महाबळेश्वरच्या थंडीचा लोचा…

महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण. हिवाळ्यात इथं बर्फ साचल्याच्या बातम्या येतात, त्याच वेळी हवामान विभागाच्या नोंदी तिथं १० / ११ अंश सेल्सिअस तापमान असल्याचं सांगतात.. हे असं कसं ? लोक हवामान खात्याची अक्कल काढतात.. पण हे असं का घडतं ? हे गौडबंगाल आहे तरी काय ??

हिवाळ्यात वेण्णा तलावाच्या परिसरात बर्फ साचल्याच्या बातम्या येतात…

कालचीच गोष्ट. महाबळेश्वरचं कमीत कमी तापमान होतं ११.५ अंश, तर पुण्याचं होतं ८.१ अंश.. पुन्हा आज पाहिलं, तर महाबळेश्वर १४.६ आणि पुणं १०.३ अंश..

याचा अर्थ पुणं महाबळेश्वरपेक्षा थंड.. हे जरा उलटंच झालं म्हणायचं.. नाही का???

भूगोलाचं पुस्तक तर सांगतं, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. पण हवामान खात्याचे आकडे वेगळंच काही तरी सांगतात. आकड्यांवर विश्वास ठेवायचा तर, महाबळेश्वरपेक्षा पुणे, नगर, नाशिक, सातारा ही ठिकाणं थंड आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत तर सावळा गोंधळ असतो. महाबळेश्वरमध्ये बर्फ साचल्याच्या बातम्या येतात. त्याच वेळी हवामान विभागाच्या नोंदी सांगतात, तिथं १० / ११ अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे.. हे असं कसं? मग लोक हवामान खात्याची अक्कल काढतात. स्वाभाविकच आहे ते. बर्फ साचतं, तेव्हा तिथं तापमान १० अंश असेलच कसं?

हवामानातली विविधता मी जाणून होतो. डोंगरी भागात तर ती खूप जास्त असते, हेही माहीत होतं. पण महाबळेश्वरच्या थंडीचं हे गुपित उकलण्यासाठी त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. पुणे वेधशाळेत महाबळेश्वरच्या तापमानाच्या जुन्या नोंदी चाळल्या. मग महाबळेश्वर गाठलं. तिथल्या वेधशाळेत पोहोचलो. ती आहे, तिथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात. ‘सर माल्कम बाबा’ नावाच्या स्तंभाला लागून. हे महाबळेश्वरमधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच ठिकाण. तिथलं माल्कम बाबा प्रकरणही भन्नाट आहे. त्याच्या नावाने तिथं उत्सव भरतो. त्याला कोंबडं-दारूसुद्धा वाहिली जाते.  असो..

वेधशाळेच्या इमारतीवरून संपूर्ण महाबळेश्वर दिसतं. डोंगर-दऱ्या, तलाव, वाऱ्याला अडवणारी टेकाडं, झाडी, शेतं.. जवळपास इतकी विविधता. ती तापमानातही उतरते. मग समजतं, इथं ठिकठिकाणी वेगवेगळं तापमान असणार! तिथल्या तापमानाची नोंद जिथं होते, ते “ऐतिहासिक” तापमापक पाहिले. सोबत त्या वेधशाळेचा प्रमुख अधिकारी विशाल रामचंद्रन होता. तरुण, उत्साही अधिकारी. त्याच्याकडून बरंच काही ऐकायला मिळालं.

हवामान विभागाची महाबळेश्वर येथील वेधशाळा..

महाबळेश्वरमध्ये जागोजागी वेगवेगळं तापमान आढळतं. एकीकडं बर्फ साचतं, तर दुसरीकडे वातावरण उबदार असतं.. हे एकाच वेळी घडतं. बर्फ साचतं म्हणजे, तिथले दवबिंदू गोठतात. त्याची ठिकाणं ठरलेली आहेत- वेण्णा तलाव, लिंगमळा धबधबा, गहू गेरवा संशोधन केंद्र. तलावातील बोटींवर, गवताच्या पात्यांवर दवबिंदू जमा होतात. ते थंडीमुळं गोठतात. ते गोठतात याचा अर्थ तिथं थोड्या काळासाठी का होईना, पण तापमान शून्य अंशांपर्यंत पोहोचतं.  हे घडतं, सकाळी सूर्य उगवताना किंवा पहाटेच्या वेळी. त्यामुळे पर्यटकांना ते सहज पाहायला मिळतं. स्वाभाविकपणे त्याची भरपूर चर्चाही होते.

गंमत म्हणजे त्याच वेळी वेधशाळेजवळ म्हणजे माल्कम बाबा स्तंभाजवळ वेगळी स्थिती असते. तिथं पारा खरंच १०-११ अशांच्या जवळपास असतो. म्हणजे ‘बर्फ साचतं’ हे वास्तव आहे आणि १०-११ अंश तापमान हेसुद्धा!.. पण मग प्रश्न उरतो, हा फरक का??

त्याचीही विशिष्ट कारणं आहेत.

Mahableshwar2
महाळेश्वरच्या वेधशाळेतील उपकरणे..Mahableshwar4

महाबळेश्वरमधली वेधशाळा आणि वेण्णा तलाव इथं तापमानात फरक असतो. विशाल याने काही कारणं सांगितली, अगदी सोप्या पद्धतीनं..

१. सूर्यप्रकाश (सन शाईन)-

वेधशाळेचं ठिकाण उंचावर आहे. तिथं जास्त वेळ सूर्याचं दर्शन होतं, सूर्यप्रकाश जास्त काळ असतो. त्यामानाने वेण्णा तलाव खोलगट भागात आहे. तिथं दिवसासुद्धा पूर्ण वेळ ऊन पडत नाही. तिथं सूर्यप्रकाश मिळण्याचं प्रमाण तुलनेत कमी आहे.

२. सूर्यास्ताच्या वेळा-

वेधशाळेचं ठिकाण (सर माल्कम बाबा) उंचावर आहे. ते वेण्णा तलावाच्या तुलनेत दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैर्ऋत्य दिशेला आहे. त्यामुळे तिथं तुलनेत सूर्यास्त उशिरा होतो; वेण्णा तलावाच्या मानाने १५ मिनिटं ते अर्धा तास उशिरा. म्हणून वेधशाळेच्या ठिकाणाला जास्त उष्णता मिळते. तिथं तापमान जास्त राहतं.

३. भूरचना व वाऱ्यांचा प्रवाह-

थंड वारे मुख्यत: उत्तरेकडून येतात. ते वेण्णा तलाव व जवळच्या खोलगट भागात उतरतात, तेव्हा अधिक बोचरे बनतात. पुढं वेधशाळेपर्यंत, माल्कम बाबा टेकडीवर येईपर्यंत काहीसे उबदार बनतात.

महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा तलाव

महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा तलाव

४. तलाव-

माल्कम बाबा टेकडी व वेण्णा तलाव या दोन ठिकाणांमधील आणखी एक फरक म्हणजे पाण्याचं सानिध्य. वेण्णा तलाव हा जलाशय आहे. त्यामुळे परिसरातील गारवा वाढतो.

५. पिकांची लागवड-

वेण्णा तलावाच्या खालच्या बाजूला स्ट्रॉबेरी व इतर पिके घेतली जातात . त्यांना पाणी दिलं जातं. त्यामुळेही त्या परिसरात गारवा असतो. अशी स्थिती वेधशाळेजवळ नाही.

महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

६. रासायनिक खतं-

या पिकांना पाण्याबरोबरच खतंसुद्धा दिली जातात, ती फवारल्यामुळेसुद्धा परिसरातील तापमान काही प्रमाणात कमी होतं.

पाचगणी पूर्वेला आहे. महाबळेश्वरची भूरचना अशी आहे की, पाचगणीकडून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जास्त गारठा असतो. तितका तो विरुद्ध बाजूला म्हणजे पश्चिमेला नसतो.

विशाल राहतो पाचगणीला. त्याने वैयक्तिक अनुभव सांगितला. तो सकाळी लवकर ऑफिसला येतो. त्याला वेण्णा तलावाजवळून यावं लागतं. तिथून येताना खूप थंडी वाजते, पण तलाव ओलांडून आलं की ती कमी होते. वेधशाळेजवळ तर चांगलीच ऊब जाणवते.

महाबळेश्वरमधील डोंगररांगा…

डोंगराळ प्रदेशाचं वैशिष्ट्यच हे. अगदी जवळच्या अंतरावरसुद्धा तापमानात बरीच तफावत असते.. तेच महाबळेश्वरमध्येही अनुभवायला मिळतं. म्हणून तर तिथं एकीकडे बर्फ साचतं अन् दुसरीकडे १०-११ अंश तापमान असतं.. हे दोन्ही एकाच वेळी!

(ता.क.–  मागं एकदा आमची अशीच फसगत झाली. महाबळेश्वरमध्ये बर्फ साचल्याचं ऐकायला मिळालं. बर्फ पाहण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या काही सहकाऱ्यांसोबत रात्री महाबळेश्वरला पोहोचलो. हवेत गारवा होता. पण सकाळी उठलो तर ना बर्फ-ना थंडीचा कडाका. दुपारी तर उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता.. काय करणार ? हात हलवत मघारी परतलो. पुढं बरेच दिवस अधून मधून तिथली थंडी आणि बर्फाचा विषय चघळत खळखळून हसत राहिलो.)

(सर्व छायाचित्रे- c@ अभिजित घोरपडे)