मेलेल्या नजरा अन् कोरडा विकास (पूर्वार्ध)

दुतर्फा असलेले डेरेदार वृक्ष.. ही आपल्या सर्वच रस्त्यांची ओळख होती. ती आता नाहिशी झाली आहे. नियोजन करणाऱ्यांच्या नजराच मेल्यावर आणखी काय होणार? या नजरा बदलत नाहीत, तोवर हा भकासपणा कायम राहणार.. अगदी असाच!

अभिजित घोरपडे

सांगली-कोल्हापूर रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत शेकडो विशाल वृक्ष तोडण्यात आले..

सांगली-कोल्हापूर रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत शेकडो विशाल वृक्ष तोडण्यात आले..

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातली गोष्ट. उकाडा वाढायला लागला होता, दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता. प्रकाश डोळ्यात खुपायला सुरुवात झाली होती.. अशा वातावरणात महाबळेश्वरहून पुण्याकडं येत होतो. बुलेटवरचा प्रवास होता. महाबळेश्वरही फारसं गार नव्हतं. इतर भागाच्या मानाने बरं होतं.. इतकंच. निघायला उशीर झाला. पसरणी घाट उतरून वाईमध्ये येईपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. वाई सोडलं, पुणेबंगळूर हायवेला आलो. तहान लागली होती. म्हटलं, एखादं झाड बघून थांबू. २०२५ किलोमीटर पुढं गेलो. पण थांबायची इच्छा व्हावी असं डेरेदार झाड कडेला दिसेना. शेवटी नीरा नदीच्या अलीकडं उन्हातच रस्त्याच्या कडेला थांबलो.. घशाची कोरड गेली, पण तहान काही भागली नाही.

पुणेसातारा रस्ता मी लहानपणापासून पाहतोय. तो किती बदललाय? त्याची आता जाणीव झाली. दोन्ही बाजूला मोठाली झाडं. पांढरालालपांढरा पट्टे फासलेली. संख्या इतकी की, ठरवलं तरी मोजता यायची नाहीत. गावी जायचं ते एसटीच्या लाल डब्याने. रस्त्यात दोनतीन वेळा बस बंद पडलेली आठवतेय. दुरुस्ती होईपर्यंत प्रवाशांचा मुक्काम रस्त्याच्या कडेला झाडांखाली. कोणी जेवणं केली, कोणी आडवं होऊन डुलकी काढली, पोरं कैऱ्याचिंचा पाडण्यात दंग. ही झाडं पाहून प्रश्न पडायचाया झाडांचे आंबे कोण उतरवत असेल आणि चिंचा कोण काढत असेल?..

जुन्या काळात डोकावलं की, लहान रस्ते डोळ्यासमोर येतात, पण त्यांच्या दुतर्फा असलेली वृक्षांची गर्दी लक्ष वेधून घेते..

जुन्या काळात डोकावलं की, लहान रस्ते डोळ्यासमोर येतात, पण त्यांच्या दुतर्फा असलेली वृक्षांची गर्दी लक्ष वेधून घेते..

मामाच्या गावाला जाऊ या ..” या गाण्यातली पळती झाडेरस्त्यावरही पाहायला मिळायची. एकटा पुणेसातारा रस्ताच नव्हे, तर सगळीकडंच रस्ता तिथं (दुतर्फा) झाडंहे वास्तव होतं. प्रवासाला कितीतरी जास्त वेळ लागायचा, पण शीण वाटला नाही.. लहान असल्यामुळे असेल कदाचित! पण हे वास्तव होतं.

आता याच रस्त्यावर थांबण्यासाठी झाड सापडू नये?.. हाच रस्ता कशाला ! तीन महिन्यांपूर्वी सांगलीला जात होतो. भल्यामोठ्या हजारो झाडांचे बुंदे आडवे झाले होते. आठदहा महिन्यांपूर्वी हेच कोल्हापूरसांगली रस्त्यावर दिसलं. रस्ता रुंद करताना पन्नासशंभर वर्षांपूर्वीचे डेरेदार वृक्ष तोडले होते. हेच सोलापूर रस्त्यावर झालं, हेच धुळेनाशिक रस्त्यावर आणि इतरत्रसुद्धा. रस्ते रुंद झाले, पण कोरडे ठणठणीत बनले अन् प्रवास रूक्ष!

रस्त्याचे काम होत गेले, तसे एकेका वृक्षाचे अस्तित्व कायमचे पुसले गेले.. त्यांच्या जागी दुसरे वृक्ष लावले जातीलच याची खात्री नाही..

रस्त्याचे काम होत गेले, तसे एकेका वृक्षाचे अस्तित्व कायमचे पुसले गेले.. त्यांच्या जागी दुसरे वृक्ष लावले जातीलच याची खात्री नाही..

झाडं तोडताच कशी? असा प्रश्न विचारणार नाही. शेंबड्या पोरालाही कळतं हो, रस्ता रुंद करायचा म्हणजे काही झाडं तोडावी लागणार. वैयक्तिक कितीही वाटलं, तरी झाडं तोडू नका, असा अट्टाहास करता येणार नाही. कारण आता आपण इतकं पुढं गेलोय की तडजोड करावीच लागणार. वाहतूक खोळंबली तर आम्हीच शिव्या देतो, प्रशासनाची / यंत्रणांची लायकी काढतो. त्यासाठी जरूर रस्ते रुंद करा. मुद्दा एवढाच आहे की, विकास इतका कोरडा का? आणि त्याचं नियोजन करणाऱ्यांच्या नजरा अशा मेलेल्या का?

बरं वाटतं का या रस्त्यांवरून प्रवास करताना? उन्हाळ्याच्या दिवसांत तर बाहेरही बघवत नाही. ज्यांच्या एसी गाड्या आहेत, त्यांचं जरा तरी बरं. इतरांची अवस्था कुत्रा हाल खात नाही.” लाल एसटीवाल्यांचं तर विचारूच नका. झाडं पाहिली की कसं डोळ्यांना बरं वाटतं, पण एवढ्यापुरता हा भावनिक मुद्दा नाही. अशा रूक्ष प्रवासाने आरोग्य बिघडतं. कार्यक्षमताही कमी होते. त्याच्या पलीकडं जाऊन बोलायचं, तर काही सौंदर्यदृष्टी आहे की नाही? रस्त्यांच्या मध्ये रुंद दुभाजक (डिव्हायडर) आहेत. तिथं अर्धीमुर्दी करपलेली रोपं दिसतात. त्यांच्यामुळे मोठ्या झाडांचा गारवा आणि दिलासा कसा मिळणार?

"वृक्ष हे राष्ट्राचे भूषण आहे..." हे खरंच आहे.. पण हे असे वृक्ष??

“वृक्ष हे राष्ट्राचे भूषण आहे…” हे खरंच आहे.. पण हे असे वृक्ष??

रस्ता पूर्ण झाल्यावर लावू की झाडं. वाढतील नंतर. असंही म्हणतील काहीजण. पण जे रस्ते मागेच झालेत त्यांच्याभोवती तरी कुठं झाडांच्या रांगा दिसतात? पुणेमुंबई द्रुतगती रस्ता पूर्ण होऊन दहापंधरा वर्षे उलटली. तिथं किती वाढलेली झाडं दिसतात? कुंड्यांमधली झाडं वृक्ष म्हणून मोजली जातात तिथं. पुणेबंगलोर रस्त्यावर तरी किती झाडं आहेतपुढं सोलापूर, औरंगाबाद, सांगली, नाशिक या रस्त्यांचं वेगळं काय होणार?

काही किरकोळ फरक सोडला तर इथून तिथून सारखीच स्थिती. रूक्ष आणि भकास करून टाकलंय सारं.. तेसुद्धा विकासाच्या नावाखाली. मेलेल्या नजरा आणि नियोजनात कोरडेपणा आहे तोवर हे सुरूच राहणार.. अगदी आहे असंच! अभिजित घोरपडे (इथंच वाचा… आपल्याकडं पूर्वापार झाडं लावली जायची, ती पुण्यकर्म म्हणून. मग तो सम्राट अशोकाचा काळ असो, नाहीतर शिवाजी महाराजांचा. हा इतिहास असताना आपण असे-कसे कोरडे बनलो?… खरंच लाज वाटते आताची स्थिती पाहिली की ! “मेलेल्या नजरा अन् कोरडा विकास  (उत्तरार्ध)” फक्त दोनच दिवसांत…) Email- abhighorpade@gmail.com Blog- www.abhijitghorpade.wordpress.com

8 thoughts on “मेलेल्या नजरा अन् कोरडा विकास (पूर्वार्ध)

 1. Sushama Deo says:

  about cutting trees- the topic of serious concern to all of us. good you are writing this with some proof. waiting for next writeup

 2. Nilesh Ambekar - Thane 98200 32772 says:

  साउथ मध्ये अख्खा झाड मुळा पासून काढून दुसरीकडे परत खणून लावता येत
  ह्याचा व्हिडियो माझ्यकडे होता . शोधून पाठवतो
  १. राजकीय अनास्था
  २. संबधित अधिकारी आणि कॉनट्रकटर यांची मिली भगत
  ३. सर्वात महत्वाच म्हणजे षंड नागरिक
  अभिजित या सर्व विषयावरची जन जागृती अति आवश्यक आहे

  निलेश आंबेकर – ठाणे
  Cell : (+91) 98200 32772

 3. Shashank says:

  ३० वर्षापूर्वी मी विद्यार्थी म्हणून कोल्हापूरच्या आमच्या राजाराम कॉलेज चे मेगझीन कवर डिझाईन केले होते. त्यासाठी युनिव्हरसिटी समोरच्या रस्त्यावरची डेरेदार वड आच्छादित रस्त्याचा फोटो घेतला होता. त्या काळचा फिल्म कॅमेरा असल्यामुळे प्रकाश किरण देखील पुरेसे येत नव्ह्ते! त्याकाळी डेरेदार वृक्षांची अभिजित नि म्हंटले आहे त्या प्रमाणे सर्वत्रच अशी झाडे दुतर्फा होती. हे फोटो बघून चीड आली. Comments करताना तुमची चीड व्यक्त करा . आणि प्रत्येक वेळी वृक्ष तोड दिसली कि तुमचा विरोध दाखवून द्या.

  • शशांक..
   खरंय. हा बदल सर्वत्र झालेला आहे.. त्याला कोणताही भाग अपवाद नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s