पिक्चर अभी बाकी है.. (कोयना भूकंप पुराण २)

कोयना धरणाजवळ ड्रिल खणताना आपण काळ्या खडकाचा तळ कधी गाठला ते कळलंच नाही. जे घडलं ते केवळ काही शे वर्षांत पहिल्यांदा घडत नव्हतं, हजार वर्षांतलं नव्हतं, काही लाख वर्षांतलं नव्हतं.. तर तब्बल साडेपाच ते साडेसहा कोटी वर्षांत पहिल्यांदा घडलं होतं. पण तिथं जे होणार आहे, ते भयंकर रोमांचक आहे… “यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है !”

कोयना धरणाच्या परिसरात घेतले जाणारे ड्रिल..

कोयना धरणाच्या परिसरात घेतले जाणारे ड्रिल..

– अभिजित घोर- अभिजित घोरपडे

..अखेर गुपित उलगडलं. आपण ज्याच्यावर राहतो, त्या काळ्या पाषाणाच्या (बेसॉल्ट) तळाशी काय दडलंय हे माहीत झालं. हे माहीत झालंच, त्याच्याबरोबर आणखीही माहिती मिळाली… “एकावर एक फ्रीमिळावी तशी.

हे शक्य झालं कोयना धरणाच्या परिसरातील भूकंपांच्या अभ्यासामुळं. कोयनेच्या परिसरात भूकंप का होतात, हे मूळ कोडं. ते उलगडण्यासाठी हैदराबादच्या एनजीआरआय संस्थेने प्रकल्प आखला. त्यासाठी दीड किलोमीटर खोलीचे ड्रिल खणले, दहा ठिकाणी. भविष्यात तिथं भूकंपाचा अभ्यास करणारी उपकरणं बसतील. पण ही ड्रिल खणताना आपण काळ्या खडकाचा तळ कधी गाठला हे कळलंच नाही. जेव्हा कळालं, तेव्हा एक ऐतिहासिक घटना घडली होती. ऐतिहासिक कसली? खरं तर अति अति अति ऐतिहासिक. कारण जे घडलं ते केवळ काही शे वर्षांत पहिल्यांदा घडत नव्हतं, हजार वर्षांतलं नव्हतं, काही लाख वर्षांतलं नव्हतंतर तब्बल साडेपाच ते साडेसहा कोटी वर्षांत पहिल्यांदा घडलं होतं.

आपल्या खडकाच्या खाली त्याचाच भाऊबंद असलेला ग्रॅनाईट आहे. भाऊबंद अशासाठी म्हणायचं की हे दोन्ही खडक लाव्हारसापासून तयार झाले आहेत. आपला खडक गडद रंगाचा, तर ग्रॅनाईट काहीसा फिक्या रंगाचा. याशिवाय नाइसेसखडकही मिळाले. ते रूपांतरित प्रकार. म्हणजे पृथ्वीच्या पोटात उष्णता व दाब यांच्यामुळे तयार होणारे.

कोयना परिसरातील ड्रिलमधून बाहेर आलेल्या खडकांचे नमुने..

कोयना परिसरातील ड्रिलमधून बाहेर आलेल्या खडकांचे नमुने..

हे गुपित उलगडणं इतकं महत्त्वाचं का?? तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्याच भूशास्त्राची नव्याने ओळख झाली.

प्रमुख गोष्टी दोन.

. एकतर आपल्या खडकाची जाडी. याबाबत आतापर्यंतचे समज वेगळे होते. त्याची जाडी समजली जात होतीसाधारणत: तीन किलोमीटर. ती प्रत्यक्षात निघाली फक्त ९०० मीटर. कुठं शेदोनशे मीटरने कमीजास्त, खडकाची कुठं कशी झीज झाली त्याप्रमाणे. पण ती तीन किलोमीटर इतकी नक्कीच नाही.

ढोबळमानाने सांगायचं तर आपला खडक समुद्रसपाटीच्या खाली तीनशे मीटरपर्यंत आहे, त्याच्या खाली दुसरे खडक आहेत.. त्यामुळे कित्येक वर्षांची समजूत निकालात निघाली, आम्हाला खरीखुरी माहिती मिळाली.

. दुसऱ्या बाबतीत, म्हटलं तर निराशा झाली. आपल्या खडकाखाली काय असेल, याबाबत अनेक तर्क होते. गाळाचे खडक असतील का? त्यात खनिज तेल मिळेल का? अशीसुद्धा एक शक्यता व्यक्त केली जायची. पण खाली ग्रॅनाईट व नाईसेस मिळाल्यामुळे आता ती शक्यता कायमची मावळली. निदान कोयनेच्या प्रयोगाने तरी हेच सांगितलंय.

हे फायदेतोटे आहेतच, पण सर्वांत “एक्साइटिंग” गोष्ट म्हणजे आपण आपल्या खडकाचा तळ गाठला. पण हे इथंच संपत नाही. कारण हा कोयनेच्या भूकंपअभ्यासाचा पहिला टप्पा आहे. “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…” पुढच्या टप्प्यात कोयनेच्या परिसरात तब्बल सात किलोमीटर खोलीचे ड्रिल घेतले जाणार आहेखल्लास!!

कोयना धरणाच्या परिसरात दीड किलोमीटर खोलीची ड्रिल घेतली जात आहेत...

कोयना धरणाच्या परिसरात दीड किलोमीटर खोलीची ड्रिल घेतली जात आहेत…

आणि गंमत माहितीए? हे ड्रिल कुठं घ्यायचं हे ठरवण्यासाठीच आता दीड किलोमीटरची ड्रिल्स घेतली गेली. तिथे भूकंपमापक यंत्रणा बसवली की ठरेलसात किलोमीटर खोलीचं ड्रिल नेमकं कुठं घ्यायचं.

विचार करा.. दीड किलोमीटच्या “ड्रिल्स”नी इतकी माहिती दिली. मग सात किलोमीटर खोलीपर्यंत गेल्यावर काय काय आढळेल?

अहो, ही कल्पनाच रोमांचित करणारी आहे !

अभिजित घोरपडे

(पण मित्रांनो, मूळ प्रश्न उरतोच कीधरणाचा आणि भूकंपाचा संबंध खरंच असतो का..?

काय? माहीत नाही…?

अजून दोनच दिवस वाट पाहा आणि इथंच वाचा

कोयना भूकंप पुराण ३“)

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com