मान्सूनच्या पावसाचं वर्णन करावं लागतं, “सुख थोडं, दु:ख भारी…” कारण भारतात गेल्या ११३ वर्षांच्या काळात फक्त १३ वर्षं अतिवृष्टीची ठरली आहेत. याउलट २० वर्षं दुष्काळाची ठरली आहेत. गेल्या २० वर्षांत एकही अतिवृष्टीचं वर्ष अवतरलं नाही, तर दुष्काळाची तीन वर्षं सोसावी लागली आहेत… म्हणूनच पावसाचं हे वर्णन !
– अभिजित घोरपडे
जम्मू–काश्मीरमध्ये पुराने थैमान घातलं. तिथं शंभर वर्षातल्या मोठ्या पुराला सामोरं जावं लागलं. मधल्या काळात गंगेच्या खोऱ्यात पुरामुळे झालेलं नुकसान सोसावं लागलं. महाराष्ट्राबद्दल सांगायचं, तर आता पावसाची परिस्थिती सुधारलीय. अगदी अलीकडंपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाण्याची टंचाई होती. आता मराठवाडा वगळता इतरत्र पाण्याची उपलब्धता आहे. मराठवाड्यातसुद्धा सुरुवातीसारखी वाईट स्थिती नाही… हे असं असलं तरी संपूर्ण देशाचा विचार करता पाऊस अपुराच आहे. आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ११ टक्के अपुराच पाऊस झाला आहे. पावसाळा संपायला अजून आठवडा बाकी आहेत, पण पावसाच्या आकड्यात फार मोठा बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे वर्षसुद्धा अपुऱ्या पावसाचंच म्हणायचं.
या निमित्तानं मान्सूनच्या पावसाचं एक वैशिष्ट्य मांडावंच लागेल. ते आहे, “सुख थोडं, दु:ख भारी..” पावसाच्या नावानं उगाचच रडण्याचं कारण नाही. पण हे वास्तव आहे. देशाच्या पावसाचं शंभर वर्षांची आकडेवारी हेच सांगते. पावसाच्या गेल्या ११३ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकू. म्हणजे १९०१ पासूनची आकडेवारी. त्याला संदर्भ आहे– भारतीय हवामान विभागाचा. ही आकडेवारी टक्केवारीत आहे. भारतात मान्सूनच्या काळात सरासरी किती पाऊस पडतो आणि प्रत्यक्षात किती पाऊस पडला… याबाबतची ही आकडेवारी.
सरासरीच्या १० टक्के जास्त पाऊस पडला तर ते “एक्सेस मान्सून रेनफॉल इयर” असं म्हटलं जातं. याउलट सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस त्याला “डेफिशिअंट मान्सून रेनफॉल इयर” असं म्हटलं जातं. त्यांना आपण अतिवृष्टीचं आणि दुष्काळी वर्ष असं म्हणू या.
हवामान विभागाची आकडेवारी असं सांगते की, गेल्या ११३ वर्षांत काळात फक्त १३ वर्षं अतिवृष्टीची ठरली आहेत. याउलट २० वर्षं दुष्काळाची ठरली आहेत. या दुष्काळी वर्षांमध्ये आताच्या २०१४ या वर्षाची भर पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे अतिवृष्टीची वर्षं आणि दुष्काळी वर्षं यांचं प्रमाण असेल, १३ : २१
ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण देशाचा विचार करता गेल्या वीस वर्षांमध्ये एकदाही अतिवृष्टीचं वर्ष अवतरलेलं नाही. यापूर्वी १९९४ मध्ये असं वर्ष होतं. त्यानंतर अशा वर्षाची अजूनही प्रतिक्षाच करावी लागते आहे. उलट गेल्या वीस वर्षांत दुष्काळाची तीन वर्षं सहन करावी लागली आहेत. ही वर्षं आहेत– २००२, २००४ आणि २००९. त्यात कदाचित २०१४ या वर्षाचीसुद्धा भर पडेल.
खरं तर सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस काय किंवा कमी पाऊस काय?.. दोन्हीमुळे नुकसान होतंच. पण अतिवृष्टीच्या वर्षात पावसाचा अपुरा कोटा भरून निघतो. एवढ्यासाठी अतिवृष्टीला चागलं म्हटलं आहे.. इतर कोणत्याही उद्देशाने नव्हे!
.
(जास्त पावसाची वर्षे व पावसाची टक्केवारी-)
१९१४- ११०.४ टक्के
१९१६- ११३.२ टक्के
१९१७– १२२.९ टक्के
१९३३- ११५.१ टक्के
१९४२- ११३.८ टक्के
१९५५– ११०.१ टक्के
१९५६- ११३.६ टक्के
१९५९– ११४.३ टक्के
१९६१– १२१.८ टक्के
१९७०– ११२.२ टक्के
१९७५– ११५.२ टक्के
१९८३– ११३.० टक्के
१९८८– ११९.३ टक्के
१९९४– ११०.० टक्के
(दुष्काळी वर्षं आणि पावसाची टक्केवारी)
१९०१- ८६.९ टक्के
१९०४- ८८.२ टक्के
१९०५- ८२.६ टक्के
१९११- ८५.३ टक्के
१९१८- ७५.१ टक्के
१९२०- ८३.२ टक्के
१९४१– ८६.७ टक्के
१९५१- ८१.३ टक्के
१९६५- ८१.८ टक्के
१९६६- ८६.८ टक्के
१९६८- ८९.७ टक्के
१९७२- ७६.१ टक्के
१९७४- ८८.० टक्के
१९७९- ८१.० टक्के
१९८२- ८५.५ टक्के
१९८६– ८७.३ टक्के
१९८७– ८०.६ टक्के
२००२– ८०.८ टक्के
२००४– ८६.२ टक्के
२००९– ७८.२ टक्के
२०१४– ८९.० टक्के (२३ सप्टेंबरपर्यंत)
– अभिजित घोरपडे
ई-मेल- abhighorpade@gmail.com
अभिदा ,
मस्तच. !
ज्ञानात खूप भर पडली।
Thanx Sir…
Thanks Sir Good Information
धन्यवाद…
अभिजित, हेच थोड्या वेगळ्या दृष्टीने मोजलं तर? म्हणजे असं, कि ११३ वर्षात १३ वर्ष अतिवृष्टीची आणि २० वर्ष दुष्काळाची, अर्थात ८० वर्ष योग्य पावसाची. म्हणजेच योग्य पावसाच्या वर्षांची टक्केवारी येते ७१%. त्यातही अतिवृष्टीचा दुष्काळाइतका त्रास होत नाही. थोडक्यात अतिवृष्टीच व्यवस्थापन करता येईल. प्रश्न आहे तो दुष्काळाचा. दुष्काळाची टक्केवारी १८% येते. (२०/११३). मग आपण हे १८% दुष्काळाच व्यवस्थापन कस करता येईल यादृष्टीने गेल्या ५० वर्षात काहीच केलं नाही असं अनुमान निघत का? ८० % काळाची योग्य पावसाची हमी देणाऱ्या निसर्गाची भलावण केलीच पाहिजे. आपण कुठे कमी पडतो, आणि त्यासाठी काय आणि कसं करता येईल याचा विचार आवश्यक ठरतो.
मोडक साहेब, धन्यवाद.
.
तुमचा दृष्टिकोन आवडला.
.
निसर्गाची भलावण केली किंवा केली नाही तरी जे तो देतो, तेच आणि तेवढंच घ्यावं लागतं हे मात्र निश्चित.
“सुखं थोडं…” म्हणायचं कारण इतकंच की आपलं नियोजन / व्यवस्थापन फसतंय-चुकतंय किंवा ते होतच नाही… अन्यथा जे मिळतं त्याचं सोनंसुद्धा करता येतं !!!
अभिजित.. छान… हायसं वाटलं तुझी आकडेवारी ऐकून.
Thanx Shubhada..