पाणी पवित्र आहे, असं मानणारा आपला समाज! घरातल्या पाण्याच्या तांब्याला, रांजणाही पाय लावायचो नाही आपण. आता काय बिघडलं माहीत नाही. पिण्याचे पाणी पुरवणारे आडही आपण सोडले नाहीत. त्यांच्या चक्क संडासाच्या टाक्या करून टाकल्या.. नेमके काय बदल झालेत? समजून घेण्यासाठी “आटपाडीचे शापित आड” ही मालिका…
– अभिजित घोरपडे
(भाग १ : आड ते शौचकूप… एक प्रवास!)
सूर्य मावळला होता. हळूहळू अंधार वाढत होता. मला पुण्याकडं निघायची घाई होती. पण गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे उठावंसंही वाटत नव्हतं.
देशपांडे सांगत होते, “आपण ज्याचं पाणी प्यायलो, पूर्वजही पाणी प्यायले, ज्याचं पाणी देवालाही दिलं. त्याचा असा वापर मला तरी मान्य नाही!”
देशपांडे… केशव लक्ष्मण देशपांडे. निवृत्त मुख्याध्यापक.
मुक्काम– देशपांडे वाडा, आटपाडी, जिल्हा– सांगली.
६४ वर्षांचे गृहस्थ. डोळ्यावर चष्मा. उंच, शिडशिडीत शरीरयष्टी!
त्यांच्याच घरी बसलो होतो. त्यांच्या वाड्यात जुना आड होता. देशपांडे त्या आडाबद्दल बोलत होते. मी शांतपणे ऐकत होतो. ऐकताना बरं वाटलं. मनात म्हटलं, एकतरी माणूस भेटला– आडाचं मोल जाणणारा, त्याची किंमत करणारा!
आटपाडीत प्रत्येक वाड्यात आड होता. आता चुकूनच एखादा दिसतो. आता जास्तीत जास्त आडांचा वापर शौचकूप म्हणून केला जातोय. शौचकूप म्हणजे मैला साठवण्याची टाकी, संडासाची टाकी ! माझ्यासाठी ही बाब धक्कादायक होती. देशपांडे यांच्यासाठी नवी नव्हती, पण ती त्यांना मान्य नव्हती. म्हणूनच ते उद्वेगाने बोलत होते.
सांगली जिल्ह्यात अतिशय कमी पावसाचा तालुका म्हणजे आटपाडी. तिथल्या आडांबद्दल ऐकलं होतं. त्यांची कहाणी मी अनेकांपर्यंत पोहोचवली होती, कधी लेखांमधून तर कधी व्याख्यानांमधून. एप्रिल २०१२ मध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. आटपाडीसुद्धा गेलो होतो. तेव्हा आडांबद्दल ऐकायला मिळालं. पण ते प्रत्यक्ष पाहता आले नव्हते. त्यामुळे काहीसा अस्वस्थ होतो. गेल्या वर्षी (जुलै २०१३)दुष्काळी दौऱ्यावर म्हसवडपर्यंत गेलो होतो. उशीर झाला तरी पुढं आटपाडीला गेलो. कारण माझ्या डोळ्यांनी तिथले आड पाहायचे होते. रात्री पावणेसात–सातच्या सुमारास आटपाडीला पोहोचलो. सोबत होते– जवळच्या बिदाल गावचे अप्पा देशमुख आणि आटपाडीचे सतीश भिंगे. आहे तेवढ्या उजेडाचा फायदा घेत आड पाहायला लागलो.
आटपाडी बरंच जुनं गाव. गावठाणात वाडे होते. प्रत्येक वाड्यातली पाण्याची व्यवस्था म्हणजे आड. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठे आड किंवा विहिरी फारशा नव्हत्या.
हे आड पाहण्यापूर्वी माझी वेगळी कल्पना होती. वाटलं, तिथं चार–दोन आडांच्या संडासच्या टाक्या झाल्या असतील. पाहिलं तर वाड्यावाड्यात हा बदल झाला होता. ते पाहून चाटच पडलो. आम्ही आड शोधत वाड्यांमध्ये फिरत होतो– भिंगे वाडा, दिघोळे वाडा, कुरेशी वाडा… कुठेच वाड्यांमधले आड वापरात नव्हते. बहुतांश आडांचे शौचकूप झाले होते. काहींनी ते बुजवून टाकले होते.
दिघोळे वाडा, भिंगे वाड्यात त्याचे शौचकूप झाल्याचे पाहिले. पद्धतही एकसारखी. आडावर स्लॅब टाकले होते.त्यावर संडास बांधले होते, आता रोजचा मैला आडात साठत होता.
वाड्यात जाण्यापूर्वी शंका होती– लोक हे असं झालेलं दाखवतील का? कदाचित हे सांगायला लाजतील. गेलो तर बरोब्बर उलटा अनुभव. कोणाला काहीच वाटत नव्हतं. लोक आवर्जून आड दाखवत होते. आड हे संडासाच्या टाक्या कधी बनले, हेही स्वत:हून सांगत होते.
दिघोळे वाड्यात भारत दिघोळे भेटले. प्राथमिक शिक्षक. वय ४० वर्षे. त्यांनी सांगितलं, “मी स्वत: या आडातून पाणी काढलंय. गेल्या २०–२५ वर्षांत त्याचा वापर बंद झाला. आम्ही १९९८ मध्ये त्याच्यावर स्लॅब टाकला. त्याची संडासाची टाकी केली..”
बहुतांश आडांच्या नशिबी हेच आलं होतं. कुरेशी वाड्यात जरा वेगळं चित्र दिसलं. तिथं आदम इस्माईल शेख राहतात. त्यांनी सांगितलं की, आता आडाचं काम उरलं नाही, त्यामुळे तो दगड, वाळू टाकून बुडवला. उगाच त्यात कोणी पडायची भीती नको.. बुजवलेल्या आडाचा चौकोनी चौथरा आडाची साक्ष देत होता.
आटपाडीत आडांसाठी ८–१० वाडे पाहिले. सर्व आडांची अवस्था एकसारखी. आडाचा व्यास साधारणत: अडीच ते तीन फूट. खोली ३०–४० फूट.
फक्त एकाच ठिकाणी वापरात असलेला आड सापडला. तोही बराच शोध घेतल्यानंतर. आईसाहेब मंदिराजवळ देशपांडे वाड्यातला हा आड. हा वाडा आटपाडीच्या शुक्र ओढ्याच्या जवळ आहे. या वाड्यात केशव देशपांडे, त्यांच्या पत्नी सौ. अरुणा राहतात. त्यांनी आडांचा उभा–आडवा इतिहास सांगितला. त्यातून आडांमध्ये झालेलं स्थित्यंतर समजलं.. तसंच माणसामध्ये झालेलं सुद्धा !
– अभिजित घोरपडे
(सर्व छायाचित्रे- c@अभिजित घोरपडे)
Email- abhighorpade@gmail.com
Blog- www.abhijitghorpade.wordpress.com
(आटपाडीला पाण्याबाबत स्वयंपूर्ण करणारे आड असे कसे बुजवले गेले? असे कसे नष्ट झाले?… जे काही घडलं ते चमत्कारीक आहे. आपण असंच वागायचं का, याचा विचार करायला लावणारं आहे…
समजून घेण्यासाठी वाचा; आटपाडीचे शापित आड, भाग २… लवकरच, याच ब्लॉगवर.
– अभिजित घोरपडे)
Shocking facts. These are practical realities of life.
Yes Prakash… shocking but true.
Abhida,
Really this is new informatin. Ase kadhi vatale navhata adacha vapar WC ….
But sir it is the fact..
Sir..khup chan zalay.Ranadet indepth reporting shikat asatana…tumache june lekh ani Ravish kumar ( ND TV ) yachi amhi nehami charcha karaycho….mstch.Blog mule yacha anand milat rahtoy …!
Thanx Parimal.. many more to come on this blog.
परीमल.. धन्यवाद.
आता अशा खूप जुन्या खुना माणसांनीच पुसायचं ठरवलं आहे. ज्या माणसांनीच बनवल्या आहेत. तुम्हाला त्याचं महत्त्व वाटलं. आता काही दिवसांनी आठवणीतला ठेवा म्हणून केवळ इतिहासात या गोष्टी दिसतील अशी स्थिती आहे.
खरंय बबन.. तो ठेवा म्हणून उरला तरी आपलं नशीब.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी काही म्हण लहानपणी ऐकली होती.
त्याचाच प्रत्यय येतो आहे . जे आपल्या हातात आहे आपल्या हुशार पूर्वजांनी बनवला आहे .
काही लोकांनी त्या गोष्टीची आधुनिक जीवन शैली च्या नावाखाली वात लावायचा विडा उचलला आहे.
निलेश आंबेकर – ठाणे – ९८२०० ३२७७२
खरंय नीलेश. बदलत्या काळानुसार बदलायला हवंच, पण आपण जुन्या व्यवस्था अशा नष्ट करणार असू तर ते पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे होईल..
Very nice