(महाराष्ट्रात उद्भवलेल्या गारपिटीच्या आपत्तीमुळं त्याबाबत लिहणं गरजेचं होतं. त्यामुळे या ब्लॉगवरील “कोयना भूकंप पुराण” या मालिकेत खंड पडला. आता या मालिकेचा पाचवा व शेवटचा भाग देत आहे… आधीचे भाग पाहायचे असतील तर याच ब्लॉगवर आधीच्या पोस्ट पाहाव्यात.)
कोयना धरणाजवळ भूकंप होतात, हे विधानच मुळातचूक आहे!! कारण गेल्या काही वर्षांत या भूकंपांचं केंद्र बदललं आहे. ते बाजूच्या वारणा धरणाकडं सरकलं आहे.. त्यामुळे आता भूकंप कोयनेचा म्हणायचा की वारणेचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे? कसा ते माहीत करून घ्यायचंय??
– अभिजित घोरपडे
कोयना धरणाजवळ होणारे भूकंप. हा महाराष्ट्रातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा किंवा चिंतेचा विषय. पण हे भूकंप खरंच कोयनेच्या परिसरात होतात का? की अन्य कुठे?.. गोंधळून जाऊ नका. असं म्हणण्यामागं तसं कारण आहे. अलीकडच्या काळात जास्तीत जास्त भूकंप कोयना धरणाजवळ झालेले नाहीत, तर शेजारी असलेल्या वारणा धरणाच्या परिसरात झाले आहेत. खुद्द आकडेवारी असं सांगते. त्यावरून काही तज्ज्ञ असं मानतात की, भूकंपांचं केंद्र कोयनेपासून वारणेकडं सरकला आहे.
कोयना आणि वारणा ही एकमेकांच्या शेजारची धरणं. दोन्ही कृष्णा नदीच्या खोऱ्यातली. कोयना नदीवर कोयना धरण, तर वारणेवर वारणा धरण. या दोन्ही नद्या कृष्णेला जाऊन मिळतात. कराडजवळ कोयना मिळते. पाठोपाठ सांगलीच्या खाली हरिपूर येथे वारणा नदी कृष्णेला मिळते. या दोन्ही धरणांमधलं अंतर भरेल सुमारे ३० किलोमीटर. ही दोन धरणं आणि त्यांच्या दरम्यानचा प्रदेश म्हणजे कोयना–वारणा पट्टा. या पट्ट्यातच तिथले बहुतांश भूकंप झाले आहेत. पण भूकंप झाला की तो कोयना धरणाजवळ झाला असे बोलले जाते. बहुतांश लोक तसंच मानतात. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. भूकंपाच्या आकडेवारीनेच ती दाखवून दिली.

अलीकडच्या काही वर्षांत कोयना धरणाच्या तुलनेत वारणा धरणाजवळ जास्त भूकंप झाले आहेत. पिवळे गोल ठिपके भूकंपाची ठिकाणे दर्शवतात..
(संदर्भ- “मरी” संस्था, नाशिक)
कोयना–वारणा पट्ट्यातील भूकंपांचं अलीकडेच विश्लेषण करण्यात आलं. त्यासाठी २००६ ते २०१२ या काळातील आकडेवारी घेतली. ती महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) या संस्थेकडं उपलब्ध होती. नाशिकची ही संस्था. या आकडेवारीमुळे हे रहस्य उलगडलं. त्यात असं आढळलं की यापैकी ७५ टक्के भूकंप वारणा धरणाच्या परिसरात झाले आहेत.
सध्या काय स्थिती आहे?.. त्यासाठी अगदी अलीकडे म्हणजे सप्टेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१३ या वर्षभरातील आकडेवारी तपासली. या काळात तिथं मुख्य नऊ भूकंप झाले. मुख्य म्हणजे रिश्टर मापनावर ३ पेक्षा जास्त तीव्रता असलेले. त्यातही हेच स्पष्ट झालं. नऊपैकी सात भूकंप वारणा जलाशयाच्या क्षेत्रात झाले आहेत. उरलेले दोन वारणा व कोयना या जलाशयांच्या मध्ये झाले आहेत. प्रत्यक्ष कोयना धरण किंवा जलाशयाजवळ एकही नाही.
यात आणखी एक गंमत आहे. ती म्हणजे पूर्वी कोयना धरणाच्या जवळचे क्षेत्र अधिक सक्रिय होते. आता वारणा अधिक सक्रिय झाले आहे… भूकंपाचे क्षेत्र स्थलांतरित व्हावे, अगदी त्याप्रमाणे!
स्वाभाविकपणे मनात पुढचा प्रश्न येतो– असं का? अजून तरी त्याचं उत्तर सापडलेलं नाही. भूगर्भातील हालचाली हा खरंच एक गूढ विषय. त्याच्याबद्दल बरंचसं माहीत झालं असलं तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने अजूनही माहीत नाही.. सध्या तरी का?? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
कोयना–वारणा पट्ट्यात गेल्या काही वर्षांपासून हाच कल कायम आहे. पुढं काय होतं ते काळ सांगेलच. पण सध्या तरी “कोयनेचे भूकंप” न म्हणता “वारणेचे भूकंप” म्हणणं जास्त योग्य ठरेल!
– अभिजित घोरपडे
Blog- www.abhijitghorpade.wordpress.com
Email id- abhighorpade@gmail.com