आपण हातचं सोडून पळत्याच्या मागं धावत सुटतो. काही काळानंतर समजतं– हवं ते मिळालंच नाही.. आपली नुसतीच धावाधाव! आटपाडीच्या आडांबद्दल अगदी असंच झालं. लोकांनी हक्काचं पाणी सोडलं आणि इतर कोणाच्या तरी आशेवर जगायला लागले.
– अभिजित घोरपडे
आटपाडीचे आड कालबाह्य झालेत का?
यावर एखादा म्हणेल– काय हा प्रश्न! कुठल्या काळात वावरता.. या काळात कसले आड घेऊन बसलात?
काळ बदललाय, हे खरंच.. तरीसुद्धा हा प्रश्न विचारण्याला कारणही तसंच आहे. आता हे आड बुजवले गेलेत किंवा त्यांच्या संडासाच्या टाक्या केल्यात.. पण ते व्यवस्थित राखले असते तर आज उपयोगी ठरले असते का?.. साधा सरळ प्रश्न. त्याच्या उत्तरात सारं काही दडलंय. आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी फार मागं जाण्याची गरज नाही. लांबचं कशाला? अगदी दोनच वर्षांपूर्वी लोकांना आडांची आठवण झाली, २०१२ सालच्या दुष्काळात. ‘आज आड असले तर..?’ अशा शब्दांत लोकांनी हळहळ व्यक्त केली. दुष्काळ पडल्यावर आडांची आठवण आली ना..? त्यातच सारं आलं.
गंमत कशी आहे पाहा.. आपण हातचं सोडून देतो आणि पळत्याच्या मागं धावत सुटतो. इतकं धावावं लागतं की दमायला होतं. काही काळानंतर हवं ते मिळत नाही.. आपली नुसतीच धावाधाव! आटपाडीच्या आडांबद्दल अगदी असंच झालं. लोकांनी हक्काचं पाणी सोडलं आणि इतर कोणाच्या तरी आशेवर जगायला लागले. आड म्हणजे हक्काचं पाणी, अगदी हक्काचं. कुणाकडं हात पसरण्याची गरज नाही, कुणाच्या तोंडाकडं आशाळभूत नजरेनं पाहण्याचीही गरज नाही.. तरीही ते आड हरवून बसले, इतरांवर अवलंबून झाले.. संपूर्ण परावलंबी. आता यंत्रणांनी सोडलं तर पाणी मिळतं, नाही सोडलं तर नाही.
हाच फरक होता– घरातले आड आणि नव्याने आलेल्या नळांमध्ये. आड हा हक्काचा जलस्रोत. आटपाडीत तर आड वाड्यातच होते. पाण्यासाठी लांब जायचीही आवश्यकता नव्हती.. नळांचं वेगळं होतं. त्यांच्यामुळं लांबून पाणी आलं, पण त्यावर नियंत्रण दुसऱ्याचं. त्याचेच तोटे आटपाडीत हळूहळू दिसायला लागले. नळाची चैन काही दिवस चालली. पण पुढं पाणी कमी पडायला लागलं. मूळ स्रोत किती मोठा किंवा भरवशाचा, त्यावर पाण्याचं प्रमाण ठरणार. सुरुवातीला दररोज पाणी यायचं. काही दिवसांनी एक दिवसाड झालं. पुढं चार दिवसांनी येऊ लागलं. मग आठवड्यातून एकदा. २०१२ च्या दुष्काळात तर काही भागांना पंधरा दिवसांतून एकदाच पाणी मिळत होतं.. या दुष्काळात लोकांशी गप्पा मारल्या. तेव्हा अनेकांना आडांची आठवण आली. अनेकांनी चूक झाल्याची कबुली दिली. तोंडात परवलीचं वाक्य असायचं, “खरंच, आज आड असते तर..?”
आड टिकवणं आपल्याच हाती होतं. ते टिकवायचे आणि त्यांचा उपयोग करून घ्यायचा. घरातल्या घरात आणि हवं तितकं पाणी.. २०१२ च्या दुष्काळापर्यंत आटपाडीचे आड कधी आटलेच नाहीत. ते आटूच शकत नाहीत.. ही इथली धारणा होती. पण दुर्लक्ष झाल्यामुळं काय होऊ शकतं, हे त्यांनीच दाखवून दिलं. इतका भरवशाचा स्रोत कालबाह्य कसा म्हणता येईल? आपण ते वापरण्यास पात्र नाही, हेच यातून स्पष्ट होतं.. बस्स इतकंच!
लोकांना दुष्काळात आडांची आठवण झाली, पण त्याला खूप उशीर झाला होता, झाला आहे. आडांमधून पाणी मिळणार ते भूजल. त्याची काय अवस्था आहे आज? त्याची पातळी कुठच्या कुठं खोल गेलीय. त्याचबरोबर त्याचा दर्जा राहिलाय का? या दोन्ही बाबतीत भूजलाची स्थिती बरी नाही. पातळी तर खोलवर गेलीच. ते इतकं प्रदूषित झालंय की पिण्यासाठी तर सोडाच, पण त्याचा उपयोग इतर वापरासाठी तरी होईल का, हेही सांगता येणार नाही. कारण आपणच आडांच्या संडासाच्या टाक्या केल्या, त्यांना नासवून टाकलं. त्यांचा वापरच नाही, मग त्यांना पाणी उरलंय का याच्याशी काय देणं–घेणं?
म्हणूनच आता आडांना पाणी नाही. ज्यांना आहे ते बरं नाही.. पण याचा अर्थ आड कालबाह्य झालेत, असा नाही. पाण्याबद्दलची आपली जाण, पाणी वापरण्याची परंपरागत कौशल्यं.. हे सारं आपण कालबाह्य करून ठेवलंय.
असं म्हणता येईल हवं तर!
– अभिजित घोरपडे
Blog- http://www.abhijitghorpade.wordpress.com
Email- abhighorpade@gmail.com