छोटासा मार्ग… पाणीबचतीचा !

पाण्याची चैन पूर्वीसारखी उरलेली नाही, पुढेही नसेल. त्यामुळे एकतर टंचाई सोसावी लागेल किंवा पाणीबचतीचे स्मार्ट उपाय करावे लागतील. असाच एक छोटासा पण उपयुक्त उपाय घरी केला. त्यामुळं वाया जाणारं ५० ते ८० टक्के पाणी वाचतं. या छोट्याशा उपायाविषयी…

– अभिजित घोरपडे

पाणीबचतीचा एक परिणामकारक उपाय...

तळहातावर मावणारा पण परिणामकारक उपाय…

आमच्या सोसायटीत तशी पाण्याची चैन. पण ती होती, असं म्हणावं लागेल. साधारण साडेपाचशेसहाशे फ्लॅट. त्यापैकी इनमीन एकतृतीयांश कुटुंबं राहायला आलेली. टँकर यायचे. पाण्याची चणचण नव्हती. चोवीस तास पाणीच पाणी. अजूनही पाण्याची व्यवस्था बिल्डरच करतो. अलीकडंच पुणे महापालिकेचं पाणी यायला लागलं. तसं बिल्डरनं लोकांना सांगितलं की, आता टँकर मागवता येणार नाहीत, मागवले तर त्याचे पैसे तुम्हाला भरावे लागतील.

झालं.. सोसायटीत अस्वस्थता. कारण आता सोसायटीतील कुटुंबं वाढू लागलीत. त्यात पालिकेचं मिळणारं पाणी पुरेसं पडत नाही

ही पार्श्वभूमी मुद्दाम सांगितलीय.

आम्ही सोसायटीत एक चांगला उपक्रम सुरू केलाय. कट्टा. वेगवेगळ्या विषयातले लोक बोलवायचे. त्यांच्याशी गप्पा करायच्या, त्यांचा विषय समजून घ्यायचा. गेल्याच रविवारी (१४ जून) बोलावलं होतं, श्री. प्रवीण लडकत यांना. लडकत म्हणजे पिंपरीचिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता. अतिशय प्रयोगशील माणूस. पाणीपुरवठ्याची देशातील सर्वोत्तम यंत्रणा, ‘स्काडात्यांच्या पालिकेकडं आहे. ती ते यशस्वीपणे हाताळतात. त्यांच्या कार्यालयात जाऊन ती यंत्रणा पाहणं हा आनंददायी अनुभव असतो. शक्य असेल त्याने आवर्जून पाहावी. विशेष म्हणजे श्री. लडकत त्यासाठी सदैव तयार असतात.. तेही हसतमुखाने. इतकंच नाही. त्यांनी स्वत:च घरालासुद्धा प्रयोगशाळा बनवलंय. घरातला पाणीवापर कसा कमी करता येईल, वापरलेलं पाणी इतर गोष्टींसाठी कसं उपयोगात आणता येईल, असे प्रयोग त्यांनी घरात केलेत. त्यात यशही मिळवलंय. म्हणून त्यांना या विषयी बोलण्याचा जास्तीचा अधिकार प्राप्त होतो.

श्री. लडकत यांनी उपस्थितांना पाण्याबाबत अनेक संकल्पना समजावून सांगितल्या.

श्री. लडकत यांनी उपस्थितांना पाण्याबाबत अनेक संकल्पना समजावून सांगितल्या.

श्री. लडकत यांनी पाणीबचतीचे अनेक मार्ग सांगितले. पाणीपुरवठ्यातल्या २४ बाय ७यासारख्या संकल्पना समजावून सांगितल्या. घरच्या घरात काय करता येईल हेही दाखवलं. सर्वकाळ पाणी पुरवल्यामुळं त्याचा जास्त वापर होतो, असं वाटेल कदाचित. पण वस्तुस्थिती विरुद्ध आहे. सर्वकाळ पाणी उपलब्ध असेल तर ते साठवून ठेवण्याची प्रवृत्ती कमी होते. त्यामुळे वाया जाण्याचं प्रमाणही कमी होतं. ते १५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं.

श्री. लडकत याच्यासोबत आले होते श्री. सुहास केंजळे. त्यांनी तर पाणीबचतीचा अतिशय सोपा मार्ग दाखवला. त्यांचे मामा श्री. सुरेश सोलापूरकर यांनी तो विकसित केला. करायचं काय? तर आपल्या नळाच्या तोंडाला छोटीशी फिटिंग बसवायची. त्याच्यामुळं पाण्याचा प्रवाह हव्या त्या प्रमाणात नियंत्रित करता येतो. हे किती फायदेशीर आहे हे आमच्याच घरात तपासलं.

पाण्याचा प्रवाह मोजल्यावर, वाया जाणाऱ्या पाण्याची खरी कल्पना आली.

पाण्याचा प्रवाह मोजल्यावर, वाया जाणाऱ्या पाण्याची खरी कल्पना आली.. सोबत श्री. लडकत आणि श्री. केंजळे.

अलीकडं नळांना उगीचच जास्त वेगानं (फोर्स) पाणी येतं. आमच्या घरात मोजलं. स्वयंपाक घरात सिंकच्या नळाला मिनिटाला १३ लिटर इतक्या वेगानं पाणी येत होतं. इतक्या वेगाची गरज नसतेच मुळी. केंजळे यांनी आणलेली फिटिंग बसवली. हा वेग केला मिनिटाला पाच लिटर. पुरेसा वाटला तो. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळं ते निष्कारण वाया जात होतं. आम्ही राहतो नवव्या मजल्यावर.

हेच तिसऱ्या मजल्यावर मोजलं. तिथं सिंकच्या नळाच्या पाण्याचा वेग भरला मिनिटाला २० ते २२ लिटर. गरज होती, मिनिटाला चारपाच लिटर इतक्या वेगाची. म्हणजे तिथं तब्बल ७५ ते ८० टक्के पाणी वाया जात होतं. सिंकचं किंवा बेसिनचं पाणी रोज वीस मिनिटं वापरलं, तर वाया जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण मोठं होतं. नवव्या मजल्यावर रोज १६० लिटर, तर तिसऱ्या मजल्यावर तब्बल ३२५ लीटर. ३२५ लिटर म्हणजे शहरातल्या अडीच-तीन लोकांचं रोजचं पाणी!

निव्वळ हे पाणी वाचवलं तरी बरंच काही साध्य होईल. दोनतीन बाथरूम आणि स्वयंपाकघर असं सगळीकडं हे बसवलं तर बचत आणखी मोठी होईल. एकाचा खर्च आहे तीनशे रुपये. त्यात मिनिटाला तीन लिटरपासून ते नऊ लिटरपर्यंत वेग नियंत्रित करण्याची सोय आहे. म्हणजे हजारदीड हजार रुपयांत सगळीकडं हे बसवता येईल. टँकरच्या पाण्याचा हिशेब काढला तर महिनादोन महिन्यांत पैसे वसूल होतील. मुद्दा केवळ पैशाचा नाही, तर पाण्यासारख्या अमूल्य घटकाचा आहे.

वेगवेगळ्या वेगाचे प्रवाहांचा संच वापरून श्री. केंजळे पाण्याचा वेग आणि आपली गरज याबाबत माहिती देतात.

वेगवेगळ्या वेगाचे प्रवाहांचा संच वापरून श्री. केंजळे पाण्याचा वेग आणि आपली गरज याबाबत माहिती देतात.

नळाच्या तोंडाला बसवायचे हे फिटिंग म्हणजे अगदीच तळहातावरचा उपाय...

नळाच्या तोंडाला बसवायचे हे फिटिंग म्हणजे अगदीच तळहातावरचा उपाय…

बहुतांश सोसायट्यांना आता अशा उपायांची गरज आहे. खरंतर बिल्डर मंडळींनी हे केलं तर उत्तमच. नाहीतर रहिवाशांनी ते हाती घ्यायला हवं. कारण..

आता पाण्याची चैन असणार नाही. त्याची टंचाई सोसावी लागेल किंवा असे काही स्मार्ट उपाय शोधावे लागतील… मग आपल्याकडं अगदी तळहातावर मावणारा हा उपाय असताना टंचाईचा विचार का करायचा??

अभिजित घोरपडे

ईमेल : abhighorpade@gmail.com