मान्सून आला. बरीच वाट पाहायला लावली, पण आला एकदाचा. नेहमीप्रमाणे त्याच्या स्वागताला सज्ज आहेच. म्हटलं या वेळी काही तरी वेगळं करू. त्याचे अनेक पैलू आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मालिका सुरू करतोय– “मान्सून रंग” या नावाने. ही सुरुवात आजपासून…
– अभिजित घोरपडे
काळे ढग, वाहणारा वारा, पावसाच्या सरी अन् चिंब वातावरण… एका सायंकाळी असं वातावरण अवतरलं. आधी चार–पाच दिवसही असंच सुरू होतं. सकाळी हवेत उष्मा असायचा, पण दुपार झाली की वातावरण बदलायचं. अंधारून यायचं. दुपार पुढं जाईल, तसं वातावरण आणखी दाट व्हायचं. मग एकच धडाका– काही काळ गडगडाट. सोबतीला विजांचा कडकडाट.. थरकाप उडवणारा! त्यातच पाऊस सुरू व्हायचा. सारं गप्प गार करूनच थांबायचा.
पाऊस तर पडत होता, पण मान्सून आल्याचं जाहीर केलं जात नव्हतं. आता आणखी काय हवं होतं मान्सूनच्या आगमनासाठी? की, तो आला तरी हवामान विभागातील मंडळी झोपली होती.. नेहमीसारखी? पाऊस तर पडतो, पण हवामान विभाग सांगतो– तो मान्सूनचा नाहीच! हे असं का?.. सामान्य माणसाला नेहमीच पडणारा हा प्रश्न!
पण त्याला उत्तरही आहे. नुसता असा पाऊस पडला म्हणजे मान्सूनचं आगमन झालं, असं नुसतंच मुळी. पावसाची रूपं अनेक. त्यात मान्सूनचा पाऊसही वेगळा. त्याच्या आधी उन्हाळ्यात पडणारा वळीव आणि मान्सूनचा पाऊस याच बराच फरक असतो. वळीव असतो उथळ, खळखळाट करणारा. याउलट मान्सून शांत, दमदार, खोली प्राप्त झाल्यासारखा. म्हणूनच तो उतावीळ असलेल्या वळिवाला आधी शांत होऊ देतो. मगच हजेरी लावतो. या पावसाच्या खेळातली सर्वांत अनोखी गोष्ट म्हणजे– गरजणारा वळीव जाऊन त्याची जागा मान्सूनच्या संततधार पावसानं घेणं! खरंच हे स्थित्यंतर पाहणं आणि अनुभवणं आनंददायी असतं.
मान्सून उंबरठ्यावर आल्याची वर्दी देण्यासाठीच जणू वळीव बसरतो. गरडणारे ढग आणि कडाडणाऱ्या विजा हे त्याचे साथीदार.. अगदी विश्वासू. दुपारपर्यंत वातावरण चांगलंच तावतं. अगदी नको नको होतं. त्यानंतर वळीव तडाखा देतो. धो धो कोसळतो. हा कधी सरळ नसतो. वाकडा, तिरका, वाट्टेल त्या दिशेनं येतो. रस्त्यांवर पाणी साठवून–घरांमध्ये शिरून दाणादाण उडवतो. सोबतीला वाऱ्याला घेऊन काही झाडं आडवी करतो. पिकं झोपवतो. जमलंच तर विजा पाडून चार–दोन बळीसुदधा घेतो.. एकाच झपाट्यात ढग रिकामा आणि आकाश पुन्हा नागवं! इतकं सारं करत असला तरी हा ‘गल्लीतला वाघ‘.
एखाद्या गावात एकाच झटक्यात वर्षभराचं पाणी देतो, पण शेजारच्या गावात पायवाट तरी ओली होईल का, याची खात्री नसते. उन्हाळ्याच्या अखेरीस “दुपारपर्यंत टोचणारं ऊन, मग त्यावर उतारा म्हणून झोडपणारा पाऊस“.. असं होता–होता जूनमध्ये ढगांचं मळभ दाटतं. ते येतं, घट्ट पाय रोवून बसतं. संपूर्ण वातावरणाचा ताबा घेतं, साथीला वारा असतो.. शांत–संथ पाऊससुद्धा!
जून महिन्याची सुरुवात होती. मला तो दिवस चांगलाच आठवतोय. तिन्ही सांजेला पाऊस गर्जतच सुरू झाला. थोडा थांबून रात्री पुन्हा सुरू झाला. उशिरापर्यंत पडत राहिला, काहीसा शांतपणे. हो! इथं जाणवलं स्थित्यंतर होताना. नकळत बोलून गेलो– आला मान्सून ! झोप लागेपर्यंत संततधार सुरूच होती. सकाळी काय चित्र असेल याची उत्सुकता लागून राहिली होती. सकाळी उजाडली ती ढगांच्या गर्दीतच. त्यांच्याआड सूर्य दडलेला. संथ वारा. सरी थांबलेल्या, पण वातावरण चिंब पावसाळी. शांत–निवांत. पावसाचं रूपही बदललं होतं.
आता हवामान विभाग काय सांगणार हे पाहायचं होतं. त्यांचं ठराविक गणित असतं. शास्त्रीय आणि बरंचसं तांत्रिकसुद्धा. किती ठिकाणी पाऊस झाला, किती प्रमाणात झाला, वाऱ्यांचा–ढगांचा पट्टा पुढं सरकला का, वाऱ्याची दिशा काय, हवेत आर्द्रता किती असे तांत्रिक प्रश्न तपासले गेले. मग काहीसं उशिरानेच मान्सून आल्याचं जाहीर केलं.. गंमत अशी की, मान्सून त्यांच्या घोषणची वाट पाहात थांबला नव्हता. तो रात्रीच दाखल झाला होता, साऱ्या जगाला झोपेत ठेवून. अगदी बेमालूनपणे!
(इथं ‘मान्सूनचा पाऊस‘ असा उल्लेख जाणीवपूर्वक केला आहे. मान्सून म्हणजे पाऊस नव्हे. त्याचा अर्थ– मोसमी वारे. हंगामानुसार आपल्याकडं येणारे आणि हंगाम संपला की आल्या वाटेनं माघारी परतणारे! हे वारे सोबत बाष्प घेऊन येतात. त्यांच्यामुळे पाऊसही मिळतो. म्हणून हा मान्सूनचा पाऊस. आपण मोघम बोलतो खरं, पण नुसता मान्सून म्हणजे पाऊस नव्हे!
पुढचे काही दिवस तो अनुभवता येईलच. शिवाय उन्हाळी पावसाच्या बीजातून तो कसा आकार घेतो, हेही पाहता येईल…)
– अभिजित घोरपडे
Email- abhighorpade@gmail.com
नमस्कार अभिजित,
खूप छान लिहिलं आहे. मनपुर्वक शुभेच्छा
शैलेश निपुणगे
धन्यवाद..
Farach sundar. Oghawati bhasha ahe….
धन्यवाद पाटील..
Nice article.
Thanx..
सुंदर.
खूपच सुंदर वर्णन आहे.
Thanx Aditi..
Very well written article. Your blogs are always very informative, interesting and reader friendly.
Thanks sir.
Thank you Prashant..
Dear Sir, farch sundar lekh. Agdi yogya vel sadhun alay. -prashant.
Thanx Prashant.. keep in touch.
अभिजित मान्सून रंग क्या बात है . मस्तच विषय निवडला आहे.
त्यामुळे ह्या मालिकेतील उर्वरित भागांची उत्सुकता वाढली आहे
तुझ्याच भाषेत संततधार,शांत,दमदार,पावसाची आतुरतेने वाट बघत आहोत.
निलेश आंबेकर – ठाणे – 98200 32772
Thanx Nilesh.. Hmm me pan vaat pahatoy.
Dear Abhijit, very aptly described, in a steady & continued tone like monsoon. You have captured the right mood, & explained the difference so simply. We await your series. All the best.
Thank you madam…
Yes, other parts will follow soon.
मान्सून आणि वळीव पावसाचे सोप्या आणि सुलभ भाषेत सांगितलेले वर्णन कुपाच आवडले
धन्यवाद..
वाचत राहा. प्रतिक्रिया देत राहा.