धोंडी धोंडी पाणी दे… (मान्सून रंग- ३)

पाऊस पडावा यासाठी अजूनही धोंडी, शंकोबा यासारख्या प्रथा आहेत. बेडकांचीगाढवांची लग्नं लावली जातात. देवाला बंदी बनवलं जातंया अंधश्रद्धाच. पण त्या लोकांची जगण्याची उमेद टिकवून ठेवायच्या. आता परिस्थिती बदललीय. आपल्या गरजा वाढल्यात किंवा त्या आपण वाढवून ठेवल्यात. त्यामुळे आम्हाला नेहमीचा पाऊसही पुरत नाही, मग धोंडी / शंकोबामुळे चार सरी (कल्पनेत) पडल्या तरी त्या आमची कितीशी गरज भागवणार?

अभिजित घोरपडे

पावसासाठी सजले बेडूक नवरा-नवरी अन् लागलं बेडकांचं लग्न..

पावसासाठी सजले बेडूक नवरा-नवरी अन् लागलं बेडकांचं लग्न..

पाऊस चेहऱ्यावर हसू फुलवतो, तसा लोकांना रडवतोसुद्धा.

कसा?.. हे सध्या पाहायला मिळतंय. संपूर्ण जून महिना कोरडा. धरणं आटत चाललीत. पुण्यामुंबईतसुद्धा पाण्याची कपात सुरू झालीय. मग इतर भागांची काय गतपाऊस पडेना म्हटल्यावर सगळीकडंच वेगवेगळे प्रयत्न सुरू झालेत. कृत्रिम पावसाच्या शक्याशक्यतेबाबत चर्चा सुरू आहेत..

इकडं नियोजनव्यवस्थापनाची तयारी सुरू असताना काही भागात वेगळं चित्र आहे. श्रद्धेपोटी परंपरागत उपाय केले जात आहेत. ठिकठिकाणी पावसासाठी यज्ञ सुरू झालेत. परवाच पिंपरीचिंचवडमध्ये असा यज्ञ झाला.

अकोल्यातली धोंडीची प्रथा आठवड्यापूर्वी पाहायला मिळाली. कमरेला लिंबाचा पाला, खांद्यावर कावड घेतल्याप्रमाणे काठी, त्याला उलटा लटकवलेला बेडूक, वाद्य वाजवणारे काही जण, मागं पोतं घेऊन धान्य गोळा करण्यासाठी काही लोक.. अशी मंडळी पाऊस मागण्यासाठी दारोदारी फिरत होती. ते दारात आले की त्यांच्या अंगावर पाणी ओतलं जात होतं..

कुठं यज्ञ केले जातात, तर कुठं आणखी काही.. दोनच दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे पावसासाठी असा महायज्ञ झाला. (फोटो@राजेश स्टीफन)

कुठं यज्ञ केले जातात, तर कुठं आणखी काही.. दोनच दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे पावसासाठी असा महायज्ञ झाला. (फोटो@राजेश स्टीफन)

पावसाला बोलावण्यासाठी आपल्याकडं अशा अनेक प्रथा आहेत. त्या सर्वच भागात दिसतात. वेगवेगळ्या अन् चित्रविचित्र. विदर्भात धोंडीदिसते. तसा पश्चिम महाराष्ट्रात शंकोबा! विवस्त्र पोरं डोक्यावर पाट घेऊन दारोदारी फिरतात. त्या पाटावर चिखलाचा शंखाकृती शंकोबाअसतो. त्याच्यावर बायका पाणी ओततात आणि चांगल्या पावसासाठी साकडं घालतात.

 

काही प्रथांमध्ये थेट देवालाच वेठीला धरलं जातं. “महादेव कोंडणंही त्यापैकी एक. गावागावात किंवा पंचक्रोशीत महादेवाचं जुनं देऊळ असतंच. तिथं महादेव कोंडला जातो. गाभाऱ्यात महादेवाची पिंड असते. गाभारा पाण्यानं भरला जातो. पिंड पाण्याखाली गेली की, देवळाची दारं बंद केली जातात. पावसाच्या सरी पडेपर्यंत महादेवाला असं बंदी केलं जातं. कधी मारुतीवर, तर कधी गणपतीवर ही वेळ येते. असं केलं की पाऊस पडतो ही लोकांची धारणा!

याच्या पलीकडं काही गमतीशीर प्रथासुद्धा आहेत. असं मानतात की, बेडकांची किंवा गाढवांची लग्न लावली की पाऊस पडतो. बेडकांची लग्न लावणं देशाच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळतं. त्यासाठी बेडकं शोधून त्यांची लग्न वाजतगाजत लावली जातात. सोलापूर, नगर, सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात गाढवांची लग्न लावली जातात. त्याबाबत अख्यायिकासुद्धा आहे. पाऊस हा वरुणदेवाचा प्रांत. त्याच्या मर्जीनुसार पाऊस पडतो. एके वर्षी पाऊस पडलाच नाही. त्या वेळी ऋषीमुनींनी वरुणदेवाला विनंती केली. तरीही त्यानं ऐकलं नाही. शेवटी ऋषी मंडळींनी निषेध म्हणून गाढवाची लग्न लावली. तेव्हा वरुणदेवानं माघार घेतली आणि पाऊस पाडलाम्हणून असं समजलं जातं की, गाढवांची लग्न लावली की पाऊस पडतो.

बेडकं अन् गाढवांची लग्नं लावली की पाऊस पडतो का? तरीसुद्धा हे केलं जातं.. का? कशासाठी?

बेडकं अन् गाढवांची लग्नं लावली की पाऊस पडतो का? तरीसुद्धा हे केलं जातं..
का? कशासाठी?

याशिवाय काही भागात पावसाला वाजतगाजत आणलं जातं. आकाशात ढग आहेत, पण पाऊस पडत नसेल, तेव्हा हे केलं जातं. ढग असतील तिकडं गावचे लोक जातात. तिथून वाजतगाजत वेशीपासून येतात. त्यांच्यासोबत पाऊस येतो, असं मानलं जातं. काही वेळा असा पाऊस पडल्याचं लोक सांगतात. त्या वेळी देवाच्या नावाचा भंडारा करून गावाला जेवणं घातलं जातं..

या प्रथा म्हणजे अंधश्रद्धाच. तरीही त्या का केल्या जात होत्या? त्यामागचं प्रमुख कारण मानसिक असावं. मागं गुजरातेत कच्छच्या रणात गेलो होतो. कच्छ हाही कमी पावसाचा प्रदेश. तिथं शंभूदान गढवी नावाचे गृहस्थ भेटले. त्यांच्याकडूनही या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते म्हणाले की, खडतर परिस्थितीत माणसाला आशा टिकवून ठेवावी लागते. आज नाही तर उद्या बरे दिवस येतील, या विश्वासावरच तो जगत असतो. वेळ मारून नेण्यासाठी असं काही करावं लागतं. कधी योगायोग म्हणून पाऊस पडतोसुद्धा. मग या प्रथांवरचा विश्वास आणखी दृढ होतो..

हा झाला इतिहास!

आता परिस्थिती कमालीची बदलली आहे. धोंडीने किंवा शंकोबाने पाऊस दिला तरी आपल्याला त्याचा उपयोग नाही. कारण पूर्वी योगायोग म्हणून पडलेला पाऊससुद्धा दिलासा द्यायचा. कारण तेव्हा गरजा कमी होत्या, लोकांना सहन करण्याची, वाट पाहण्याची सवय होती. दु:खावर फुंकर मारण्यासाठी थोडासा दिलासासुद्धा पुरायचा. पण आता सारंच बदललंय. गरजा वाढल्यात म्हणा किंवा वाढवून ठेवल्यात म्हणा.. त्यामुळे नेहमीचा पाऊसही पुरत नाही, मग धोंडीच्या / शंकोबामुळे चार सरी (कल्पनेत) पडल्या तरी त्या आमची कितीशी गरज भागवणार?

अभिजित घोरपडे

ई-मेल- abhighorpade@gmail.com

3 thoughts on “धोंडी धोंडी पाणी दे… (मान्सून रंग- ३)

 1. Deepak Modak says:

  जिम कोर्बेट च्या एका पुस्तकात (आता नाव आठवत नाही), हिमालयातील अशा एका माणसाचे वर्णन वाचल्याचे आठवते. तो विशिष्ठ झाडपाला घेऊन मंत्र म्हणत गेला, कि त्याच्या मागोमाग पाऊस जायचा आणि ठराविक काळात हमखास पडायचाच. खरं असेल हे? आणि आता अशी माणस भेटतील आपल्याला?

 2. Nilesh Ambekar - Thane 98200 32772 says:

  ह्या प्रथा म्हणजे अंधश्रद्धेचा कळस आहे.
  २१व्या शतकात सुद्धा आपण काय करायला पाहीजॆ ह्याचा विचार करत नाही हे दुर्भाग्य.
  शंखोबाच याना सुबुद्धी देवो.
  निलेश आंबेकर – ठाणे ९८२०० ३२७७२

 3. रविंद्र माने says:

  गरजा वाढल्या म्हणून पाणी पर्यायाने पावसाचे पाणी कमी पडू लागले हेच खरे आहे ़ धरणे , तलाव बांधले तरी पाणी पुरेना.कधी काळी खूप पाणी होते म्हणे़ लोकसंख्या आणि गरजा वाढल्या आहेत़ त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोयनेतील पाणी बंद केल्यानंतर क्रुष्णानदी कोरडी पडली़

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s