यंदा कोजागरी पौर्णिमेला चंद्र ढगाआड होता. केवळ या वर्षीच नाही, तर गेली पाच–सात वर्षं असाच अनुभव येतोय. कोजागरीचा चंद्रच आमच्यावर रुसलाय का? की हे हवामानातले बदल म्हणायचे? यावरून लगेचच कोणताही निष्कर्ष काढायचा विचार नाही. पण पुढच्या वर्षी कोजागरीला चंद्राचं दर्शन होईलच, हे मात्र ठामपणे सांगता येणार नाही. आणि हो, हे पुण्यापुरतंच मर्यादित नाही, तर सर्वच भागात घडत असावं.
मग सांगा, आपला कोजागरीचा काय अनुभव आहे?
– अभिजित घोरपडे
कोजागरीचा सण उत्साहाचा.. पण या वेळची कोजागरी नीरसच म्हणायची. तीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राभर. एवढं दूध आटवलं, रात्र जागवली, पण चंद्रानं काही दर्शन दिलंच नाही. दुधाच्या पातेल्यात त्याचं प्रतिबिंब दिसलं नाही. शेवटी नाईलाज झाला.. तसंच दूध पिऊन घेतलं. पुण्यापासून मुंबईपर्यंत, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत ते अगदी धुळ्यापर्यंत सगळीकडंच ढगाळ वातावरण होतं. मोजके भाग्यवंत वगळता सगळीकडं हे असंच.
ऑक्टोबरची सुरुवात झाली तरी हे असं? उन्हाचा चटका नाही. उकडतंय, पण ते ढगाळ वातावरणामुळं. नेमका अर्थ तरी काय लावायचा याचा?
आणि हो.. हे आजचंच नाही. गेली किमान पाच–सात वर्षं असंच सुरू आहे. चांगलं आठवतंय मला. खरं तर पुण्याच्या हवामानाचं गणित ठरलेलं होतं. जूनमध्ये पावसाची सुरुवात, जुलै–ऑगस्टमध्ये धो–धो पडायचा, सप्टेंबर म्हणजे पाऊस ओसरायला सुरुवात. पुढं ऑक्टोबरमध्ये तो पूर्ण थांबायचा. वादळी पावसाचा एखादा अपवाद सोडला, तर फार मोठा बदल व्हायचा नाही. पण गेली पाच–सात वर्षं वेगळाच अनुभव येतोय. मी पुण्यात असल्यामुळं इथलं सांगतोय, पण असंच काहीसं इतरही भागात पाहायला मिळतंय..
२००८ सालचा गणपती बसल्याचा दिवस! पुणेकरांच्या लक्षात राहील असाच हा दिवस. सायंकाळच्या वेळी पावसाला सुरुवात झाली.. जो सपाटून पडला की पुण्यातल्या साऱ्या यंत्रणा गुडघ्यावर आल्या. नेमकी व्यग्र वाहतुकीची वेळ. गणेशमूर्ती घरी आणण्याची गर्दी. त्याच वेळी पाऊस सुरू झाला. त्यानं सर्वांनाच थांबवून ठेवलं. अर्ध्या–पाऊण तासातच पाऊणशे मिलिमीटरच्या आसपास नोंद झाली. ही नोंद वेधशाळेतली.. पण वादळी पाऊस म्हणजे जागोजागी इतका कमी–जास्त असतो की त्याचा हिशेबच नाही. पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहिले. वाहतूक ठप्प. सगळीकडं कोंडी. बऱ्याचशा भागात घरांमध्ये पाणी शिरलं. सोसायट्यांच्या भिंती पडल्या. शहरातल्या सर्व सार्वजनिक यंत्रणांनी गुडघे टेकले. जवळजवळ तीन–चार तास शहराचं हाल कुत्रं खात नव्हतं. एक मैत्रीण एसटी बसनं बाहेर गावी जाणार होती. तिची बस तीन–चार तासांनी पुण्यातून बाहेर पडू शकली.

४ ऑक्टोबर २०१० रोजी पुण्यात एकाच दिवसात विक्रमी १८१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.. त्यामुळे पुण्यातील रस्ते असे जलमय बनले होेते.
दोनच वर्षांनी, २०१० साली तर कहरच झाला. चांगलं आठवतंय. ४ ऑक्टोबरचा दिवस. ३० सप्टेंबरला अधिकृतरीत्या पावसाळा संपला. तरीही पावसाच्या सरी पडत होत्या. सकाळपासूनच आकाशात ढग होते. दुपारी पाऊस सुरू झाला. त्याचा जोर वाढला. म्हणता म्हणता इतका वाढला की, पुण्याचा बराचसा भाग जलमय व्हायला लागला. महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचा तळमजला पाण्याने व्यापला. मॉडेल कॉलनीतल्या चित्तरंजन वाटिकेजवळ त्यांचा बंगला. बाजूने वाहणारा नाला तुंबल्यामुळे त्यांच्या बंगल्यात पुरुषभर पाणी जमा झालं. आयुक्तांचा बंगलाच पाण्यात तर इतरांची काय गत? दुपारपासून पाऊस कोसळतच होता. रात्री अकरा–साडेअकराच्या सुमारास थांबला. तोवर पाषाण रस्ता, बाणेर रस्ता आणि गणेशखिंड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाले होते. या रस्त्यांवरून पाच–सहा फुटांचा प्रवाह वाहत होता. शहरात भिंती पडल्यामुळे आणि पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्यामुळे अकरा–बारा जण मरण पावले. पुण्यात पावसाचा नवा उच्चांक नोंदवला गेला. २४ तासांत– १८१.१ मिलिमीटर पाऊस. याआधीचा सर्वकालीन उच्चांक होता. १५४ मिलिमीटरच्या आसपास!

४ ऑक्टोबर २००४ च्या विक्रमी पावसामुळे पुण्याच्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या आवाराची अशी अवस्था झाली होती…
२०११ साली पुन्हा तसंच. कोजागरी होती. आम्ही ऑफिसात दूध, पुलाव असा बेत ठरवला होता. सायंकाळपासून पाऊस पडत होता. आता थांबेल, मग थांबेल.. म्हणत वाट पाहिली. पण तो कोसळतच होता. तशात दूध घेऊन येणं जिकिरीचं होतं. पण ते आणलं.. गार का असेना, त्याच्यावर कोजागरी साजरी झाली.. अर्थातच चंद्राच्या दर्शनाविना. पाऊस कोसळतच होता. मी त्याच्या आकड्यावर लक्ष ठेवून होतो. हळूहळू तो शंभराच्या दिशेने सरकत होता. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत शंभरी ओलांडेल असं वाटलं. पण तो ९६–९७ मिलिमीटरच्या आसपास थांबला.. तरीही पुण्यासाठी तो खूपच जास्त होता. त्यानंतर त्याच वर्षी पुन्हा १२ ऑक्टोबर रोजी २४ तासांत तब्बल १०५ मिलिमीटर पाऊस कोसळला.
२०१२ सालचा नेमकं आठवत नाही. पण पुढं २०१३ सालचा गणपती उत्सव पावसाने धुऊन टाकला. जवळजवळ रोजच वादळी पाऊस. मिरवणुकीच्या दिवशी तर दोन–तीन टप्प्यांत कोसळला. इतका की, पोलिसांना काहीही करावं लागलं नाही, मिरवणुकीतली गर्दी आपोआपच कमी झाली

या वर्षी म्हणजे २०१४ साली कोजागरीच्या दिवशी पुण्यावर ढग होते… पुण्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातसुद्धा !
आता या वेळी २०१४ च्या कोजागरीला चंद्राचं दर्शन नाही… बंगालच्या उपसागरात “हुदहुद” नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं. ते घोंघावतच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर आदळलं. त्याचा परिणाम म्हणून पुण्यात ढग आहेतच, पण बहुतांश महाराष्ट्रात ढगाळ वातावरण–पाऊस असंच चित्र आहे…
कोजागरीचा चंद्रच आमच्यावर रुसलाय का? की हे हवामानातले बदल म्हणायचे? ही झाली माझी निरीक्षणं. यावरून लगेचच कोणताही निष्कर्ष काढायचा विचार नाही. पण पुढच्या वर्षी कोजागरीला चंद्राचं दर्शन होईलच, हे मात्र ठामपणे सांगता येणार नाही. हे पुण्यापुरतंच मर्यादित नसावं… सर्वच भागात कमी–अधिक प्रमाणात घडत असावं. ते जाणून घ्यायचं आहे. म्हणूनच आपल्याला विचारतोय. सांगा, आपला कोजागरीचा काय अनुभव आहे?
– अभिजित घोरपडे
(abhighorpade@gmail.com)
It seems, whole cycle of the seasons has been pushed further. -Ravi J.
Yes Ravi sir.. it seems late by about a month.
Some meteorologists have put their research, but it has not been officially accepted yet.
खूप छान अभ्यासपूर्ण लिहिलं आहे, मनपुर्वक धन्यवाद
शैलेश
Thank you Shailesh…
अभिजित
पोस्टची सवय लावली आणि गायब हाहाहाहा असो,
हवामान लहरी आहे मग कामाच्या व्यापामुळे पोस्ट पुढे मागे होत असणार.
आजचे माझ लिखाण हे कदाचित पोस्टला धरून नसेलही.
तरी लाद्तोय….
खर सांगायचं लहानपणची कोजागिरी हा सण म्हणूनच साजरा व्ह्यायचा
गच्चीत सर्वांनी जमायचं मोठी माणस आम्हाला तारर्यांची माहिती देत मग
मसाला दुध व कार्यक्रम संपायचा.
नंतर नंतर इतर व्यापामुळे कोजागिरी हा दिवस
कोजागिरीचा चंद्र न बघता मित्र, मैत्रिणी, नातेवाइक
याना भेटण्याचे एक कारण मिळाल.
अभिजित पण हे सर्व आठवलं – जाणवलं तुझ्या या अप्रतिम पोस्ट मुळे
मस्तच
निलेश आंबेकर – ठाणे
९८२०० ३२७७२
ambekar.nilesh@gmail.com
knowledgeable post.
Thanx Anusia…