जांभा सांगतोय, प्राचीन हवामानाचा इतिहास!

सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा पट्टा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथं कोणे एके काळी कोकणासारखा धोधो पाऊस पडायचा. हा इतिहास उलगडलायतिथं सापडणाऱ्या जांभा नावाच्या खडकाने. तिथं हा जांभा खडक जागोजागी भेटतो आणि स्वत:च्या निर्मितीची कहाणीच सांगतो! तिथं इतका पाऊस पडायचा असं सांगितलं तरी आजच्या दुष्काळी स्थितीत दिलासा वाटावा

अभिजित घोरपडे

J5

सांगली जिल्ह्यात विटा-खानापूर रस्त्यावर असलेल्या तामखडी गावात सर्वत्र अशी लालेलाल माती आहे. कारण एकच- तिथं आढळणारा जांभा !

 

दंडोबा.. सांगलीजवळ असलेला हा एक डोंगर. प्रसिद्ध पर्यटनस्थळ! निसर्गप्रेमी, भाविक, तरुणतरुणी, ट्रेकिंग करणारे अशा साऱ्यांचं आवडतं ठिकाण. कोणी सहलीसाठी जातात, कोणी वृक्षारोपण करण्यासाठी, कोणी गुहेतील मंदिराच्या दर्शनासाठी, तर कोणी इतर कारणांसाठीयात्रा किंवा काही सणांचे दिवस सोडले तर फारशी वर्दळ नसते. त्यात या डोंगराचा पसारा बराच मोठा. त्यामुळे थोडीफार गर्दी असली तरी ती जाणवत नाही. वाहणारा वारा, निवांतपणा अनुभवण्यासाठीच हे एक उत्तम ठिकाण!

J4

दंडोबावर असलेलं मंदिर असं जांभा खडकामध्ये कोरलेल्या गुहेत आहे.

मी या डोंगराद्दल बरंच ऐकलं होतं. त्यातल्या एका वेगळ्या गोष्टीचं मला कुतूहल होतं. इतकं की प्रत्यक्ष जाऊन ते कधी पाहतो, असं झालं होतं. तीनचार वर्षांपूर्वी योग आला. आणि ते पाहून खरंच आश्चर्यचकित झालो. ऐकलं होतं, तरीही ते प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. असं काय होतं तिथं?.. तर वैशिष्ट्यपूर्ण खडक! तिथले खडक पाहिले की वाटावं, आपण कोकणात तर नाही ना! इतका वेगळा. कसला खडक?… तर लालपिवळ्या रंगाचा, झीज झालेला आणि पाणी वाहून जाईल असा सछिद्र. हा तर जांभाकोकणाची ओळख असलेला!

दंडोबा डोंगराच्या माथ्याचा संपूर्ण थर याच प्रकारच्या खडकाचा. तोच खडक कोरून गुहा केलेली आणि त्या गुहेत एक मंदिर. आजूबाजूला खडकाच्या भल्या मोठ्या शिळा पडलेल्या. त्या साऱ्या लालपिवळ्या रंगाच्या म्हणजेच जांभ्याच्या!

माझ्यासाठी ही नवलाई होती. कारण कोकण सोडून इथं जांभा कसा? तो सुद्धा सांगलीसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात! तसा यापूर्वी पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी तुरळक प्रमाणात जांभा पाहिला होता, पण हे इतके मोठाले खडक आणि संपूर्ण जांभ्याचा थर पहिल्यांदाच पाहात होतो. ते पाहून आश्चर्य वाटण्याचं कारण हे की जांभा खडक विशिष्ट हवामानातच निर्माण होतो. त्याच्यासाठी कोकणासारखी जास्त पावसाची आणि भरपूर आर्द्रता असलेली स्थिती आवश्यक असते. दंडोबा डोंगरावर हवामानाची स्थिती नेमकी याच्या विरुद्ध आहे. तिथला प्रदेश कमी पावसाचा आणि कोरड्या हवामानाचा. तरीही इथं जांभा आढळणं हे आगळं होतं. बरं, असंही नव्हतं की, इथं कोणी इतर ठिकाणाहून जांभा आणला असेल किंवा तो पाण्यासोबत वाहत आला असेल. तो तिथलाच होता, तिथंच तयार झालेला.

J2

घराच्या भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले… बेडग गावाजवळचं हे कच्चं घर

 

हे केवळ दंडोबा डोंगरापुरतं मर्यादित नव्हतं. या परिसरात, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा जांभा पाहायला मिळतो. नेमकेपणानं सांगायचं तर मिरज तालुक्यात बेडग हे गाव. तिथून जवळ असलेल्या रेल्वे मार्गालगत एक कच्चं घर दिसलं. छप्पर म्हणून पत्रा आणि भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले. एरवी कोकणात जांभ्याच्या चिरांची सुंदर घर पाहिली होती, पण जांभ्याचे दगड रचलेलं हे इथलं घर. या घराजवळून लाल माती काढून ती रेल्वेमार्गावर पसरलेली दिसली. तिथूनच हे दगडसुद्धा काढलेले होते.

एवढंच नाही, तर खानापूरविटा रस्त्यावर वेगळा प्रकार पाहायला मिळाला. या रस्त्यावर खानापूरपासून ६ किलोमीटर अंतरावर तामखडी नावाचं गाव आहे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तांबडी माती दिसली. आजूबाजूच्या मातीपासून स्पष्ट फरक लक्षात यावा, इतकी तांबडी! शेतंच्या शेतं या तांबड्या मातीत. त्यातच नांगरट केलेली आणि त्यातच उभी पिकं. या तांबड्या मातीचं रहस्यसुद्धा तिथं सापडणाऱ्या लाल जांभा खडकात होतं. तामखडीमध्ये जांभा आढळतो, त्यानंच तिथल्या लाल मातीला जन्म दिला आहे. तामखडी सोडून आणखी पुढं गेलं की प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे. हे मंदिरसुद्धा जांभा खडकावरच वसलं आहे. मंदिराच्या मागं गेलं की तिथं लालपिवळसर रंगाचं टेकाड याची माहिती देतं.

J6

रेवणसिद्ध मंदिराच्या परिसरातही लाल-पिवळा जांभा दर्शन देतो.

याची आणखी एक तऱ्हा जत तालुक्यात पाहायला मिळाली. जत म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांत दुष्काळी तालुक्यांपैकी एक. कर्नाटकच्या सीमेवर. जतपासून कर्नाटकात अथनी या गावाला एक रस्ता जातो. या रस्त्याने जाताना उजव्या हाताला टेकडीवर मोठमोठाल्या पवनचक्क्या दिसल्या. ते पाहण्यासाठी थांबलो, तर संपूर्ण टेकडीच लालेलाल खडकाची दिसली. ती टेकडी जांभा खडकाची होती. तीच नव्हे तर आसपासच्या ओळीने साऱ्या टेकड्या जांभ्याच्याच होत्या. काही लाल रंगाच्या, तर काही लालबरोबरच पिवळसर झाक असलेल्या!

J3

जतकडून कर्नाटकात अथनीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना जांभ्याच्या टेकड्या दिसतात. त्यावरचा लालबुंद रस्ता कोकणची आठवण करून देतो.

याचा अर्थ हा जांभा याच भागातला मूळ निवासी. तो कुठून तरी आलेला / आणलेला किंवा पाण्यासोबत वाहत आलेला अजिबात नाही. हा सांगितलेला सारा भाग येतो दुष्काळी पट्ट्यातकाही माणदेशात, तर काही त्याला लागून असलेल्या भागात. हे वास्तव असेल तर ते मोठा प्रश्न उपस्थित करतं. कोकणच्या हवामानातला जांभा या दुष्काळी पट्ट्यात कसा?

सामान्यांना प्रश्न पडेल, पण अभ्यासक, विशेषत: पुराहवामानतज्ज्ञ / भूशास्त्राचे अभ्यासक याचं उत्तर देतात. ही मंडळी प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करतात. त्यावरून त्या काळातील हवामान आणि त्यात झालेला बदल याची माहिती मिळवतात. पुण्यातील डॉ. शरद राजगुरू हे असेच वरिष्ठ तज्ज्ञ. त्यांच्यासोबतच मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात सासवडजवळ आढळणारे जांभ्याचे खडक पाहिले होते. या तज्ज्ञांचा निष्कर्ष असा, की सांगली जिल्ह्यात आढळणाऱ्या जांभ्याची निर्मिती काही हजार किंवा काही लाख वर्षांपूर्वी झाली आहे. तो तयार झाला तेव्हा तिथं कोकणासारखं हवामान होतं. म्हणजेचभरपूर पाऊस आणि आर्द्र हवा. तेसुद्धा थोड्याथोडक्या काळापुरतं नव्हे तर किमान काही हजार वर्षं!

आता सर्वच भाग अतिशय कमी पावसाचा. महाराष्ट्राचा दुष्काळी भाग म्हटलं की या भागाचं नाव आधी घेतलं जातं. त्यामुळे तिथं कधी काळी भरपूर पाऊस पडत होता हे सांगितलं तरी दिलासा मिळावाहवामान आणि त्याचं चक्र एकसारखं नसतं, ते सतत बदलत असतं. त्याची गती संथ असते इतकंच.

J1

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जागोजागी असे जांभ्याचे खडक  पाहायला मिळतात.

आताच या विषयावर लिहायचं कारण असं की सध्या दुष्काळी वर्ष आहे. पाण्याची ओरड आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कमी पडलेला पाऊस हे कारण आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गातील व्यवस्था नष्ट केल्या आहेत. उदा. नैसर्गिक प्रवाह, भूजलाची व्यवस्था, त्याचं पुनर्भरण करण्यास उपयुक्त ठरणारा झाडोरा, वगैरे. निसर्गसुद्धा बदल घडवून आणतो, पावसाचं प्रमाण कमी करतो. म्हणून तर सांगलीत पूर्वीचा जांभा दिसतो, तर आता दुष्काळ! पण निसर्गातील बदल संथ गतीने होतात, तर आपली गाडी सुसाट सुटते. निसर्गाच्या वेगाशी जुळवून घेणं काही प्रमाणात शक्य असतं, पण आपल्या या वेगाचं काय?

याचं भान यावं यासाठी हे सारं!

अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

http://www.abhijitghorpade.wordpress.com

27 thoughts on “जांभा सांगतोय, प्राचीन हवामानाचा इतिहास!

  1. तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे. जागतिक हवामानाबद्दल बोलताना पुष्कळ लोकांचा आवडता युक्तिवाद असतो, की नैसर्गिक रित्याही पृथ्वीचे हवामान बदलत आलेले आहेच मग त्याचा इतका बाऊ कशाला करायचा. पण नैसर्गिक रित्या होणारे बदल संथ असतात. त्यामुळे सजीव प्रजातींमध्ये त्या बदलांशी अनुकूलन साधणारे वर्तणुकीय बदल तसेच जनुकीय बदलही घडून येण्यासाठी वाव मिळतो. तरीसुध्दा काळाच्या अोघात अशा संथ बदलांशीसुध्दा जुळवून घेता न आल्यामुळे हजारो प्रजाती नष्ट झाल्या आहेत. तेंव्हा जागतिक हवामान बदल ही समस्या नसून त्या बदलाचा औद्योगिक क्रांतींनंतर झपाट्याने वाढलेला वेग ही खरी समस्या आहे.

    • प्रियदर्शिनी मॅडम…
      अगदी बरोबर. याच गोष्टींची जागरुकता वाढावी आणि त्यातील नेमका फरक वाचकांच्या लक्षात यावा, या उद्देशाने ही मांडणी केलेली आहे.
      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  2. Vishwanath Bhave says:

    निसर्ग-स्नेही जीवनशैली हे अनेक पर्यावरणीय प्रश्नांचे उत्तर आहे. पण त्याचे आचरण करण्यास कोणीच तयार नाही. शेवटी नैसर्गिक उत्पात होईपर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास यांच्या धुंदीतच आपण राहू असे दिसते. गम्मत वाटते पर्यावरण तज्ञांची. विकास आणि पर्यावरण यांची सांगड घालणे शक्य आहे असे सांगून ते चंगळवादाला खतपाणीच घालतात.

    • प्रिय विश्वनाथ सर,
      विकास आणि पर्यावरण या गोष्टी एकमेकांना पूरक असू शकत नाहीत. विकास करताना पर्यावरणाचे नुकसान होतेच, ते तुलनेने कमी करणे हेच आपल्या हाती असते. अर्थात म्हणून विकास करायचाच नाही, असेही मानता येणार नाही. भोवतालची परिस्थिती आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन हा निर्णय घ्यावा लागतो.
      मात्र, ते करताना नेमून दिलेले कायदे-नियम यांची पायमल्ली होणार नाही आणि पर्यावरणाचे नुकसान कमी कसे करता येईल, हे पाहायला हवेच.

      • Vishwanath Bhave says:

        विकास करायचाच नाही असे मानता येणार नाही हे खरे, पण मग प्रश्न उरतो किती ! गरजेचा विकास आणि चैनीचा विकास असा फरक करायचा म्हटला तर तसे शक्य होणार नाही करण गरज अणि चैन यांच्या व्याख्या कोणी करायच्या हा प्रश्न अनुत्तरितच राहणार.

  3. P.S.Hirurkar says:

    अभिजित सर, आश्चर्यकारक आहे. जांभा खडक म्हणजे सँड स्टोन काय? कदाचित हा परिसर लाखो वर्षापूर्वी समुद्राचासुध्दा भाग असु शकतो.

    • प्रिय हिरूरकर सर,
      जांभा म्हणजे लॅटेराईट. त्याला लोहखनिज असेही म्हणता येते. त्याच्यापासून लोखंड हा धातू मिळवता येतो. त्याचा सँड स्टोनशी संबंध नाही. सँड स्टोन हा गाळाचा खडक आहे. आपण म्हटल्याप्रमाणे तो समुद्राच्या तळाशी निर्माण होतो.
      .
      जांभा हा आपल्याकडे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर (पश्चिम घाट) आणि किनारपट्टीच्या भागात मिळतो.

  4. BABAN MINDE says:

    घोरपडे नमस्कार चांगली माहिती मिळाली या लेखामुळे. अशा अभ्यासामुळे त्या त्या प्रदेशाचा इतिहास कळतो. धन्यवादबबन मिंडे

    बुधवार, 20 जनवरी, 2016 4:49 PM को, “हवा, पाणी आणि अभि…” ने लिखा:

    #yiv8243860637 a:hover {color:red;}#yiv8243860637 a {text-decoration:none;color:#0088cc;}#yiv8243860637 a.yiv8243860637primaryactionlink:link, #yiv8243860637 a.yiv8243860637primaryactionlink:visited {background-color:#2585B2;color:#fff;}#yiv8243860637 a.yiv8243860637primaryactionlink:hover, #yiv8243860637 a.yiv8243860637primaryactionlink:active {background-color:#11729E;color:#fff;}#yiv8243860637 WordPress.com | abhijitghorpade posted: “सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा पट्टा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथं कोणे एके काळी कोकणासारखा धो-धो पाऊस पडायचा. हा इतिहास उलगडलाय- तिथं सापडणाऱ्या जांभा नावाच्या खडकाने. तिथं हा जांभा खडक जागोजागी भेटतो आणि स्व” | |

    • बबनराव,
      हो, याच उद्देशाने ही पोस्ट टाकली आहे. त्यानिमित्ताने लोकांचे या महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधले जावे आणि या विषयांवर चर्चा व्हावी हा हेतू आहे. तो सफल होताना दिसत आहे.
      प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  5. Hemangi says:

    किती दिवसांनी लिहिलाय तुम्ही ब्लॉग…
    माहिती आवडली. आश्चर्य वाटले, तुमचे आणि प्रियदर्शिनीचे मुद्दे विचारप्रवर्तक असून अगदी पटले.

    • हो हेमांगी.
      खूप महिन्यांचा खंड पडला होता. आता पुन्हा ब्लॉग लिहण्यास सुरुवात केली आहे- अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी. अनेक विषय आहेत..
      प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  6. विनायक तुकाराम पाटील says:

    सर माझं गांव सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यात. म्हणजेच जत, खानापुर पासून हाकेच्या अंतरावर. तुमचा ब्लाॅग वाचून मला माझ्या प्रदेशाची माहिती मिळाली.

    • @पाटील सर,
      तुमचा जिल्हा खूप वेगळा आहे. तो व्यवस्थित पाहिला तर त्यात खूप काही रंजक गोष्टी आहेत.
      .
      आपणाला आवडला असेल तर हा ब्लॉग व त्यावरील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  7. Vishwanath Bhave says:

    जांभा दगडच सुर्य प्रकाशामुळे काळपट पडू लागतो व कालांतराने त्यातली लाली जाते असे कोकणातही दिसून येते. लागवडीसाठी कातळ फोडला तर निघणारा दगड आंत लाल असतो हे मी माझ्या बागेंत कलमे लावताना बघितले आहे. भूगार्भ्शास्त्रीय द्रुष्ट्या विचार केल्यास असे आढळले आहे कि घाटमाथा अणि कोकण हे एकसंध भूपृष्ठ नाही.आजही कोंकण व घाट यांच्या सांध्यावर भूस्तरीय तडा असून ती रेषा पनवेल मार्गे दक्षिण गुजरात ते गोवा-कर्नाटक पर्यंत जाते समुद्रतळान्तिल भूकाम्प्सादृश हालचालींमुळे कोंकण भूपृष्ठ नंतर वर आले. त्यामुळे कोंकण -पूर्व स्थितीमध्ये सातारा -सांगली हा भाग समुद्राला सामोरा होता त्यामुळे असे झाले असावे.

  8. J k Patil says:

    अभिदा मस्तच,ब्लॉग.
    कालच 54 विदयार्थी व आम्ही 5 शिक्षक कोयना धरण पाहण्यास गेलो होतो.पाण्याचा साठा पाहून अचंबित होण्याशिवाय पर्याय नव्हता.
    तुमचे ब्लॉग वाचून,पर्यावरण विषयी प्रेम वाढत आहे,धन्यवाद अभिदा

  9. dattatray jadhav says:

    सर आपण सध्या आमच्या भागात फिरता आहात…तांबखडी खूपच ऐतिहासिक आहे. त्या भागातील आग्रणी ही मोठी नदीचा उगम तांबखडीत झाला आहे. आजोबा सांगतात साधारण १९६०-६५पर्यंत नदी किमान आठ माहिने वाहत होती. २०००पर्यंत ती किमान चार-पाच महिने वाहत होती. अलीकडे असे चित्र दिसत नाही. वायफळे गावाजवळूनही हीच नदी वाहते. परिसराने एकेकाळी वैभव पाहिलेला आहे. आज मात्र भकास परिसर पाहताना वाईट वाटते.. आमच्या भागाला भेट दिल्याबद्दल आणि परिसराचे वेगळे विश्लेषण केल्याबद्दल आभार.. दत्ता जाधव मटा पुणे

    • हो दत्ता..
      परिस्थिती बरीच बदलली आहे. अनेक नैसर्गिक व्यवस्थासुद्धा मोडकळीला आल्या आहेत. मग वाईट तर वाटणारच. हे पूर्ववत करण्यासाठी काय करता येईल, यावर गंभीर विचार व्हायला हवा. काही लोक त्याबाबत काम करताहेत. त्यांना बळ देऊ या.
      तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  10. Anil Shidore says:

    खूपच छान … मला त्यानंतरच्या प्रतिक्रिया वाचायलाही मजा आली .. अशा विषयांचा अभ्यास करण्यासाठी एखादा अभ्यासगट स्थापन करता येईल का? त्यांनी ५ वर्ष काम करायचं.. त्यात वेगवेगळ्या विद्याशाखेचे लोक असतील. हा महाराष्ट्रासाठी मोठा दस्तावेज होईल … आम्ही गडचिरोलीच्या लेखा-मेंढी गावात असा अभ्यासगट काही वर्ष चालवला होता.. असो.. ह्या लेखनानं महत्वाचा विषय समोर आणलात.. छान.

    • सर, या विषयावर अभ्यासगट करून काम करण्याची कल्पना चांगली आहे. आपण बोलून खरंच ठरवू या.
      प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  11. PRADEEP ATHAVALE says:

    असाच जांभा दगडाचा उंचच उंच उभा कडा मुळशी धरणाच्या आसपास दिसतो. माझा समाज होता कि तो लाल मुरूम आहे म्हणून. किंबहुना सर्वच परिसर त्याच लाल मुरुमांचा आहे. कर्नाटकात रा.म.मार्ग ४ वर जागोजाग कावेचा लालबुंद भाग दिसतो. मी तो haematite ,Fe3O4 समजत आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s