आंबा विरुद्ध आंबा…

तऱ्हतऱ्हेच्या रंगछटा, चव, आकार, इतर वैशिष्ट्य असलेले आंबे आता दिसतात का? ही विविधता आपल्या डोळ्यांदेखत नष्ट होत आहे. याचं कारण आहेहापूस तसेच, पायरी, केशर, दशहरा, तोतापुरी अशा ठराविकच आंब्यांचं वाढलेलं महात्म्य! या आंब्यांनी बाजार व्यापून टाकला, तशा इतर जाती नष्ट होत गेल्या. एकाच्या मुळावरच जणू दुसरा उठावा. अगदी त्याप्रमाणे..

अभिजित घोरपडे

M01

एखादा गोल गरगरीत, एखादा लांबट केळासारखा, एखादा लिंबाएवढा बारीक, एखादा चपटा, एखाद्याला चोचीसारखं टोक, एखाद्याचं तोंड आवळलेलं!…

रंगसुद्धा तऱ्हतऱ्हेचेकोणी हिरवागार, कोणी काळपट हिरवा, कोणी शेंद्री, पिवळा, तांबूस, सफरचंदाच्या रंगाचा, संत्र्याच्या रंगाचा, पेरूच्या रंगाचा, वर पिवळा खाली हिरवा, संपूर्ण पिवळा बनलेला, ठिपक्याठिपक्यांनी सजलेला!…

चवी तर विचारूच नका.. असंख्य ! खोबऱ्याच्या चवीचा, शेपूच्या चवीचा, आंबट गोड, रसाळ गोड, फिकट गोड, मधासारखा गोड, आंबटपणाचेही कितीतरी प्रकार

इतकंच नव्हेजास्त केसर असलेला, केसर नसलेला, कोयीला गर असणारा, सालीवर गर साचणारा, पातळ रस असलेला, घट्ट रस असलेला, कापून खाण्यास योग्य, चोखून खाण्यास योग्य, तोंड आवळल्यामुळे इतर कुठून तरी फोडावा लागणारा, झाडावर पिकणारा, आडीत चांगला पिकणारा, जास्त पिकला तरी खराब न होणारा, झाडावरच खराब होणारा

यादी मारूतीच्या शेपटसारखी लांबलचक होतेय ना? पण हे काहीच नाही. चार जाणत्या माणसांसोबत बसलं ना.. तर मग विचारायलाच नको. शेकडो प्रकार निघतील आंब्याचे. प्रत्येक भागातला आणि प्रत्येक गावातलासुद्धा.

 

M09M02

काही शंका राहून राहून मनात येतात. आता यातल्या किती जाती उरणार? त्यासुद्धा किती काळ?.. कारण याबाबत परिस्थिती बरी नाही. आंब्यामधली विविधता आपल्या डोळ्यांदेखत नष्ट होत आहे. विविधता संपली.. पण आंबा खायचं प्रमाण फारसं कमी झालेलं नाही.. मग घोड कुठं पेंड खातं? याचं उत्तर आहेहापूस. काही प्रमाणात पायरी, केशर, दशहरा, तोतापुरी अशा ठराविकच आंब्यांचं वाढलेलं महात्म्य! या आंब्यांनी बाजार व्यापून टाकला, सोबत इतर जाती नष्ट होत गेल्या.. एकाच्या मुळावरच जणू दुसरा उठावा. अगदी त्याप्रमाणे.

 

M10M03लहानपणीचे दिवस आठवतात. सातारा जिल्ह्यात गावी किंवा आजोळी. आंबे उतरवले की अंधाऱ्या खोलीत पिकायला ठेवायचे. पिकले की खोलीभर पसरायचे. मग पाहिजे ते आंबे उचलायचे, पाटीत भरायचे आणि दिवसभर चोखत राहायचे. कधी या चवीचा, तर कधी त्या. मी खाल्लेले आणि आठवत असलेली नावंही बरीच आहेतकाळ्या, लोद्या, गोटी, खोबऱ्या, शेपू, केळ्या, शेंद्री, लाल्याप्रत्येक जात दुसऱ्यापेक्षा वेगळी. रंग, चव, आकार, साल, कोयीचा आकार, गर कमीजास्त असणं, लवकर पाड लागणं, झाडावरच पिकणं, लोणच्याचा, आमरसाचा.. फरक दाखवणारे सतराशे घटक.

छोटीशी का असेना, प्रत्येकाला स्वत:ची ओळख होती.

हापूस... खरंच देखणा आणि चविष्ट, पण त्याच्यामुळे इतर आंब्यांकडे कोणी पाहिनासे झालेय.

हापूस… खरंच देखणा आणि चविष्ट, पण त्याच्यामुळे इतर आंब्यांकडे कोणी पाहिनासे झालेय.

त्या वेळी हापूसचं नाव नुसतं ऐकायला मिळायचं. पुण्यात आलं की बघालाही मिळायचा. पण तो खायला मिळायचा नाही. तशी गरजही वाटयची नाही.. आणि आता??

आता सगळीकडं हापूस आणि पायरी! त्याच्या पलीकडं विश्वच नाही. पुण्यामुंबईपासून ते थेट ग्रामीण भागापर्यंत त्यांचा शिरकाव. चुकूनच कुठं तरी इतर आंब्याचं दर्शन घडतं.. शहर सोडून थोडंसं बाहेर गेलं किंवा एखाद्या गावच्या आठवडे बाजारात हिंडलं की हे आंबे दिसतात. तऱ्हतऱ्हेचे, पण बिना नावाचे. पाटीत अंग चोरून बसलेले आणि ग्राहकाच्या प्रतिक्षेत पडून राहिलेले. काही दिसायला अतिशय आकर्षक असतात. हापूसपायरीच्या गर्दीत ते लक्षही वेधून घेतात.

अलीकडेच सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन या संस्थेनं एक सर्वेक्षण केलं. पश्चिम घाटातील आंब्याच्या जातींची नोंद केली. त्यासाठी शाळांमधील इको क्बलस्च्या विद्यार्थ्यांची मदत घेतली. त्यात त्यांना दोनशेहून जास्त जाती नोंदवता आल्या. अर्थात हे मुलांच्या मदतीनं केलेलं काम. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी जास्त जाती आहेत. त्यांना आढळलेल्या जातींमध्येही तऱ्हतऱ्हेची वैशिष्ट्यं आहेत. रंग, आकार, चव, दिसणं यावरून अनेक प्रकार आहेत. खूपच छान उपक्रम होता हा.

"सेंटर फॉर एन्व्हायन्मेंट एज्युकेशन"च्या सर्वेक्षणात स्थानिक आंब्यांच्या दोनशेहून अधिक जातींची नोंद करण्यात आली..

“सेंटर फॉर एन्व्हायन्मेंट एज्युकेशन”च्या सर्वेक्षणात स्थानिक आंब्यांच्या दोनशेहून अधिक जातींची नोंद करण्यात आली..

या आंब्यांच्या जातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न होतही आहेत. त्यांची रोपं तयार करून ती लावली जात आहेत. त्याने फरक पडेल, पण तो फार मोठा नसेल. या विविधतेबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करायला पाहिजे. त्यांना ते पटवून दिलं पाहिजे. पण या गोष्टी टिकण्यामध्ये अर्थकारण महत्त्वाचं ठरतं. सगळीकडं हापूस, पायरी, केशरचा बोलबाला कशामुळे झाला? तर त्यांच्यामुळे पैसे मिळतात या एकाच कारणामुळे. म्हणूनच तर गेल्या दोनअडीच दशकांपासून सगळीकडंच एक बदल दिसतो. इतर झाडं काढून हापूस लावण्याची पद्धत रूढ झाली. अनेकांना असं करणं आवडलंही नसेल. तरीही हे होत गेलं. कारण ज्याला बाजार आहे, ते स्वीकारणं स्वाभाविक आहे. मुद्दाम जपायचं म्हणून काही जण प्रयत्न करतीलही, पण ते मोजकेच असतील.

मग यावर उत्तर काय? सरकारी किंवा संस्थात्मक पातळीवर यावर प्रयत्न व्हायला हवेत. या जातींची विविधता जपण्यासाठी उपक्रम हवेत. तसे कुठं कुठं होतही आहेत. पण आपणही त्यात हातभार लावू शकतो. ग्राहक राजा बनून खारीचा वाटा उचलू शकतो. नुसतंच हापूस, पायरीच्या लाटेत कशासाठी वाहत जायचं? स्थानिक जातीच्या आंब्याची एखादी पाटी खरेदी करा, मग बघा तो आंबा बाजारात टिकून राहील.. आणि शेतातसुद्धा !

केवळ हापूस उरला, तर आंबा चोखून खाल्ला जातो.. हे कोणाला पटणारही नाही..

केवळ हापूस उरला, तर आंबा चोखून खाल्ला जातो.. हे कोणाला पटणारही नाही..

 

या जाती कमी होऊन शेवटी फक्त हापूस उरला तर.. तर वाटतंआंबे चोखूनही खाल्ले जातात, हे पुढं फक्त पुस्तकात वाचावं लागेल. पुरावा म्हणून त्याचं प्रात्यक्षिक दाखवणारी एखादी क्लिप पाहावी लागेल.. कदाचित !

 

 

 

(ता..-

हापूस, पायरीची चव उत्तमच आहे. त्याबाबत वादच नाही, पण आंब्याच्या स्थानिक जातींचीसुद्धा आपली आपली मजा आहे.. ती चवही चाखायला पाहिजे, टिकायला पाहिजे. इतकंच!)

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

(छायाचित्रे@ सौजन्य- सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन, पुणे)

12 thoughts on “आंबा विरुद्ध आंबा…

 1. sanket kulkarni says:

  लेख आणि माहिती मस्तच आहे. स्थानिक आंबे अजूनही घाटावर, मराठवाड्यात,
  खान्देशात आणि विदर्भात चांगलेच टिकून आहेत. तेही टिकतील असे वाटते.

  • धन्यवाद संकेत..
   टिकले तर छानच.. पण त्यांची संख्या बरीच कमी झालीय, अजूनही कमी होतेय.

 2. Nilesh Ambekar - Thane 98200 32772 says:

  अभिजित
  माझ्यातर नावातच आंबा आहे. तू जे बोललास ते एकदम बरोबर कोकणात सुद्धा बरर्याच जाती आहेत . पण अस जाणवत की राजा राजा म्हणून हापूस कडेच लक्ष आणि बाकी जातीन कडे दुर्लक्ष
  मला तर वाटत माणसांमधल “जाती भेदाचे” खूळ आंब्यांच्या मुळावर आलय. रायवळ आम्ही त्याला बीटकी म्हणतो पिल्लू आंबा पण आंबट गोड चव. पण कोकणात त्याला काळ कुत्रा पण विचारात नाही. काही आंबे फक्त लोणच्याचे तर काही खोबराम्बे म्हणजे अर्ध कच्चे असताना खायचे . पण खालॆत तर कळणार न
  असो यावर्षीचा सिझन संपत आला आहे पुढील वर्षी तरी बाकीच्या आंब्यांना न्याय देवूया
  निलेश आंबेकर – ठाणे 98200 32772

 3. Deepak Modak says:

  अभिजित, लहानपणी कोकणात असताना खूप वर्षे बिटक्याच चोखून खाल्ल्यात. पण नंतर गेल्या कित्येक वर्षात ते सारं विसरून जायला झालंय खरं. पण आज तुझा ब्लॉग वाचला आणि बिटक्या चोखायची खूप इच्छा झाली. कुठे मिळतील?

  • धन्यवाह सर.
   पुण्यातही मिळतील कदाचित.. पण पुणं सोडून थोडं बाहेर गेलं की एखाद्या आठवडे बाजारात नक्की..

 4. sushama karve says:

  you said it! it is actually boring to eat either hapus or pairy all through the season. please tell me where to find them.

  • Thanks for your comments kaku.

   U may find it somewhere in mandai also. If not have to travel little away from city and visit some Athawade Bazar. There mango varieties definitely will be there..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s