मान्सूनच्या पावसाचा चकवा! (मान्सून रंग- ४)

मान्सूनच्या पावसाचा अंदाज अजूनही आपल्याला नेमकेपणाने येत नाही. या बाबतीत आपण चुकत आलो आहोत, अगदी आजच्या विकसित तंत्रज्ञानाच्या काळातसुद्धा! आजवरचा इतिहासही हेच सांगतो. हवामानाच्या एकाचा सूत्राला नेमकेपणाने दुष्काळ ओळखता आलेले नाहीत. म्हणूनच एकेक करून ही सूत्र बदलण्यात आली.. सध्या तरी आपण पावसाच्या लहरीवरच जगत आहोत. अजून किती काळ हे माहीत नाही?

अभिजित घोरपडे

Mon6

मोसमी (मान्सूनच्या) पावसाचा अंदाज.. हा अतिशय किचकट विषय. इतका की याच्या वाटेला जाणारे बहुतांश लोक तोंडावर आपटले आहेत. मी मी म्हणणाऱ्यांनाही पावसाचा नेमकेपणाने अंदाज आला नाही, येत नाही. मग ते कितीही मोठे अभ्यासक असोत; देशी असोत वा परदेशी. इतिहास याचा साक्षीदार आहे. मागं वळून पाहिलं की समजतं, आपण फिरून फिरून होतो तिथंच आलो आहोत. खरं तर अजूनही आपण पावसाच्या लहरीवरच अवलंबून आहोत.

फार मागं जायला नको. याच वर्षाचं उदाहरण घ्या. हवामान विभागानं पहिल्या टप्प्यात, एप्रिल महिन्यात ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला होता. महिनादीड महिन्यातच तो ९३ टक्के असा सुधारीत करण्यात आला. पाऊस सक्रिय कधी होणार, याबाबतही असंच. आता होईल, मग होईल म्हणताम्हणता दीड महिने उलटले. अंदाज दिले जात होते, पण ते प्रत्यक्षात उतरत नव्हते. वेगवेगळी विघ्न यायची. पाऊस देणारी कमी दाबाची क्षेत्रं हवी तेवढी तीव्र नसायची.. कधी प्रशांत महासागरात चक्रीवादळ निर्माण व्हायचं. ते आपला पाऊस हिरावून न्यायचं.. तर कधी पावसाचा अंदाज देणारं मॉडेलच फसायचं..

एकूण काय? तर पावसाचा नेमका अंदाज आलाच नाही. पण हे आजचं नाही, तर मागंसुद्धा असंच घडलं आहे.

Mon2

मोसमी पावसाचा अंदाज देण्याची भारताची परंपरा खूप जुनी आहे. ब्रिटिशांच्या काळापासून त्याचा वेध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा काळ तब्बल सव्वाशे वर्षांच्याही मागे जातो. भारताच्या हवामान विभागाची स्थापना १८७५ साली झाली. ब्लँडफोर्ड हा अधिकारी या विभागाचा पहिला चीफ रिपोर्टरठरला. त्याने मोसमी पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. तारीख होती, ४ जून १८८६. भारत आणि ब्रह्मदेश (आताचा म्यानमार) या क्षेत्रावर पावसाळ्याच्या चार महिन्यांत कसा पाऊस पडेल, याचं भाकीत त्याने पहिल्यांदा केलं. त्याचं अंदाज वर्तविण्याचं सूत्र साधं होतं. ते हवामानाच्या एकाच घटकावर आधारीत होतं. तो घटक होता, हिवाळ्यात हिमालयात असणारं हिमावरण. त्याने आधीच्या चार वर्षांच्या पावसाची आकडेवारीचा अभ्यास केला. त्याला आढळलं की, हिमावरण जास्त असेल तर पाऊस कमी पडतो आणि हिमावरण कमी असेल, तर पाऊस जास्त! झालं मग या घटकाचा आधार घेत अंदाज दिले गेले.

पुढच्या काळात एकाचे तीन घटक झाले. त्यावर आधारीत अंदाज येऊ लागले. विसाच्या शतकाच्या पूर्वार्धात गिल्बर्ट वॉकर नावाच्या अधिकाऱ्याने भारतीय हवामानशास्त्र विभागासाठी मोठं योगदान दिलं. त्याने देशाच्या तीन भागांसाठी स्वतंत्र अंदाज देणे सुरू केलं. हे भाग होतेद्वीपकल्पीय भारत, ईशान्य भारत आणि वायव्य भारत. त्याने तयार केलेल्या सूत्राच्या आधारे १९२४ ते १९८७ या काळात, तब्बल ६३ वर्षे, पावसाचा अंदाज दिला गेला. मात्र, या सूत्राला १९८७ च्या दुष्काळाचा अंदाज देता आला नाही (खरंतर आधीच्या दुष्काळांचासुद्धा!)

Mon4

त्यामुळे १९८८ पासून देशाने पावसाच्या अंदाजासाठी स्वतंत्र सूत्र स्वीकारलं. तेव्हा डॉ. वसंत गोवारीकर पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे हवामानशास्त्रज्ञांनी नवं सूत्र विकसित केलं. त्यात पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. व्ही. थपलियाल यांचा प्रमुख वाटा होता. हे सूत्र हवामानाच्या १६ घटकांवर आधारीत होतं. त्याचा बराच गाजावाजा झाला. पण त्याचेही दिवस भरले.

हे सूत्र बदलण्याचं कारणही तेच ठरलं दुष्काळ ओळखण्यात आलेलं अपयश. या सूत्रामुळे २००२ साली पडलेला भीषण दुष्काळाचा अंदाज आला नाही. मग २००३ सालापासून पुन्हा नवं सूत्र स्वीकारण्यात आलं. ते आठ व दहा घटकांवर आधारीत होतं. त्या आधारे दोन टप्प्यांत अंदाज दिले जाऊ लागले. त्यातही सुधारणा करून आता सहा आणि पाच घटकांवर आधारीत दोन टप्प्यांत अंदाज दिला जात आहे.. या सर्वच सूत्रांची मर्यादा होती. ती म्हणजे त्यांना नेमकेपणाने दुष्काळ हेरता आले नाही. नियोजनासाठी अशी कठीण वर्षं समजणंच महत्त्वाचं असतं. नाहीतर या सूत्रांचा उपयोग तो काय?

हा इतिहास हेच सांगतो की, अजूनही आपण पावसाची लहर ओळखू शकलेलो नाही. पैसा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ पुरवले तरी हे झालेले नाही. अर्थात हेही खरं की, मोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात मर्यादा आहेत. आपल्याप्रमाणे जगभरातील शास्त्रज्ञही त्यात अपयशी ठरले आहेत. तूर्तास आपण पावसाच्या लहरीवर अवलंबून आहेत.. पाऊस दरवर्षी चकवा देतो, मग अंदाज चुकतात. अर्थात, म्हणून प्रयत्न करणं सोडून द्यायचं असंही नाही. ते तर करावेच लागतील.. अंदाज कधी बरोबर येतील ते येवोत, दरम्यानच्या निदान काही गोष्टी तरी हाती लागत राहतील!

Mon5

(ता..-

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केलेले दीर्घकालीन पावसाचे अंदाज चुकतात, हे खरंच. त्यामुळे अलीकडं एक टूम निघाली आहे. ऊठसूठ कोणीही पावसाचे अंदाज वर्तवू लागले आहेत. ते योगायोग म्हणून खरेसुद्धा ठरतात, पण कधीकधीच. त्यातील सोयीस्कर आकडे दाखवून, आपण कसे शहाणे आहोत, हे भासविण्याचा प्रयत्न काही तथाकथित तज्ज्ञ करतात. त्याचबरोबर आय.एम.डी.ला नालायक ठरवतात. अलीकडं हे प्रमाण वाढलं आहे.. या लोकांना थारा देता कामा नये. आय.एम.डी. अजूनही चुकते हे खरं, पण त्यांनी दिलेले अंदाज हवामानाच्या ठोस घटकांच्या आधारीवर असतात. अशी मांडणीच अचूकतच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आय.एम.डी.चे दोष दाखवताना, आपण इतर कोणाला उगीचच डोक्यावर घेत असून, तर तेही योग्य नाही.)

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com