अरे माणसा.. किती जपशील जिवा?

खाऊन झाल्यावर गाडगीळ सरांनी टेबलावरचा जग उचलला. पाणी पेल्यात ओतून घेतलं. तेवढ्यात सोबतचा कार्यकर्ता धावला. त्याने पाण्याची बाटली समोर ठेवली. सर शांतपणे म्हणाले, “मला नको ते पाणी, मी हेच पितो..” गाडगीळ सरांसारखी मोठी व्यक्ती असं वागते याचं आश्चर्य वाटेल कदाचित… पण सध्या अतिस्वच्छतेच्या नादापायी आपण प्रतिकारशक्तीच घालवून बसतो आहोतया परिस्थितीत आपल्या वागण्याकडं गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

अभिजित घोरपडे

 water01

डॉ. माधव गाडगीळ यांच्या त्या कृतीने मला खूप बरं वाटलं आणि थोडंसं आश्चर्यसुद्धा!

आश्चर्य अशासाठी की इतकी मोठी व्यक्ती असं साधं वागते अन् बरं अशासाठी की मी ज्या प्रकारचा विचार करतो, तसा तेसुद्धा करतात.

पण असं झालं काय होतं?

आम्ही निघालो होतो प्रवासाला. पुणेनगर रस्त्याने. सोबत एक कार्यकर्ता होता.. ज्यांच्याकडं जाणार होतो त्यांचा. वाटेत सरदवाडीला नाश्ता करण्यासाठी थांबलो. रस्त्याच्या कडेचं हॉटेल होतं. खाऊन झाल्यावर गाडगीळ सरांनी टेबलावरचा जग उचलला. पाणी पेल्यात ओतून घेतलं. तेवढ्यात सोबतचा कार्यकर्ता धावला. त्याने पाण्याची बाटली समोर ठेवली. सर शांतपणे म्हणाले, “मला नको ते पाणी, मी हेच पितो..” कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होतं. मीसुद्धा टेबलावरचा जग उचलला आणि माझा पेला भरला.

सर, या वयात असं बाहेरचं पाणी?” मी हलकेच विषय काढला.

अहो, मला चालतं. काही त्रास होत नाही..”

जिथं जाईल, तिथलं पाणी आवर्जून पितो. तिथले लोकही तेच पितात ना? त्यांना पचतं तर मलाही पचेल की.. अगदीच गढूळ, खराब पाणी असेल तर टाळतो. इतकंच.”

त्यांचं उत्तर ऐकून मला बरं वाटलं. मीसुद्धा असाच विचार करायचो. पण मधे पोटाचा त्रास झाल्यामुळे जास्त काळजी घ्यायला लागलो होतो. पण या निमित्तानं मलासुद्धा पूर्वीसारखं वागता आलं. डॉ. गाडगीळ म्हणजे ज्येष्ठ आणि प्रख्यात शास्त्रज्ञ. जीवशास्त्रवाले. म्हटलं, त्यांच्याकडून हा विषय समजून घेतलाच पाहिजे.

जगताना स्वच्छता पाळायलाच पाहिजे, पण अतिस्वच्छता, अतिकाळजी घेणं बरं नाही. असं करून आपण स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेतो. अमेरिकेनं, काही पाश्चात्य देशांनी असंच अति केलं. आता ते त्याचे परिणाम भोगत आहेत. बारीकसं काही झालं तरी त्रास. माणसागणिक अॅलर्जी. आपल्याला इतकं नाजूक राहून कसं चालेल?”

सर सांगत असताना सार्सच्या आपत्तीची आठवण झाली. गेल्याच दशकातली गोष्ट. बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू यांच्या आधीची. त्या वेळी सार्सने अमेरिकेत आणि काही युरोपीय राष्ट्रांमध्ये धुमाकूळ घातला होता. काही मृत्यूसुद्धा झाले. आपल्यालाही भीती दाखवण्यात आली होती, पण विशेष काहीच झालं नाही. आपण सार्सथाराच दिला नाही.. त्याची अनेक कारणं असतील, पण एक महत्त्वाचं म्हणजेआपली त्याच्याबाबतची प्रतिकार क्षमता! अतिकाळजी न घेणं हेही त्यामागचं एक कारण होतं.. कारण यामुळं असे कितीतरी विषाणू, जीवाणू आपण पचवलेत.

महापालिकेचं शुद्ध पाणी घरात येत असतानाही असे संच घरोघरी बसवले जातात.. याला काय म्हणायचं?

महापालिकेचं शुद्ध पाणी घरात येत असतानाही असे संच घरोघरी बसवले जातात.. याला काय म्हणायचं?

याचा अर्थ स्पष्ट आहेजितकी अति स्वच्छता तितकी प्रतिकारशक्ती कमी. म्हणजे या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधात आहेत. मग करायचं काय?.. अतिस्वच्छतेच्या मागं लागून प्रतिकारशक्ती घालवायची की स्वच्छतेकडं दुर्लक्ष करून प्रतिकारशक्ती वाढवायची? आपल्या देशाची, राज्याची स्थिती कशी आहे? स्वच्छतेच्या अभावामुळं अनेक रोग, आजार होतात. साथी येतात. कितीतरी मृत्यू होतात. पाणी हे तर त्यामागचं प्रमुख साधन. या परिस्थितीत स्वच्छतेकडं दुर्लक्ष करून कसं चालेल?

पाण्याबद्दल बोलायचं, तर ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्थिती बरी नाही. प्रदूषण, टंचाई, वितरण व्यवस्थेतील त्रुटी, निष्काळजीपणा ही त्यामागची कारणं.. तिथं निर्विवादपणे स्वच्छतेलाच प्राधान्य पाहिजे. पण प्रश्न आहे सधन शहरी भागाचा. जिथं अति केलं जातं तिथला

घरात पालिकेचं शुद्ध पाणी आलं, तरीही झिरो बी / ‘आरओ’ बसवले जातात तिथला.

हॉटेलात स्वच्छ पाणी असतानाही बाटलीबंद पाणी मागवलं जातं तिथला.

घरात एखादं झुरळ दिसलं की लगंच कीटकनाशक फवारलं जातं तिथला.

हाताला धूळ, पायाला माती लागू नये याची पूर्ण व्यवस्था केली जाते तिथला.

अशी असंख्य उदाहरणं आहेत. जिवाला अति जपण्यामुळं आपण स्वत:चंच नुकसान करून घेतोय का?

घरात दोनचार झुरळं दिसली की लोक नाही नाही ते उपाय करतात. याबाबत गाडगीळ सरांनी सोपा उपाय केला. घरी कामासाठी येणाऱ्या महिलांना विचारलं, तुमच्या घरात पाली आहेत का? मग त्यांच्याकडून दोन पाली मागवल्या. झुरळं आहेत तिथं त्या सोडल्या. आता त्या पाली मस्तपैकी झुरळांना गट्टम करतात

पेस्ट कंट्रोल ही गरज आहे की फॅड की अंधानुकरण..?

पेस्ट कंट्रोल ही गरज आहे की फॅड की अंधानुकरण..?

काय आश्चर्य वाटलं ना?.. पण घरात घातक कीटकनाशकं फवारण्यापेक्षा हा उपाय बरा नाही का? असो. याकडं पाहण्याचा ज्याचा त्याचा दृष्टिकोन असेल. पण झुरळांसारख्या गोष्टीचा नको तितका बाऊ करणाऱ्यांसाठी मुद्दाम हे उदाहरण!

आता आणखी मुद्दा येतो.. स्वच्छता आणि प्रतिकारशक्ती या गोष्टी एकमेकांच्या विरोधात आहेत. दोन्ही महत्त्वाच्या. मग त्यांचा सुवर्णमध्य साधावा लागणार. पण कसा आणि किती? याबाबत मागं डॉ. योगेश शौचे यांच्याशी चर्चा झाली. शौचे सर म्हणजेपुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेतील (एन.सी.सी.एस.) वरिष्ठ शास्त्रज्ञ. ते म्हणाले, याला नेमकं उत्तर नाही. हा सुवर्णमध्य ज्याचा त्यानं ठरवायचं, आपला परिसर आणि आसपासची परिस्थिती पाहून!

हा सुवर्णमध्य साधताना आता जास्त सजग राहावं लागतं. कारणमाध्यमांचा विस्फोट आणि आर्थिक हितसंबंध. स्वच्छता / अतिस्वच्छता हे धंद्याचे मुद्दे बनले आहेत. जाहिराती करून तुम्हाला घाबरवलं जातं. बहुतांश वेळा बागुलबुवाच असतो तो! मग अति करायला भाग पाडलं जातं. तुम्ही एकदा बाजारात गेलात की बाजार सज्जच असतो.. म्हणूनच तर सबसे शुद्ध पाणी‘, ‘पाणी का डॉक्टर‘… या स्लोगन सतत कानावर पडतात. आपलीही पावलं तिकडं वळतात. कधी जाहिरातीच्या प्रभावामुळं, तर कधी आपली प्रतिष्ठाजपण्यासाठीसुद्धा!

याबाबत आपलं वागणं कसं आहे याचा विचार केलाय का? खरं तर नाहीच. पण आता वेळ आलीयआपल्या कृतीचा शांतपणे विचार करण्याची. कारण हा मुद्दा स्वच्छतेचा तर आहेच, शिवाय आपल्या प्रतिकारशक्तीचासुद्धा!

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com