सुप्याच्या ”चिंकारां”ची अडचण…

पुणे जिल्ह्यातलं सुपे अभयारण्य आणि आसपासचा परिसर म्हणजे गवताळ माळरानं. चिंकारा हरणांसारखे प्राणी, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश. तिथल्या जमिनी शहरी लोकांनी विकत घेतल्या. आता तिथं प्लॉट पडले, तारेची कुंपणं आली. या कुंपणांनी चिंकारांची अडचण केली. आतापर्यंत मुक्तपणे फिरणारे चिंकारा या कुंपणांच्या चक्रव्यूहात अडकले… परिसरात होणाऱ्या बदलांनी पर्यावरणापुढं उभं केलेलं हे प्रातिनिधिक आव्हान. ही आव्हानं समजून न घेता पर्यावरणाकडं पाहणं उपयोगाचं ठरणार नाही

अभिजित घोरपडे

तारेचं कुंपण... चिकांरांसाठीचा चक्रव्यूह

तारेचं कुंपण… चिकांरांसाठीचा चक्रव्यूह

दोनतीन महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. महेशचा फोन आला.

म्हणाला, “अभि, चिंकारा हरणांबद्दल फोटो, बातमी मेलवर पाठवलीय. बघून घे.”

महेश म्हणजे डॉ. महेश गायकवाड. माझा चांगला मित्र. वन्यजीवांचा हाडाचा अभ्यासक. निसर्ग, पर्यावरणाबद्दल खरंखुरं प्रेम असलेला. त्यासाठी पोटतिडकीने बोलणारा, तसंच झपाटून कामही करणारा. मूळचा फलटणचा. त्याची पीएचडी आहे, वटवाघूळ या विषयावर. तो वटवाघळं पाहत, त्यांचा अभ्यास करत, त्यांच्याबाबत जागरूकता निर्माण करत आणि त्यांचं संवर्धन कसं करता येईल याचा विचार करत राज्यभर फिरत असतो. गवताळ प्रदेश अर्थात माळरानांवरचे पक्षी, प्राणी, तिथली जैवविविधता, त्यांचे प्रश्न यावर त्याचा चांगला अभ्यास. पुणे जिल्ह्यातलं सुपे मयुरेश्वर अभयारण्य हे त्याचं अभ्यासाचं प्रमुख ठिकाण. गेल्या काही वर्षांपासून बारामतीतल्या पर्यावरण संस्थेसोबत काम करायचा. आता त्याच्या निसर्गजागरया संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिकरीत्या अनेक उपक्रम राबवतो. घरात कमी आणि या पर्यावरणाच्या कामात पूर्णपणे गढून गेलेला.. असा हा महेश!

गवताळ माळरानांवर असे प्लॉट पडलेत. ते तारेची कुपणांनी व्यापले आहेत.

गवताळ माळरानांवर असे प्लॉट पडलेत. ते तारेची कुपणांनी व्यापले आहेत.

त्याचा ईमेल पाहिला. त्यात चिंकारांचे फोटो होते. तारेचं कुंपण आणि आतमध्ये चिंकारा हरणं. त्यापैकी काही कुंपणाच्या तारांमधून पलीकडं जाण्याचा प्रयत्न करणारे. हा फोटो होता, सुप्याच्या मयुरेश्वर अभयारणाजवळचा. हे चित्र प्रातिनिधिक होतं. सुप्याच्या परिसरात ठिकठिकाणी असंच चित्र आहे. तिथं जास्तीत जास्त माळरानंच. हा कमी पावसाचा प्रदेश. जमीनसुद्धा हलकी. त्यामुळं तिथं शेती करणं परवडणारं नव्हतं. त्याची तितकी गरजही नव्हती. म्हणून ही माळरानं आतापर्यंत तशीच पडून होती. आता मात्र परिस्थिती बदललीय. फार काही पाणी आलंय असं नाही, पण या जमिनी शहरी लोकांनी विकत घेतल्या. तिथं आता प्लॉट पडू लागलेत. एकदा प्लॉट पडले की कुंपण आलंच.. सुपे, बारामती आणि आसपासच्या परिसरात जागोजागी हेच नजरेला पडतं. आतापर्यंत लांबवर मोकळी पसरलली माळरानं आता तुकड्यातुकड्यात विभागली गेलीत.

हा परिसर आहे चिंकारांचा आणि माळरानांवर राहणाऱ्या त्यांच्यासारख्याच इतर प्राणीपक्ष्यांचा. सर्वांचा वावर या परिसरात असतो. पण आता जागोजागी तारेचं कुंपण झाल्यामुळं चिंकारांची अडचण झाली. त्यांना मोकळेपणानं फिरता येईना. कुत्री मागं लागली तर आधीसारखा बचाव करता येईना. तारेच्या कुंपणातून मार्ग काढताना कसरत करावी लागते

चिंकारा हरणं अशा प्रकारे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यात ती जखमी होतात.

चिंकारा हरणं अशा प्रकारे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यात ती जखमी होतात.

चिंकारांचे जखमी होतात, त्यांचे केस या तारेच्या कुंपणात अडकतात.

चिंकारांचे जखमी होतात, त्यांचे केस या तारेच्या कुंपणात अडकतात.

अभयारण्याच्या हद्दीबाहेर लगेचच ही कुंपणं आहेत. आता हरणांना कसली आलीय हद्द. या हद्दी, सीमारेषा आपण केलेल्या. हरणांसाठी दिसेल तो प्रदेश मुक्तपणे फिरण्याचामग तो वन विभागाचा असो, अभयारण्याचा असो नाहीतर खासगी मालकीचा. त्यांच्या लेखी सब भूमी गोपालकी“! त्यामुळे हरणांच्या विहारावर अडथळे येतात. आधीच सुपे भागातली चिंकारांची संख्या वेगवेगळ्या कारणांमुळे कमी झालीय. अलीकडच्या गणनेत ते दिसून आलंय. त्यात या अडथळ्याची भर!

महेशला याबाबत चिंता होती. त्याने त्यावर साधा मार्गही सुचवलाय. प्लॉट पाडू नका, हे सांगणं त्याच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. असं सांगून कोणी ऐकणारही नाही. त्यानं वेगळा उपाय सुचवला. प्लॉट पाडले की त्याला सीमारेषा येणार. त्या जरूर आखा. मात्र, कुंपण घालताना थोडीशी काळजी घ्या. लोखंडी खांब रोवा, पण तारेचं कुंपण करू नका. नाहीतरी जमिनीवरून चोरून नेण्याजोगं काहीच नाही. मग तारेचं कुंपण कशासाठी? नुसते लोखंडी खांब रोवले तरी काम भागण्याजोगं आहे. तुमचंही काम भागेल, चिंकाराचासुद्धा अडथळा कमी होईल.. महेशचा उपाय अगदीच प्रत्यक्षात आणण्याजोगा होता. त्यात काही अचडण असावी, असं वाटत नाही. तो त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. अजून तरी फार प्रतिसाद मिळाला नाही, पण पुढं मिळेल कदाचित!

या चक्रव्यूहावर उपाय आहेत... पण ते केले जाणार का, हाच कळीचा प्रश्न आहे.

या चक्रव्यूहावर उपाय आहेत… पण ते केले जाणार का, हाच कळीचा प्रश्न आहे.

मला इथं वेगळीच समस्या दिसते.. अधिक व्यापक असलेली! हा प्रश्न केवळ सुप्याचा नाही किंवा नुसता चिकारांचाही नाही. ही समस्या एकूणच निसर्ग, पर्यावरणाची आजची आव्हानं दर्शवणारी आहे. आपली बदललेली जीवनशैली, आसपास घडणारे बदल पर्यावरणावर कसे परिणाम करत आहेत, याचं हे उत्तम उदाहरण. पर्यावरण किंवा निसर्ग वाचवण्याची मनात कितीही इच्छा असली, तरी या बदलांचं करायचं काय? आजच्या घडीला पर्यावरणापुढचं हेच मोठं आव्हान आहे. विकासाच्या टप्प्यात इतके बदल झालेत की, त्यातून पर्यावरण टिकवणं मोठं मुश्कील आहे. इथलंच उदाहरण घ्या. आतापर्यंत पडून राहिलेली माळरानं शेतीखाली आली, फार्म हाऊस म्हणून वापरली गेली किंवा नुसतीच कुंपण घालून ठेवली तरी होणारं नुकसान भरून निघणारं नाही.

विकास करताना बदल कसे होत जातात, हे यातून समजतं. हे बदल लक्षात न घेता नुसतंच पर्यावरणावर प्रेम असणं काही कामाचं नाही. परिसरात होत असलेले, झालेले बदल लक्षात घेतले, तरच खऱ्या अर्थानं पर्यावरणावरचा फायदा आणि तोटा याचा हिशेब मांडता येईल. नाहीतर लाखाचे बारा हजारव्हायला फारसा वेळ लागणार नाही.. हेच आजच्या काळाचं आव्हान आहे सभोवताली झपाट्याने बदल होत आहेत. ते आपल्यावर वेगाने आदळत आहेत. हा वेग इतका प्रचंड आहे की या बदलांना नेमका कसा प्रतिसाद द्यायचा, हे ठरवणंही मुश्कील बनलं आहेसुप्याच्या चिंकारांची झालेली अडचण हे त्याचंच एक प्रातिनिधिक उदाहरण आहे!

(छायाचित्र : सौजन्य- डॉ. महेश गायकवाड)

अभिजित घोरपडे

ई मेल : abhighorpade@gmail.com