आडांसोबत काय काय गमावलं? (आटपाडीचे शापित आड- ४)

आटपाडीतले आड गेले, सोबत तिथल्या ओढ्याचं रूपरंग घेऊन गेले, भूजलाची व्यवस्था उलथून गेले, एक जलसंस्कृती तोडून मोडून गेले, आम्हाला परावलंबी करू गेले अन् आमचं शहाणपणही घेऊन गेले.

अभिजित घोरपडे

आटपाडीचे आड गेलेच.. सोबत बरंच काही घेऊन गेले..

आटपाडीचे आड गेलेच.. सोबत बरंच काही घेऊन गेले..

आडपाडीचे आड तर गेलेच.. पण ते एकटे गेले नाहीत, सोबत अनेक गोष्टी घेऊन गेले.. त्यांनी नेल्या असं म्हणण्यापेक्षा आपणच या साऱ्यांवर पाणी सोडलं.

आडांचं अस्तित्व स्वतंत्र नव्हतं. ते एका व्यवस्थेचा भाग होते. व्यवस्था होती पाण्याची, भूजलाची. ही व्यवस्था टिकून होती म्हणूनच आड टिकून होते, वापरण्याजोगे होते. आता आड उरले नाहीत, त्यामुळे ते ज्या व्यवस्थेचा भाग होते तीसुद्धा दुर्लक्षिली गेली, हळूहळू बिघडून गेली. आटपाडीत हे सविस्तर पाहायला मिळतं.

हा पार्किंग लॉट नाही, ओढा आहे.. पण त्याचा वापर वाहनं उभी करण्यासाठी होतो.

हा पार्किंग लॉट नाही, ओढा आहे.. पण त्याचा वापर वाहनं उभी करण्यासाठी होतो.

आटपाडी गावातून शुक्रनावाचा ओढा वाहायचा. ‘वाहायचाअसं म्हणायचं कारण आता तो कधीतरीच वाहताना दिसतो. हा ओढा इथला पाण्याचा स्रोत होता. पाण्याची व्यवस्थाही साधी सरळ. ओढ्याचा उगम जवळच्या डोंगरात. ओढा वर्षभर वाहायचा, पावसाळ्यात दुथडी भरून. गावातले लोक वाहत्या पाण्याच्या आवाजाच्या आठवणी सांगतात. पूर आला की पाण्याचा वेग मोठा. तो ओलांडणं मुश्किल बनायचं. ‘आईसाहेब मंदिराजवळ तर पाण्याचा आवाज इतका असायचा की रात्रीच्या वेळी धडकीच भरायची‘.. इति श्री. केशव देशपांडे. तिथंच मोठा डोह होता. त्यात वर्षभर डुंबायला मिळायचं. पाणी कधीच आटायचं नाही, अशा अनेक आठवणी मागच्या पिढीतले लोक सांगतात.

या ओढ्यामुळं भूजलाचं पुनर्भरण व्हायचं. भूजलाची पातळी वाढली की आपोआपच आडांनाही पाणी टिकून राहायचं. आडांच्या पाण्याचा स्रोत म्हणून ओढा महत्त्वाचा! त्यामुळे त्याची काळजी घेतली जायची. तो वाहता राहील, पात्रात अतिक्रमणं होणार नाहीत, ते उथळ होणार नाही.. याची खबरदारी घेतली जायची.. ते स्वाभाविकच होतं. पण हे कधीपर्यंत?.. आड वापरात असेपर्यंत.

आडांचा वापर बंद झाल्यावर त्यांना पाणी देणाऱ्या स्रोताशी काय देणंघेणं? आडांकडं दुर्लक्ष झालं, त्याहून जास्त ओढ्याकडं झालं. सगळीकडंच होतं ते आडपाडीतही झालं. ओढ्यावर अतिक्रमण झालं. काही ठिकाणी त्याचं पात्र बुजवलं गेलं, काठ संपले, ओढा उथळ बनला. परिसरातली भूजलाची पातळी खाली गेली, त्यामुळे ओढा वाहायचा थांबला. फक्त पावसाळ्यातच त्याचं अस्तित्व दिसू लागलं. तो वाहिलानाही वाहिला तरी फार फरक पडत नव्हता.. आपोआपच तो दुर्लक्षित बनला, नावापुरताच उरला.

पूर्वी वाहता असलेला ओढा आता असा कोरडा ठणठणीत असतो..

पूर्वी वाहता असलेला ओढा आता असा कोरडा ठणठणीत असतो..

आटपाडी मुक्कामात या ओढ्याचं विदारक चित्र दिसलं. त्याला ना रूप उरलं, ना रंग.. पात्र उथळ. पाण्याचा पत्ता नाही. कडेला झाडी नाही. वाहनं उभी करण्यासाठी उपयोग! जुने लोक ओढ्याच्या छान आठवणी सांगतात. त्या खऱ्या आहेत का असा प्रश्न पडावा, इतकी विदारक अवस्था!

आड गेले ते या शुक्र ओढ्याचं रूपरंग घेऊन गेले.

आड गेले ते भूजलाची व्यवस्था उलथून गेले.

आड गेले ते आपली पाण्याबद्दलची आस्था घेऊन गेले.

आड गेले ते एक जलसंस्कृती तोडून मोडून गेले.

आड गेले ते आम्हाला परावलंबी करू गेले.

आड गेले ते आमचं शहाणपणही घेऊन गेले.

आड गेले ते गेले.. पण आपल्याला बरंच काही शिकवूनही गेले. त्यातून आपण काही शिकणार का? हाच कळीचा मुद्दा आहे.

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

आज आड असते तर ..? (आटपाडीचे शापित आड- ३)

आपण हातचं सोडून पळत्याच्या मागं धावत सुटतो. काही काळानंतर समजतंहवं ते मिळालंच नाही.. आपली नुसतीच धावाधाव! आटपाडीच्या आडांबद्दल अगदी असंच झालं. लोकांनी हक्काचं पाणी सोडलं आणि इतर कोणाच्या तरी आशेवर जगायला लागले.

अभिजित घोरपडे

आड कालबाह्य झालेत की आपणच ते घालवलेत..?

आड कालबाह्य झालेत की आपणच ते घालवलेत..?

आटपाडीचे आड कालबाह्य झालेत का?

यावर एखादा म्हणेलकाय हा प्रश्न! कुठल्या काळात वावरता.. या काळात कसले आड घेऊन बसलात?

काळ बदललाय, हे खरंच.. तरीसुद्धा हा प्रश्न विचारण्याला कारणही तसंच आहे. आता हे आड बुजवले गेलेत किंवा त्यांच्या संडासाच्या टाक्या केल्यात.. पण ते व्यवस्थित राखले असते तर आज उपयोगी ठरले असते का?.. साधा सरळ प्रश्न. त्याच्या उत्तरात सारं काही दडलं. आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी फार मागं जाण्याची गरज नाही. लांबचं कशाला? अगदी दोनच वर्षांपूर्वी लोकांना आडांची आठवण झाली, २०१२ सालच्या दुष्काळात. ‘आज आड असले तर..?’ अशा शब्दांत लोकांनी हळहळ व्यक्त केली. दुष्काळ पडल्यावर आडांची आठवण आली ना..? त्यातच सारं आलं.

२०१२ च्या भीषण दुष्काळात लोकांना आडांची आठवण झाली..

२०१२ च्या भीषण दुष्काळात लोकांना आडांची आठवण झाली..

गंमत कशी आहे पाहा.. आपण हातचं सोडून देतो आणि पळत्याच्या मागं धावत सुटतो. इतकं धावावं लागतं की दमायला होतं. काही काळानंतर हवं ते मिळत नाही.. आपली नुसतीच धावाधाव! आटपाडीच्या आडांबद्दल अगदी असंच झालं. लोकांनी हक्काचं पाणी सोडलं आणि इतर कोणाच्या तरी आशेवर जगायला लागले. आड म्हणजे हक्काचं पाणी, अगदी हक्काचं. कुणाकडं हात पसरण्याची गरज नाही, कुणाच्या तोंडाकडं आशाळभूत नजरेनं पाहण्याचीही गरज नाही.. तरीही ते आड हरवून बसले, इतरांवर अवलंबून झाले.. संपूर्ण परावलंबी. आता यंत्रणांनी सोडलं तर पाणी मिळतं, नाही सोडलं तर नाही.

हाच फरक होताघरातले आड आणि नव्याने आलेल्या नळांमध्ये. आड हा हक्काचा जलस्रोत. आटपाडीत तर आड वाड्यातच होते. पाण्यासाठी लांब जायचीही आवश्यकता नव्हती.. ळांचं वेगळं होतं. त्यांच्यामुळं लांबून पाणी आलं, पण त्यावर नियंत्रण दुसऱ्याचं. त्याचेच तोटे आटपाडीत हळूहळू दिसायला लागले. नळाची चैन काही दिवस चालली. पण पुढं पाणी कमी पडायला लागलं. मूळ स्रोत किती मोठा किंवा भरवशाचा, त्यावर पाण्याचं प्रमाण ठरणार. सुरुवातीला दररोज पाणी यायचं. काही दिवसांनी एक दिवसाड झालं. पुढं चार दिवसांनी येऊ लागलं. मग आठवड्यातून एकदा. २०१२ च्या दुष्काळात तर काही भागांना पंधरा दिवसांतून एकदाच पाणी मिळत होतं.. या दुष्काळात लोकांशी गप्पा मारल्या. तेव्हा अनेकांना आडांची आठवण आली. अनेकांनी चूक झाल्याची कबुली दिली. तोंडात परवलीचं वाक्य असायचं, “खरंच, आज आड असते तर..?”

आड टिकवणं आपल्याच हाती होतं. ते टिकवायचे आणि त्यांचा उपयोग करून घ्यायचा. घरातल्या घरात आणि हवं तितकं पाणी.. २०१२ च्या दुष्काळापर्यंत आटपाडीचे आड कधी आटलेच नाहीत. ते आटूच शकत नाहीत.. ही इथली धारणा होती. पण दुर्लक्ष झाल्यामुळं का होऊ शकतं, हे त्यांनीच दाखवून दिलं. इतका भरवशाचा स्रोत कालबाह्य कसा म्हणता येईल? आपण ते वापरण्यास पात्र नाही, हेच यातून स्पष्ट होतं.. बस्स इतकंच!

दुष्काळाने बरंच शिकवलं, बरंच काही करायला लावलं..

दुष्काळाने बरंच शिकवलं, बरंच काही करायला लावलं..

लोकांना दुष्काळात आडांची आठवण झाली, पण त्याला खूप उशीर झाला होता, झाला आहे. आडांमधून पाणी मिळणार ते भूजल. त्याची काय अवस्था आहे आज? त्याची पातळी कुठच्या कुठं खोल गेलीय. त्याचबरोबर त्याचा दर्जा राहिलाय का? या दोन्ही बाबतीत भूजलाची स्थिती बरी नाही. पातळी तर खोलवर गेलीच. ते इतकं प्रदूषित झालंय की पिण्यासाठी तर सोडाच, पण त्याचा उपयोग इतर वापरासाठी तरी होईल का, हेही सांगता येणार नाही. कारण आपणच आडांच्या संडासाच्या टाक्या केल्या, त्यांना नासवून टाकलं. त्यांचा वापरच नाही, मग त्यांना पाणी उरलंय का याच्याशी काय देणंघेणं?

म्हणून आता आडांना पाणी नाही. ज्यांना आहे ते बरं नाही.. पण याचा अर्थ आड कालबाह्य झालेत, सा नाही. पाण्याबद्दलची आपली जाण, पाणी वापरण्याची परंपरागत कौशल्यं.. हे सारं आपण कालबाह्य करून ठेवलंय.

असं म्हणता येईल हवं तर!

अभिजित घोरपडे

Blog- http://www.abhijitghorpade.wordpress.com

Email- abhighorpade@gmail.com

आड… एक संस्कृती ! (आटपाडीचे शापित आड- भाग २)

आड ही एक संस्कृती होती.. पण गावात नळ आले अन् ते आडांच्या मुळावर उठले, आड हळूहळू नष्ट होत गेले. काळ बदलताना गोष्टी बदलणारचआडही सर्वकाळ टिकून राहणार नाहीतहे खरंच. पण आडाच्या संडासाच्या टाक्या व्हाव्यात.. भूजलही कायमचं प्रदूषित व्हावं, हे अतिच झालं… हो ना?

– अभिजित घोरपडे

खरं सांगू? आता काळ बदललाय हे मान्य, पण चांगलं होतं ते नष्ट झाल्याचं दु:ख आहेआटपाडीच्या आडांबद्दल जुन्या पिढीकडून हा सूर ऐकायला मिळतो. जुनी पिढी म्हणजे फार जुनी नाही. सध्या चाळीशीतपन्नाशीत असणारे आणि त्यांच्या आधीचे सर्वजण. या पिढ्यांनी या आडांचा वापर केला आहे, ते अनुभवले आहेत.

आटपाडीतले हे आड मागच्या पिढीतील एका संस्कृतीची आठवण करून देतात..

आटपाडीतले हे आड मागच्या पिढीतील एका संस्कृतीची आठवण करून देतात..

या लोकांकडून आटपाडीच्या आडांबद्दल अनेक आठवणी ऐकायला मिळतात. ऐकताना समजतंतिथं आड ही एक संस्कृती होती. त्याच्याभोवती अनेक गोष्टी फिरत होत्या. लांबचं कशाला? अनेकांचा दिवसच सुरू व्हायचा, आडांवरच्या रहाटाच्या, भांड्यांच्या आवाजाने. श्री. केशव देशपांडे यांचा वाडा आणि आडही सुमारे १५०२०० वर्षे जुना. त्यांनी बऱ्याच आठवणी सांगितल्या. हे सांगताना काहीतरी गमावल्याबाबत अस्वस्थता बोलण्यात होती.

लहानपणी सकाळी आडांवरच्या रहाटाचा आवाज यायचाधाड, धाड, धाड, धाड… याच आवाजाने जाग यायची. प्रत्येक घरात आडातून पाणी काढण्याची वेगळी पद्धत होती. पाणी काढताना आत कळशा, बादल्या पडायच्या. त्या बाहेर काढणारे लोक पूर्वी होते. काही जण गळ टाकून भांडी काढायचे. काही जण आत उतरायचे. आता ते उरले नाहीत..” इति श्री. देशपांडे.

आईवडिल माझ्या लग्नाआधीच वारले. त्यामुळे मी घरात एकटाच.घरात पाण्यासाठी भांडी वापरायचो नाही. त्यांची गरजच नव्हती. फक्त तांब्या वापरायचो, कळशीचीसुद्धा गरज नव्हती. कारण पाहिजे तांब्या आडात बुडवायचा आणि पाणी काढायचं…” आठवणी सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता.

देशपांडे यांच्या पत्नी अरुणा. त्यासुद्धा शिक्षिकात्यांच्याही आठवणी आहेत. अर्थातच लग्नानंतरच्या, १९८० नंतरच्या. त्यांचं माहेर कुरुंदवाड. म्हणजे कृष्णेच्या काठी. गावाशेजारून कृष्णा वाहते. तिथं आडाची काय गरज? त्या आटपाडीत आल्यावर आडाचं पाणी काढायला शिकल्या.

आटपाडी गाव बदललं, तसं तिथलं सगळंच चित्र  बदलत गेलं..

आटपाडी गाव बदललं, तसं तिथलं सगळंच चित्र बदलत गेलं..

त्या काळी आड हाच पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत.पाणी गोडं होतं. तेव्हा घरात पाणी भरणं हा प्रकार नव्हता. गरज पडली की आडात बादली सोडायची आणि पाणी काढायचं. ६ फुटांवर पाणी. उन्हाळ्यात फार तर १५ फुटांपर्यंत. पाण्याची पातळी त्याच्या खाली जायची नाही…” पाण्यासाठी आडाभोवती फिरणारं हे जग. पुढं सारं बदलूनच गेलं.

गावात नळ येता..

आटपाडीत १९८५ च्या पुढंमागं सार्वजनिक नळ आले. त्यानंतर दोनेक वर्षांत ते घरातही पोहोचले. सुरुवातीला आड व नळ दोन्हीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात होतं.

नळाला सकाळी तासभर पाणी यायचं. नळांनी बस्तान बसवलं, तसे हळूहळू आड बाजूला पडू लागले. नळाचं पाणी पुरलं नाही तर पर्यायी स्रोतम्हणून त्यांचा वापर होऊ लागला. याशिवाय झाडांना घालण्यासाठी, पाहुणे आल्यावर किंवा बांधकामासाठी आडाचं पाणी वापरात होतं.पुढं नळांचीच मक्तेदारी निर्माण झाली. आड कधी मागं पडले समजलंच नाही…” देशपांडे पतीपत्नी आणि एकूणच त्यांच्या पिढीने पाहिलेला हा बदल.

नळ आणि आड यांचा एकमेकांशी व्यस्त संबंध होता.नळांमुळे पिण्याच्या पाण्यातून आड बाद होत गेले. त्यांच्या पाण्याचा उपसा कमी झाला. परिणामी पाण्याची चव बिघडली. ते पिण्यासाठी वापरणं बंद झालं. मग आडांचं करायचं तरी काय?”

आड बुजवण्याची सुरुवात

आड का बुजले आणि त्यांच्या संडासाच्या टाक्या का झाल्या..? या प्रवासातला महत्त्वाचा मुद्दा इथं होता.

आड अडगळीत पडत गेले..

आड असे अडगळीत पडत गेले..

देशपांडे सांगतात, “गावात नळाचं पाणी आलं. पाठोपाठ ४५ वर्षांत आड बुजवणं सुरू झालं. त्याला वेग आला १९९५ सालानंतर. त्याचा थेट संबंध आहे, वाड्यांमध्ये आलेल्या संडासांशी. १९९५ च्या आधीसुद्धा आटपाडीत वाड्यांमध्ये संडास होते. पण फक्त ५७ टक्के वाड्यांमध्येच.आता हे प्रमाण १०० टक्क्यांवर पोहोचलं. याच काळात आड झाकले गेले. त्यांच्या संडासाच्या टाक्या झाल्या.”

आधीच्या पिढीचा विरोध

आड बुजवण्याला आधीच्या पिढीने विरोध केला.. पण घराची सूत्रं त्यांच्या हाती नव्हती. मग त्यांच्या विरोधाला कोण जुमानणार? भारत दिघोळे यांनी सांगितलं, “आम्ही आडाला संडासाच्या टाकी करायचं ठरवलं, तेव्हा आईने विरोध केला. पण घरात टाकीसाठी जागाच नव्हती. मग काय करणार? एका वर्षी प्रचंड पावसामुळे ओढ्याला पूर आला होता. तेव्हा शौचासाठी बाहेर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे निर्णय घेतला. १९९८ साली घरात संडास बांधला, आडाचा उपयोग संडासाची टाकी म्हणून केला.”

हेच सतीश भिंगे यांच्याही घरी झालं. त्यांच्या आजीने त्याला विरोध केला होता.. पण संडास आले आणि आडाची टाकी बनली.

या सर्व आठवणींमध्ये आवर्जून ऐकायला मिळालेली गोष्ट म्हणजेदुष्काळातही आडांना पाणी असायचं. देशपांडे यांच्या वाड्यातील आडाबद्दल आठवण बोलकी आहे. “२०१० सालाच्या आधी आडाचं पाणी कधीच आटलं नाही. अगदी २००२०३ सालच्या भीषण दुष्काळातही आडाला पाणी होतं..देशपांडे म्हणाले, “माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच २०१२ सालच्या एप्रिल महिन्यात आड पहिल्यांदाच आटला. कारण आधीची दोनतीन वर्षं या भागात पुरेसा पाऊस झाला नाही. अनिर्बंध पाणीउपशामुळे भूजलाची व्यवस्था नष्ट झाली.”

देशपांडे वाड्यातील आड अजून तरी टिकून आहे. बदलांच्या धक्क्यांमध्ये तो किती काळ टिकून राहील, हा प्रश्नच आहे.. काळ बदलताना गोष्टी बदलणारच. त्यामुळे आड सर्वकाळ टिकून राहणार नाहीत, हेही समजतं (पचलं नाही तरीसुद्धा!) पण आडाच्या संडासाच्या टाक्या व्हाव्यात.. भूजलही कायमचं प्रदूषित व्हावं, हे जरा अतिच झालंहो ना?

(ता..- २०१३ सालच्या गणपतीत मोठा पाऊस झाला. त्यामुळे देशपांडे यांच्या आडात पुन्हा पाणी आलं.. जवळजवळ दीड वर्षांनी !)

– अभिजित घोरपडे

Blog- http://www.abhijitghorpade.wordpress.com

Email- abhighorpade@gmail.com