आड ही एक संस्कृती होती.. पण गावात नळ आले अन् ते आडांच्या मुळावर उठले, आड हळूहळू नष्ट होत गेले. काळ बदलताना गोष्टी बदलणारच. आडही सर्वकाळ टिकून राहणार नाहीत, हे खरंच. पण आडाच्या संडासाच्या टाक्या व्हाव्यात.. भूजलही कायमचं प्रदूषित व्हावं, हे अतिच झालं… हो ना?
– अभिजित घोरपडे
“खरं सांगू? आता काळ बदललाय हे मान्य, पण चांगलं होतं ते नष्ट झाल्याचं दु:ख आहे…” आटपाडीच्या आडांबद्दल जुन्या पिढीकडून हा सूर ऐकायला मिळतो. जुनी पिढी म्हणजे फार जुनी नाही. सध्या चाळीशीत–पन्नाशीत असणारे आणि त्यांच्या आधीचे सर्वजण. या पिढ्यांनी या आडांचा वापर केला आहे, ते अनुभवले आहेत.
या लोकांकडून आटपाडीच्या आडांबद्दल अनेक आठवणी ऐकायला मिळतात. ऐकताना समजतं– तिथं आड ही एक संस्कृती होती. त्याच्याभोवती अनेक गोष्टी फिरत होत्या. लांबचं कशाला? अनेकांचा दिवसच सुरू व्हायचा, आडांवरच्या रहाटाच्या, भांड्यांच्या आवाजाने. श्री. केशव देशपांडे यांचा वाडा आणि आडही सुमारे १५०–२०० वर्षे जुना. त्यांनी बऱ्याच आठवणी सांगितल्या. हे सांगताना काहीतरी गमावल्याबाबत अस्वस्थता बोलण्यात होती.
“लहानपणी सकाळी आडांवरच्या रहाटाचा आवाज यायचा– धाड, धाड, धाड, धाड… याच आवाजाने जाग यायची. प्रत्येक घरात आडातून पाणी काढण्याची वेगळी पद्धत होती. पाणी काढताना आत कळशा, बादल्या पडायच्या. त्या बाहेर काढणारे लोक पूर्वी होते. काही जण गळ टाकून भांडी काढायचे. काही जण आत उतरायचे. आता ते उरले नाहीत..” इति श्री. देशपांडे.
“आई–वडिल माझ्या लग्नाआधीच वारले. त्यामुळे मी घरात एकटाच.घरात पाण्यासाठी भांडी वापरायचो नाही. त्यांची गरजच नव्हती. फक्त तांब्या वापरायचो, कळशीचीसुद्धा गरज नव्हती. कारण पाहिजे तांब्या आडात बुडवायचा आणि पाणी काढायचं…” आठवणी सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता.
देशपांडे यांच्या पत्नी अरुणा. त्यासुद्धा शिक्षिका. त्यांच्याही आठवणी आहेत. अर्थातच लग्नानंतरच्या, १९८० नंतरच्या. त्यांचं माहेर कुरुंदवाड. म्हणजे कृष्णेच्या काठी. गावाशेजारून कृष्णा वाहते. तिथं आडाची काय गरज? त्या आटपाडीत आल्यावर आडाचं पाणी काढायला शिकल्या.
“त्या काळी आड हाच पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत.पाणी गोडं होतं. तेव्हा घरात पाणी भरणं हा प्रकार नव्हता. गरज पडली की आडात बादली सोडायची आणि पाणी काढायचं. ५–६ फुटांवर पाणी. उन्हाळ्यात फार तर १५ फुटांपर्यंत. पाण्याची पातळी त्याच्या खाली जायचीच नाही…” पाण्यासाठी आडाभोवती फिरणारं हे जग. पुढं सारं बदलूनच गेलं.
गावात नळ येता..
आटपाडीत १९८५ च्या पुढं–मागं सार्वजनिक नळ आले. त्यानंतर दोनेक वर्षांत ते घरातही पोहोचले. सुरुवातीला आड व नळ दोन्हीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात होतं.
“नळाला सकाळी तासभर पाणी यायचं. नळांनी बस्तान बसवलं, तसे हळूहळू आड बाजूला पडू लागले. नळाचं पाणी पुरलं नाही तर “पर्यायी स्रोत” म्हणून त्यांचा वापर होऊ लागला. याशिवाय झाडांना घालण्यासाठी, पाहुणे आल्यावर किंवा बांधकामासाठी आडाचं पाणी वापरात होतं.पुढं नळांचीच मक्तेदारी निर्माण झाली. आड कधी मागं पडले समजलंच नाही…” देशपांडे पती–पत्नी आणि एकूणच त्यांच्या पिढीने पाहिलेला हा बदल.
नळ आणि आड यांचा एकमेकांशी व्यस्त संबंध होता. “नळांमुळे पिण्याच्या पाण्यातून आड बाद होत गेले. त्यांच्या पाण्याचा उपसा कमी झाला. परिणामी पाण्याची चव बिघडली. ते पिण्यासाठी वापरणं बंद झालं. मग आडांचं करायचं तरी काय?”
आड बुजवण्याची सुरुवात…
आड का बुजले आणि त्यांच्या संडासाच्या टाक्या का झाल्या..? या प्रवासातला महत्त्वाचा मुद्दा इथं होता.
देशपांडे सांगतात, “गावात नळाचं पाणी आलं. पाठोपाठ ४–५ वर्षांत आड बुजवणं सुरू झालं. त्याला वेग आला १९९५ सालानंतर. त्याचा थेट संबंध आहे, वाड्यांमध्ये आलेल्या संडासांशी. १९९५ च्या आधीसुद्धा आटपाडीत वाड्यांमध्ये संडास होते. पण फक्त ५–७ टक्के वाड्यांमध्येच.आता हे प्रमाण १०० टक्क्यांवर पोहोचलंय. याच काळात आड झाकले गेले. त्यांच्या संडासाच्या टाक्या झाल्या.”
आधीच्या पिढीचा विरोध…
आड बुजवण्याला आधीच्या पिढीने विरोध केला.. पण घराची सूत्रं त्यांच्या हाती नव्हती. मग त्यांच्या विरोधाला कोण जुमानणार? भारत दिघोळे यांनी सांगितलं, “आम्ही आडाला संडासाच्या टाकी करायचं ठरवलं, तेव्हा आईने विरोध केला. पण घरात टाकीसाठी जागाच नव्हती. मग काय करणार? एका वर्षी प्रचंड पावसामुळे ओढ्याला पूर आला होता. तेव्हा शौचासाठी बाहेर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे निर्णय घेतला. १९९८ साली घरात संडास बांधला, आडाचा उपयोग संडासाची टाकी म्हणून केला.”
हेच सतीश भिंगे यांच्याही घरी झालं. त्यांच्या आजीने त्याला विरोध केला होता.. पण संडास आले आणि आडाची टाकी बनली.
या सर्व आठवणींमध्ये आवर्जून ऐकायला मिळालेली गोष्ट म्हणजे– दुष्काळातही आडांना पाणी असायचं. देशपांडे यांच्या वाड्यातील आडाबद्दल आठवण बोलकी आहे. “२०१० सालाच्या आधी आडाचं पाणी कधीच आटलं नाही. अगदी २००२–०३ सालच्या भीषण दुष्काळातही आडाला पाणी होतं..” देशपांडे म्हणाले, “माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच २०१२ सालच्या एप्रिल महिन्यात आड पहिल्यांदाच आटला. कारण आधीची दोन–तीन वर्षं या भागात पुरेसा पाऊस झाला नाही. अनिर्बंध पाणीउपशामुळे भूजलाची व्यवस्थाच नष्ट झालीय.”
देशपांडे वाड्यातील आड अजून तरी टिकून आहे. बदलांच्या धक्क्यांमध्ये तो किती काळ टिकून राहील, हा प्रश्नच आहे.. काळ बदलताना गोष्टी बदलणारच. त्यामुळे आड सर्वकाळ टिकून राहणार नाहीत, हेही समजतं (पचलं नाही तरीसुद्धा!) पण आडाच्या संडासाच्या टाक्या व्हाव्यात.. भूजलही कायमचं प्रदूषित व्हावं, हे जरा अतिच झालं… हो ना?
(ता.क.- २०१३ सालच्या गणपतीत मोठा पाऊस झाला. त्यामुळे देशपांडे यांच्या आडात पुन्हा पाणी आलं.. जवळजवळ दीड वर्षांनी !)
– अभिजित घोरपडे
Blog- http://www.abhijitghorpade.wordpress.com
Email- abhighorpade@gmail.com