कोकणचं पाणी मराठवाड्याला (पुन्हा एक स्वप्न)

म्हटलं तर तंत्रज्ञानाला सर्व काही शक्य असतं. त्यामुळे कोकणातलं पाणी मराठवाड्यात नेता येईल.. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात तर नक्कीच. पण असं करणं व्यवहार्य आहे का आणि ते परवडणार का? खरं तर मराठवाड्याची नैसर्गिक साधनसंपत्ती पाहून या प्रदेशासाठी विकासाचा वेगळा विचार करायचा की तिथंसुद्धा भरपूर पाण्याच्या मागं लागायचं?

– अभिजित घोरपडे
kokan01

पुन्हा एक स्वप्न.. एक फॅन्टसी.. एक आशा..

राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतंच एका योजनेवर काम करणार असल्याची घोषणा केली. ही योजना आहे, कोकणातलं पाणी मराठवाड्याकडं वळवण्याची! म्हणे, कोकणातलं वाया जाणारं पाणी मराठवाड्याला देणार. पण कधी आणि कसं?

अहो, साधं कृष्णा खोऱ्यातलं २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला देता आलं नाही. तिथं कालव्यांची निम्मी कामं उरकली. झालेले कालवे आता बुजलेसुद्धा! पण मराठवाड्याला अजून पाण्याचा थेंबही मिळाला नाही.. हे कमी होतं म्हणून की काय, आता कोकणातलं पाणी तिकडं पाठवणार ! ही घोषणा कशासाठी आणि कोणासाठी? लोकांना कधीही पूर्ण न होणारं स्वप्न दाखवण्यासाठी की ठेकेदारांची धन करण्यासाठी..? निव्वळ अव्यवहार्य ही निव्वळ अव्यवहार्य घोषणा. ती नव्याने राजकारणात आलेल्या किंवा पहिल्यांदाच मंत्री झालेल्या कोणी केली असती- अगदी मुख्यमंत्र्यांनी केली असती- तरी एकवेळ क्षम्य होतं. पण ही घोषणा कोणी करावी? सध्याच्या मंत्रिमंडळात जे सर्वांत अनुभवी आहेत, ज्यांनी जलसंपदा विभाग जवळून पाहिलाय, त्यात पैसा कसा जिरवला जातो याचे जे साक्षीदार आहेत, त्याचं थोडं फार पाणीसुद्धा चाखलंय.. अशा एकनाथ खडसे यांनी!

कृष्णा खोऱ्यातल्या पाण्याची अजूनही मराठवाड्याला प्रतिक्षाच आहे..

कृष्णा खोऱ्यातल्या पाण्याची अजूनही मराठवाड्याला प्रतिक्षाच आहे..

हे सरकारही १९९५ च्या युती सरकारप्रमाणे प्रवास करणार की काय? अशी शंका यायला नक्कीच जागा आहे.

सह्याद्रीचे डोंगरच कापून काढा
पाण्याबाबत, पावसाबाबत, नैसर्गिक स्रोतांबाबत अव्यवहार्य कल्पना मांडणं हे आपल्यासाठी नवं नाही. या आधीसुद्धा असं घडलंय. महाराष्ट्राचा जवळजवळ २५-३० टक्क्यांपेक्षा जास्त प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. या प्रदेशात पावसाचं प्रमाण अतिशय कमी. त्याला कारणीभूत आहेत- सह्याद्रीचे घाटमाथे. हे घाटमाथे कोकण आणि देश (महाराष्ट्राचा पठारी प्रदेश) यांना विभागतात. त्यांच्यामुळे पुढच्या पठारी भागातला पाऊस कमी होतो. त्याचा फटका मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग यांना बसतो.. यावर एक कल्पना मांडली गेली की, सह्याद्रीचे डोंगरच कापून काढा, म्हणजे समुद्रावरून येणारं वारं अडणार नाहीत आणि पाऊस पुढच्या भागापर्यंत पोहोचेल.. अर्थात ती कोणी गांभीर्याने घेतली नाही.

सह्याद्रीचे उत्तुंग कडे कापून काढा.. अशीही खुळसट कल्पना काहींकडून मांडली गेली..

सह्याद्रीचे उत्तुंग कडे कापून काढा.. अशीही खुळसट कल्पना काहींकडून मांडली गेली..

मुंबईसाठी कृत्रिम पाऊस
दुसरी अशीच – मुंबईसाठी कृत्रीम पाऊस पाडण्याची. पावसाचं आगमन लांबलं किंवा त्यानं उघडीप दिली की ही कल्पना मांडली जाते. कृत्रीम पावसाच्या प्रयोगामुळे पाऊस पडतो, पण किती आणि केवढा खर्च करून? हे कोडं अजून तरी आपल्या बाजूने आलेलं नाही. ही अवघड उत्तरं शोधण्याआधी साधे-सोपे उपाय करावे, पण ते केले जात नाहीत. नेमकेपणाने सांगायचं तर, मुंबईच्या सुमारे ४३८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पडणारा पाऊस वाहून जातो. तो साठवायचे, वापरायचे उपाय केले तर त्यामुळे या महानगरीची ४० ते ५० टक्के पाण्याची गरज भागेल. या तुलनेत आपण कृत्रीम पावसाचे पाणी किती? अगदीच नाममात्र! पण आपण पावसाचे पाणी वाया घालवतो आणि कृत्रीम पावसावर खर्च करतो, त्याच्या आशेवर जगतो.

हवेतील बाष्पापासून पाणी असाच आणखी एक मार्ग. त्याची आता चर्चा सुरू झाली आहे. त्याचा आकर्षक व्यवसाय पाहून त्यात अनेक कंपन्या उतरत आहेत. हा मार्ग म्हणजे- हवेत असलेल्या बाष्पापासून पाणी मिळवणे. हवेतून पाणी..!! याबाबत अजूनही अनेक लोक तोंडात बोटं घालतात. ते तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आहे.. मुद्दा इतकाच की ते आपल्याला परवडणार का? एक लिटर पाणी मिळवण्यासाठी दोनपाच रुपयांची ऊर्जा खर्च करणं आपल्याला झेपणार आहे का?.. तरीपण हे सांगितलं जातं, चवीनं चघळलं जातं. कारण एकच- त्यात असलेल्या लोकांचे आर्थिक हितसंबंध.. असो! मुद्दा एकच- आपण तंत्रज्ञानाच्या जोरावर काही तरी वेगळं केल्याच्या फुशारक्या मारतो, पण जे करतो त्यावर खर्च किती आणि त्यातून फायदा किती अशा ‘लाभ-व्यय’ गुणोत्तरावर तपासून पाहत नाही. इथेच लाखाचे बारा हजार होतात. कोकणातलं पाणी मराठवाड्याला वळवण्याची योजनाही अशीच.

कागदोपत्री शक्य, पण…
ही योजना कागदोपत्री शक्य आहे का? जरूर शक्य आहे. कोकणात धो धो पाऊस पडतो. वर्षाला सरासरी तीन हजार मिलिमीटरपर्यंत. त्यापैकी बहुतांश समुद्राला जाऊन मिळतो. कारण सछिद्र जांभा खडक आणि कोकणाची अतिशय चिंचोळी पट्टी. हे पाणी मराठवाड्याला देता आलं तर ते कोणालाही आवडेल. कारण मराठवाडा हा अतिशय कमी पावसाचा प्रदेश. तिथे पावसाचं प्रमाण सातशे मिलिमीटरच्या पुढं मागं. या पावसाही मोठी तफावत. कुठं तीनशे-चारशे मिलिमीटर इतकाच पडतो. त्यामुळे निश्चित असं पाणी नाही. अलीकडं तर वरून येणारी गोदावरीसुद्धा फारशी वाहत नाही.. त्यामुळे दुष्काळात तेरावा !

याचा अर्थ मराठवाड्याला पाणी हवंय.. पण ते कोकणातून पोहोचणं शक्य नाही. ते आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. म्हटलं तर टँकरने, रेल्वेने नेता येईल. भरपूर वीज वापरून पाणी उपसून ते कितीही लांब नेता येईल.. त्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. नाही तरी आपण पूर्वेकडं वाहणारं पाणी पश्चिमेला वळवतोच की. कोयना धरणातलं पाणी पश्चिमेला वळवून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते.. पण ती परवडते म्हणून. इथं या निकषावर आपल्याला माघार घ्यावी लागते.

मराठवाड्यासाठी पशुपालनाचा उत्तम पर्याय अजूनही गांभीर्याने घेतला जात नाही..

मराठवाड्यासाठी पशुपालनाचा उत्तम पर्याय अजूनही गांभीर्याने घेतला जात नाही..

दुसरं असं की, इतका आटापीटा करून मराठवाड्याला इतकं पाणी कशासाठी पुरवायचं.. तिथं साखर कारखाने चालवण्यासाठी? असं म्हणताना साखर कारखान्यांना आंधळा विरोध अजिबात नाही.. पण सगळीकडंच भरपूर पाणी, त्यातून ऊस, साखर कारखाने, जमिनींची खराबी हेच दुष्टचक्र हवंय का? मराठवाडा पशुपालनासाठी अतिशय उत्तम आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे अशी मांडणी करतात की, पशुपानलाच्या बाबतीत मराठवाड्याची डेन्मार्क बनण्याची क्षमता आहे. दुधाच्या व्यवसायात आणि पशुपालनात किती अर्थप्राप्ती आहे हे वेगळं सांगायला नको. तरीसुद्धा आम्हाला या प्रदेशाचा पश्चिम महाराष्ट्रच करायचा असेल तर काय बोलणार..?

मराठवाड्यात आहे ते तरी आपण जपतोय का? तुळजापूरच्या आई भवानीच्या दर्शनाला आपण जातो. पण तिथं भल्या मोठ्या २७ बारवा आहेत.. त्यांची अवस्था काय झालीय? एकेक बारव मोठ्या गावाला पाणी पुरवेल अशा क्षमतेची. त्यामुळे पूर्वी तिथं पाण्याचा तुटवडा जाणवत नसेल. आता या बारवांच्या कचराकुंड्या झाल्यात. हेच तिथल्या विहिरींचं झालं, ओढ्यांचं झालं, भूजलाचं झालं.. काहीच टिकवलं नाही. आता हे कोकणाच्या पाण्याचं स्वप्न. त्यात ठेकेदार गब्बर होतील, त्यांना कामं देणारे गब्बर होतील.. मराठवाडा मात्र तहानलेलाच राहील.

खडसे साहेब, करण्याजोगं मूलभूत काम बरंच बाकी आहे. लोकांना कुठल्या तरी स्वप्नात गुंतवून वेळ काढू नका. बेसिक्स पक्के करा.. ठरवलं तर तुम्हीच ते करू शकाल. त्यावर काम होऊ द्या.. मग पाहू कोकणातील पाणी मराठवाड्याकडं कसं वळवायचं ते. पण कदाचित त्याची गरजच उरणार नाही !

– अभिजित घोरपडे

ई मेल : abhighorpade@gmail.com

ब्लॉग- http://www.abhijitghorpade.wordpress.com

11 thoughts on “कोकणचं पाणी मराठवाड्याला (पुन्हा एक स्वप्न)

 1. Shailesh Nipunge says:

  नमस्कार अभिजित,

  खूप छान वास्तववादी लिहिला अहेस. अत्यंत अभ्यासपूर्ण. संबंधित लोकांनी जर
  हे वाचलं तर त्यांना नक्की नीट पुन्हा विचार करावा लागेल.

  • धन्यवाद शैलेश..
   वास्तव सोडून स्वप्न दाखवणं सर्वांनीच टाळायला पाहिजे. आपणही ते ओळखून मूलभूत गोष्टींवरच लक्ष द्यायला पाहिजे…

 2. अगोदर मराठवाड्याचा अनुशेष, जायकवाडीच हक्काच पाणी, जलनियमन प्राधिकरण कायद्याची अंमलबजावणी करून जलआराखडा तयार करणं शिवाय रखडलेले मंजूर प्रकल्प पूर्ण करणॆ या सरकारचे कर्तव्य आहे. नविन अतार्किक काहितरी बोलून या भयान परिस्थितीत मराठवाड्यातील जनतेच्या पाणी प्रश्नाचं हसं सरकारने करू नये. मराठवाड्याच्या भाषेतच बोलायच तर एकनाथ खडसेंचा हा खयाली पुलावं आहे.

  • खरंय कुणाल..
   हातचं सोडून पळत्याच्या मागं जायची सवयच लागलीय सगळ्य़ांना. यात बदल व्हायला पाहिजेत.

 3. Dear abhijeet thats really true,
  Marathwada can be Denmark,as said by Dr chitale, yes we have to work on that concept seriously nnd scientifically
  There are breeds like,deoni,redkandhari in cattle, marathwadi buffaloe, osmanabadi goats these are resources these are supported by good quality of grass.we need to plan our grasslands am its rejuvanation fodder banks, new interventions in fodders storage.enhancing milk collection units cold storage chain.
  Even if today you will find that KHOA to all pilgrimage inaharashtra comes from Manjarsumba..
  Thaks for good article …

 4. आर्मीचे एक रिटायर अभियंते आहेत. त्यांनी कोकणातील पाणी मराठवाड्यात कसं वळवता येईल याचं लो बजेट माॅडेल विकसित केले आहे. थोडा खर्च आहे पण पाच वर्षाच्या आत ब्रेक इव्हन पाॅईंट येईल, असं आहे. पर्यावरणाला कुठलाही फटका न बसला वाॅटर लिफ्टिंग व वाॅटर पाईपलाईन टनेलच्या माध्यमातून सह्याद्री क्राॅसकरुन पाणी सह्याद्रीच्या पुर्व भागातील पाणलोटात सोडायचं अशी ही योजना आहे. पुण्यातच असतात हे गृहस्थ. खडकीला एका इंजिनिअरिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट संस्थेशी संबंधीत आहेत. गेल्या वर्षी मला भेटलेले. आम्ही सोबत कामही केलं काही प्रोजेक्टवर. तुमच्याही परिचयाचे असतिल. आत्ता त्यांचे नाव माझ्या लक्षात नाही. बॅकअप डेटा पाहून सांगतो… त्यांना एकदा जरुर भेटा या विषयावर. कदाचित भेटलाही असाल यापुर्वी….

 5. padmakar KULKARNI says:

  अभिजीत सर नमस्कार
  सडेतोड आणि वास्तव लेखन. शासन कोणतेही आले तरी मराठवाडयाची उपेक्षाच झाली आहे. एकतर अशा अव्यवहार्य घोषणा नाहीतर आहेत ते प्रकल्प अर्धवट.. तात्पर्य काय तर वर्षानुवर्षे पाण्याची वाट पाहत राहाणे, हीच मराठवाडयाची शोकांतिका आहे.

 6. sanjay belsare says:

  You have raised valid issues in your articles. Let us hope that there will action s on basic issues and not on dreams

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s