आज आड असते तर ..? (आटपाडीचे शापित आड- ३)

आपण हातचं सोडून पळत्याच्या मागं धावत सुटतो. काही काळानंतर समजतंहवं ते मिळालंच नाही.. आपली नुसतीच धावाधाव! आटपाडीच्या आडांबद्दल अगदी असंच झालं. लोकांनी हक्काचं पाणी सोडलं आणि इतर कोणाच्या तरी आशेवर जगायला लागले.

अभिजित घोरपडे

आड कालबाह्य झालेत की आपणच ते घालवलेत..?

आड कालबाह्य झालेत की आपणच ते घालवलेत..?

आटपाडीचे आड कालबाह्य झालेत का?

यावर एखादा म्हणेलकाय हा प्रश्न! कुठल्या काळात वावरता.. या काळात कसले आड घेऊन बसलात?

काळ बदललाय, हे खरंच.. तरीसुद्धा हा प्रश्न विचारण्याला कारणही तसंच आहे. आता हे आड बुजवले गेलेत किंवा त्यांच्या संडासाच्या टाक्या केल्यात.. पण ते व्यवस्थित राखले असते तर आज उपयोगी ठरले असते का?.. साधा सरळ प्रश्न. त्याच्या उत्तरात सारं काही दडलं. आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी फार मागं जाण्याची गरज नाही. लांबचं कशाला? अगदी दोनच वर्षांपूर्वी लोकांना आडांची आठवण झाली, २०१२ सालच्या दुष्काळात. ‘आज आड असले तर..?’ अशा शब्दांत लोकांनी हळहळ व्यक्त केली. दुष्काळ पडल्यावर आडांची आठवण आली ना..? त्यातच सारं आलं.

२०१२ च्या भीषण दुष्काळात लोकांना आडांची आठवण झाली..

२०१२ च्या भीषण दुष्काळात लोकांना आडांची आठवण झाली..

गंमत कशी आहे पाहा.. आपण हातचं सोडून देतो आणि पळत्याच्या मागं धावत सुटतो. इतकं धावावं लागतं की दमायला होतं. काही काळानंतर हवं ते मिळत नाही.. आपली नुसतीच धावाधाव! आटपाडीच्या आडांबद्दल अगदी असंच झालं. लोकांनी हक्काचं पाणी सोडलं आणि इतर कोणाच्या तरी आशेवर जगायला लागले. आड म्हणजे हक्काचं पाणी, अगदी हक्काचं. कुणाकडं हात पसरण्याची गरज नाही, कुणाच्या तोंडाकडं आशाळभूत नजरेनं पाहण्याचीही गरज नाही.. तरीही ते आड हरवून बसले, इतरांवर अवलंबून झाले.. संपूर्ण परावलंबी. आता यंत्रणांनी सोडलं तर पाणी मिळतं, नाही सोडलं तर नाही.

हाच फरक होताघरातले आड आणि नव्याने आलेल्या नळांमध्ये. आड हा हक्काचा जलस्रोत. आटपाडीत तर आड वाड्यातच होते. पाण्यासाठी लांब जायचीही आवश्यकता नव्हती.. ळांचं वेगळं होतं. त्यांच्यामुळं लांबून पाणी आलं, पण त्यावर नियंत्रण दुसऱ्याचं. त्याचेच तोटे आटपाडीत हळूहळू दिसायला लागले. नळाची चैन काही दिवस चालली. पण पुढं पाणी कमी पडायला लागलं. मूळ स्रोत किती मोठा किंवा भरवशाचा, त्यावर पाण्याचं प्रमाण ठरणार. सुरुवातीला दररोज पाणी यायचं. काही दिवसांनी एक दिवसाड झालं. पुढं चार दिवसांनी येऊ लागलं. मग आठवड्यातून एकदा. २०१२ च्या दुष्काळात तर काही भागांना पंधरा दिवसांतून एकदाच पाणी मिळत होतं.. या दुष्काळात लोकांशी गप्पा मारल्या. तेव्हा अनेकांना आडांची आठवण आली. अनेकांनी चूक झाल्याची कबुली दिली. तोंडात परवलीचं वाक्य असायचं, “खरंच, आज आड असते तर..?”

आड टिकवणं आपल्याच हाती होतं. ते टिकवायचे आणि त्यांचा उपयोग करून घ्यायचा. घरातल्या घरात आणि हवं तितकं पाणी.. २०१२ च्या दुष्काळापर्यंत आटपाडीचे आड कधी आटलेच नाहीत. ते आटूच शकत नाहीत.. ही इथली धारणा होती. पण दुर्लक्ष झाल्यामुळं का होऊ शकतं, हे त्यांनीच दाखवून दिलं. इतका भरवशाचा स्रोत कालबाह्य कसा म्हणता येईल? आपण ते वापरण्यास पात्र नाही, हेच यातून स्पष्ट होतं.. बस्स इतकंच!

दुष्काळाने बरंच शिकवलं, बरंच काही करायला लावलं..

दुष्काळाने बरंच शिकवलं, बरंच काही करायला लावलं..

लोकांना दुष्काळात आडांची आठवण झाली, पण त्याला खूप उशीर झाला होता, झाला आहे. आडांमधून पाणी मिळणार ते भूजल. त्याची काय अवस्था आहे आज? त्याची पातळी कुठच्या कुठं खोल गेलीय. त्याचबरोबर त्याचा दर्जा राहिलाय का? या दोन्ही बाबतीत भूजलाची स्थिती बरी नाही. पातळी तर खोलवर गेलीच. ते इतकं प्रदूषित झालंय की पिण्यासाठी तर सोडाच, पण त्याचा उपयोग इतर वापरासाठी तरी होईल का, हेही सांगता येणार नाही. कारण आपणच आडांच्या संडासाच्या टाक्या केल्या, त्यांना नासवून टाकलं. त्यांचा वापरच नाही, मग त्यांना पाणी उरलंय का याच्याशी काय देणंघेणं?

म्हणून आता आडांना पाणी नाही. ज्यांना आहे ते बरं नाही.. पण याचा अर्थ आड कालबाह्य झालेत, सा नाही. पाण्याबद्दलची आपली जाण, पाणी वापरण्याची परंपरागत कौशल्यं.. हे सारं आपण कालबाह्य करून ठेवलंय.

असं म्हणता येईल हवं तर!

अभिजित घोरपडे

Blog- http://www.abhijitghorpade.wordpress.com

Email- abhighorpade@gmail.com

आटपाडीचे शापित आड; भाग १

पाणी पवित्र आहे, असं मानणारा आपला समाज! घरातल्या पाण्याच्या तांब्याला, रांजणाही पाय लावायचो नाही आपण. आता काय बिघडलं माहीत नाही. पिण्याचे पाणी पुरवणारे आडही आपण सोडले नाहीत. त्यांच्या चक्क संडासाच्या टाक्या करून टाकल्या.. नेमके काय बदल झालेत? समजून घेण्यासाठी आटपाडीचे शापित आडही मालिका

– अभिजित घोरपडे

(भाग १ : आड ते शौचकूपएक प्रवास!)

आटपाडीच्या देशपांडे वाड्यातील आड, सोबत सौ. देशपांडे.

आटपाडीच्या देशपांडे वाड्यातील आड, सोबत सौ. देशपांडे.

सूर्य मावळला होता. हळूहळू अंधार वाढत होता. मला पुण्याकडं निघायची घाई होती. पण गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे उठावंसंही वाटत नव्हतं.

देशपांडे सांगत होते, “आपण ज्याचं पाणी प्यायलो, पूर्वजही पाणी प्यायले, ज्याचं पाणी देवालाही दिलं. त्याचा असा वापर मला तरी मान्य नाही!

देशपांडेकेशव लक्ष्मण देशपांडे. निवृत्त मुख्याध्यापक.

मुक्कामदेशपांडे वाडा, आटपाडी, जिल्हासांगली.

६४ वर्षांचे गृहस्थ. डोळ्यावर चष्मा. उंच, शिडशिडीत शरीरयष्टी!

त्यांच्याच घरी बसलो होतो. त्यांच्या वाड्यात जुना आड होता. देशपांडे त्या आडाबद्दल बोलत होते. मी शांतपणे ऐकत होतो. ऐकताना बरं वाटलं. मनात म्हटलं, एकतरी माणूस भेटला आडाचं मोल जाणणारा, त्याची किंमत करणारा!

श्री. केशव देशपांडे, आटपाडी

श्री. केशव देशपांडे, आटपाडी

आटपाडीत प्रत्येक वाड्यात आड होता. आता चुकूनच एखादा दिसतो. आता जास्तीत जास्त आडांचा वापर शौचकूप म्हणून केला जातोय. शौचकूप म्हणजे मैला साठवण्याची टाकी, संडासाची टाकी ! माझ्यासाठी ही बाब धक्कादायक होती. देशपांडे यांच्यासाठी नवी नव्हती, पण ती त्यांना मान्य नव्हती. म्हणूनच ते उद्वेगाने बोलत होते.

सांगली जिल्ह्यात अतिशय कमी पावसाचा तालुका म्हणजे आटपाडी. तिथल्या आडांबद्दल ऐकलं होतं. त्यांची कहाणी मी अनेकांपर्यंत पोहोचवली होती, कधी लेखांमधून तर कधी व्याख्यानांमधून. एप्रिल २०१२ मध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. आटपाडीसुद्धा गेलो होतो. तेव्हा आडांबद्दल ऐकायला मिळालं. पण ते प्रत्यक्ष पाहता आले नव्हते. त्यामुळे काहीसा अस्वस्थ होतो. गेल्या वर्षी (जुलै २०१३)दुष्काळी दौऱ्यावर म्हसवडपर्यंत गेलो होतो. उशीर झाला तरी पुढं आटपाडीला गेलो. कारण माझ्या डोळ्यांनी तिथले आड पाहायचे होते. रात्री पावणेसातसातच्या सुमारास आटपाडीला पोहोचलो. सोबत होते– जवळच्या बिदाल गावचे अप्पा देशमुख आणि आटपाडीचे सतीश भिंगे. आहे तेवढ्या उजेडाचा फायदा घेत आड पाहायला लागलो.

आटपाडी बरंच जुनं गावगावठाणात वाडे होते. प्रत्येक वाड्यातली पाण्याची व्यवस्था म्हणजे आड. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठे आड किंवा विहिरी फारशा नव्हत्या.

हे आड पाहण्यापूर्वी माझी वेगळी कल्पना होती. वाटलं, तिथं चारदोन आडांच्या संडासच्या टाक्या झाल्या असतील. पाहिलं तर वाड्यावाड्यात हा बदल झाला होता. ते पाहून चाटच पडलो. आम्ही आड शोधत वाड्यांमध्ये फिरत होतोभिंगे वाडा, दिघोळे वाडा, कुरेशी वाडाकुठेच वाड्यांमधले आड वापरात नव्हते. बहुतांश आडांचे शौचकूप झाले होते. काहींनी ते बुजवून टाकले होते.

आड झाकून शौच्यालये उभी राहिली अन् आडांचे शौचकूप बनले..

आड झाकून शौच्यालये उभी राहिली अन् आडांचे शौचकूप बनले..

दिघोळे वाडा, भिंगे वाड्यात त्याचे शौचकूप झाल्याचे पाहिले. पद्धतही एकसारखी. आडावर स्लॅब टाकले होते.त्यावर संडास बांधले होते, आता रोजचा मैला आडात साठत होता.

वाड्यात जाण्यापूर्वी शंका होतीलोक हे असं झालेलं दाखवतील का? कदाचित हे सांगायला लाजतील. गेलो तर बरोब्बर उलटा अनुभव. कोणाला काहीच वाटत नव्हतं. लोक आवर्जून आड दाखवत होते. आड हे संडासाच्या टाक्या कधी बनले, हेही स्वत:हून सांगत होते.

दिघोळे वाड्यात भारत दिघोळे भेटले. प्राथमिक शिक्षक. वय ४० वर्षे. त्यांनी सांगितलं, “मी स्वत: या आडातून पाणी काढलंय. गेल्या २०२५ वर्षांत त्याचा वापर बंद झाला. आम्ही १९९८ मध्ये त्याच्यावर स्लॅब टाकला. त्याची संडासाची टाकी केली..”

कुरेशी वाड्यातील आड बुजवण्यात आला आहे, पण त्याच्या खाणाखुणा आजही पाहायला मिळतात.

कुरेशी वाड्यातील आड बुजवण्यात आला आहे, पण त्याच्या खाणाखुणा आजही पाहायला मिळतात.

बहुतांश आडांच्या नशिबी हेच आलं होतं. कुरेशी वाड्यात जरा वेगळं चित्र दिसलं. तिथं आदम इस्माईल शेख राहतात. त्यांनी सांगितलं की, आता आडाचं काम उरलं नाही, त्यामुळे तो दगड, वाळू टाकून बुडवला. उगाच त्यात कोणी पडायची भीती नको.. बुजवलेल्या आडाचा चौकोनी चौथरा आडाची साक्ष देत होता.

आटपाडीत आडांसाठी ८१० वाडे पाहिले. सर्व आडांची अवस्था एकसारखी. आडाचा व्यास साधारणत: अडीच ते तीन फूट. खोली ३०४० फूट.

फक्त एकाच ठिकाणी वापरात असलेला आड सापडला. तोही बराच शोध घेतल्यानंतर. आईसाहेब मंदिराजवळ देशपांडे वाड्यातला हा आड. हा वाडा आटपाडीच्या शुक्र ओढ्याच्या जवळ आहे. या वाड्यात केशव देशपांडे, त्यांच्या पत्नी सौ. अरुणा राहतात. त्यांनी आडांचा उभाआडवा इतिहास सांगितला. त्यातून आडांमध्ये झालेलं स्थित्यंतर समजलं.. तसंच माणसामध्ये झालेलं सुद्धा !

– अभिजित घोरपडे

(सर्व छायाचित्रे- c@अभिजित घोरपडे)

Email-  abhighorpade@gmail.com

Blog-  www.abhijitghorpade.wordpress.com

(आटपाडीला पाण्याबाबत स्वयंपूर्ण करणारे आड असे कसे बुजवले गेले? असे कसे नष्ट झाले?… जे काही घडलं ते चमत्कारीक आहे. आपण असंच वागायचं का, याचा विचार करायला लावणारं आहे…

समजून घेण्यासाठी वाचा; आटपाडीचे शापित आड, भाग २… लवकरच, याच ब्लॉगवर.

– अभिजित घोरपडे)