गडचिरोलीचा प्राचीन खजिना!

M03

वर्धम.. तालुका- सिरोंचा. जिल्हा- गडचिरोली. दाट जंगलाचा परिसर, नक्षलवाद प्रभावित भाग.
तिथं प्राचीन जीवाश्मांचा अतिशय मौल्यवान खजिना सापडलाय. मोठाले वृक्ष जीवाश्मांच्या रूपात सापडतात. इतकंच नव्हे तर डायनासोरची अंडी, इतर अवशेष, मासे, इतर जीवांचे जीवाश्मसुद्धा इथं आढळतात. बरेचशा नमुन्यांना आतापर्यंत ‘पाय फुटलेत’, पण आता वन विभाग तिथं फॉसिल पार्क विकसित करतोय.. एकदा पाहिलंच पाहिजे असं हे ठिकाण.

अभिजित घोरपडे

वर्धमच्या फॉसिल पार्कमध्ये फिरताना, काय पाहू आणि काय नको अशी अवस्था होते. गाव- वर्धम. तालुका- सिरोंचा. जि. गडचिरोली.. दाट जंगलाचा परिसर, नक्षलवाद प्रभावित भाग.

गेल्याच आठवड्यात तिथं जाणं झालं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आम्ही एक संग्रहालय उभारलंय. त्यासाठी काही जीवाश्म (फॉसिल) पाहण्यासाठी गेलो होतो. तिथं मोठ्या प्रमाणात वृक्षांचे जीवाश्म आढळतात. बरेचशा नमुन्यांना आतापर्यंत ‘पाय फुटलेत’. आता मात्र वन विभागाने काही काळजी घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून वर्धम इथं फॉसिल पार्क विकसित करण्याचं काम सुरू आहे.

M05

वर्धम फॉसिल पार्क, ता. सिरोंचा, जि. गडचिरेली

वैशिष्ट्य म्हणजे आजही तिथं पावलो पावली जीवाश्म दिसतात. वृक्षांची भलीमोठी खोडं जमिनीतून वर डोकावतात. लाकडाचे ओंडके फोडताना लहान-मोठे तुकडे उडून पडावेत तशा लहान-मोठ्या चुईट्या पडलेल्या वाटतात, तर मध्येच भलामोठा ओंडका दर्शन देतो. या सर्वांना हात लावेपर्यंत ते दगड आहेत हे लक्षातच येत नाही. हुबेहूब लाकूड. लाकडावरच्या रेषा, त्यांची रचना, त्यांना असलेल्या गाठी, डाग.. सारं काही जसंच्या तसं दगडात उतरलेलं. पाहताना अचंबित व्हायला होतं. तुमची नजर शोधक असेल तर या लाकडाच्या जीवाश्मांच्या गर्दीत प्राण्यांची जीवाश्म दिसू शकतात. दगडाचा आकार घेतलेलं एखाद्या प्राण्याचं अंडं, हाड किंवा इतर अवशेष.. तोही दगडाच्या रूपात बदलून गेलेला. अर्थात हे तिथंच पाहण्यापुरतं असतं.

M01
हुबेहूब लाकडाचा ओंडका?… नव्हे जीवाश्म.

खरंतर त्या परिसरात अशी अनेक ठिकाणे होती, आजही आहेत. वन विभागाचे लोक किंवा स्थानिक संग्रहकांच्या म्हणण्यानुसार, कित्येक ठिकाणचे अवशेष लोकांनी काढूनही नेलेत. काहींनी खोऱ्यानं उपसले, तर काहींनी ट्रकच्या ट्रक भरून. त्याचा ना हिशेब, ना गणती. अजूनही काही ठिकाणी ते उघड्यावर पडले आहेत. असेच पाय फुटण्याच्या प्रतिक्षेत आहेत. वर्धम या ठिकाणी मात्र वन विभागानं काही अवशेष संरक्षित केलेत. आसपासच्या परिसरालाही संरक्षण देण्याची तयारी केलीय. या जीवाश्मांचा इतिहास अतिशय प्राचीन आणि रंजक. ही जीवाश्म ज्या वृक्षांची आहेत, त्यांचा काळ बराच मागं जातो. काही अभ्यासकांच्या मतानुसार अगदी १३ ते १५ कोटी वर्षांपर्यंत.

M06

प्राण्यांचे जीवाश्म… अंडी, हाडांचे जीवाश्म.

त्या काळात या वनस्पती, प्राणी, जलचर किंवा इतर जीव नद्या, तळी, समुद्र यांच्या गाळात गाडले गेले. त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात गाळ येऊन पडला. त्याचा परिणाम असा की, या सर्व जीवांच्या टणक भागांचा आकार गाळाने घेतला. ही क्रिया अतिशय संथ गतीने होत गेली. पाणी आणि त्यासोबतच्या रसायनांमुळं जीवांचा एकेक कण विरघळून बाहेर पडत गेला. तशी ती जागा गाळातील कणांनी घेतली. त्यामुळे जीवांचा मूळ टणक भाग निघून गेला, पण त्यांचा आकार जसाच्या तसा या गाळाच्या कणांनी घेतला. पुढं या गाळाचं रूपांतर कठीण खडकात झालं. हे खडक पृथ्वीच्या पोटातल्या हालचालींमुळं वर आले आणि जीवाश्मांच्या रूपात आपल्या नजरेला पडले.. आपल्याला दिसलं ते केवळ नमुन्यापुरतं, पण त्याच्या कितीतरी पटीने जीवाश्म पृथ्वीभर वेगवेगळ्या खडकांमध्ये पडून आहेत. त्याची केवळ एक छोटीशी झलक वर्धमला पाहायला मिळते.

M02

पावलोपावली जीवाश्मांचा खजिना..

महाराष्ट्राच्या दृष्टीनं याला अधिक महत्त्व. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा ८५ टक्के भाग बेसॉल्ट नावाच्या अग्निजन्य खडकानं व्यापला आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस थंड होऊन तयार झालेला हा खडक. तिथं अशी जीवाश्म पाहायला मिळत नाहीत. ती मुख्यत: गाळाच्या म्हणजेच स्तरित खडकात पाहायला मिळतात. महाराष्ट्रात असा हा भाग विदर्भात आढळतो. म्हणूनच महाराष्ट्रासाठी ही जीवाश्म वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. वर्धम किंवा गडचिरोलीचं वैशिष्ट्य असं की तिथं वनस्पतींप्रमाणेच माशांचे ठसे, डायनासोर, जलचर आणि इतर प्राण्यांचे जीवाश्मही मिळतात. याच परिसरात पूर्वी डायनासोरच्या मणक्याचे जीवाश्म मिळालेत. त्याच्या विविध भागांचे जीवाश्मही मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. यापैकी डायनासोर कोलकात्याच्या संग्रहालयात आहे, तर बाकी इथल्या-बाहेरच्या हौशींच्या, अभ्यासकांच्या संग्रहात.

असं हे वर्धम. गडचिरोली जिल्ह्याची प्रमुख ओळख ठरू शकेल अशी त्याची क्षमता. तिथं उत्तम संग्रहालय तयार करण्याची योजना आहे. त्यावर कामही झालंय, पण ती पूर्ण होण्यासाठी आणि पुढं विकसित होण्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा लागेल, काही नाही तर निदान पर्यटक म्हणून तरी!

– अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

 

9 thoughts on “गडचिरोलीचा प्राचीन खजिना!

  1. अभिजितजी,
    धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत. आजच लोकसत्तात याविषयीची बातमी वाचली.
    प्रत्यक्ष जाणे बहुतेक दिवाळीनंतर होईल.
    -प्रशांत पिंपळनेरकर

    • आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.. जरूर भेट द्या आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा.

  2. Shailesh Nipunge says:

    नमस्कार,

    फार उत्तम माहिती आहे. वनविभाग हे संरक्षण करण्यासाठी फार प्रयत्न करतो आहे हि
    स्तुत्य घटना आहे.
    हि माहिती फार महत्वपूर्ण आहे. तुम्ही त्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करीत
    आहात.
    मनःपूर्वक शुभेच्छा

    शैलेश निपुणगे

    Shailesh Nipunge
    http://www.vsmandal.org

    Mobile: +91 99 30 01 12 73

    ” Serve, love, give, purify,meditate,realize,be good, do good, be kind,be
    compassionate”
    – Swami Sivananda

    2018-07-11 19:48 GMT+05:30 हवा, पाणी आणि अभि… :

    > abhijitghorpade posted: ” वर्धम.. तालुका- सिरोंचा. जिल्हा- गडचिरोली. दाट
    > जंगलाचा परिसर, नक्षलवाद प्रभावित भाग. तिथं प्राचीन जीवाश्मांचा अतिशय
    > मौल्यवान खजिना सापडलाय. मोठाले वृक्ष जीवाश्मांच्या रूपात सापडतात. इतकंच
    > नव्हे तर डायनासोरची अंडी, इतर अवशेष, मासे, इतर जीवांचे जीवाश्मसु”
    >

    • आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू या.

  3. MUKUND KAJALE says:

    Thanks Abhijit! Appreciate your efforts to pass on the valuable information to common Man so that we all take pride in protecting our ancient heritage. All the best- Mukund Kajale

  4. Deepak Modak says:

    अभिजित छान माहिती आहे. हे ठिकाण पाहायलाच हवं. तीन वर्षांपूर्वी सियाटलला गेलो असताना माउंट हेलेन्स या जागृत ज्वालामुखीला भेट देऊन आलो. १९८२ च्या मे महिन्यात त्याचा फार मोठा उद्रेक झाला होता. त्यावेळी राखेत गाडली गेलेली असंख्य पाईन आणि सेदारची खोडं आता फोसिल स्वरुपात दिसतात. मध्यंतरी फेसबुकवर मी त्यासंबंधी लिहिलं होतं आणिबरेच फोटोही टाकले होते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s