कुठं गेल्या पेरूच्या बागा?

पुण्यातून बाहेर पडताना सर्वच रस्त्यांवर पेरूच्या बागा होत्यासिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, बाणेर रस्ता, सूस रस्ता, पाषाण रस्ताअगदी पुणे शहरातसुद्धा! आता नावालाही बाग दिसत नाही. गेल्या दहावीस वर्षांत केवढा बदल झालाय हा.. पण तो जाणवतोय का आपल्याला?… आणि इतर शहरांचं काय?

– अभिजित घोरपडे

Peru01

अंगारकी चतुर्थीचा दिवस. पुण्यात बिबवेवाडी भागात डॉक्टरांकडं गेलो होतो. खांदा दुखावल्यामुळे अजूनही गाडी चालवत नव्हतो. बसस्टॉपकडं चालतच निघालो. वाटेत पेरूवाला दिसला. सायकलवर पाटी लावलेली. त्यात तजेलदार पेरू! रस्त्याच्या कडेला सावलीला थांबला होता. मी किती दिवस पेरू खाल्लाच नव्हताअलीकडं सफरचंद, संत्री, मोसंबी यांचे ढीगच्या ढीग असतात, पण पेरू पहिल्यासारखा दिसत नाही. निदान पुण्यात तरी हे चित्र आहे.. इतर भागातून आलेल्या फळांनी पेरूला परका करून टाकलाय. किती?.. तर काश्मीर, हिमाचलपासून वॉशिंग्टन, चिली, इराणची सफरचंद गाड्यागाड्यांवर दिसतात, पेरू मात्र शोधत फिरावं लागतं.

सध्या सफरचंद, संत्री, मोसंबी यासारख्या फळांचंच राज्य आहे.. त्यात पेरू चुकून कुठं तरी अंग चोरून बसलेला दिसतो..

सध्या सफरचंद, संत्री, मोसंबी यासारख्या फळांचंच राज्य आहे.. त्यात पेरू चुकून कुठं तरी अंग चोरून बसलेला दिसतो..

इथं माझ्या समोर पेरूवाला होता. तरतरीत नाक, खुरटी दाढी, कपाळावर टिळा, तोंडात तंबाखूचा बार आणि भाषेत मराठवाडी हेल!

कसा दिला?”

दहा रुपये, पंधरा रुपये आणि वीस रुपयेघ्या. गोडाय बगा.”

एवढ्या लहान पेरूला दहा रुपये द्यायचे?.. मनात क्षणभर पुणेरी विचार आला. पण तो लगेच झटकून पेरू निवडला. त्यानं तिखटमीठ भरून पेरू दिला. चवदार होता. गप्पा सुरू झाल्या. मनात म्हटलं, पुढच्या काळात असे पेरूवाले इतिहासजमाच होतील. घ्या आत्ताच बोलून. तो पण बोलका होता. भरभरून बोलू लागला.

मनोहर म्हेत्रे.. दहा वर्षांपूर्वी लातूरहून पुण्याला आला. तेव्हापासून पेरू विकतोय..

मनोहर म्हेत्रे..
दहा वर्षांपूर्वी लातूरहून पुण्याला आला. तेव्हापासून पेरू विकतोय..

मनोहर म्हेत्रे. वय पस्तीशीच्या आसपास. मूळचा लातूरचा. दहा वर्षांपूर्वी पुण्यात आला, तेव्हापासून पेरूच विकतोय. ‘अप्परला राहतो. (अप्पर म्हणजे अप्पर इंदिरानगर नावाची झोपडपट्टी!) घरी बायको, दोन मुलं.

तो धंद्याबद्दल सांगू लागला. ते ऐकताना पुण्याच्या परिसरात झालेला बदल माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.. मीसुद्धा त्याचा साक्षीदार होतो. आज म्हेत्रेशी बोलताना त्याची तीव्रता प्रकर्षानं जाणवली. पुण्यातून बाहेर पडताना जवळजवळ सर्वच रस्त्यांवर पेरूच्या बागा होत्या.. अगदी पुण्यातसुद्धा! सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, बाणेर रस्ता, सूस रस्ता, पाषाण रस्तापुणे शहरातसुद्धा बागा होत्या. कोथरूडच्या सिटी प्राइड सिनेमाजवळ अजूनही एक मोठी बाग तग धरून आहे. पिंपरीचिंचवड परिसरात गुरवपिंपळे भागातली बाग आजही आठवते. बागेत जाऊन वाट्टेल तेवढे पेरू खायचे. घरी नेण्यासाठी तेवढे विकत घ्यायचेअर्थात हा काळ २५३० वर्षांपूर्वीचा!

पुण्यातल्या पेरूच्या बागा जवळजवळ संपल्या..

पुण्यातल्या पेरूच्या बागा जवळजवळ संपल्या..

आता पुणं किती तरी बदललंय. म्हेत्रे सांगतो, कात्रजजवळ आंबेगाव पठारावर पेरूच्या बागा होत्या. कोंढव्यात होत्या, दत्तनगरला होत्या, जांभूळवाडीला होत्या. त्यामुळे दुपारी पेरू विकून झाले की, सायकलला टांग मारून आंबेगावला नाहीतर कोंढव्यात गोकुळनगरला जायचा. पाटी भरून पुन्हा विक्रीसाठी गावात यायचा. आता ते शक्य नाही, कारण तिथल्या बागा संपल्या.. पेरूसाठी सोलापूर रोडला पाटसपर्यंत जावं लागतं. सकाळी एकच फेरी होते. पेरू विकून झाले की थेट घर गाठायचं.. पुन्हा दुसऱ्याच दिवशी.

एवढंच कशाला? पुण्याच्या आसपास सर्वांत चांगला होता पेरू खेड-शिवापूरचा, पण तिथंसुद्धा आता घरात खाण्यापुरती झाडं राहिलीत.. बागा संपल्या.

सायेब, आपन उभं हाव ना तित पन बाग हुती पिरूची..” कसा बदल होत गेलाय याच्यावर म्हेत्रेनं व्यवस्थित बोट ठेवलं. बागा संपल्या. तिथं इमारती झाल्या. काळी माती होती ३०३० फूट. कितीही खणलं तरी मुरूम लागायचा नाय. तिथंसुद्धा इमारती झाल्या. त्याचं सांगणं पटत होतं. मी आता राहतोय तिथं, आंबेगावातही पेरूच्या बागा होत्या.. आता आहे इमारतींचं जाळं! सिंहगड रोडची आठवणही अशीच. लहानपणी बसनं सिहंगडला जायचो. प्रवासात आकर्षण असायचंया रस्त्यावरच्या पेरूच्या बागांचंच. सिंहगड रस्ता लागला की थोड्याच अंतरावर बागा सुरू व्हायच्या, त्या बराच वेळ संपायच्याच नाहीत. रस्त्यावर पाट्यांमध्ये पेरू विकायला असायचे. आता अधेमधे पेरूच्या पाट्या दिसतात, पण बाग काही दिसत नाही.

Peru02या आठवणींनी मनात अनेक प्रश्न उभे केले. पूर्वी चहुबाजूंनी पेरूच्याच बागा का होत्या? इतके पेरू खपायचे तरी कुठं? आणि आता सर्व बागा गेल्या तरी लोकांवर फरक कसा पडला नाही?… मान्य आहेबदल हे होतातच, होणारच. पण दहावीस वर्षांत पेरूच्या सर्वच्या सर्व बागा खल्लास व्हाव्यात? हे चांगलं की वाईट.. या प्रश्नात जात नाही, पण जमिनवापरामध्ये झालेला बदल जाणवतोय का आपल्याला? म्हटलं तर हा विषय विसरून जावा असा होता, म्हटलं तर अतिशय गहन.

काही क्षण शांतपणे विचार केला, तेव्हा हा बदल फारच मोठा वाटला. डोक्यात आलं, पुण्यासारखं इतरत्रसुद्धा असं काही झालं असेल का?

च्यायला, मी इकडं विचारात होतो. म्हेत्रे मात्र मला सुन्न करून स्वत: “पेरू….वालाम्हणत निघूनही गेला होता.

अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com

9 thoughts on “कुठं गेल्या पेरूच्या बागा?

 1. Shailesh Nipunge says:

  खूप छान लिहीलं आहे, एकदम वास्तवदर्शी

  शुभेच्छा
  शैलेश निपुणगे

 2. देवदत्त पाटणकर says:

  मी सिंहगड रस्त्यावर रोज जाये करतो. अजूनही काही ठिकाणी विशेषत : नांदेडच्या / धायरीच्या आसपास भरपूर ताजे , रसरशीत पेरु मिळतात. पुण्यापेक्षा थोडे स्वस्तही असतात. मी अनेकदा नेऊन मित्र परिवारात वाटतो.

 3. ashwini says:

  हल्ली तर शाळांबाहेर दिसणारे पेरुवालेही कमी झाले आहेत…

 4. अशीच अवस्था अंजीरांची, गावोगावच्या वड -पिंपळाची आहे. दुसरे महत्वाचं म्हणजे आजकाल वाढलेल्या इमारतींनी आजूबाजूला झाडे लावायची जराही काळजी घेतली नाहीये. परवानगी पत्रात जरी लिहिलं असलं तरी कोणताही बिल्डर व्यवस्थित झाडे नव्याने लावत नाही. काही खुरटी व शोभेची झाडे लावून सरकार ला मूर्ख बनवतो…! मात्र खरा प्रॉब्लेम सरकार ला नव्हे तर आपल्याला आहे हेच या सर्वांना कळेना झालंय…!!

 5. नीलेश बने says:

  अभिजित, हीच अवस्था रत्नागिरीचीही झाली आहे. शहर विस्तारत जाते तसे तिथल्या लागवडीखाली असलेला भागात इमारतींचे जाळे होत जाते. आज थेट हातखंब्यापर्यंत आणि खाली शिरगावापर्यंत रत्नागिरी शहर विस्तारले आहे. फार लांबचे नको, गेल्या १५ वर्षात मी स्वतः कित्येक आंब्याच्या बागा संपलेल्या पाहिल्या आहेत. मुंबई-पुण्याबद्दल तर बोलायलाच नको.
  शहरीकरणाची ही प्रक्रिया चूक की बरोबर यावर वाद होतील, पण ही प्रक्रिया अटळ आहे असे सारखे वाटत राहते. शहर किती विस्तारू द्यायचे आणि गावे कशी स्वयंपूर्ण करायची याचे नियोजन तातडीने व्हायला हवे. मधमाशीच्या पोवळ्याची टोकावर शहर आणि मध्यभागात स्वयंपूर्ण गावे असा Honeybee Plan राबवला तर शहर आणि ग्रामीण भागाचे संतुलन राखता येऊ शकेल.
  तुझ्या या लेखामुळे पुन्हा एकदा डोक्यात भिंगरी फिरायला लागलीय. Thanku!

  • धन्यवाद नीलेश.
   हे सर्वच भागात घडतंय.. काही गोष्टी घडणारच, पण नियोजनबद्ध झाल्या तर चांगल्या ठरतील. नाहीतर आतासारखी नुसतीच सूज.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s