सांगा, का नाही येणार पूर? ; भाग ४
कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता..
हवामान विभागाने २३ ऑगस्ट २०१९ या दिवसासाठी दिलेला हा पावसाचा अंदाज.
या अंदाजाचा नेमका अर्थ काय आणि यावरून धरणांच्या क्षेत्रात नेमका किती पाऊस पडणार आहे किंवा निदान धरणांचे पाणलोट असलेल्या क्षेत्रांमध्ये पावसाची स्थिती काय असेल हे समजेल का?
अभिजित घोरपडे
संपादक, “भवताल” / abhighorpade@gmail.com

पुणे वेधशाळा (भारतातील जुनी वेधशाळा) स्थापना – १९२८
थेट सांगायचे तर पावसाच्या अंदाजाबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा अनुभव चांगला नाही.
“या वेळच्या पावसाळ्यातील जून व जुलै महिन्यांमधील अंदाज उपयोगाचा ठरलाच नाही. मोठा पाऊस पडेल असा अंदाज जाहीर केला जात होता, पण प्रत्यक्षात तो तसा पडला नाही. स्वाभाविकपणे प्रत्यक्ष मोठा पाऊस पडला, तेव्हा हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजावर विश्वास कसा ठेवायचा? अशी स्थिती धरणातील पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्यांची होते,” जलसंपदा विभागाचे अधिकारी सांगतात.
पुराची तीव्रता काही प्रमाणात कमी करायची असेल तर धरणांच्या क्षेत्रात आगामी एक ते सात दिवसांमध्ये (आठवड्याभरात) पावसाची स्थिती काय असणार आहे याचा नेमका अंदाज मिळणे आवश्यक आहे. विशेषत: जुलै महिन्याचा उत्तरार्ध आणि ऑगस्ट महिन्यात असा नेमका अंदाज मिळायला हवा. कारण तोवर धरणांमध्ये पाणी जमा झालेले असते आणि आपल्याकडे सर्वाधिक पावसाचा हाच काळ असतो.
पण प्रश्न हा आहे की, असा नेमका व अचूक अंदाज देण्याची हवामान विभागाची क्षमता आहे का?
याबाबतची नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ आणि पुण्यातील उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
हवामान विभाग कोणकोणते अंदाज देते?
हवामान विभागाकडून वेगवेगळ्या कालावधीसाठी पावसाचे अंदाज दिले जातात.
१. लाँग रेंज किंवा सिझनल फोरकास्ट (सपूर्ण हंगामाचा अंदाज)
मोसमी पावसाच्या कालावधीसाठीचा (जून ते सप्टेंबर) हा अंदाज. हा संपूर्ण भारतासाठी दिला जातो आणि त्याच्या चार विभागांपुरताच दिला जातो.
२. एक्सटेंडेड फोरकास्ट (एक महिन्यापर्यंत)
हा पावसाचा अंदाज पुढील एका महिन्याच्या कालावधीसाठी जाहीर केला जातो. तो संपूर्ण भारतासाठी दिला जातो. मात्र, त्याचा नकाशा दिला जात असल्याने आपल्या उपविभागासाठी स्थिती काय असेल हे शोधून काढता येते. हवामान विभागानुसार महाराष्ट्राचे चार उपविभाग आहेत- कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. या क्षेत्रांवर पुढील महिन्यात पाऊस कसा असेल याचा अंदाज मिळू शकतो.
३. मिडियम रेंज फोरकास्ट (१० दिवसांपर्यंतचा)
हा जिल्हा किंवा आता तालुका पातळीवरही दिला जातो. मात्र, त्याची अचूकता पडताळून पाहण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत काहीच सांगता येत नाही.
४. शॉर्ट रेंज फोरकास्ट (३ दिवसांपर्यंतचा)
हा अंदाजसुद्धा तालुका, जिल्हा व काही शहरांच्या पातळीवर दिला जातो.
५. नाऊकास्टिंग (काही तासांपर्यंतचा)
अंदाजांची विश्वासार्हता आणि उपयुक्तता

पाऊस नेमका कुठे पडणार हे हवामान विभागाच्या अंदाजावरून समजत नाही.
हे अंदाज दिले जातात, पण प्रश्न आहे त्यांच्या विश्वासार्हतेचा आणि उपयुक्ततेचा.
या अंदाजांची विश्वासार्हता शोधण्यासाठी दिलेला अंदाज आणि प्रत्यक्ष पडलेला पाऊस यांची तुलना करून सविस्तर अभ्यास करावा लागेल. त्यानंतर विश्वासार्हता काढता येईल. मोसमी पावसाच्या म्हणजेच सिझनल अंदाजाच्या विश्वासार्हतेबाबत बोलले जाते, चर्चा होते. मात्र, इतर अंदाजांच्या विश्वासार्हतेबाबत पुरेसा अभ्यास झालेला नाही, त्याबाबत बोललेही जात नाही.
पुराच्या काळातील धरणांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने या सर्वच अंदाजांची उपयुक्तता अतिशय कमी आहे. कारण या अंदाजावरून (तो अचूक ठरला तरीसुद्धा !) पाऊस नेमका कोणत्या क्षेत्रावर पडणार आहे, याची कल्पना येत नाही. सर्वसाधारण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर (ज्याला हवामान विभागाकडून “घाट सेक्सन” म्हटले जाते) किती पाऊस पडणार हे समजले तरी विशिष्ट धरणाच्या क्षेत्रात किंवा विशिष्ट धरणप्रणालीच्या क्षेत्रात किती पाऊस पडणार, हे समजत नाही. मग त्याचा धरणातील पाणी सोडण्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपयोग काय?
या व्यवस्थापनाच्या दृष्टीने धरणक्षेत्रात पाऊस पडणार का आणि किती पडणार, हे समजल्याशिवाय या अंदाजांची उपयुक्तता असणार नाही. एकूण घाटासाठी मोठ्या पावसाचा अंदाज दिला असल्यास आपल्या धरणाच्या क्षेत्रातही जास्त पाऊस पडेल, एवढेच ढोबळमानाने मानता येईल. याचा यापेक्षा अधिक उपयोग नाही.
धरणक्षेत्रासाठी पावसाचा अचूक अंदाज देता येईल का?
सध्याच्या घडीला हवामान विभागाकडून असा अंदाज दिला जात नाही. हवामान विभागाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत असे आहेत. याशिवाय वेगवेगळी प्रादेशिक कार्यालये (मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर, गुवाहटी, दिल्ली, वगैरे.) यांचे कार्यक्षेत्र काही राज्यांचे असे मिळून आहे. त्यामुळे या विभागाच्या दृष्टीने विशिष्ट धरणाच्या प्रणालीतील पावसाचा अंदाज देणे ही खूपच छोट्या भौगोलिक क्षेत्रावरील बाब झाली. त्यामुळे हवामान विभागाकडून असा अंदाज दिला जात नाहीत. भविष्यातही दिला जाणार का, याबाबत सांगता येत नाही. या अंदाजांसाठी स्वतंत्र केंद्र / गट / विभाग / यंत्रणा लागेल.
असे स्वतंत्र केंद्र / विभाग उभारला, तरी छोट्या भौगोलिक क्षेत्रावरील अंदाज नेमका अंदाज देणे शक्य होईल का? हेही तपासून पाहायला हवे.
छोट्या क्षेत्रासाठी अचूक अंदाज देण्यात दोन मर्यादा असू शकतात –
१. मुळात हवामानशास्त्राच्या मर्यादा असल्याने हे शक्य नसणे किंवा
२. आपला हवामान विभाग किंवा यंत्रणा हे करण्यात कमी पडतात.
धरणक्षेत्रातील पावसाचे मॉडेल शक्य

वेगवेगळ्या भागातील स्थानिक पावसाचा अंदाज देणाऱ्या windy.com सारख्या अनेक वेबसाईट आहेत.
याबाबत डॉ. कुलकर्णी सांगतात, “छोट्या क्षेत्रावर अंदाज देताना हवामानशास्त्राच्या मर्यादा निश्चितच येतात. मात्र, साधनसामुग्री व मूलभूत सुविधा उभारल्यास त्याची अचूकता वाढवणे शक्य आहे. तसे प्रयोग करायला हवेत. धरणांच्या क्षेत्रातील पावसासाठी ‘क्वांटिटिटिव्ह प्रेसिपिटेशन फोरकास्टिंग’ (QPF) यासारखे तंत्र वापरता येऊ शकते. धरणक्षेत्रावरील ढगांच्या, पावसाच्या काही मिनिटांच्या अंतरा-अंतराने नोंदी मिळवण्याची यंत्रणा बसवली, तर धरणातील पावसाच्या अंदाजासाठी उत्तम मॉडेल तयार करता येऊ शकेल. त्यासाठी रडार, स्वयंचलित पर्जन्यमापकांचे जाळे व इतर यंत्रणा उभारायला हवी. तूर्तास उपग्रहांच्या मदतीने मोफत मिळणाऱ्या नोंदी वापरूनही हा प्रयोग करता येईल. पुढे सक्षम व सुसज्ज यंत्रणा उभारून त्यात अचूकता आणता येईल.”
“आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्था जगभरातील ठिकाणांचा पावसाचा रोजचा अंदाज बांधतात आणि त्यांच्या वेबसाईट्सवर प्रसिद्धही करतात. त्या भारतातील सर्वच भागांसाठी अंदाज देतात. windy.com ही त्यापैकी एक. त्यांच्या संकेतस्थळावर एखाद्या शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी हवामानाचा एकच अंदाज नसतो, तर तो त्यातील प्रत्येक भागानुसार दिला जातो. केवळ तालुकाच नव्हे, तर त्यातील वेगवेगळ्या भागांसाठी स्वतंत्र अंदाज दिला जातो. ही सुविधा उपलब्ध आहे. ती अधिक सुधारीत करून धरणांसाठी वापरणे नक्कीच शक्य आहे. त्यामुळे आपण ठरवलेच तर धरणक्षेत्रासाठी स्वतंत्र अंदाज देणे शक्य आहे. त्याची अचूकताही वाढवता येऊ शकेल.”
नदीखोऱ्यांधील पाण्याचा अंदाज

हवामान विभागाच्या ‘हायड्रॉलॉजी’ विभागाकडून विविध नद्यांच्या उपखोऱ्यांंसाठी किती पाणी निर्माण होईल याबाबत अंदाज दिला जातो. (फोटो – हवामान विभाग वेबसाईट)
भारतीय हवामान विभागामध्ये “हायड्रॉलॉजी” हा उपविभाग आहे. या विभागातर्फे देशातील २० प्रमुख नद्या आणि त्यांच्या सुमारे शंभर उपनद्यांच्या खोऱ्यांसाठी एक सेवा उपलब्ध करून दिली जाते. त्यानुसार नदीखोरी आणि उपखोरी यांच्यामध्ये किती पाऊस पडेल आणि पाणी निर्माण होईल याचा पुढील काही आठवड्यांचा अंदाज जाहीर केला जातो. त्याची गरज केंद्रीय जल आयोग (सी.डब्ल्यू.सी.) यांच्यासाठी असते. मात्र, ही खोरी, उपखोरी यांचे भौगोलिक क्षेत्र खूपच मोठे असते. त्यामुळे त्याचा थेट उपयोग होण्यास मर्यादा आहेत. मात्र, त्यावरून आगामी काही आठवड्यांमध्ये हवामानाची स्थिती काय असेल आणि आपल्या परिसरात किती प्रमाणात पाणी निर्माण होईल याच साधारण अंदाज येऊ शकतो.
मात्र, असा काही अंदाज दिला जातो, याची माहिती जलसंपदा विभागाला किंवा इतर संबंधित यंत्रणांना आहे का? इथे विविध विभागांमधील संवाद व समन्वयाचा मुद्दा उपस्थित होतो.
संवाद, समन्वय आणि बरेच काही
पावसाचा अंदाज देणारा हवामान विभाग आणि त्या अंदाजाची गरज असलेला, धरणांचे व्यवस्थापन करणारा जलसंपदा विभाग यांच्यात संवाद-समन्वय आहे का? याचे उत्तर नकारार्थी आहे. हवामान विभागाकडून धरणांसाठी म्हणून स्वतंत्र अंदाज दिले जात नाहीत. पण पावसाची सर्वसाधारण काय स्थिती असेल हे हवामान विभागाकडून समजून घेण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून केला जात नाही. सांगली, कोल्हापूर परिसरात २००५ साली निर्माण झालेल्या महापुराच्या परिस्थितीनंतर काही काळासाठी वैयक्तिक पातळीवर हा संवाद झाला. मात्र, तो एखाद्या अधिकाऱ्याने पुढाकार घेतल्याने सुरू झालेला होता. ती कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने स्वाभाविकपणे तो पुढे बंद पडला.
हवामान विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्यात समन्वयच नाही. त्यामुळे हवामानाचा अंदाज मिळाला किंवा नाही, तरी त्याचा धरणातून पाणी सोडण्याच्या व्यवस्थापनासाठी विशेष उपयोग होत नाही. ही बाब पूरपरिस्थितीत विपरित परिणाम करते.
हा संवाद वाढवायला हवा. धरण क्षेत्रातील पावसाच्या अंदाजाच्या नेमक्या गरजा काय, त्या कशा पूर्ण करता येतील यासाठी हवामान विभागाकडून सल्ला-सेवा घ्यायला हवी. याशिवाय खास धरणांच्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज मिळवण्याची यंत्रणाही उभारायला हवी. त्यासाठी विशेष असा खर्चही करावा लागणार नाही. असे केले तर पुराची आपत्ती काही प्रमाणात कमी करण्यास नक्कीच मदत होईल.
त्यासाठी आपण पुढाकार घेणार का?
(या मालिकेसाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री. नंदकुमार वडनेरे, निवृत्त सचिव श्री. सतीश भिंगारे, डॉ. दि. मा. मोरे, कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता श्री. संकपाळ, पुण्यातील अधीक्षक अभियंता श्री. प्रवीण कोल्हे, हवामानशास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी, कोल्हापूर पुण्यनगरीचे संपादक श्री. अशोक घोरपडे, सांगली पुण्यनगरीचे श्री. समाधान पोरे, श्री. प्रविण शिंदे, सेंट्रल वॉटर कमिशनचे कुरुंदवाड येथील प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.)
- अभिजित घोरपडे (abhighorpade@gmail.com)
………….
आता गावं हलवायची का पुरासोबत राहायचं?
“सांगा, पूर का नाही येणार?”
या लेखमालेचा शेवटचा भाग लवकरच…
ब्लॉग आवडला तर फॉलो करा आणि इतरांसाठीही शेअर करा.