार? तसं ठरवलं तर पोलिसांना सारखाच फोन करावा लागेल.. त्याचा उपयोग किती?? असो.

पण तिथं पाहिलं की प्रकर्षानं जाणवतं. जसं आवाजाचं तसंच हवेचंसुद्धा. वाहनातून धूर येताना दिसला नाही. तिथला मित्र संदीप पुराणे याच्याकडून समजलं की, इथं दर दोन वर्षांनी वाहनांची तपासणी होते. वाहन फिट ठरलं, तर ठीक . अन्यथा सर्व चाचण्या पार करेल इतकंदुरुस्त करून घ्यावं लागतं. नाहीतर बाद . यांचे इंधनाच्या दर्जाचे नियमही कडक.

प्रदूषण नाही.. तरीही तोंडावर मास्क! प्रदूषणासाठी नव्हे, परागकणांपासून बचावासाठी...

प्रदूषण नाही.. तरीही तोंडावर मास्क!
प्रदूषणासाठी नव्हे, परागकणांपासून बचावासाठी…

तरीही तिथं अनेक लोक तोंडावर कापडी मास्क लावलेले दिसले. महिला, पुरुष, वृद्ध आणि छोटी-मोठी मुलंसुद्धा. याचं कारण होतं, हवेत उडणारे परागकण. ते आताच्या हंगामात हवेत उडतात. ते नाकात जाऊन अनेकांना अॅलर्जीचा त्रास होतो. शिंका येतात, नाक चोंदतं. या हंगामात अशांची संख्या निम्म्यापर्यंत जाते. गंमत म्हणजे, परागकणांचा त्रास होणारे हे लोक. त्यांना धुराची मात्र चिंता नसते. आता कल्पना करा किती स्वच्छ असेल त्यांची हवा!!

वाटलं, आपल्याकडं हे का असू नये? आम्ही अनेक बाबतीत पाश्चात्यांचं अंधानुकरण केलं. नको त्या गोष्टी स्वीकारल्या. जपानकडून एवढी गोष्ट घ्यायला काय हरकत आहे?? एवढ्या बाबतीत त्यांचं अनुकरण करू या- आपलं पर्यावरण आणि भवताल ठाकठीक ठेवण्यासाठी !
– अभिजित घोरपडे
Blog- http://www.abhijitghorpade.wordpress.com
Email- abhighorpade@gmail.com

15 thoughts on “आव्वाज करायचा नाय…!

  1. हो आवाज करायचा नाही ! आपल्या येथील आवाजाच्या विरोधात ! ! ! हे सर्वत्रिक सत्य आहे. आपल्या देशात आवाजाचे साम्राज्य लळी, स्थळी, काष्ठी आ्णि पाषाणी असाच प्रकार आहे. जणु मोठ्याने बोलणे आणि कशाचेही मोठमोठे आवाज काढणे जणू जन्मसिध्द अधिकारच आहे. रस्त्याचे तर सोडाच पण हॉटेल्स, बस्स्थानक, रेल्वेस्थानक, सिनेमागॄह कुठे ही जा कर्कश आवाज आणि गोंगाट इतका की, तुम्हाला आपसात बोलणेसुध्दा मुश्कील व्हावे. बाहेरच्या गोंगाटाला कंटाळून जरी घरी आलात तरी शेजारच्या टीहीवरील डाल्बी आवाज ऎकायला मिळेल, शिवाय आजुबाजूला असलेलेली प्रार्थनास्थळे कर्कश आवाजात तुम्हाला प्रार्थना ऎकवतील, यात लहान मुले, आजारी व्यक्ती आणि वॄध्द यांना त्रास होतो आहे काय ? याचा तर अजिबात विचार केला जात नाही. कायदा असूनही त्याची अमलबजावणी होत नाही, हे जसे खरे आहे, त्यापेक्षा याबाबतची शिस्त आम्ही लावून घेऊ ईच्छीत नाही, आणि त्याची आम्हाला गरच वाटत नाही हेच खरे आहे.

  2. अहो होर्न वाजवायचे सोडा भारतीयांनी साधा सिग्नल पाळला तरी पुष्कळ झाल. खर सांगयचे तर भारतामध्ये या बेशिस्तीला अंत नाही. आपल्या सारख्या सम विचारी मंडळींनी अशा लोक्कांवर टीका तरी किती करायची.

  3. krishnat patil says:

    खूपच छान….भारतीयांची अशी मानसिकता तयार होण्यास अजून किती वर्षे जातील कुणास ठाऊक…आणि ती तयार होईल की नाही याचा ठाम विश्वासही नाही.

  4. जपान दौरा करून आल्या बद्दल आपले अभिनंदन. आपल लिखाण नेहमीच माहितीपूर्ण असत. हा लेखही खूप छान…..ही माहिती वाचून एका तरी टाळक्यात प्रकाश पडला तरी तुमचे श्रम कामी पडतील. मी ही गाडी चालवताना होर्नचा वापर करण्याचा प्रयत्न नक्की करेन. माहिती पुरवल्या बद्दल आपले मनापासून आभार…..!!!

  5. The reference of mask tells every thing about the way the country is avoiding pollution. We even cant think of clean air forget about the horns and use of mobile. I hope your experience of the tour must be very good.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s