सांगलीच्या पेवांची कथा… (भाग १)

सांगलीची हळद देशभर प्रसिद्ध. ही हळद साठवण्यासाठी तिथं पेवं होती, अजूनही आहेत. सांगलीत हळदीचा व्यापार वाढला, तसं शेजारच्या हरिपुरात पेवांचं पेव फुटलं. पेवांनी हरिपूरला वेगळी ओळख दिली, पैसा दिला. ‘पेवं म्हणजे समृद्धी’ हे जणू सूत्रच होतं. कृष्णाकाठच्या मातीचे वैशिष्ट्यपूर्ण थर, सांगलीचा शेजार यामुळे ही पेवं वाढली. पण २००५ साली कृष्णेला आलेल्या पुरात बहुतांश पेवं बुडाली. या पुराचा आघात इतका मोठा होता की, तेव्हापासून पेवांची घडी विस्कटली ती कायमचीच. आता बदलत्या काळात ही घडी पुन्हा बसणं महाकठीण. त्यामुळे हळूहळू पेवांचं स्थान आठवणींमध्येच उरण्याची शक्यता अधिक. याच पेवांची वेगळ्या अंगानं ओळख करून देण्यासाठी ही छोटीशी मालिका…

अभिजित घोरपडे

P7

खोल खोल पेवं !

महाराष्ट्राच्या काही भागाने नुकताच पुराचा अनुभव घेतला. जुलैऑगस्ट महिन्यांचं हे वैशिष्ट्यच. सर्वाधिक पावसाचा काळ. धरणं भरत आलेली असतात. पडेल तो पाऊस सोडून द्यावा लागतो. मग अनेक भागात पुराची शक्यता निर्माण होते. कधी अतिवृष्टी झाली तर दाणादाणसुद्धा. पावसाच्या अशा अनेक आठवणी आहेत. दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या. दोन वर्षांपूर्वी दरडींखाली गुडूप झालेलं माळीण गाव.. या वर्षी महाडजवळ कोसळलेला सावित्रीवरचा पूल.. शीच एक कहाणी २००५ सालची. त्या वर्षी २६ जुलै रोजी मुंबईने प्रलय अनुभवला, तसाच तो महाराष्ट्राच्या अनेक भागांनीही अनुभवला. कोकणात चार-पाच गावांवर दरडी कोसळल्या. शंभरावर लोकांचा मृत्यू झाला. त्या वर्षी एकाच वेळी राज्याचा निम्मा भाग पुराने वेढला गेला होता. सांगली-कोल्हापूर या जिल्ह्यांना तर पुराचा अभूतपूर्व विळखा पडला. या पुराने शेतीचं, आर्थिक नुकसान तर केलंच. त्याच्या बरोबरीनेच व्यापक बदल घडवले. अनेक ठिकाणची वैशिष्ट्यं संपवली. त्यातला एक बदल सांगलीच्या दृष्टीनं दूरगामी आणि या शहराची ओळख हिरावून घेणारा ठरला. कारण या पुरामुळं सांगलीची वैशिष्ट्यपूर्ण “पेवं” नष्ट झाली. त्या महापुराला आता अकरा वर्षं होतील, पण सांगलीच्या पेवांची घडी विस्कटली ती कायमचीच. सांगलीची ही महत्त्वाची ओळख हळूहळू विसरू लागलीय. विस्मरणात चाललेल्या पेवांच्या दुनियेत पावसाच्या निमित्तानं डोकावायला हवं

P8

पिवळीधमक हळद / हळकुंडं… सांगलीची ओळख

हरिपूरची ओळख

माझं पेवांबद्दलचं आकर्षण बरंच जुनं, पण ती पाहायला मिळाली दोन वर्षांपूर्वी. सांगली मुक्कामात तिथल्या प्रसिद्ध हळदीबद्दल माहिती घेत होतो. वेगवेगळ्या भागात मातीपाणीहवामान याचा हळदीवर, तिच्या दर्जावर काय परिणाम होतो, हे समजून घ्यायचं होतं. तिथले एक व्यापारी दिलीप मालू यांच्याशी बोलताना पेवांचा विषय निघाला. त्यांनी पेवांबाबत सांगितलेली माहिती इतकी रंजक होती की लगोलग दुसऱ्याच दिवशी पेवांच्या गावात प्रवेश केला. गावाचं नावहरिपूर. कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या संगमाचं गाव. सांगलीला लागूनच. वस्ती साधारण ६००० ते ६५००. हळदीसाठी सांगली प्रसिद्ध, तर हळकुंडं साठवण्यासाठीची पेवं ही हरिपूरची ओळख!

पेवं हा शब्द ऐकला असेल, पण पेवं म्हणजे नेमकी काय? हे पाहिल्याशिवाय समजत नाही. मलासुद्धा ती पाहिल्यावरच स्पष्टता आली. समज-गैरसमजही गळून पडले. पेव म्हणजे जमिनीत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं तयार केलेली पोकळी. माती उकरून ती तयार केली जाते. आकार साधारण गोलाकार. त्यात धान्य, शेतीमाल साठवला जातो. इथल्या पेवांचा मुख्य उद्देश हळकुंडं साठवणं. ती पेवात चांगली टिकतात. हळदीचा दर्जा सुधारतो. शिवाय इतर साठवण्याच्या पद्धतीपेक्षा खूपच किफायतशीर. त्यामुळे पेवं वाढली. एकेका पेवात १५ टन ते २५ टन इतकी हळकुंडं मावतात. व्यवस्थित राहतात. त्यामुळे व्यापारी मंडळी हळद (हळकुंडं) पेवात साठवायचे. ही पेवं मात्र हरिपूरच्या लोकांची. आता परिस्थिती बदललीय. तरीही पेवं तग धरून आहेत. पेवं आणि हरीपूर यांचा घट्ट संबंध. अगदी थेट. ती तशी इतरत्रही पाहायला मिळतात, पण इथली पेवं वैशिष्ट्यपूर्ण. म्हणून पेवं म्हटलं की याच गावाचं नाव घेतलं जातं. हळदीसाठी प्रसिद्ध असलेली पेवं फक्त इथलीच. याचा संबंध इथल्या मातीशी, तिच्या थरांशी आहे.

P3

पेवांसाठी मैदानं… मुक्काम पोस्ट- हरिपूर.

पेवांची दुनिया

पेवांची दुनिया समजून घेण्यासाठी अनेकांना भेटलो, बोललो. ज्यांची आजही पेवं आहेत ते अशोक मोहिते, याच गावचे राजाभाऊ आळवेकर, अशोक तेलंग, वयाची शंभरी गाठत आलेले गोविंद नारायण ऊर्फ अण्णा आळवेकर, सांगलीतील दिलीप ट्रेडर्सचे दिलीप मालू, असे बरेच जणहरिपुरात गेल्यावर एक वैशिष्ट्य जाणवलं. या गावात मैदानंच मैदानं. गावठाणात, आजूबाजूला. सगळीकडंच मैदानं. मुद्दामच राखलेली. ही सारी पेवांची मैदानंबोंद्रे मैदान, पिंगळे मैदान, फाकडे मैदान, कत्ते मैदान, हनवर मैदानअशी कितीतरीफाकडे मैदानात दोन एकरावर नारायण बजरंग फाकडे यांची १००-१५० पेवं असल्याचं समजलं. अंकली रस्त्यावर बोंद्रे मैदानातली पेवं चांगल्या प्रकारे राखलेली होती. या मोठ्या मैदानात पेवाच्या ८ ओळी मोजल्या. एका एळीत १० पेवं होती. अशी एकूण ८० पेवं होती. त्यालाच लागून असलेल्या लहान मैदानात ५० पेवं होती.

ही सर्व पेवं जुनी. अलीकडच्या २५२७ वर्षांत नव्यानं पेवं काढली नाहीत. पण या पेवांचा काळ नेमका किती मागं जातो, हे अधिकारवाणीने कोणी सांगू शकलं नाही. पेवांचे मालक असलेले अशोक मोहिते यांच्या म्हणण्यानुसार, पेशवाईपासून घरात पेवं होती. कारण तितक्या जुन्या वाड्यांमध्ये आजही पेवं पाहायला मिळतात. पुढे १९३५ नंतर त्यांची संख्या वाढत गेली.

पेवांबाबत जुनी माहिती मिळवण्यासाठी गावातील वयोवृद्ध गृहस्त गोविंद नारायण आळवेकर ऊर्फ अण्णा यांना भेटलो. जन्म१९२०. त्यांच्या घरी गेलो. नेहरू शर्ट, धोतर, डोक्यावर पिवळसर फेटा, कपाळावर चंदनाचा टिळा. दृष्टी व्यवस्थित, आवाजही उत्तम, मात्र ऐकायला कमी येत होतं. पन्नाशीत असलेल्या आपल्या मुलाचा (वसंत) हात धरून बाहेरच्या खोलीत आले. नमस्कार केला, तर ते माझ्या पाया पडण्यासाठी वाकलेते वारकरी संप्रदायाचे असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं.

Pe

श्री. अण्णा आळवेकर. जन्म- १९२०

आजपर्यंतचा प्रवास

अण्णांनी हरिपुरात लहानपणीपासून पेवं पाहिलीत. “ती आधी धान्य साठवण्यासाठी वापरली जायची. हळदीची बाजारपेठ वाढली, तशी पेवांची संख्याही वाढत गेली. आधी पेवं घरातच असायची. ती फार मोठी नव्हती. त्यात २५-५० पोती धान्य मावायचं. अनेकांच्या घरात आजही पेवं आहेत. पुढं पेवांची संख्या वाढली, तशी ती अंगणात गेली. १९३५ नंतर हळदीचं उत्पादन वाढलं, सांगलीत हळदीची बाजारपेठही विस्तारली. व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात हळद साठवण्याची गरज निर्माण झाली. मागणी आणखी वाढल्यावर लोकांनी शेतातही पेवं काढली. पेवांकडं उत्पन्नाचं चांगलं साधन म्हणून पाहिलं जाऊ लागलं…” अण्णांनी बराच जुना पट उलगडून दाखवला. “१९७५ ते २००५ हा कालावधी हळदीच्या पेवांसाठी अतिशय लाभदायक. सुवर्णकाळच म्हणा...” अण्णांचे चिरंजीव वसंत आळवेकर यांनी माहितीत भर टाकली. “३० वर्षांपूर्वी पेवं काढायला तीन हजार रुपये खर्च यायचा…” हरिपुरात भेटलेले ७४ वर्षांचे श्रीपती केदारी जाधव यांनी ही माहिती दिली.

एकट्या हरीपुरात ४५००-५००० पेवं होती, असं गावातील राजाभाऊ आळवेकर यांनी सांगितलं. “२००५ च्या पुरात हरिपुरातली निम्मी पेवं गेली. पुरामुळे पेवं पाण्याखाली गेली. पाणी आत शिरल्याने स्फोट झाल्यासारखी पेवं उडाली. पेवं अशी फुटायची, त्याचा मोठा आवाज व्हायचा, मग तिथं पाणी शिरून पाण्याचा भोवरा व्हायचा. कदाचित आत साठून राहणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूचा तो परिणाम असावा… या पुरात हरिपूरची निम्मी पेवं संपलीराजाभाऊ यांची आठवण. “या पुरामुळे सांगलीतील हळदीच्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. ते सहाआठ वर्षे मागं फेकले गेले..” हळदीचे व्यापारी दिलीप मालू यांची आठवण. सध्या हरीपुरात २०००२५०० पेवं असल्याचं सर्वांच्याच बोलण्यात आलं.

आकर्षक रचना

पेवांची रचना आवडली- जणू एखादा रांजणच. वरच्या बाजूला चार-सहा फूट सरळ उभट तोंड. ते विटांनी बांधून घेतलं जातं.

त्याच्या खाली या तोंडापेक्षा थोडा कमी व्यासाचा मार्ग असतो. तिथं आढी बांधतात. या ठिकाणी पेवाचं झाकण असतं. खाली थोडंसं विटांचं बांधकाम, त्याच्यावर लोखंडी पट्ट्या आणि त्या पट्ट्यांवर पेवाचं झाकण बसवलं जातं. झाकण म्हणजे आयताकृती शहाबादी फरशी. ती बसवली की वर माती टाकून तोंड बंद करून टाकतातपेवाचं तोंड हे मातीच्या विशिष्ट थरात असतं. साधारणपणे वरचा काळ्या मातीचा थर आणि खालचा चिकण मातीचा थर यांच्या सीमेवरच तोंड असतं.

या तोंडाच्या खाली हंड्याच्या आकाराची मोठी पोकळी. ती पूर्णपणे चिकण मातीच्या थरात असते. त्याची उंची साधारणपणे २० ते २५ फुटांपर्यंत असतेव्यास १५२० फुटांपर्यंत असतो… राजाभाऊ आळवेकर यांनी सांगितलेली ही माहिची. पण मी विविध मैदानात वरूनच पेवं पाहिली, तेव्हा पेवांचा व्यास १२ फुटांच्या आसपास असावा, असं वाटलंदोन पेवांमध्ये तीनचार फूट असावं, असं दिसून आलं.

पेवाचं तोंड बंद केल्यावर ते नेमकं कुठं आहे, हे ओळखू यावं यासाठी तिथं मातीचा ढिगारा करतात. या ढिगाऱ्यावर बँकेची प्लेट दिसली. ज्या बँकेने पेव तारण ठेवून कर्ज दिलेलं असेल त्या बँकेची ही प्लेट. (क्रमश:)

– अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

(पेवं हरिपूरलाच का.. असं काय दडलंय तिथल्या मातीत..?

वाचा- “सांगलीच्या पेवांची कथा, भाग २”… लवकरच याच ब्लॉगवर)

 

30 thoughts on “सांगलीच्या पेवांची कथा… (भाग १)

  1. Nilesh Ambekar - Thane says:

    अभिजित
    धन्यवाद, अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  2. Atul kapole says:

    Abhijeet,
    New information. What is reason to make storages below ground? May be to conserve smell of turmeric.
    Thanks
    Atul kapole

  3. Sandeep Shrotri says:

    extremely useful.
    thnx for sharing

    sandeep shrotri

    2016-08-10 16:11 GMT+05:30 “हवा, पाणी आणि अभि…” :

    > abhijitghorpade posted: ” सांगलीची हळद देशभर प्रसिद्ध. ही हळद साठवण्यासाठी
    > तिथं पेवं होती, अजूनही आहेत. सांगलीत हळदीचा व्यापार वाढला, तसं शेजारच्या
    > हरिपुरात पेवांचं पेव फुटलं. पेवांनी हरिपूरला वेगळी ओळख दिली, पैसा दिला.
    > ‘पेवं म्हणजे समृद्धी’ हे जणू सूत्रच होतं. कृष्णाकाठच्या माती”
    >

  4. Sandeep Shrotri says:

    its extremely useful
    its amazing
    it should be considered as Traditional way of storage, conservation.
    Ita kind of Heritage of ancient India

    sandeep shrotri

    • Yes, it was really interesting way. Don’t know whether it will cope up with the recent changes. Because people who can dug these structures & work in these structures are very few in number today.
      But definitely it is one of the heritages of our country.
      Thanks for your response.

  5. Baba Pawar says:

    अभिदा खूप छान लेख. मी 20 वर्षांपूर्वी असेच एक पेव पाहिले होते आणि त्या पेवात रात्री चुकून पडल्याने वेडा झालेला माणूसही पाहिला होता. त्यावेळेपासून मलाही खूप कुतूहल होते पेवांचे. ही माहिती खूपच उत्सुकता वाढवतीये माझी. लवकर पुढचा भाग येउद्या. Thanks lot. Keep it up.

    • पेवांची दुनिया खूपच न्यारी आहे.. त्याच्याशी संबंधित अनेक कथाही आहेत.
      पुढचा भाग लवकरच.
      प्रतिसादाबद्दल आभार.

  6. sanyogita patil says:

    Amazing na
    खूप ऐकलं होतं आज वाचायला मिळालं आता सांगलीला जाऊन नक्की बघणार
    Thanks Abhijeet

    • संयोगिता,
      जरूर पाहा, इतरांनाही दाखवा. नक्की आवडेल.
      कोणा माहितीगाराची आश्यकता भासल्यास जरूर सांगा.
      प्रतिसादाबद्दल आभार.
      – अभिजित

  7. अमिजीत ..ब्लॉग खूप छान माहितीपूर्ण! ! पेव फुटणं हा वाक्प्रचार माहीत होता फक्त
    …तुमच्या माहितीने पेव म्हणजे नक्की काय याचा अंदाज आला. पुढील भाग लवकर येऊ द्या 😊

  8. abhishek says:

    uttam mahiti..pahilyancha aaikali..chan mandani..ajun kahi pevache foto takata ale tar tyachya saurachanecha changala aandaz yeu shakel

    • हो अभिषेक, पुढच्या भागांध्ये काही फोटो टाकणार आहे.
      प्रतिसादाबद्दल आभार.

  9. देवदत्त पाटणकर says:

    काही वेळा आपल्याकडे असलेले असे पारंपारीक ज्ञान कालौघात नष्ट होत असते. याचा कुठेतरी log ( नोंद) असणे आवश्यक आहे. ते तुमच्या लेखामुळे साध्य झाले आहे।

    • होय देवदत्त.
      यामुळे या गोष्टींची नोंदही होईल आणि अनेकांना त्या कशा होत्या / आहेत याची कल्पनाही येईल.
      प्रतिसादाबद्दल आभार.

  10. Harshada Pendharkar says:

    खूप छान माहिती. लहानपणी सांगलीला काही वर्ष राहिले होते. पण हि माहिती आता समजली. आमच्या संस्थेतील मुलांना दाखवायला आवडेल. Thanks.

    • संस्थेतील मुलांनी तर पाहावीच, पण मोठ्यांनीसुद्धा पाहावीत अशी ही पेवं आहेत.
      हर्षदा, प्रतिसादाबद्दल आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s