चांद छुपा बादलमे..! (मान्सून रंग- ६)

यंदा कोजागरी पौर्णिमेला चंद्र ढगाआड होता. केवळ या वर्षीच नाही, तर गेली पाचसात वर्षं असाच अनुभव येतोय. कोजागरीचा चंद्रच आमच्यावर रुसलाय का? की हे हवामानातले बदल म्हणायचे? यावरून लगेचच कोणताही निष्कर्ष काढायचा विचार नाही. पण पुढच्या वर्षी कोजागरीला चंद्राचं दर्शन होईलच, हे मात्र ठामपणे सांगता येणार नाही. आणि हो, हे पुण्यापुरतंच मर्यादित नाही, तर सर्वच भागात घडत असावं.

मग सांगा, आपला कोजागरीचा काय अनुभव आहे?

अभिजित घोरपडे

kojagiri1a

कोजागरीचा सण उत्साहाचा.. पण या वेळची कोजागरी नीरसच म्हणायची. तीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राभर. एवढं दूध आटवलं, रात्र जागवली, पण चंद्रानं काही दर्शन दिलंच नाही. दुधाच्या पातेल्यात त्याचं प्रतिबिंब दिसलं नाही. शेवटी नाईलाज झाला.. तसंच दूध पिऊन घेतलं. पुण्यापासून मुंबईपर्यंत, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत ते अगदी धुळ्यापर्यंत सगळीकडंच ढगाळ वातावरण होतं. मोजके भाग्यवंत वगळता सगळीकडं हे असंच.

ऑक्टोबरची सुरुवात झाली तरी हे असं? उन्हाचा चटका नाही. उकडतंय, पण ते ढगाळ वातावरणामुळं. नेमका अर्थ तरी काय लावायचा याचा?

आणि हो.. हे आजचंच नाही. गेली किमान पाचसात वर्षं असंच सुरू आहे. चांगलं आठवतंय मला. खरं तर पुण्याच्या हवामानाचं गणित ठरलेलं होतं. जूनमध्ये पावसाची सुरुवात, जुलैऑगस्टमध्ये धोधो पडायचा, सप्टेंबर म्हणजे पाऊस ओसरायला सुरुवात. पुढं ऑक्टोबरमध्ये तो पूर्ण थांबायचा. वादळी पावसाचा एखादा अपवाद सोडला, तर फार मोठा बदल व्हायचा नाही. पण गेली पाचसात वर्षं वेगळाच अनुभव येतोय. मी पुण्यात असल्यामुळं इथलं सांगतोय, पण असंच काहीसं इतरही भागात पाहायला मिळतंय..

२००८ साली गणेश चतुर्थीच्या दिवशी अतिवृष्टीमुळे पुण्यात अशी अवस्था झाली होती...

२००८ साली गणेश चतुर्थीच्या दिवशी अतिवृष्टीमुळे पुण्यात अशी अवस्था झाली होती…

२००८ सालचा गणपती बसल्याचा दिवस! पुणेकरांच्या लक्षात राहील असाच हा दिवस. सायंकाळच्या वेळी पावसाला सुरुवात झाली.. जो सपाटून पडला की पुण्यातल्या साऱ्या यंत्रणा गुडघ्यावर आल्या. नेमकी व्यग्र वाहतुकीची वेळ. गणेशमूर्ती घरी आणण्याची गर्दी. त्याच वेळी पाऊस सुरू झाला. त्यानं सर्वांनाच थांबवून ठेवलं. अर्ध्यापाऊण तासातच पाऊणशे मिलिमीटरच्या आसपास नोंद झाली. ही नोंद वेधशाळेतली.. पण वादळी पाऊस म्हणजे जागोजागी इतका कमीजास्त असतो की त्याचा हिशेबच नाही. पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहिले. वाहतूक ठप्प. सगळीकडं कोंडी. बऱ्याचशा भागात घरांमध्ये पाणी शिरलं. सोसायट्यांच्या भिंती पडल्या. शहरातल्या सर्व सार्वजनिक यंत्रणांनी गुडघे टेकले. जवळजवळ तीनचार तास शहराचं हाल कुत्रं खात नव्हतं. एक मैत्रीण एसटी बसनं बाहेर गावी जाणार होती. तिची बस तीनचार तासांनी पुण्यातून बाहेर पडू शकली.

४ ऑक्टोबर २०१० रोजी पुण्यात एकाच दिवसात विक्रमी १८१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.. त्यामुळे पुणअयातील रस्ते असे जलमय बनले होेते.

४ ऑक्टोबर २०१० रोजी पुण्यात एकाच दिवसात विक्रमी १८१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.. त्यामुळे पुण्यातील रस्ते असे जलमय बनले होेते.

दोनच वर्षांनी, २०१० साली तर कहरच झाला. चांगलं आठवतंय. ४ ऑक्टोबरचा दिवस. ३० सप्टेंबरला अधिकृतरीत्या पावसाळा संपला. तरीही पावसाच्या सरी पडत होत्या. सकाळपासूनच आकाशात ढग होते. दुपारी पाऊस सुरू झाला. त्याचा जोर वाढला. म्हणता म्हणता इतका वाढला की, पुण्याचा बराचसा भाग जलमय व्हायला लागला. महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचा तळमजला पाण्याने व्यापला. मॉडेल कॉलनीतल्या चित्तरंजन वाटिकेजवळ त्यांचा बंगला. बाजूने वाहणारा नाला तुंबल्यामुळे त्यांच्या बंगल्यात पुरुषभर पाणी जमा झालं. आयुक्तांचा बंगलाच पाण्यात तर इतरांची काय गत? दुपारपासून पाऊस कोसळतच होता. रात्री अकरासाडेअकराच्या सुमारास थांबला. तोवर पाषाण रस्ता, बाणेर रस्ता आणि गणेशखिंड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाले होते. या रस्त्यांवरून पाचसहा फुटांचा प्रवाह वाहत होता. शहरात भिंती पडल्यामुळे आणि पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेल्यामुळे अकराबारा जण मरण पावले. पुण्यात पावसाचा नवा उच्चांक नोंदवला गेला. २४ तासांत१८१.१ मिलिमीटर पाऊस. याआधीचा सर्वकालीन उच्चांक होता. १५४ मिलिमीटरच्या आसपास!

४ ऑक्टोबर २००४ च्या विक्रमी पावसामुळे पुण्याच्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या आवाराची अशी अवस्था झाली होती...

४ ऑक्टोबर २००४ च्या विक्रमी पावसामुळे पुण्याच्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या आवाराची अशी अवस्था झाली होती…

२०११ साली पुन्हा तसंच. कोजागरी होती. आम्ही ऑफिसात दूध, पुलाव असा बेत ठरवला होता. सायंकाळपासून पाऊस पडत होता. आता थांबेल, मग थांबेल.. म्हणत वाट पाहिली. पण तो कोसळतच होता. तशात दूध घेऊन येणं जिकिरीचं होतं. पण ते आणलं.. गार का असेना, त्याच्यावर कोजागरी साजरी झाली.. अर्थातच चंद्राच्या दर्शनाविना. पाऊस कोसळतच होता. मी त्याच्या आकड्यावर लक्ष ठेवून होतो. हळूहळू तो शंभराच्या दिशेने सरकत होता. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत शंभरी ओलांडेल असं वाटलं. पण तो ९६९७ मिलिमीटरच्या आसपास थांबला.. तरीही पुण्यासाठी तो खूप जास्त होता. त्यानंतर त्याच वर्षी पुन्हा १२ ऑक्टोबर रोजी २४ तासांत तब्बल १०५ मिलिमीटर पाऊस कोसळला.

२०१२ सालचा नेमकं आठवत नाही. पण पुढं २०१३ सालचा गणपती उत्सव पावसाने धुऊन टाकला. जवळजवळ रोजच वादळी पाऊस. मिरवणुकीच्या दिवशी तर दोनतीन टप्प्यांत कोसळला. इतका की, पोलिसांना काहीही करावं लागलं नाही, मिरवणुकीतली गर्दी आपोआपच कमी झाली

cloudy sky over Pune on Friday. Express Photo by Arul Horizon, 10-10-2014, Pune

या वर्षी म्हणजे २०१४ साली कोजागरीच्या दिवशी पुण्यावर ढग होते… पुण्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातसुद्धा !

आता या वेळी २०१४ च्या कोजागरीला चंद्राचं दर्शन नाहीबंगालच्या उपसागरात हुदहुदनावाचं चक्रीवादळ निर्माण झालं. ते घोंघावतच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर आदळलं. त्याचा परिणाम म्हणून पुण्यात ढग आहेतच, पण बहुतांश महाराष्ट्रात ढगाळ वातावरणपाऊस असंच चित्र आहे

कोजागरीचा चंद्रच आमच्यावर रुसलाय का? की हे हवामानातले बदल म्हणायचे? ही झाली माझी निरीक्षणं. यावरून लगेचच कोणताही निष्कर्ष काढायचा विचार नाही. पण पुढच्या वर्षी कोजागरीला चंद्राचं दर्शन होईलच, हे मात्र ठामपणे सांगता येणार नाही. हे पुण्यापुरतंच मर्यादित नसावंसर्वच भागात कमीअधिक प्रमाणात घडत असावं. ते जाणून घ्यायचं आहे. म्हणूनच आपल्याला विचारतोय. सांगा, आपला कोजागरीचा काय अनुभव आहे?

अभिजित घोरपडे

(abhighorpade@gmail.com)

सुखं थोडं, दु:ख भारी… (मान्सून रंग- ५)

मान्सूनच्या पावसाचं वर्णन करावं लागतं, “सुख थोडं, दु:ख भारी…” कारण भारतात गेल्या ११३ वर्षांच्या काळात फक्त १३ वर्षं अतिवृष्टीची ठरली आहेत. याउलट २० वर्षं दुष्काळाची ठरली आहेत. गेल्या २० वर्षांत एकही अतिवृष्टीचं वर्ष अवतरलं नाही, तर दुष्काळाची तीन वर्षं सोसावी लागली आहेत… म्हणूनच पावसाचं हे वर्णन !

– अभिजित घोरपडे

भारताच्या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे-  अतिवृष्टीपेक्षा दुष्काळी वर्षांची संख्या जास्त.

भारताच्या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे- अतिवृष्टीपेक्षा दुष्काळी वर्षांची संख्या जास्त.

जम्मूकाश्मीरमध्ये पुराने थैमान घातलं. तिथं शंभर वर्षातल्या मोठ्या पुराला सामोरं जावं लागलं. मधल्या काळात गंगेच्या खोऱ्यात पुरामुळे झालेलं नुकसान सोसावं लागलं. महाराष्ट्राबद्दल सांगायचं, तर आता पावसाची परिस्थिती सुधारलीय. अगदी अलीकडंपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाण्याची टंचाई होती. आता मराठवाडा वगळता इतरत्र पाण्याची उपलब्धता आहे. मराठवाड्यातसुद्धा सुरुवातीसारखी वाईट स्थिती नाहीहे असं असलं तरी संपूर्ण देशाचा विचार करता पाऊस अपुराच आहे. आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ११ टक्के अपुरा पाऊस झाला आहे. पावसाळा संपायला अजून आठवडा बाकी आहेत, पण पावसाच्या आकड्यात फार मोठा बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे वर्षसुद्धा अपुऱ्या पावसाचंच म्हणायचं.

या निमित्तानं मान्सूनच्या पावसाचं एक वैशिष्ट्य मांडावंच लागेल. ते आहे, “सुख थोडं, दु:ख भारी..” पावसाच्या नावानं उगाचच रडण्याचं कारण नाही. पण हे वास्तव आहे. देशाच्या पावसाचं शंभर वर्षांची आकडेवारी हेच सांगते. पावसाच्या गेल्या ११३ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकू. म्हणजे १९०१ पासूनची आकडेवारी. त्याला संदर्भ आहेभारतीय हवामान विभागाचा. ही आकडेवारी टक्केवारीत आहे. भारतात मान्सूनच्या काळात सरासरी किती पाऊस पडतो आणि प्रत्यक्षात किती पाऊस पडलायाबाबतची ही आकडेवारी.

सरासरीच्या १० टक्के जास्त पाऊस पडला तर ते एक्सेस मान्सून रेनफॉल इयरअसं म्हटलं जातं. याउलट सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस त्याला डेफिशिअंट मान्सून रेनफॉल इयरअसं म्हटलं जातं. त्यांना आपण अतिवृष्टीचं आणि दुष्काळी वर्ष असं म्हणू या.

११३ वर्षांमध्ये अतिवृ्ष्टीची केवळ १३ वर्षं

११३ वर्षांमध्ये अतिवृ्ष्टीची केवळ १३ वर्षं

हवामान विभागाची आकडेवारी असं सांगते की, गेल्या ११३ वर्षांत काळात फक्त १३ वर्षं अतिवृष्टीची ठरली आहेत. याउलट २० वर्षं दुष्काळाची ठरली आहेत. या दुष्काळी वर्षांमध्ये आताच्या २०१४ या वर्षाची भर पडण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे अतिवृष्टीची वर्षं आणि दुष्काळी वर्षं यांचं प्रमाण असेल, १३ : २१

ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण देशाचा विचार करता गेल्या वीस वर्षांमध्ये एकदाही अतिवृष्टीचं वर्ष अवतरलेलं नाही. यापूर्वी १९९४ मध्ये असं वर्ष होतं. त्यानंतर अशा वर्षाची अजूनही प्रतिक्षाच करावी लागते आहे. उलट गेल्या वीस वर्षांत दुष्काळाची तीन वर्षं सहन करावी लागली आहेत. ही वर्षं आहेत२००२, २००४ आणि २००९. त्यात कदाचित २०१४ या वर्षाचीसुद्धा भर पडेल.

खरं तर सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस काय किंवा कमी पाऊस काय?.. दोन्हीमुळे नुकसान होतंच. पण अतिवृष्टीच्या वर्षात पावसाचा अपुरा कोटा भरून निघतो. एवढ्यासाठी अतिवृष्टीला चागलं म्हटलं आहे.. इतर कोणत्याही उद्देशाने नव्हे!

.

२० वर्षांपासून अतिवृष्टीची प्रतिक्षाच..

२० वर्षांपासून अतिवृष्टीची प्रतिक्षाच..

(जास्त पावसाची वर्षे व पावसाची टक्केवारी-)

१९१४-  ११०.टक्के

१९१६-  ११३.टक्के

१९१७–  १२२.टक्के

१९३३-  ११५.टक्के

१९४२-  ११३.टक्के

१९५५–  ११०.टक्के

१९५६-  ११३.टक्के

१९५९–  ११४.टक्के

१९६१–  १२१.टक्के

१९७०–  ११२.टक्के

१९७५–  ११५.टक्के

१९८३–  ११३.टक्के

१९८८–  ११९.टक्के

१९९४–  ११०.० टक्के

दुष्काळाचेच सावट अधिक..

दुष्काळाचेच सावट अधिक..

(दुष्काळी वर्षं आणि पावसाची टक्केवारी)

१९०१-  ८६.टक्के

१९०४-  ८८.टक्के

१९०५-  ८२.टक्के

१९११-  ८५.टक्के

१९१८-  ७५.टक्के

१९२०-  ८३.टक्के

१९४१–  ८६.टक्के

१९५१-  ८१.टक्के

१९६५-  ८१.टक्के

१९६६-  ८६.टक्के

१९६८-  ८९.टक्के

१९७२-  ७६.टक्के

१९७४-  ८८.टक्के

१९७९-  ८१.टक्के

१९८२-  ८५.टक्के

१९८६–  ८७.टक्के

१९८७–  ८०.टक्के

२००२–  ८०.टक्के

२००४–  ८६.टक्के

२००९–  ७८.टक्के

२०१४–  ८९.टक्के (२३ सप्टेंबरपर्यंत)

– अभिजित घोरपडे

ई-मेल- abhighorpade@gmail.com

ब्लॉग- http://www.abhijitghorpade.wordpress.com

मान्सूनच्या पावसाचा चकवा! (मान्सून रंग- ४)

मान्सूनच्या पावसाचा अंदाज अजूनही आपल्याला नेमकेपणाने येत नाही. या बाबतीत आपण चुकत आलो आहोत, अगदी आजच्या विकसित तंत्रज्ञानाच्या काळातसुद्धा! आजवरचा इतिहासही हेच सांगतो. हवामानाच्या एकाचा सूत्राला नेमकेपणाने दुष्काळ ओळखता आलेले नाहीत. म्हणूनच एकेक करून ही सूत्र बदलण्यात आली.. सध्या तरी आपण पावसाच्या लहरीवरच जगत आहोत. अजून किती काळ हे माहीत नाही?

अभिजित घोरपडे

Mon6

मोसमी (मान्सूनच्या) पावसाचा अंदाज.. हा अतिशय किचकट विषय. इतका की याच्या वाटेला जाणारे बहुतांश लोक तोंडावर आपटले आहेत. मी मी म्हणणाऱ्यांनाही पावसाचा नेमकेपणाने अंदाज आला नाही, येत नाही. मग ते कितीही मोठे अभ्यासक असोत; देशी असोत वा परदेशी. इतिहास याचा साक्षीदार आहे. मागं वळून पाहिलं की समजतं, आपण फिरून फिरून होतो तिथंच आलो आहोत. खरं तर अजूनही आपण पावसाच्या लहरीवरच अवलंबून आहोत.

फार मागं जायला नको. याच वर्षाचं उदाहरण घ्या. हवामान विभागानं पहिल्या टप्प्यात, एप्रिल महिन्यात ९६ टक्के पावसाचा अंदाज जाहीर केला होता. महिनादीड महिन्यातच तो ९३ टक्के असा सुधारीत करण्यात आला. पाऊस सक्रिय कधी होणार, याबाबतही असंच. आता होईल, मग होईल म्हणताम्हणता दीड महिने उलटले. अंदाज दिले जात होते, पण ते प्रत्यक्षात उतरत नव्हते. वेगवेगळी विघ्न यायची. पाऊस देणारी कमी दाबाची क्षेत्रं हवी तेवढी तीव्र नसायची.. कधी प्रशांत महासागरात चक्रीवादळ निर्माण व्हायचं. ते आपला पाऊस हिरावून न्यायचं.. तर कधी पावसाचा अंदाज देणारं मॉडेलच फसायचं..

एकूण काय? तर पावसाचा नेमका अंदाज आलाच नाही. पण हे आजचं नाही, तर मागंसुद्धा असंच घडलं आहे.

Mon2

मोसमी पावसाचा अंदाज देण्याची भारताची परंपरा खूप जुनी आहे. ब्रिटिशांच्या काळापासून त्याचा वेध घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा काळ तब्बल सव्वाशे वर्षांच्याही मागे जातो. भारताच्या हवामान विभागाची स्थापना १८७५ साली झाली. ब्लँडफोर्ड हा अधिकारी या विभागाचा पहिला चीफ रिपोर्टरठरला. त्याने मोसमी पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. तारीख होती, ४ जून १८८६. भारत आणि ब्रह्मदेश (आताचा म्यानमार) या क्षेत्रावर पावसाळ्याच्या चार महिन्यांत कसा पाऊस पडेल, याचं भाकीत त्याने पहिल्यांदा केलं. त्याचं अंदाज वर्तविण्याचं सूत्र साधं होतं. ते हवामानाच्या एकाच घटकावर आधारीत होतं. तो घटक होता, हिवाळ्यात हिमालयात असणारं हिमावरण. त्याने आधीच्या चार वर्षांच्या पावसाची आकडेवारीचा अभ्यास केला. त्याला आढळलं की, हिमावरण जास्त असेल तर पाऊस कमी पडतो आणि हिमावरण कमी असेल, तर पाऊस जास्त! झालं मग या घटकाचा आधार घेत अंदाज दिले गेले.

पुढच्या काळात एकाचे तीन घटक झाले. त्यावर आधारीत अंदाज येऊ लागले. विसाच्या शतकाच्या पूर्वार्धात गिल्बर्ट वॉकर नावाच्या अधिकाऱ्याने भारतीय हवामानशास्त्र विभागासाठी मोठं योगदान दिलं. त्याने देशाच्या तीन भागांसाठी स्वतंत्र अंदाज देणे सुरू केलं. हे भाग होतेद्वीपकल्पीय भारत, ईशान्य भारत आणि वायव्य भारत. त्याने तयार केलेल्या सूत्राच्या आधारे १९२४ ते १९८७ या काळात, तब्बल ६३ वर्षे, पावसाचा अंदाज दिला गेला. मात्र, या सूत्राला १९८७ च्या दुष्काळाचा अंदाज देता आला नाही (खरंतर आधीच्या दुष्काळांचासुद्धा!)

Mon4

त्यामुळे १९८८ पासून देशाने पावसाच्या अंदाजासाठी स्वतंत्र सूत्र स्वीकारलं. तेव्हा डॉ. वसंत गोवारीकर पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे हवामानशास्त्रज्ञांनी नवं सूत्र विकसित केलं. त्यात पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. व्ही. थपलियाल यांचा प्रमुख वाटा होता. हे सूत्र हवामानाच्या १६ घटकांवर आधारीत होतं. त्याचा बराच गाजावाजा झाला. पण त्याचेही दिवस भरले.

हे सूत्र बदलण्याचं कारणही तेच ठरलं दुष्काळ ओळखण्यात आलेलं अपयश. या सूत्रामुळे २००२ साली पडलेला भीषण दुष्काळाचा अंदाज आला नाही. मग २००३ सालापासून पुन्हा नवं सूत्र स्वीकारण्यात आलं. ते आठ व दहा घटकांवर आधारीत होतं. त्या आधारे दोन टप्प्यांत अंदाज दिले जाऊ लागले. त्यातही सुधारणा करून आता सहा आणि पाच घटकांवर आधारीत दोन टप्प्यांत अंदाज दिला जात आहे.. या सर्वच सूत्रांची मर्यादा होती. ती म्हणजे त्यांना नेमकेपणाने दुष्काळ हेरता आले नाही. नियोजनासाठी अशी कठीण वर्षं समजणंच महत्त्वाचं असतं. नाहीतर या सूत्रांचा उपयोग तो काय?

हा इतिहास हेच सांगतो की, अजूनही आपण पावसाची लहर ओळखू शकलेलो नाही. पैसा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ पुरवले तरी हे झालेले नाही. अर्थात हेही खरं की, मोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात मर्यादा आहेत. आपल्याप्रमाणे जगभरातील शास्त्रज्ञही त्यात अपयशी ठरले आहेत. तूर्तास आपण पावसाच्या लहरीवर अवलंबून आहेत.. पाऊस दरवर्षी चकवा देतो, मग अंदाज चुकतात. अर्थात, म्हणून प्रयत्न करणं सोडून द्यायचं असंही नाही. ते तर करावेच लागतील.. अंदाज कधी बरोबर येतील ते येवोत, दरम्यानच्या निदान काही गोष्टी तरी हाती लागत राहतील!

Mon5

(ता..-

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केलेले दीर्घकालीन पावसाचे अंदाज चुकतात, हे खरंच. त्यामुळे अलीकडं एक टूम निघाली आहे. ऊठसूठ कोणीही पावसाचे अंदाज वर्तवू लागले आहेत. ते योगायोग म्हणून खरेसुद्धा ठरतात, पण कधीकधीच. त्यातील सोयीस्कर आकडे दाखवून, आपण कसे शहाणे आहोत, हे भासविण्याचा प्रयत्न काही तथाकथित तज्ज्ञ करतात. त्याचबरोबर आय.एम.डी.ला नालायक ठरवतात. अलीकडं हे प्रमाण वाढलं आहे.. या लोकांना थारा देता कामा नये. आय.एम.डी. अजूनही चुकते हे खरं, पण त्यांनी दिलेले अंदाज हवामानाच्या ठोस घटकांच्या आधारीवर असतात. अशी मांडणीच अचूकतच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आय.एम.डी.चे दोष दाखवताना, आपण इतर कोणाला उगीचच डोक्यावर घेत असून, तर तेही योग्य नाही.)

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

धोंडी धोंडी पाणी दे… (मान्सून रंग- ३)

पाऊस पडावा यासाठी अजूनही धोंडी, शंकोबा यासारख्या प्रथा आहेत. बेडकांचीगाढवांची लग्नं लावली जातात. देवाला बंदी बनवलं जातंया अंधश्रद्धाच. पण त्या लोकांची जगण्याची उमेद टिकवून ठेवायच्या. आता परिस्थिती बदललीय. आपल्या गरजा वाढल्यात किंवा त्या आपण वाढवून ठेवल्यात. त्यामुळे आम्हाला नेहमीचा पाऊसही पुरत नाही, मग धोंडी / शंकोबामुळे चार सरी (कल्पनेत) पडल्या तरी त्या आमची कितीशी गरज भागवणार?

अभिजित घोरपडे

पावसासाठी सजले बेडूक नवरा-नवरी अन् लागलं बेडकांचं लग्न..

पावसासाठी सजले बेडूक नवरा-नवरी अन् लागलं बेडकांचं लग्न..

पाऊस चेहऱ्यावर हसू फुलवतो, तसा लोकांना रडवतोसुद्धा.

कसा?.. हे सध्या पाहायला मिळतंय. संपूर्ण जून महिना कोरडा. धरणं आटत चाललीत. पुण्यामुंबईतसुद्धा पाण्याची कपात सुरू झालीय. मग इतर भागांची काय गतपाऊस पडेना म्हटल्यावर सगळीकडंच वेगवेगळे प्रयत्न सुरू झालेत. कृत्रिम पावसाच्या शक्याशक्यतेबाबत चर्चा सुरू आहेत..

इकडं नियोजनव्यवस्थापनाची तयारी सुरू असताना काही भागात वेगळं चित्र आहे. श्रद्धेपोटी परंपरागत उपाय केले जात आहेत. ठिकठिकाणी पावसासाठी यज्ञ सुरू झालेत. परवाच पिंपरीचिंचवडमध्ये असा यज्ञ झाला.

अकोल्यातली धोंडीची प्रथा आठवड्यापूर्वी पाहायला मिळाली. कमरेला लिंबाचा पाला, खांद्यावर कावड घेतल्याप्रमाणे काठी, त्याला उलटा लटकवलेला बेडूक, वाद्य वाजवणारे काही जण, मागं पोतं घेऊन धान्य गोळा करण्यासाठी काही लोक.. अशी मंडळी पाऊस मागण्यासाठी दारोदारी फिरत होती. ते दारात आले की त्यांच्या अंगावर पाणी ओतलं जात होतं..

कुठं यज्ञ केले जातात, तर कुठं आणखी काही.. दोनच दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे पावसासाठी असा महायज्ञ झाला. (फोटो@राजेश स्टीफन)

कुठं यज्ञ केले जातात, तर कुठं आणखी काही.. दोनच दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे पावसासाठी असा महायज्ञ झाला. (फोटो@राजेश स्टीफन)

पावसाला बोलावण्यासाठी आपल्याकडं अशा अनेक प्रथा आहेत. त्या सर्वच भागात दिसतात. वेगवेगळ्या अन् चित्रविचित्र. विदर्भात धोंडीदिसते. तसा पश्चिम महाराष्ट्रात शंकोबा! विवस्त्र पोरं डोक्यावर पाट घेऊन दारोदारी फिरतात. त्या पाटावर चिखलाचा शंखाकृती शंकोबाअसतो. त्याच्यावर बायका पाणी ओततात आणि चांगल्या पावसासाठी साकडं घालतात.

 

काही प्रथांमध्ये थेट देवालाच वेठीला धरलं जातं. “महादेव कोंडणंही त्यापैकी एक. गावागावात किंवा पंचक्रोशीत महादेवाचं जुनं देऊळ असतंच. तिथं महादेव कोंडला जातो. गाभाऱ्यात महादेवाची पिंड असते. गाभारा पाण्यानं भरला जातो. पिंड पाण्याखाली गेली की, देवळाची दारं बंद केली जातात. पावसाच्या सरी पडेपर्यंत महादेवाला असं बंदी केलं जातं. कधी मारुतीवर, तर कधी गणपतीवर ही वेळ येते. असं केलं की पाऊस पडतो ही लोकांची धारणा!

याच्या पलीकडं काही गमतीशीर प्रथासुद्धा आहेत. असं मानतात की, बेडकांची किंवा गाढवांची लग्न लावली की पाऊस पडतो. बेडकांची लग्न लावणं देशाच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळतं. त्यासाठी बेडकं शोधून त्यांची लग्न वाजतगाजत लावली जातात. सोलापूर, नगर, सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात गाढवांची लग्न लावली जातात. त्याबाबत अख्यायिकासुद्धा आहे. पाऊस हा वरुणदेवाचा प्रांत. त्याच्या मर्जीनुसार पाऊस पडतो. एके वर्षी पाऊस पडलाच नाही. त्या वेळी ऋषीमुनींनी वरुणदेवाला विनंती केली. तरीही त्यानं ऐकलं नाही. शेवटी ऋषी मंडळींनी निषेध म्हणून गाढवाची लग्न लावली. तेव्हा वरुणदेवानं माघार घेतली आणि पाऊस पाडलाम्हणून असं समजलं जातं की, गाढवांची लग्न लावली की पाऊस पडतो.

बेडकं अन् गाढवांची लग्नं लावली की पाऊस पडतो का? तरीसुद्धा हे केलं जातं.. का? कशासाठी?

बेडकं अन् गाढवांची लग्नं लावली की पाऊस पडतो का? तरीसुद्धा हे केलं जातं..
का? कशासाठी?

याशिवाय काही भागात पावसाला वाजतगाजत आणलं जातं. आकाशात ढग आहेत, पण पाऊस पडत नसेल, तेव्हा हे केलं जातं. ढग असतील तिकडं गावचे लोक जातात. तिथून वाजतगाजत वेशीपासून येतात. त्यांच्यासोबत पाऊस येतो, असं मानलं जातं. काही वेळा असा पाऊस पडल्याचं लोक सांगतात. त्या वेळी देवाच्या नावाचा भंडारा करून गावाला जेवणं घातलं जातं..

या प्रथा म्हणजे अंधश्रद्धाच. तरीही त्या का केल्या जात होत्या? त्यामागचं प्रमुख कारण मानसिक असावं. मागं गुजरातेत कच्छच्या रणात गेलो होतो. कच्छ हाही कमी पावसाचा प्रदेश. तिथं शंभूदान गढवी नावाचे गृहस्थ भेटले. त्यांच्याकडूनही या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते म्हणाले की, खडतर परिस्थितीत माणसाला आशा टिकवून ठेवावी लागते. आज नाही तर उद्या बरे दिवस येतील, या विश्वासावरच तो जगत असतो. वेळ मारून नेण्यासाठी असं काही करावं लागतं. कधी योगायोग म्हणून पाऊस पडतोसुद्धा. मग या प्रथांवरचा विश्वास आणखी दृढ होतो..

हा झाला इतिहास!

आता परिस्थिती कमालीची बदलली आहे. धोंडीने किंवा शंकोबाने पाऊस दिला तरी आपल्याला त्याचा उपयोग नाही. कारण पूर्वी योगायोग म्हणून पडलेला पाऊससुद्धा दिलासा द्यायचा. कारण तेव्हा गरजा कमी होत्या, लोकांना सहन करण्याची, वाट पाहण्याची सवय होती. दु:खावर फुंकर मारण्यासाठी थोडासा दिलासासुद्धा पुरायचा. पण आता सारंच बदललंय. गरजा वाढल्यात म्हणा किंवा वाढवून ठेवल्यात म्हणा.. त्यामुळे नेहमीचा पाऊसही पुरत नाही, मग धोंडीच्या / शंकोबामुळे चार सरी (कल्पनेत) पडल्या तरी त्या आमची कितीशी गरज भागवणार?

अभिजित घोरपडे

ई-मेल- abhighorpade@gmail.com

ओल्ड फेथफूल.. (मान्सून रंग २)

भारतात दरवर्षी सरासरीच्या ७० ते १२५ टक्के इतका पाऊस पडतोच. त्यातली तफावत हे तर मान्सूनचं स्वातंत्र्य. तो निसर्गाचा भाग आहे, मशीनचं उत्पादन नाही.. ठरवून दिलेल्या मापानुसार बाहेर पडणारं! आता हा चढ-उतारही झेपत नसेल, तर तो आपला दोष. त्याची दूषणं मान्सूनला कशी? – अभिजित घोरपडे

जूनच्या उत्तरार्धात भाताच्या लागणीला वेग आलेला असतो.. सध्या मात्र पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे..

जूनच्या उत्तरार्धात भाताच्या लागणीला वेग आलेला असतो.. सध्या मात्र पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे..

पाऊस नाही.. अजून नाही.. अजूनही नाही.. महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात गेले काही दिवस तक्रारीचा सूर आहे. आणि तो का नसावा? जून महिन्याचे तीन आठवडे संपलेत. आठ-दहा दिवसांत अख्खा जून संपेल. तरीही पावसाचा जोर नाही. अजून मान्सूनचा पाऊस सक्रिय कसा नाही? कोकण, विदर्भाचा काही भाग सोडला तर महाराष्ट्र कोरडाच आहे. आतापर्यंत पेरण्यांची तयारी झालेली असते. कुठे त्या उरकलेल्या असतात. यंदा चित्र वेगळं आहे. भाताची रोपंसुद्धा नव्यानं वाढवायची वेळ आलीय.

परवाच देहू-आळंदीची वारी सुरू झाली. तिथंही पाऊस लांबल्याचा परिणाम दिसला. इंद्रायणीचा घाट नेहमीइतका भरला नव्हता या वेळी. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात तर जूनच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल. काय होणार तोवर? अनेकांना चिंता लागू राहिलीय. मान्सूनबाबत शंकाही उपस्थित केल्या जात आहेत- अरे, काय लावलंय.. दगा देणार की काय या वर्षी?

तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवते, तेव्हा इंद्रायणीचा घाट वारकर्यानी भरून गेलेला असतो.. यावेळी मात्र असे चित्र पाहायला मिळाले.. (फोटो@राजेश स्टीफन)

तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवते, तेव्हा इंद्रायणीचा घाट वारकर्यानी भरून गेलेला असतो.. यावेळी मात्र असे चित्र पाहायला मिळाले.. (फोटो@राजेश स्टीफन)

मान्सून येईपर्यंत, तो येणार का? आणि आता आल्यावर तो दगा देणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत.. यातून आपण किती अधिर आहोत, याचं दर्शन होतं. पण मान्सूनबद्दल म्हणाल तर तो विश्वासू आहे.. अगदी ओल्ड फेथपूल!

हे ठामपणे म्हणण्याला कारण आहे. कारण मान्सून आला नाही, असं कधी झालं नाही. कधी होतही नाही. तो येतो म्हणजे येतोच. त्याच्या वाट्याचा पाऊस देतो. मगच जातो.. हेच तर आपल्या मान्सूनचं वैशिष्ट्य. त्याचं येणं पक्कं असतं आणि पाऊस देणंसुद्धा. हा काळही सर्वसाधारपणे ठरलेला असतो. या सर्वच गोष्टींमध्ये थोडं पुढं-मागं होतं, इतकंच. मान्सूनचा भारताकडं येण्याचा प्रवास तब्बल दीड कोटीवर्षांपासून सुरू आहे. हिमालयाची उंची काही कोटी वर्षांपासून वाढतच आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. ती विशिष्ट पातळीपर्यंत वाढली, तेव्हा मान्सूनच्या निर्मितीला गती आली. तेव्हापासून तो (म्हणजेच मोसमी वारे) भारताकडे येतो आहे, सोबत पावसाला आणतो आहे. हा काळ होता- साधारणत: १.५४ कोटी ते १.३९ कोटी वर्षांपूर्वीचा. गोव्यातील राष्ट्रीय सागरविज्ञान संस्था तसेच, ब्रिटनच्या संशोधकांनीपाचेक वर्षांपूर्वी हे दाखवून दिलं. त्याआधी हा काळ ८० लाख वर्षे इतका समजला जात होता.

हिमालयाची उंची विशिष्ट टप्प्यापर्यंत वाढली आणि मान्सूनची निर्मिती झाली...

हिमालयाची उंची विशिष्ट टप्प्यापर्यंत वाढली आणि मान्सूनची निर्मिती झाली…

मान्सूनचं पाणी देण्याचं प्रमाणही ठरलेलं. त्यात चढ-उतारही असतो . संपूर्ण देशाचा विचार केला, तर कमीत कमी सरासरीच्या ७० टक्के आणि जास्तीत जास्त १२५ टक्के ! मान्सूनचा भारतात येण्याचा, पुढं सरकण्याचा काळही असाच. केरळ- १ जून, महाराष्ट्र- ६/७ जून, दिल्ली- १ जुलै, संपूर्ण भारत व्यापणं- १५ जुलै… या सरासरी तारखा. त्यासुद्धा मागं-पुढं होतात. ही तफावत हे तर मान्सूनचं स्वातंत्र्य. तो निसर्गाचा भाग आहे, मशीनचं उत्पादन नव्हे.. ठरवून दिलेल्या मापानुसार बाहेर पडणारं, दरवर्षी एकसारखं! आता हा चढ-उतारही झेपत नसेल, तर तो आपला दोष. त्याची दूषणं मान्सूनला कशी?

खरं सांगू का? अलीकडं आपल्याला सबुरी उरलीच नाही. क्षणभराचा उशीर चालत नाही आम्हाला. कदाचित सर्वच गोष्टी मुळासकट खाण्याची सवय लागल्यामुळे असेल. शिवाय नियोजनाची बोंब. त्यामुळे आम्हाला जराही थांबणं जमतनाही. आता तर त्यात ‘बकासुरी’ माध्यमांची भर पडलीय. त्यांनी आमची थांबण्याचीसवय पार संपवूनच टाकलीय.. पण हे योग्य नाही. जरा इतिहासात डोकवा. निसर्गाच्या सर्वच घटकांमध्ये चढ-उतार आहेत. हे सारं विसरून नुसतंच अधिर बनणं बरं नाही, उपयोगाचंही नाही.. अपयश आपलं अन् पावती मान्सूनच्या नावावर. असं कसं चालेल? त्याच्याइतकी विश्वासार्हता फारच कमी जणांकडं असते. तीसुद्धा दीड कोटी वर्षांपासून. म्हणूनच त्याला म्हणायचं- ओल्ड फेथफूल, कोणी मानो न मानो! – अभिजित घोरपडे ई-मेल : abhighorpade@gmail.com