इतिहासात डोकावलं की अनेक कोडी सुटतात. कोयना आणि एकूणच महाराष्ट्रातील भूकंपांच्या बाबतीतही अगदी तसंच आहे. इथं पूर्वी भूकंप होत नव्हते, असं लोक मानतात. पण इतिहासातील नोंदी काही वेगळंच सांगतात. शिवाजी महाराजांच्या काळातही इथं भूकंप झाले होते.
माहितीए तुम्हाला??
– अभिजित घोरपडे
कोयनेत १९६७ साली भूकंप झाला. त्यात जिविताची आणि मालमत्तेची हानी झाली. त्या वेळी केंद्र सरकारने उच्च स्तरीय चौकशी समिती नेमली. या समितीने अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यापैकी सर्वांत रंजक म्हणजे आपल्या भागातील भूकंपाचा इतिहास. महाराष्ट्रात आणि आसपासच्या परिसरात पूर्वी भूकंप झाले आहेत का हे जुन्या नोंदींवरून शोधलं. अन् काय आश्चर्य… जुन्या काळातील भूकंपांची मालिकाच उलगडली. विशेष म्हणजे त्यात छत्रपती शिवराय हयात असतानाच्या, १६७८ सालच्या एका भूकंपाचीही नोंद सापडते.
मुंबई, वेंगुर्ले, रेवदंडा, नाशिक, पैठण, पंढरपूर, वाई, कराड, पुणे, लोहगड, कोल्हापूर अशा कितीतरी ठिकाणी भूकंप झाल्याच्या नोंदी सापडल्या. त्यांची यादीच या समितीच्या अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे. ही यादी बरंच काही सांगते. त्याचबरोबर आताचं सारं काही बदललंय, हे आपल्याला वाटणारं दु:खही हलकं करते.
वाचा तर मग कुठं कुठं भूकंप झालेत ते…
१. वर्ष १५९४ : माहीम–वसई परिसर (उत्तर कोकण)
आषाढ महिन्यात ‘न्यू मून‘ दिवसाच्या आदल्या मध्यरात्री व पुढच्या दिवशी भूकंप झाला.
२. वर्ष १६१८ : मुंबई
चक्रिवादळासोबतच भूकंपाचे धक्के जाणवले. या आपत्तीत २,००० लोकांचा मृत्यू झाला, तर ६० जहाजं बेपत्ता झाली.
३. वर्ष १६७८ : वसई (Bassien) व जवळच अगाशी हा परिसर
माघ महिन्यात सलग पाच दिवस भूकंपाचे धक्के जाणवले.
(या भूकंपाच्या वेळी शिवाजी महाराज हयात होते.)

कोयनेतील भूकंपानंतर स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने जुन्या काळातील भूकंपांच्या नोंदी संकलित केल्या आहेत..
४. वर्ष १७०२ : उत्तर कोकणात भूकंप
५. १७५१ (९ डिसेंबर) : वसई आणि सालसेट (salsette) परिसरात भूकंप
६. १७५२ (५ फेब्रुवारी) : लोहगड ते अरबी समुद्र दरम्यान भूकंप
या भूकंपांसोबत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. तारीख होती, ५ फेब्रुवारी.
७. १७५७ (३१ ऑक्टोबर) : टोके व धोम परिसरत भूकंप
८. १७६४ (ऑगस्ट महिना) : मोठ्या प्रदेशावर भूकंपाचे हादरे
या क्षेत्राच्या सीमा दूरपर्यंत होत्या. नाशिक, पैठण, पंढरपूर, मुक्केरी, धोम, वाई, कराड येथे हा भूकंप जाणवला. कृष्णा नदीच्या पात्राबरोबरच पिंपळगाव, राहुरी येथेही हादरे जाणवले.
९. १७९२ (२९ मे) : रेवदंडा
घरे, देवळे व इतर वास्तू पायासकट हादरल्या.
१०. १८१२ (२३ फेब्रुवारी) : पुण्यात भूकंपाचे हादरे
११. १८२६ (२० मार्च) : कोकणप्रांतात भूकंप, जास्त तीव्रता मोरावडे
१२. १८२८ (२२ ऑगस्ट) : वेंगुर्ले व मलबार किनाऱ्यावर भूकंप
वेंगुर्ले येथे अनेक बंगले भयंकररीत्या हदरले. हा हादरा पंधरा सेकंदांपर्यंत काम राहिला. त्याच्यासोबत मोठा गडगडाटी आवाज झाला.
१३. १८३२ (४ ऑक्टोबर) : अगाटे (Agate) येथे भूकंप
कॉटवर झोपलेले लोक खाली फेकलो गोलो. पृथ्वीच्या पोटातून गडगडाट ऐकू आला.
१४. वर्ष १९५१ : जयगड (रत्नागिरीपासून ४० किलोमीटर)
येथे भूकंपाचे दोन हादरे जाणले.
१५. वर्ष १९६२ (सप्टेंबर) : रत्नागिरी
मध्यम स्वरूपाचा भूकंप रत्नागिरीच्या ६० किलोमीटीर परिसरत जाणवला.
(पुढे १९६३ साली कोयना धरणाची निर्मिती झाली… पुढच्या काळतही भूकंपाचे हादरे सुरूच राहिले. आता यांच्या नोंदी व्यवस्थित घेतल्या जाऊ लागल्या.)

कोयना धरणाच्या परिसरात १९६७ साली भूकंप झाल्यानंतर धरणाचे बळकटीकरण करण्यात आले. त्याआधी धरण असे दिसायचे…
१६. १९६५ ते सप्टेंबर १९६७ : मुंबई, रेवदंडा, रत्नागिरी, एकूण कोकण किनारा
पाच प्रमुख भूकंप जाणवले. त्यपैकी दोघांचे केंद्र मुंबईजवळ, दोघांचे रेवदंड्याजवळ, तर एकाचे दक्षिणेला होते.
जून १९६५ मध्ये रत्नागिरीतही दोन भूकंप जणवले.
१७. १९६७ (१३ सप्टेंबर) :कोयना धरणाजवळ भूकंप
रिश्टर मापनावर ५ ते ५.५ इतकी नोंद. त्याच्यामुळे कोयनानगर येथील इमारतींची कमी ते मध्यम प्रमाणात हानी.
१८. १९६७ (११ डिसेंबर) : कोयनानगर
रिश्टर मापनावर ६.५ इतकी नोंद. भूकंपाचे केंद्र कोयना धरणाच्या खालच्या बाजूला.
…भूकंपांचा हा इतिहास पाहिला की एक गोष्ट बरी वाटते. ती म्हणजे, अलीकडच्या कोयना भूकंपांचं फारसं दडपण येत नाही. म्हणूनच मागं वळून जरा इतिहासही पाहायचा…
पण एक लक्षात असू द्या, इतिहास ही अशी गोष्ट आहे की ती कधी दडपण दूर करते, तर कधी ते वाढवतेसुद्धा!
(पण मित्रांनो, सर्वांत रंजक बाब तर पुढंच आहे.. १९६७ साली कोयना धरणाजवळ सर्वांत मोठा भूकंप झाला, पण आता भूकंपाचा केंद्रबिंदू सरकला आहे. तो कोयना धरणाऐवजी वारणा धरणाजवळ सरकला आहे… इतका की आता “भूकंप कोयनेचा नव्हे तर वारणेचा” असंच म्हणायची वेळ आली आहे !
थोडीशी प्रतिक्षा करा… आणि इथंच वाचा,
“कोयना भूकंप पुराण ५” )
– अभिजित घोरपडे