आदित्यजी… बुडाली तुमची मुंबई!

बहे गयी, डुब गयी, मुंबई बुडाली… मुंबईत पाणी साचलं की माध्यमांकडून अशी बोंब ठोकली जाते. पण मुंबईला भौगोलिक मर्यादा आहेत. पाऊस आणि भरती एकत्र आली की पाणी साचणारच. इथल्या नैसर्गिक व्यवस्था मोडल्या, नाल्यांचे सबवे झाले, मग पाणी जाणार कुठं? त्यामुळे नुसतं ओरडून उपयोग नाही, लोकांना वस्तुस्थिती सांगावीच लागेल.

– अभिजित घोरपडे

पाऊस पडल्यावर पाणी साचणं हे मुंबईचं वैशिष्ट्यच आहे.

पाऊस पडल्यावर पाणी साचणं हे मुंबईचं वैशिष्ट्यच आहे.

बरं झालं, पावसाचा जोर कमी झाला ते. नाहीतर वाहिन्यांनी अजून कोणाकोणाला मुंबईकडं पाहायला लावलं असतं, याचा नेम नाही. सलग चारपाच दिवस तेच ते सुरू होतंआदित्यजी, कशी बुडाली तुमची मुंबई; उद्धवजी, बघा तुमच्या मुंबईची अवस्था; मुख्यमंत्री, जरा इकडं लक्ष द्या

हिंदी वाहिन्यांनी तर कहर केला होता बहे गई मुंबई, सावधान मुंबई, मुंबईको कौन डुबारहा है, आफत की बारीश

नुसती चढाओढ लागली होती. कोण सर्वांत चित्तथरारक मथळा देतोय ते? त्यासाठीची कल्पकता उतू चालली होती. कारण काय? तर जास्तीत जास्त प्रेक्षकवर्ग खेचला जावा. अरे, पण परिणाम काय होत होता त्याचा? निव्वळ अस्वस्थता आणि अधिरता. फक्त मुंबईतच नाही, तर सर्व राज्यभर. जणू काय जगबुडीच झालीय! माझाच अनुभव सांगतो. सविता, माझी बायको सांगलीहून पुण्याला यायची होती. सासुबाईंचा फोन आला, किती पाऊस पडतोय, तिला घ्यायला या. पुण्यात पावसाचा थेंब नव्हता, पण वाहिन्यांनी त्यांचं काम केलं होतं. सगळीकडंच अस्वस्थता पसरली होती.

पाऊस पडलं की हे चित्र दिसतंच.

पाऊस पडलं की हे चित्र दिसतंच.

बरं. मुंबईत पहिल्यांदाच पाऊस पडला होता का? त्याचा असा झपाटा आधी कधीच नव्हता का? की मुंबईच्या रस्ते, रेल्वेरूळ पहिल्यांदाच पाण्याखाली गेले होते? पण जे काही दाखवलं जात होतं ते भयंकर होतं. दर पावसाळ्यात मुंबईकर अशा पाण्यातून वाट काढतोच. तोही धास्तावून जावा. असंच दाखवलं जात होतं सारं. हिंदमाता, लोवर परळ, दादर, ग्रॉन्ट रोड, सात रस्ता, मिलन सबवे, अंधोरी, मालाड, मुलुंड, सांताक्रुझ सबवे इथं पाणी साचतंच थोड्याफार पावसात. प्रत्येक पावसाळ्यात हेच घडतं. मुंबईकरही सरावले आहेत त्याला. जोराचा पाऊस आणि भरती म्हटल्यावर पाणी तुंबणार! हे वास्तव स्वीकारूनच मुंबईकर जगत आलाय.

२६ जुलै २००५ च्या घटनेच्या महापुरानंतर जुन्या पिढीतल्या अनेकांशी बोललो, तेव्हा त्यांनी हेच वास्तव सांगितलं.. अगदी शांतपणे. मुंबईच्या म्हणून काही भौगोलिक मर्यादा आहेत. सात बेटांमध्ये भर घालून जमीन तयार केलीय. पाणी वाहून जायला नैसर्गिक अडथळे आहेत. अशा स्थितीत पाणी साचणं हा काही चमत्कार नाही. हे इथं घडणारच. त्याची तीव्रता कमी कशी करता येईल, यावर जरूर बोलावं. त्यात आपण कसे अपयशी ठरलो, हे नक्की सांगावं.. पण तेवढंच. पाणी साचलं रे साचलं, लगेच बोंब मारण्यात काही हशील नाही. मूळ समस्या आणि उपाय कुणी फारसे गांभीर्यानं मांडले नाहीत, नुसतंच सुरू होतंबहे गयी, डुब गयी, मुंबई बुडाली

आधी मुंबईचं वास्तव समजून घ्यावं लागेल. साधारणपणे माहीत असतंच. पण २६ जुलैच्या महापुरानंतर ते नव्यानं कागदावर आलं. डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तिनं ते अधोरेखित केलं.

मुंबईचा बदललेला नकाशा... सात बेटांची (सन १८४७) ते आजची (सन १९९०) (संदर्भ- सर्वे ऑफ इंडिया)

मुंबईचा बदललेला नकाशा… सात बेटांची (सन १८४७) ते आजची (सन १९९०)
(संदर्भ- सर्वे ऑफ इंडिया)

मुंबईचा इतिहास सांगतोभरती आणि बऱ्यापैकी पाऊस एकाच वेळी आले की काही तास पाणी तुंबतं.. अगदी भरती ओसरेपर्यंत. असे प्रसंग दर पावसाळ्यात किमान चारसहा वेळा येतातच. कारण बेटांच्या मधली जागेत भर टाकून जमीन तयार केली, त्यावर मुंबई वसलीय.

मुंबईच्या भूरचनेत गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड बदल झालेत. पूर्वी जिथं पाणी साचायचं त्या जमिनीवर आता भर घातलीय. तेव्हा या भागात पुरेशा क्षमतेचे प्रवाहसुद्धा निर्माण करायला हवे होते. या भागातलं पाणी व्यवस्थित वाहून न्यायचं असेल तर हे प्रवाह पुरेसे रूंद खोल असणं गरजेचं होतं. ते तसे नाहीत. मग पाणी साचलं नाही तरच आश्चर्य?

आणखी एक बदल म्हणजेपूर्वी पावसाचं पाणी काही ना काही प्रमाणात साठविणारे तलाव (होल्डिंग पॉन्ड्स) होते. ते आता संपले. ते मुंबईच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा भाग होते. पुढं मुंबईचा विकासहोताना ते बुजवण्यात आले. हे तलाव पावसाचं किमान दहा टक्के पाणी साठवून ठेवायचे. त्यामुळे पुराची तीव्रता थोडीतरी कमी व्हायची. आता मात्र पावसाचं सारंच पाणी पुराच्या स्वरूपात वाहतं.

इथं कधी काळी तलाव होता. तो भर घालून बुजवला. (ठिकाण- सांताक्रुझजवळ)

इथं कधी काळी तलाव होता. तो भर घालून बुजवला.
(ठिकाण- सांताक्रुझजवळ)

मुंबईतल्या पाणी वाहून नेणाऱ्या प्रवाहांचंही एक वास्तव आहे. हे प्रवाह जिथं समुद्राला मिळतात ती त्यांची मुखं. मुंबईत असे १८६ प्रवाह आहेत. त्यापैकी ४५ प्रवाहांच्या मुखांची पातळी समुद्राच्या सरासरी पातळीच्याही खाली आहे. साहजिकच या प्रवाहांमधून पाणी समुद्रात जायचं म्हटलं की, ओहोटी येण्याची वाट पाहावी लागते. ती येईपर्यंत पावसाचं पाणी तुंबूनच राहतं. यापैकी १३५ प्रवाहांच्या मुखांची पातळी भरती आणि ओहोटी यांच्या पातळीच्या मध्ये आहे. केवळ सहा प्रवाहांची मुखं भरतीच्या पातळीच्याही वर आहेत. हे सहा प्रवाह अपवाद. भरती असताना इतर प्रवाहांवाटे पाणी समुद्रात जाऊ शकत नाही.

हे एवढंच नाही. खाड्यांजवळची खारफुटी, नदीनाल्यांच्या परिसरातली दलदल यामुळंसुद्धा पुराचं पाणी शोषलं जातं. आता या जागाच उरल्या नाहीत. त्यामुळे नदीचं पाणी वाढलं की ते थेट रस्त्यावर येतं, घरांमध्ये शिरतं. कळस म्हणजेआताचे मिलन सबवे, अंधोरी, मालाड, मुलुंड, सांताक्रुझसारखे सबवे हे पूर्वी पाणी वाहून नेणारे नैसर्गिक प्रवाह होते. ते चक्क बुजवून रस्ता केल्यावर तिथं पाणी का साचणार नाही?…

खारफुटी महत्त्वाची... पण बरीचशी नष्ट झाली.

खारफुटी महत्त्वाची… पण बरीचशी नष्ट झाली.

याच्या पलीकडचं म्हणजेजमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण. मुंबईत जवळजवळ निम्मं पाणी मुरायचं. पण गेल्या २०२५ वर्षांत बरीचशी झाडी इतिहासजमा झाली. जमीन सिमेंट, डांबर, पेव्हर ब्लॉकनं झाकली गेली. आता अपवादानंच जमिनीचा तुकडा उघडा दिसतो. मोकळ्या जागा, मोकळी पटांगणे आता पाहायला मिळत नाहीतरिणाम काय? आता पावसाचं पाणी अजिबात मुरत नाही. सारं पाणी वाहतं. स्वाभाविकपणे पुराची तीव्रतासुद्धा वाढली.

त्यातच लोक वाढताहेत, वस्ती वाढतेय. नैसर्गिक व्यवस्थांवरची अतिक्रमणं वाढलीत. त्याच वेळी पावसाचं प्रमाण त्याची तीव्रता कायम आहे. किंबहुना त्यात थोडीशी वाढच झाली. मग पावसाचं पाणी सखल भागात साचणार. ते तरी कुठं जाणार?

हे बदलण्यासाठी पंपांची व्यवस्था करणं हवी. भरतीच्या वेळी साचून राहिलेलं पाणी ते काढू शकतील. गटारांची नव्यानं रचना करावी. तशा शिफारसी पूर्वीच करून ठेवल्यात. त्या झाल्या प्रत्यक्षात आल्या तर बरंच काही बदल होऊ शकतील. पुराची तीव्रता ५० ते ७० टक्क्यांनी कमी होईल. पण तरीही पाणी साचणारच. हे वास्तव लोकांना सांगायला वं.

नुसतंच मुंबई बुडाली असं ओरडत बसलो, तर निव्वळ अस्वस्थता वाढेल. शिवाय पुढच्या पावसात लोकांना आकर्षित करण्यासाठी तेच आणखी मोठ्यानं सांगावं लागेल!

– अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com