सांगा, का नाही येणार पूर? ; भाग १
सांगली, कोल्हापूरचा भयंकर महापूर आता ओसरलाय, त्याबाबत सविस्तर लिहायची हीच वेळ आहे. या पुराच्या निमित्ताने अनेक उच्चांक झाले. निसर्गाचा रौद्रावतार म्हणजे काय, माणसाच्या चुकांची किती मोठी किंमत मोजावी लागले हेही स्पष्ट झाले. या पुराला असलेले अनेक पैलू व कंगोरे यांच्या अनुषंघाने वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही लेखमाला.अभिजित घोरपडे
संपादक, “भवताल” / abhighorpade@gmail.com

२०१९ च्या जुलै अखेर आणि ऑगस्टची सुरुवातीला दोन आठवडे धो-धो पावसाने थेमान घातले होते.
पाथरपुंज.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेले हे ठिकाण.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येते.
या ठिकाणी १ जून ते १५ ऑगस्ट या काळात ७०३२ मिलिमीटर पाऊस पडलाय. म्हणजे तब्बल २७७ इंच
आणि जगातील सर्वाधिक पावसाचे समजल्या जाणाऱ्या चेरापुंजीचा याच काळातील आकडा आहे ५७८० मिलिमीटर.
एकटे पाथरपुंजच नव्हे तर महाबळेश्वरजवळील धोम-बलकवडी धरणाच्या क्षेत्रातील जोर (६८०० मिलिमीटर), पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाच्या क्षेत्रातील दावडी (६२२५ मिलिमीटर), कोयना धरणाच्या क्षेत्रातील नवजा (६११० मिलिमीटर) या ठिकाणीही या हंगामात ६००० हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
विशेष म्हणजे या हंगामात चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस असलेली डझनभर ठिकाणे आपल्याकडे सापडतील.
भारतीय हवामान विभागाची महाबळेश्वर येथील नोंद आहे, ६७०० मिलिमीटर. ही नोंदसुद्धा आपण चेरापुंजीला कुठल्या कुठे मागे सोडलेय याचा पुरावा देते.
हा झाला धरण क्षेत्रातील पाऊस. याशिवाय इतरत्र पडलेल्या पावसाची आकडेवारीसुद्धा कितीतरी पट अधिक असल्याचे सांगते. याचे एक उदाहरण म्हणजे सांगली जिल्ह्यातील येरळा नदी. ही नदी सर्वकाळ कोरडीठक्क असते. ती १४ वर्षांनंतर यंदा वाहिली; इतकी की पात्र सोडून इतरत्र पाणी पसरले. हे घडले ७ ऑगस्ट २०१९ रोजी. म्हणजे ऐन पुराच्या काळात.
मग सांगा का नाही येणार पूर??
राधानगरीचे सर्व्हिस गेट पहिल्यांदाच वर

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राधानगरी धरणावरील रस्ता
ठिकाण – राधानगरी धरण.
राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले हे धरण. अर्थातच जिल्हा कोल्हापूर.
भोगावती नदीवरील धरण. भोगावती, तुळशी, सरस्वती, कुंभी, कासारी या पाच नद्या एकत्र येतात, तेव्हा पंचगंगा बनते. ती कोल्हापूर शहरातून वाहते आणि पुढे नरसोबाची वाडी येथे कृष्णी नदीला मिळते.
कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ सांगत होते, पाऊस किती भीतीदायक असू शकतो याची प्रचिती या वेळी घेतली.
राधानगरी धरण १९०८ साली बांधण्यात आले. या धरणाला स्वयंचलित म्हणजे अटोमॅटिक दरवाजे आहेत. धरणाची पातळी वाढली की हे दरवाजे आपोआप वर होतात आणि पाणी बाहेर पडते. मात्र, धरणात खूप जास्त वेगाने पाणी येऊ लागले तर धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी हे पाणी तातडीने बाहेर काढण्यासाठी तीन विशेष दरवाजांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना म्हणतेत- ‘सर्व्हिस गेट’. ही गेट प्रयत्नपूर्वक उघडावी लागतात.
राधानगरी धरणाच्या इतिहासात आतापर्यंत एकदाच हे ‘सर्व्हिस गेट’ उघडण्याची वेळ आली होती. वर्ष होते, २००५. त्या वेळी धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने तीनपैकी एक ‘सर्व्हिस गेट’ उघडावे लागले होते. मात्र, या वर्षी पावसाची तीव्रता इतकी होती की तीनही ‘सर्व्हिस गेट’ उघडावी लागली. ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुढे सलग तीन दिवस हे दरवाजे उघडे ठेवावे लागले. तरीसुद्धा पाण्याची पातळी धरणाच्या माथ्यापेक्षा केवळ तीन फुटांनीच खाली होती. यावेळी धरणावरून पाणी वाहण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्या धरणाचे नियमन करणाऱ्यांच्या दृष्टीने ते तीन दिवस तणावाचे होते.

राधानगरी धरणाचे स्वयंचलित (automatic) दरवाजे
राधानगरी क्षेत्रातील पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण काय सांगते?
२००५ सालच्या भयंकर पुराच्या वेळी महापुराच्या आधी सलग चार दिवस राधानगरीत दररोज सरासरी २१४ मिलिमीटर पाऊस पडत होता. या वेळी हा आकडा सरासरी ३४९ मिलिमीटर इतका होता. शिवाय या चार दिवसांच्या आधी सलग १२ दिवस संततधार पाऊस पडत होताच.
धरणाच्या क्षेत्रात इतका प्रचंड पाऊस होता, त्याचबरोबर तो इतर क्षेत्रातही होताच. जलसंपदा विभागाची आकडेवारी सांगते, कोल्हापूरच्या पंचगंगा नदीतून वाहून गेलेल्या एकूण पाण्यात राधानगरी धरणाचा वाटा होता फक्त १५ टक्के. उरलेले पाणी इतर क्षेत्रातील होते. ते पंचगंगेची पातळी वाढवत होते आणि पुढे धोका निर्माण करत होते.
मग सांगा, का नाही येणार पूर??
परिणाम व्हायचा तो झालाच!
इतका पाऊस पडल्यावर आणि इतर कारणे (याबद्दल पुढे बोलूच) असताना पाण्याची पातळी वाढली नाही तरच नवल!
या अनुषंघाने अनेक उच्चांक नोंदवले गेले. त्यापैकी एक म्हणजे जागोजागची पाण्याची पातळी.
कुरुंदवाड हे कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमाजवळचे गाव. संगमाचे गाव असलेल्या नरसोबाची वाडी या गावाला लागूनच असलेले. या ठिकाणी सुंदर घाट आहे. या घाटावर सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधीसुद्धा आहे.

कृष्णा नदीच्या काठावरील कुरुंदवाड येथील प्रसिद्ध घाट
इथला घाट चढून महादेव मंदिरात जाताना पायऱ्यांवर काही खुणा आहेत. या खुणा आहेत, पूरपातळीच्या. वेगवेगळ्या वर्षी आलेल्या महापुराच्या खुणा इथल्या भितींवर कोरल्या आहेत. १९१४, १९३२, १९४१, १९५८, २००६ अशा वेगवेगळ्या वर्षांच्या या खुणा. त्यात १९१४ आणि २००५ या वर्षातील पुराच्या खुणा लक्ष वेधून घेतात. १९१४ साली पातळी होती, ५३९.७२ मीटर. हा उच्चांक २००५ सालच्या महापुराने तोडला. दोन्ही पातळ्यांमध्ये अंतर होते, केवळ ४ सेंटीमीटरचे. २००५ साली पुराची पातळी ५३९.७६ मीटर इतकी नोंदवली गेली.

कुरुंदवाड घाट… १९१४ सालातील पुराची पातळी = ५३९.७२ मीटर; २००५ सालातील पुराची पातळी = ५३९.७६ मीटर
१९१४ आणि २००५ म्हणजे सर्वसाधारणपणे १०० वर्षांचा काळ. यामध्ये पातळीमध्ये विशेष फरक नव्हता. आता २०१९ साली ही पातळी प्रचंड वाढली. ती ५४१.२१ मीटरवर पोहोचली. म्हणजे २००५ पेक्षा तब्बल १.५० मीटरने जास्त. फुटामध्ये सांगायचे तर तब्बल पाच फूट.
हेच सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाहायला मिळाले. २००५ साली नदीपात्रापासून पुराची पातळी होती, ५३ फूट ६ इंच. यावेळी ही पातळी पोहोचली, ५७ फूट ५ इंचांवर… म्हणजे तब्बल चार फुटांनी जास्त.
कोल्हापुरात पंचगंगा नदी शहरात येण्याआधी एक बंधारा आहे. त्याचे नाव, राजाराम बंधारा.
या बंधाऱ्याजवळ नदीची पातळी मोजली जाते. आतापर्यंत सर्वाधिक पातळी होती, १९८९ साली. ती नोंद होती, ५० फूट ६ इंच.
त्यानंतर २००५ सालीसुद्धा पातळी एका फुटाने कमीच होती. मात्र, आताच्या पुरात ही पातळी आतापर्यंतच्या विक्रमापेक्षा पाच फुटांनी अधिक होती. आकडा होता, ५५ फूट ६ इंच.
याचा व्हायचा तो परिणाम झाला.
दोन्ही शहरे आणि जिल्ह्यांमधील गावे पाण्याखाली जाणअयाचे क्षेत्र कमालीचे वाढले.
पूर ओसरायला तितकाच जास्त वेळ लागला.
(या मालिकेसाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री. नंदकुमार वडणेरे, निवृत्त सचिव श्री. सतीश भिंगारे, डॉ. दि. मा. मोरे, कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ, पुण्यातील अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण कोल्हे, हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी, कोल्हापूर पुण्यनगरीचे संपादक श्री. अशोक घोरपडे, सांगली पुण्यनगरीचे श्री. समाधान पोरे, श्री. प्रविण शिंदे, सेंट्रल वॉटर कमिशनचे कुरुंदवाड येथील प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.)
- अभिजित घोरपडे (abhighorpade@gmail.com)
पूर कोणाच्या माथी मारायचा,
पावसाच्या, अतिक्रमणांच्या की अलमट्टी धरणाच्या??
(या मालिकेचा दुसरा भाग- उद्या, मंगळवार – दि. २० ऑगस्ट २०१९ रोजी याच ब्लॉगवर..)
.
ब्लॉग जरूर वाचा.
आवडला तर फॉलो करा आणि इतरांसाठी शेअरही करा..
अभिजित अगदी वस्तुस्थितीनुसार अचूक लिहितो आहेस. पुढील भागाची वाट पाहतो आहे. हल्ली अनेक बुद्धिमंत काय करायला पाहिजे होतं या बद्दल उपदेश करत आहेत. पाण्यात पडून बुडणार्याला काठावर उभं राहून पोहायला शिकवणं नेहमीच सोपं असात. २००५ साली शिल्लक साठा इतका होता, तो का ठेवला होता? त्यामुळे हे झाले आणि ते झाले. या वर्षी सगळी धरणं रसातळाला गेली होती, तरी इतका पूर का आला यावर काही मत वाचायला नाही मिळालं.
.
Thank you.
Very good arrival.waiting for tomorrow’s one. J.v.barve jjbarve@yahoo.com
Thank you.
Reblogged this on गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही and commented:
सांगली कोल्हापूरच्या पुराची कारणमिमांसा करणारा लेख
Dear AbhijiYour article on excess monsoon and floods is very nicely written. I have one request can you send me contact of Mr. Kenjale who is providing small unit for saving water. with best wishes Dr. Sushama G. DeoHead, Dept of AIHC & ArchaeologyDeccan College, Pune