गार –ए- गार ! (गारांच्या अंतरंगात…)

गारांनी महाराष्ट्रात नुकताच धुमाकूळ घातला. एवढीशी म्हटली जाणारी गार विध्वंसक ठरली. या गारेचं अंतरंग भयंकर रंजक आहे. गार म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतीलगारांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. माहितीए का??

अभिजित घोरपडे

थोडंसं गारेच्या अंतरंगात डोकावू...

मौल्यवान खडा नाही, हे आहे गारेचं अंतरंग…

गारा.. शहरी भागासाठी कुतुहलाचा विषय. ग्रामीण भागासाठी काळजीचा. त्यांच्या वर्णनावरूनच समजतं. शहरी कवितांमध्ये गारा छानछान असतात. पण गावाकडं गारपीटठरतात. कशा?? ते गेले दोन आठवडे गारांनी दाखवून दिलंच. संपूर्ण राज्यानं ते पाहिलं. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, ती अशी! असो..

या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं.. सारं काही भन्नाट आहे. हे माहितीए का? गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नसतो. तिला पापुद्रे असतात. अगदी कांद्यासारखे. हे पापुद्रेच तिचा आकार वाढवतात. तिला मोठं मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठी. पुन्हा कांद्याशीच साम्य. जमलं तर कधी गार फोडा. नीट पाहा, तिचे पापुद्रे दिसतील.

हे पापुद्र्यांचं रहस्य उलगडता येतं. त्यासाठी गारेची निर्मिती कशी होतं ते समजून घ्यावं लागतं. गार म्हणजे तसा पावसाचाच प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच काही घडावं लागतं. नाहीतर नेहमीच गारा पडल्या असत्या की. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. म्हणजे ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. हो.. ज्या ढगातून गारा तयार होतात ते जास्त उंचीवर जातात. नाहीतर काही कारणामुळे पाणी गोठण्याची पातळी खाली सरकलेली असते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.

पण गारेच्या पापुद्र्यांचं काय???

उंच जाणाऱ्या ढगांमध्ये गारांची निर्मिती होते..

उंच जाणाऱ्या ढगांमध्ये गारांची निर्मिती होते..

प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो. तेव्हा थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटून मोठे होतात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा. मधला भाग. आता ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खालीवर होत राहते. ती फिरते, तसे तिच्या भोवती थर तयार होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. ती ढगात जितकी जास्त वेळ फिरेल तितके जास्त थर. तितका आकारही मोठा.

गारेचा हा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवरगारेचे वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचे वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसेकिती हेलकावे खाल्ले, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.

या गारा खाली येताना वितळल्या तर पावसाचे टपोरे थेंब पाहायला मिळतात..

या गारा खाली येताना वितळल्या तर पावसाचे टपोरे थेंब पाहायला मिळतात..

एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही अडथळे असतात. तिला सामना करावा लागतो तापमानाचा. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात तुम्ही पावसाचे टपोरे थेंब पाहिलेत का? हे थेंब टपोरे का असतात, त्यामागं हेच रहस्य असतं.

ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठ्ठं कुतुहल असं की, गारा तासन् तास पडून राहतात, लवकर वितळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या दिसतात. का?? याची अनेक कारणं असतील. त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण गारेगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो, असं हवामान अभ्यासक सांगतात.

गारा लवकर वितळत नाही, बराच काळ आहे तशाच पडून राहतात..

गारा लवकर वितळत नाही, बराच काळ आहे तशाच पडून राहतात..

बघितली तर एवढीशी गार. तरी तिचं हे एवढं अजब विश्व.

खरं सांगू काहवामानाचं आणि त्याच्यातील असंख्य घटकांचं असंच आहे. त्यात रंजकता ठासून भरलेली आहे, पण त्याच्याकडं कधी आपण तसं बघितलंच नाही. बघितलं ते रूक्षपणे.. दुर्दैव आपलं !

आता डोळे उघडून बघू या.. मग हवामानाची अनेक रहस्य तर उलगडतीलच. त्याहून महत्त्वाचं म्हणजेत्याच्या आपत्तींचा तडाखा कमी करायलाही मदत होईल, कदाचित!

अभिजित घोरपडे

Blog- www.abhijitghorpade.wordpress.com

Email- abhighorpade@gmail.com

या ब्लॉगचा उद्देशच आहेनिसर्ग, पर्यावरणातील रहस्य उलगडण्याचा. त्यांचं माणसाशी असलेलं नातं सांगण्याचा. अर्थातच, पुढच्या भागातही असंच काही तरी असेल. ते रंजक आणि आगळं वेगळं असेल हे निश्चितपण काय??

यासाठी थोडीशी वाट पाहा.

अभिजित घोरपडे