गोष्ट ”डुक्करमाशा”ची ! (उजनीच्या पाण्याचं दुष्टचक्र ३)

उजनी जलाशयाची आणखी एक ओळख म्हणजे तिथला डुक्करमासा ! प्रदूषणाचा विषय निघालाय तर त्याला विसरून कसं चालेल? उजनीप्रमाणेच आपल्याकडील इतर जलाशय, तळी, नद्यांचा ताबा या माशानं घेतलाय. त्यामुळे जलचरांची विविधता नष्ट झालीच, शिवाय इतरही परिणाम भोगावे लागत आहेत. ”कानामागून येऊन तिखट झालेल्या” या माशाची ही गोष्ट… रंजक आणि बरंच काही शिकवणारीसुद्धा !

– अभिजित घोरपडे

चिलापी ऊर्फ डुक्करमासा !

चिलापी ऊर्फ डुक्करमासा !

”साहेब, आता इथं दुसरा मासाच बघायला मिळत नाहीत, सापडतो तो फक्त चिलापी! धरणात लावलेलं जाळं बाहेर काढलं की त्यात चिलापीच असतो, उगंच कुठं चार-दोन इतर मासे मिळतात”… भीमा नदीवरील उजनी धरणात मासेमारी करणारा मच्छिमार सांगत होता. त्याच्या सांगण्यात एका शब्दाचीही काहीही अतिशयोक्ती नव्हती. उन्हाळ्याच्या दिवसात दररोज मिळणाऱ्या ४०-५० टन माशांमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असतो तो चिलापीच, उरलेल्या दोन-पाच टक्क्यांमध्ये असतात रोहू, कटला, मरळ, वाम अशा जाती! या जाती पाहायला तरी मिळतात, पण परंपरागतरीत्या आढळणारे आहेर, खद्री यासारखे मासे तर इथून कधीच हद्दपार झालेत.

उजनी धरणाबरोबरच महाराष्ट्रातील (आणि देशातीलसुद्धा) बहुतांश नद्या व धरणांमध्ये चिलापीची घुसखोरी झालीय. कोल्हापूरजवळ उगम पावणाऱ्या पंचगंगा नदीतही तो आहे. पंचगंगा व कृष्णा या नद्यांचा संगम कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाचीवाडी इथं होतो. त्याच्या जवळ तेरवाड नावाचं गाव आहे आणि छोटासा बंधारासुद्धा! इथले मासेमारही असाच अनुभव सांगतात. तिथलं पाणी अतिशय प्रदूषित. इतकं की दुर्गंधीमुळं परिसरात थांबणंही नको होतं. तिथं आता केवळ एकाच जातीचा मासा सापडतो. तो म्हणजे- चिलापी. पंधरा-वीस वर्षांपूर्वी तिथं सतरा-अठरा जातींचे मासे मिळायचे, तेसुद्धा मोठ्या प्रमाणात. पण आता एकटा चिलापी तिथं टिकून आहे. इथल्या अतिशय घाणेरड्या पाण्यात हा मासा सापडतो. म्हणून स्थानिक मासेमारांनी त्याला नाव दिलंय- डुक्करमासा!

उजनी जलाशयात मिळणाऱ्या माशांमध्ये ९५ टक्के चिलापी असतो.

उजनी जलाशयात मिळणाऱ्या माशांमध्ये ९५ टक्के चिलापी असतो.

या डुक्करमाशानं आपल्याकडील नद्यांचा, तलावांचा ताबा घेतला. त्याच्या साक्षीनेच आपल्या स्थानिक जाती नष्ट होत गेल्या. अगदी हजारो वर्षांपासून पाहायला मिळणाऱ्या स्थानिक माशांच्या जातींना मागं टाकून चिलापीनं त्यांची जागा घेतली. मुख्यत: गेल्या पंधरा-वीस वर्षांत हा बदल पाहायला मिळाला. त्याची सुरुवात आधीपासूनच झाली, पण दर्शनी स्वरूप लाभलं ते गेल्या दोन दशकांमध्ये. विशेष म्हणजे याच काळात नद्यासुद्धा भयंकर प्रदूषित होत गेल्या. हा बदलही या डुक्करमाशाच्या पथ्यावर पडला. स्थानिक माशांना हद्दपार करणारा हा मासा आपल्याकडं आला कसा, रुजला कसा याची कथा अतिशय रंजक आहे आणि बरंच काही शिकवणारीसुद्धा!

आपल्या संदर्भात सांगायचं तर त्याची कथा आहे गेल्या साठ वर्षांमधील. त्याचं मूळ नाव ‘तिलापिया मोझांबिकस’ किंवा ‘ओरेक्रोमिस मोझांबिकस’. या तिलापियाचा अपभ्रंश होऊन आपल्याकडं तो बनला चिलापी. भारत स्वतंत्र झाला तेव्हा चिलापी महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातही अस्तित्वात नव्हता. कारण तो मूळचा आपल्याकडचा नाहीच. त्याचं मूळ स्थान आहे- आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील मोझांबिक, झिंबाब्वे, स्वाझिलँड, बोत्सवाना या देशांमधलं.

परिसराशी उत्तमप्रकारे कसं जुळवून घ्यावं हे शिकावं याच माशाकडून! अतिशय खडतर परिस्थितीत तो तग धरू शकतो. त्यामुळे एकदा का तो एखाद्या नदीत किंवा जलाशयात शिरला की त्याला तिथून हटविणं मुश्किल, अगदी चिवट तणाप्रमाणे! त्याला कारणही तसंच आहे. उत्क्रांत होत असताना या माशाला काही भन्नाट गुणधर्म लाभले आहेत. तो गोड्या पाण्यात राहू शकतो, तसाच मचूळ आणि अगदी खाऱ्या पाण्यातसुद्धा! इतकंच नाही तर तो बऱ्यापैकी आम्लयुक्त आणि अल्कलीयुक्त पाण्यातही जगू शकतो.

प्रदूषणाचंही त्याला वावडं नसतं. पाण्याचं जैविक प्रदूषण असू द्या नाहीतर रासायनिक; त्यातूनही तो मार्ग काढतो. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की मासे व इतर जलचर तेथून पळ काढतात. ते शक्य नसेल तर मरतात. चिलापी मात्र ही स्थिती पचवून टिकून राहतो. त्याला खाण्याचंही वावडं नसतं. या बाबतीत तो सर्वहारी उंदराचाच भाऊ! मुख्यत: पाण्यातील शेवाळ खातोच, पण गरज पडली तर पाणवनस्पती व अगदी इतर माशांची अंडीसुद्धा मटकावतो.

या माशाचं एक वैशिष्ट्य म्हणजे- पाण्यात त्याच्या पिलांना धोका वाटला की तो त्यांना तोंडात घेतो आणि सुरक्षा देतो...

या माशाचं एक वैशिष्ट्य म्हणजे- पाण्यात त्याच्या पिलांना धोका वाटला की तो त्यांना तोंडात सामावून घेतो आणि सुरक्षा देतो…

याच्या पलीकडंही त्याची वैशिष्ट्यं आहेत. ती त्याच्या पथ्यावर पडतात आणि इतर माशांना त्रासदायक ठरतात. याची उत्पादनक्षमता अफाट आहे. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आलंय की, एका तळ्यात या माशाची बोटाएवढ्या आकाराची बारा-चौदा पिलं सोडल्यावर एक-दीड महिन्यात त्यांची संख्या तीन हजार बनली, तर अडीच महिन्यांमध्ये ती १४ हजारांवर पोहोचली. म्हणजे तळ्यात एकदा माशाचं बीज सोडलं की पुन्हा टाकायची अजिबात गरज नसते. त्याची संख्या वाढली की अर्थातच इतर माशांच्या संख्येवर विपरित परिणाम होतोच.

हा मासा आपली अंडी तोंडात घेऊन फिरतो. त्यामुळे पिलं बाहेर पडेपर्यंत त्यांना संरक्षण मिळतं. या माशाची आणखी एक खोड म्हणजे तो पुनरोत्पादनासाठी नदीचा, धरणाचा तळ ढवळतो. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ बनतं. ते इतर माशांसाठी व वनस्पतींसाठी हानीकारक ठरतं… एक ना दोन, याच्या अशा नाना तऱ्हा! म्हणूनच तो कुठल्याही पाण्यात शिरला की तिथला ताबाच घेतो.

आता प्रश्न उरतो हा आपल्याकडं आला कसा? त्याला कारणभूत आहे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य- याची वाढ अतिशय वेगाने होते, अगदी ब्रॉयलर चिकनप्रमाणं. त्यामुळेच त्याला ‘अॅक्वॉटिक चिकन’ असंही म्हणतात. त्यामुळे मासेमारीचं उत्पादन वाढविण्यासाठी तो आपल्याकडं आणण्यात आला. ते वर्ष होतं १९५२. सुरुवातीला तो बंधिस्त तळ्यांमध्ये सोडण्यात आला, पण तिथून सुटून तो हळूहळू सर्व नद्यांमध्ये शिरला. तिथं घुसला तो कायमचाच! उत्पादन वाढतं म्हणून सुरुवातीला तो उपयुक्त ठरला, त्याचा हा फायदा आजही आहे. पण त्याचे दुष्परिणाम आता चांगलेच जाणवू लागलेत. त्याच्यामुळं इतर माशांना हद्दपार व्हावं लागतं. परिणामी पाण्यातील जैवविविधता नष्ट होत गेली.

महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्ये तसेच, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांतही याची उदाहरण आहेत. त्यांच्यामुळे स्थानिक मासे संपले. आफ्रिका खंडाच्या दक्षिण कोपऱ्यात वावरणारा हा मासा आता जगभरातील ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला. तिथं स्थिरावला आहे. तेच महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. विविधता तर गेलीच, स्थानिक जातीसुद्धा नष्ट झाल्या आणि वाढला तो चिलापी ! उजनी धरणाचंच उदाहरण द्यायचं तर तिथून नष्ट झालेल्या आहेर-खद्री या जातींप्रमाणेच झिंगे, मरळ, वाम या जातीसुद्धा अपवादानंच पाहायला मिळतात. तिकडं पंचगंगा नदीत तेरवाड बंधाऱ्याजवळ माशांच्या शेंगाळो, मरळ, वडसुडा, तांबर, घुगरा, परग, वाम, कटारना, आंबळी, खवली, तांबुडका, अरळी, कानस, डोकऱ्या अशा चौदा-पंधरा जाती सहजी मिळायच्या. पण आता यापैकी एकही मासा दिसला तरी नवल !

या बहुद्द्योगी माशाची सर दुसरी कुणाला??

या बहुद्द्योगी माशाची सर दुसरी कुणाला??

चिलापी वाढण्यास नद्यांचं प्रदूषणही कारणीभूत ठरलं. प्रदूषित पाण्यामुळं स्थानिक मासे आधीच टिकून राहण्यासाठी धडपडत होते. याशिवाय मासेमारीत जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठीची बेशिस्त त्रासदायक ठरलीच होती. त्यात भर म्हणजे चिलापी. त्याच्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठीच स्पर्धा निर्माण झाली. स्थानिक मासे ही स्पर्धा हरले. चिलापीचा माणसावरही अप्रत्यक्ष परिणाम होतच आहे. माशांच्या इतर जाती नष्ट झाल्या. त्याचा मासेमारांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला.

हा मासा प्रदूषित पाण्यात वाढतो. त्याचा त्रास हा मासा खाणाऱ्यालाही होतो. कारण हा मासा प्रदूषित पाण्यात टिकतो म्हणजे प्रदूषित घटक त्याच्या शरीरात गेले तरी त्याला काही होत नाही. जड धातूसारखे अतिशय घातक घटक काही प्रमाणात त्याच्या शरीरात साठून राहतात. माणूस किंवा इतर पक्षी-प्राणी या माशाला खातात तेव्हा त्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे काही अभ्यासक असे सांगतात की, प्रदूषणामुळे मासे मेलेले परवडले, पण ते जिवंत राहिले तर त्याचा माणसाला त्रास होऊ शकतो.

गेल्या वीस वर्षांमध्ये झालेला हा बदल स्थानिक जिवांच्या विविधतेवर खोलवर परिणाम करणारा आहे. त्यातून शिकण्यासारखं बरंच आहे. एखाद्या प्रदेशात कोणत्याही प्राण्याची नवी जात आणताना त्याच्या परिणामांचा पूर्ण अभ्यास झालेला नसेल तर काय होऊ शकतं, याचं हे उत्तम उदाहरण. चिलापी आणला उत्पादन वाढविण्यासाठी पण त्याच्यामुळं भलतंच घडलं. गाजरगवत, घाणेरी यासारख्या तणांच्या रूपानं जमिनीवर हे घडलंच आहे. आता पाण्यातही चिलापीच्या रूपानं ”तण” वाढतंय. त्यामुळे असा खेळ अतिशय काळजीपूर्वक खेळावा लागतो. नाहीतर उपायापेक्षा इलाज भयंकर ठरतो. तेच चिलापी ऊर्फ ”डुक्करमाशा”नं दाखवून दिलंय.

– अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com

17 thoughts on “गोष्ट ”डुक्करमाशा”ची ! (उजनीच्या पाण्याचं दुष्टचक्र ३)

 1. दीपक मोडक says:

  अतिशय उद्बोधक माहिती आहे ही अभिजित. आणि शेवटी निष्कर्ष काय, तर एकच, वाढतं आणि घातक प्रदूषण, आणि फायद्यासाठी माणसाने निसर्गात केलेली ढवळाढवळ.

  • हो सर…
   पण हा फायदासुद्धा तत्कालीक आहे, फार काळ टिकणारा नाही. त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत.

   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

 2. देवदत्त पाटणकर says:

  अगदी भयानक परिस्थीती आहे. मुला-मुठे मध्ये काहीच वर्षापूर्वी साधारण पाने ७० जातींचे मासे वा जलचर आढळत होते. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण प्रदूषणामुळे कमी झाल्याने बहुसंख्य जाती नष्ट होऊन आज घडीला फक्त ७-८ जाती अस्तीत्वात आहेत. त्याचबरोबर पाणवठे अथवा नदीचा प्रवाह यांच्या काठावर दिसणारे अनेक जातींचे पक्षी आता दिसत नाहीत कारण त्यांचे नैसर्गीक अधिवास प्रदूषित अथवा नष्ट झाले आहेत. प्रदूषित पाण्याजवळ हमखास आढळणारा एक काळ्या रंगाचा बगळ्यासदृश्य पक्षी मात्र सतत दिसतो.( नाव आठवत नाही). एकूण काय मानवाने निसर्गाबरोबर इतर जीव — ज्यांचा मानवाइतकाच जगायचा हक्का आहे तो सुद्धा हिरावून घेतला आहे !

 3. Ravindra Gore says:

  – interesting
  – an eye opener
  – needs to be referred to an expert like konkan krishi vidyapeeth or
  fisheries college
  – thx

  ravi gore
  9011061961

  On Mon, Feb 23, 2015 at 2:29 AM, “हवा, पाणी आणि अभि…” wrote:

  > [image: Boxbe] This message is eligible
  > for Automatic Cleanup! (comment-reply@wordpress.com) Add cleanup rule
  >
  > | More info
  >
  >
  > abhijitghorpade posted: “उजनी जलाशयाची आणखी एक ओळख म्हणजे तिथला
  > डुक्करमासा ! प्रदूषणाचा विषय निघालाय तर त्याला विसरून कसं चालेल?
  > उजनीप्रमाणेच आपल्याकडील इतर जलाशय, तळी, नद्यांचा ताबा या माशानं घेतलाय.
  > त्यामुळे जलचरांची विविधता नष्ट झालीच, शिवाय इतरही परिणाम भोगावे लागत आहेत.
  > ”का”

 4. अप्रतिम जानकारी देनेवाला एक शानदार लेख.. नया विषय, अद्भुत सरल शैली और दुनिया भर का ज्ञान.. मेरे दोस्त आपका तहेदिल से अभिनंदन..
  दिनेश शर्मा

 5. adv. Ravindra pomane says:

  Apali juni olakh ahe soppecom
  Ujani che tin lekh vachale khup abhyaspurn ahet.
  Kurkumbh midc chya badhit kshetrat rahto. Andolana sathi apali madat havi
  Thanks
  9096125413

  • प्रिय रवींद्र,
   आपल्याशी इतक्या दिवसांनंतर संपर्क होत आहे. बरं वाटलं. आपण आंदोलनाबाबत काय विचार करत आहात ते जरूर कळवा. माझ्याकडून निश्चित सहकार्य असेल.
   धन्यवाद.
   ९८२२८४०४३६

 6. माहितीपूर्ण लेखमालिका. प्रत्याक्षात आपण काय करु शकतो – हा प्रश्न मनात आलाच!

  • आपण खूप काही करू शकतो.. आणि हे आपणच करू शकतो.
   मी सध्या तरी लोकांना जागरूक करण्याची बाजू सांभाळतो आहे. पुढच्या टप्प्यात आणखी करण्याचा विचार आहे. त्यात सर्वांनाच खारीचा तरी वाटा लागेल.
   धन्यवाद.

 7. Mrs Alka Kolipakam says:

  The information on the adaptability of Tilapia was very comprehensive. I really liked it. I am aware that this fish is from Africa as I have been living here on and off for past 10 years. But I am a little confused about certain things….is the introduction of Tilapia really the cause of disappearance of other species of fish? Or is the disappearance because of the rising pollution and indisciplined fishing? Is it that introduction of Tilapia is all bad? I can understand that eating Tilapia would be harmful for people because of the chemicals stored in its body. But has anybody studied whether water pollution decreases due to the presence of this fish, and in fact help growth of other species? I write this because I know that in Africa there is a practice of introducing Tilapia for cleaning up water and recirculating it. As Tilapia is an introduced species, it would not have its natural predator in India. Do we know what are the causes of natural death of this fish, what species are its predators? And is it possible to introduce them?

 8. Abhijit Vithoba Gharat says:

  खरचं खूप सूदंर व माहितीपूर्ण लेख लीहीला आहे तूम्ही.याच माशाला कोकणातील खेड्या मधे फंटूश,तिलापी इ.नावाने ओळखला जातो.हा मासा तो ज्या जलाशयात सापडतो त्या जलाशयातील इतर प्राण्यावर नक्कीच त्याचा प्रभाव जाणवतो( तूम्ही नमूद केल्याप्रमाने) आणि तो किती होतो यासंदर्भात शोध चालू आहे.मला त्याबद्दल अधिक माहिती प्राप्त झाल्यानंतर आपणांस मेल करेन.खरचं आपला ब्लॅाग वाचनिय आहे.तसेच अलका मॅडमनी नमूद केल्यानूसार याचा फक्त एकच फायदा माझ्या माहितीत आहे तोम्हणजे हा डासाच्या अळ्या ही खातो.

  • अभिजित,
   आपल्या प्रतिसादाबाबत धन्यवाद. याबाबत मला जरूर माहिती कळवा. सोबत माझा मोबाईल क्रमांकही देत आहे- ९८२२८४०४३६. आपण कुठे असता आणि काय करता याबाबतही सांगा.

 9. नेहा says:

  अप्रतिम माहिती… माहितीपूर्ण लेखासाठी खूप खूप आभार

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s