हळदीची पेवं सांगलीजवळ असलेल्या हरीपूरलाच का?.. याचं उत्तर सांगलीची बाजारपेठ आणि हरीपूरमधील मातीच्या थरांमध्ये दडलं आहे. मातीचे वैशिष्ट्यपूर्ण थर नसते तर तिथं पेवं खणताच आली नसती आणि त्यात हळदही टिकली नसती. एरवी मातीकडं कोणी लक्ष देईल न देईल, पण इथं मातीनंच हळद साठवण्याला पूरक परिस्थिती निर्माण करून दिली आणि सांगलीची बाजारपेठ विस्तारण्यास हातभारही लावला.
या पेवांची दुनियाच न्यारी आहे. कारण त्यात हळदीला कीड लागत नाही, साठवलेल्या हळदीचं वजन वाढतं आणि त्यातल्या हळदीची चोरीही होऊ शकत नाही…
– अभिजित घोरपडे

पेवाचं तोंड, आढी आणि झाकण
हळद साठवण्याची पेवं पाहताना मला पडलेला एक प्रश्न– ही पेवं हरिपुरातच का? एक गोष्ट स्पष्टच होती. हळदीची देशातली सर्वांत मोठी उलाढाल सांगलीला व्हायची, आजही होते. त्याच्या जवळ असल्यामुळे हरीपूर महत्त्वाचं. पण हे एकच कारण पुरेसं नाही. कारण तसं असतं तर मग खुद्द सांगलीत किंवा आसपासच्या इतर गावांमध्ये पेवं का नाहीत? अगदी कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या इतर गावांमध्ये अशी पेवं का नाहीत?.. ती फक्त हरीपुरातच का?
याचा संबंध तिथल्या नैसर्गिक घटकांशीही असणार हे निश्चित. तो नेमका काय आणि कसा? याचा शोध घेताना मजा आली, बरंही वाटलं. बरं वाटण्याचं कारण म्हणजे– त्याच्याशी तिथल्या मातीच्या थरांचा संबंध असल्याचं ऐकायला मिळालं, पाहायलाही मिळालं. मी भूशास्त्राचा विद्यार्थी. म्हणूनच त्याच्याशी मातीचा संबंध असल्याचे पाहून आनंद झाला. इथल्या मातीचा या दृष्टीने विशेष अभ्यास झालाय, असं नाही. पण तिथले लोक पेवांची माहिती देतात, त्यावरून निश्चितपणे काही अंदाज बांधता येतात, ढोबळ निष्कर्षही काढता येतात.
पेवांसाठी मातीमध्ये तीन गुणधर्म असावे लागतील–
- त्या मातीत पेवं व्यवस्थित कोरता यावीत.
- पेव कोरल्यावर ती ढासळायला नकोत. त्यासाठी माती तितकी धरून ठेवणारी असावी.
- त्यात ठेवलेली हळद टिकून राहायला हवी. त्यात पाणी झिरपायला नको, ओल यायला नको.
हरीपूरमधील मातीचे थर हे निकष पूर्ण करतात. त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात पेवं आहेत आणि ती इतक्या वर्षांनंतरही टिकून आहेत. हरीपूरमध्ये अनेकांशी या विषयावर बोललो. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की ही माती हे सर्व निकष पूर्ण करणारी आहे. हरीपूरला असलेल्या मातीचे थर साधारणपणे असे आहेत–
- सर्वांत वरती साधारणत: पाच–सात फूट जाडीचा काळ्या मातीचा थर.
- त्याच्या खाली सुमारे तीस ते सत्तर फुटांपर्यंत वैशिष्ट्यपूर्ण थर आहे. तो माण माती, चिकनी माती, चिकण माती, लाल माती… अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.
- याच्या खाली वाळूचा थर आणि
- सर्वांत खाली शेवटी काळा खडक.
या थरांपैकी सर्वांत महत्त्वाचा आहे, माण मातीचा / चिकनी मातीचा थर. याचं वैशिष्ट्य असं की,
१. त्यात हवं तसं कोरता येतं. बाजूची माती ढासळत नाही. टिकावाने किंवा कुदळीने मातीचा जेवढा भाग काढू, तेवढाच निघतो. बाजूचा भाग हलत नाही, पडत नाही. त्यामुळे त्यात पेवं खणणं सोपं जातं.
२. हा मातीचा थर बरंच वजन पेलू शकतो. म्हणून तर आत पोकळी असली तरी पेवं ढासळत नाहीत. या पेवांमध्ये हळदीची पोती भरण्यासाठी तिथपर्यंत भरलेले ट्रक आणावे लागतात. इतकं वजन पेलून धरण्याची या मातीची क्षमता आहे. त्यामुळे पेवं ढासळत नाहीत.
३. या मातीतून पाणी पाझरत नाही. त्यामुळे आतल्या हळदीला ओल लागत नाही. ती व्यवस्थित राहते.

पेवाची सर्वसाधारण रचना
पेवांची रचना :
या पेवांच्या रचनेवर सांगलीच्या दिलीप ट्रेडर्सचे दिलीप मालू यांनी प्रकाश टाकला. हरीपूरचे राजाभाऊ आळवेवर यांनीही त्यांची रचना समजावून दिली.
- सर्वांत वरती चार–सहा फुटांच्या थरात पेवाचं तोंड असतं. सरळ उभट तोंड. ते सर्व बाजूंनी विटांनी बांधून घेतलं जातं.
- त्याच्या खाली या तोंडापेक्षा थोडा कमी व्यासाचा मार्ग असतो. तिथं आढी बांधतात. या ठिकाणी पेवाचं झाकण असतं. आढी म्हणजे– खाली थोडंसं विटांचं बांधकाम, त्याच्यावर लोखंडी पट्ट्या आणि त्या पट्ट्यांवर पेवाचं झाकण बसवलं जातं. झाकण असतं आयताकृती शहाबादी फरशीचं. ती बसवली की वर माती टाकून तोंड बुजवून टाकतात.
पेवाचं तोंड साधारणपणे वरचा साधा काळ्या मातीचा थर आणि खालचा चिकण मातीचा थर यांच्या सीमेवर असतं. तोंडाच्या खाली हंड्याच्या आकाराची मोठी पोकळी केलेली असते. ती पूर्णपणे चिकण मातीच्या थरात असते. त्याची उंची साधारणपणे २० ते २५ फुटांपर्यंत असते.
पेवाचा व्यास १५–२० फुटांपर्यंत असतो… राजाभाऊ आळवेकर यांनी वर्णन केलं. पण मी प्रत्यक्ष काही पेवांमध्ये डोकावलं तेव्हा त्यांचा व्यास १२ फुटांच्या आसपास असावा असं वाटलं. दोन पेवांमध्ये काही फुटांचं अंतर असतं. हरीपूरची पेवं पाहिल्यावर ते तीन–चार फूट असावं, असं जाणवलं.
पेवाचं तोंड भरून घेतल्यानंतर ते कुठं आहे हे ओळखू यावं म्हणून वर मातीचा ढिगारा करतात. या ढिगाऱ्यावर बँकेची प्लेट रोवलेली असते. ज्या बँकेने पेव तारण ठेवून कर्ज दिलेलं असेल, त्या बँकेची ती प्लेट.

पेवाच्या तोंडावर बँकेची प्लेट
पेवात हळद भरण्याची पद्धत :
पेवं ही एक स्वतंत्र संस्कृती होती, अजूनही आहे. त्यामुळे तिथं लोकांनी पेवांशी संबंधित कामं, कौशल्य आत्मसात करून घेतली होती. त्यातलंच एक काम म्हणजे पेवं भरणं. पेवं भरण्याची पद्धत सविस्तर वर्णन करण्याजोगी आहे. थोडक्यात सांगायचं तर,
– तळाशी शेणकुटं टाकतात.
– त्याच्यावर शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या चटया अंथरतात.
– पेवात कडेला उसाच्या वाड्याच्या वाळलेल्या पेंड्या लावतात.
– मग मधल्या भागात हळदीची पोती ठेवतात. पोती ठेवत ठेवत कडेच्या उसाच्या पेंड्यांचा थर वाढवत नेतात.
– पेवाच्या झाकणापासून खाली पाच फुटांचा थर मोकळा ठेवला जातो. त्याच्या खालपर्यंतच हळदीची पोती ठेवली जातात. एका नियमित आकाराच्या पेवात साधारणत: १५० ते २०० क्विंटल इतकी हळद मावते.
दिलीप मालू यांच्यानुसार, पेवांमध्ये हळद व्यवस्थित टिकते. कडेला असलेल्या हळदीला थोडी फार बुरशी लागलेली दिसते, पण त्याचं प्रमाण अगदीच नगण्य असतं.
पेवात हळद साठवण्याचे फायदे :
हळद पेवातच का साठवायची, याचीही कारणं आहेत. त्याच्यामुळे हळदीचं संरक्षण होतंच, शिवाय तिचा दर्जाही सुधारतो, असं तिथल्यालोकांनी सांगतलं.
हरीपूरचे वसंत गोविंद आळवेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
१. पेवातल्या हळदीला कीड लागत नाही, कारण पेवात ऑक्सिजन नसतो. त्यामुळे तिथं कोणताही कीटक तिथं जगू शकत नाही.
२. या हळदीची चोरी होत नाही, ती सुरक्षित राहते. कारण पेव खणून हळद चोरणं हे सोपं काम नाही. दुसरं म्हणजे पेवात ऑक्सिजन नसतो. त्यात हवा खेळण्यासाठी आणि ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी साधारणत: सोळा–अठरा तास लागतात.
एखादं पेव दुपारी बाराच्या सुमारास पेव उघडलं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास त्यात हवा खेळलेली आणि पुरेसा ऑक्सिजन जमा झाल्याचं पाहायला मिळतं. त्यासाठी त्यात कंदील सोडला जातो. त्याची ज्योत टिकली की मगच माणसं आत उतरतात. तोपर्यंत कोणी आत जाऊ शकत नाही, गेलंच तर ऑक्सिजनअभावी त्याचा मृत्यू ओढावतो.
३. पेवात हळद साठवल्यावर तिचा रंग सुधारतो, तो अधिक पिवळा धमक होतो. त्यांच्या हिशेबानुसार २५–३० टक्के पिवळेपणा वाढतो.
४. पेवात साठवल्यावर हळदीचं वजन वाढतं. याबाबत ९५ वर्षांचे गोविंद आळवेवर यांनी सांगितलं की, पेवात ठेवल्यावर पोत्याचं (१०० किलोच्या) वजन १०६ किलो इतकं भरतं.
हे असं वजन का वाढतं? हा प्रश्न माझ्या मनात होता, अजूनही आहे. वसंत आळवेकर यांनी सांगितले की, पेवात चांगलीच उष्णता असते. त्याच्यामुळे हळद फुगते, तिचं वजन वाढतं.
…हे झाले लोकांचे अनुभव, लोकांची माहिची! पण तरीही काही रहस्यं आणि प्रश्न कायम राहतात- हळदीचं वजन वाढणं, पिवळेपणा वाढणं, ऑक्सिजन नष्ट होणं आणि महत्त्वाचं म्हणजे तिथल्या मातीच्या थरात नेमकं काय दडलंय?… त्यासाठी पुन्हा पुन्हा पेवांची माहिती घ्यावीच लागते.
(क्रमश:)
– अभिजित घोरपडे
ई–मेल : abhighorpade@gmail.com
पर्यावरण पत्रकार / फेलो (पर्यावरण व शाश्वतता), प्राज फाऊंडेशन
(“पेवं म्हणजे संपन्नता” : पेवांचं अर्थकारण… वाचा पुढच्या भागात)
An informative article
A very nice article. Abhijit sir please explore more information and keep updating……nice information.
It is very good article & that lot of people will come to know how brilliant our ancients were..
good one.
अभिजित लेख आवडला. छान आहे. वेगळ्या विषयाची माहिती मिळाली.
अभिदा, तुझ्याकडे अशा आश्चर्यकारक माहितीचे एक भले मोठ्ठे “पेव” आहे. त्या पेवातून अशी एकेक माहिती बाहेर येतेय. आमच्या ज्ञानात भर पडतेय. तुझे हे पेव कायम भरलेले राहो. मस्तच…
धन्यवाद 🌾 🍁 🌾 🍁 २रया भागा साठी… ३रया ची वाट बघत राहु…..
I have been reading you since you started writing in Loksatta .I have some paper cuttings. Your investigations are really very good and you narrate in very good language . Keep writing till you can .Thank you