राज्यात दुष्काळी स्थिती अवतरली की राज्यकर्त्यांना कृत्रिम पावसाची आठवण होते. आताही झालीय. तहान लागलीय ना? मग घ्या विहीर खणायला. पण कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे चमत्कार नाही. त्याच्यामुळे पाऊस पडतो हे खरं, पण कुठं–किती–कसा? हे अभ्यासावं लागतं. त्यासाठी या प्रयोगांमध्ये सातत्य लागलं. आपण मात्र दुष्काळ पडल्यावर जागे होतो आणि बरा पाऊस झाला की झोपी जातो… मग त्याचा लाभ तरी कसा होणार?
– अभिजित घोरपडे
पुन्हा तेच. तहान लागली ना? आता घ्या विहीर खणायला!
तहान कसली?… महाराष्ट्रात पावसानं चांगलीच ओढ दिलीय. तीन आठवडे झाले पावसाचा पत्ता नाही. कुठं तरी चार–दोन सरी सोडल्या तर पुरता गायब झालाय. काळे ढग उगाच तोंड दाखवतात, नंतर आपलं तोंड काळं करतात. ज्यांनी पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या, त्या वाळून गेल्या. जे थांबले, ते अजूनही थांबलेच आहेत. धरणात पिण्यापुरतं पाणी गोळा झालंय, तरीही मुंबईसारख्या मोठ्या शहराला चिंता लागलीय. हवामान विभाग म्हणतोय– २० जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणजे आणखी किमान एक आठवडा!
या वेळचा पाऊस बरा नसेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तो खरा ठरावा असंच वातावरण आहे. यातच गेले काही दिवस चर्चा ऐकायला मिळाली, कृत्रिम पावसाची! असा पाऊस पाडण्याचं नियोजन कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केलं. औरंगाबादला मुख्य केंद्र असेल. आसपासच्या दुष्काळी पट्ट्यात पाऊस पाडला जाईल. मुख्यमंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिला. एकच प्रश्न पडतो– तहान लागल्यावरच विहीर खणायला घ्यायची का? की लोकांना भुलवण्यासाठी हे सारं? अनेकदा ही घोषणा होते, ती घशाला कोरड पडल्यावरच. कधी ती हवेत विरून जाते, तर कधी हाती घेऊन अर्ध्यावर टाकून दिली जाते.
अवर्षणाची झळ सोसत असताना लोकांनी कृत्रिम पावसाची अपेक्षा केली, मागणी केली तर ती रास्तच आहे. पण हा प्रयोग म्हणजे काही चमत्कार नाही. तो हाती घेतला म्हणजे पाऊस पडला आणि दुष्काळ हटला असं होत नाही. जरा हवामानशास्त्र पाहा, इतिहास पाहा. मागं काय झालंय या प्रयोगांचं? या प्रयोगाचं म्हणून काही शास्त्र आहे, शिस्त आहे. तो सलग काही वर्षे राबवल्यावरच त्याचं फळ मिळू शकतं. निदान तो आपल्याकडं पडेल का, हे तरी समजू शकतं. महाराष्ट्रात एका तपापूर्वी, २००३ साली पहिल्यांदाच असा प्रयोग राबवला. त्यानंतर तो कायम ठेवण्याची संधी सरकारनं दवडली.
तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकारानं कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पाच–साडेपाच कोटी रुपयांचा खर्च आला. अर्थात त्या वर्षी हे जुळून यायला सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध उजाडला. त्यासाठीच्या विशेष विमानाचं पहिलं उड्डाण २० सप्टेंबरला झालं. याच दिवशी सातारा जिल्ह्य़ात वडूज इथं पहिला कृत्रिम पाऊस पडल्याचं जाहीर करण्यात आलं. या प्रयोगाच्या वेळी प्रत्यक्ष विमानात बसण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे या गोष्टी जवळून पाहता आल्या. त्या वेळी दुष्काळाची तीव्रता, लोकांची अधिरता व प्रयोगामुळे लोकांना मिळू शकणारा मानसिक दिलासा ही पार्श्वभूमी होती. म्हणून त्या वेळी तो प्रयोग स्वागतार्हच होता. या प्रयोगामुळे पावसाचं प्रमाण काही टक्क्यांनी वाढल्याचा दावा प्रशासनामार्फत करण्यात आला, पण तो गांभीर्यानं घेण्याचं कारण नाही. सरकारकडून काहीतरी वेगळे प्रयत्न झाले, एवढाच काय तो दिलासा! असे प्रयोग यशस्वी होण्यासाठी काही वर्षं सातत्य लागतं. २००३ नंतर पुढच्या वर्षी काही विमानं झेपावली, पण नंतर २००५, २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळं सारंच थंडावलं. हा प्रकल्प गुंडाळला गेला. त्यानंतर चार वर्षांनी पुन्हा चर्चेत आला आहे. तोसुद्धा तहान लगल्यावरच!

२००३ साली महाराष्ट्रात झालेल्या प्रयोगाच्या वेळी ‘पायपर शाईन’ या विमानातून ढगांमध्ये पावसाची बिजं फवारण्यात आली होती.
कृत्रिम पाऊस पाडता येतो, हे कोणीही नाकारत नाही. पण या प्रयोगांची यशस्वीता किती याबाबत वाद आहेत. ते उत्तर शोधण्यासाठी संशोधन व सातत्य हे कळीचे मुद्दे आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दुष्काळाची वाट पाहणं योग्य नाही. चीनमध्ये तर चांगला पाऊस पडत असतानासुद्धा हे प्रयोग हाती घेतले जातात. कृत्रिम पावसाचा प्रयोग कोणत्याही प्रदेशात हाती घेतला की त्याचे अपेक्षित परिणाम येतीलच असे नाही. त्या त्या प्रदेशाच्या हवामानानुसार त्यात काही बदल व सुधारणा कराव्या लागतात. महाराष्ट्रात कमी पाऊस पडणाऱ्या तालु्क्यांची संख्या मोठी आहे. जवळजवळ एक–तृतियांश भागावर बहुतांश वर्षी अपुराच पाऊस असतो. त्यामुळे आपल्यासाठीही अशी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करायला हरकत नसावी. पण ती उभी केली तर मग तिचा सातत्याने उपयोग करून घ्यायला हवा.
महाराष्ट्रासाठी चांगला योग म्हणजे, पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेतर्फे (आयआयटीएम) याबाबत देशपातळीवरील संशोधनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यांचीही तांत्रिक मदत सहज मिळू शकते. आताही या वर्षी चांगला पाऊस पडला की हा विषय मागं पडेल मग पुन्हा आठवण येईल ती पुन्हा तहान लागल्यावर! आताच या प्रयोगांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा, ती कार्यरत ठेवा. पाऊस पडो, अथवा न पडो किमान काही वर्षे प्रयोग, अभ्यास म्हणून प्रकल्प राबवा. त्यातून फायदा जिसला तर सुरू ठेवा, नाहीतर कायमचा विषय बंद करून टाका. कोणाला माहीत.. या वेळी खणलेल्या विहिरीचं पाणी पुढील काही वर्षं चाखायला मिळेल!
(ता.क.-
कृत्रिम पावसाच्या प्रयोगांचा उपयोग होतोय असं पुढच्या काही वर्षांत स्पष्ट झालं, तर मात्र याबाबत काही नियम करावे लागतील. वेळेला कायदासुद्धा करावा लागेल. याबाबत धोरण आखावं लागेल. त्याला अनुसरूनच या गोष्टींना हात घालावा लागेल. नाहीतर आता जमिनीवरचं पाणी पळवलं म्हणून भांडणं सुरू आहेत, तीच ढग पळवल्याच्या कारणावरून सुरू होतील!)
– अभिजित घोरपडे
ई-मेल : abhighorpade@gmail.com
(छायाचित्रे c@- अभिजित घोरपडे)