प्रदूषणाचे आर्थिक परिमाण (उजनीच्या पाण्याचं दुष्टचक्र- २)

उजनी धरणाची निर्मिती १९८० सालची. तेव्हपासून थेंबे थेंबेप्रदूषण वाढतच आहे. आता त्याने घातक टप्पा गाठला आहे. वरच्या बाजूच्या लोकांनी केलेल्या पापाचं ओझं आता हा जलाशय वाहत आहे. त्याचे आर्थिक परिणामही खालच्यांना भोगावे लागत आहेत

उजनी जलाशयावर असे आकर्षक परदेशी पक्षी येतात खरे, पण तिथल्या पाण्याच्या प्रदूषणाची स्थिती भयावह आहे..

उजनी जलाशयावर असे आकर्षक पक्षी येतात खरे, पण तिथल्या पाण्याच्या प्रदूषणाची स्थिती भयावह आहे..

पुणे आणि सोलापूर जिल्हयांच्या सीमेवर असलेलं उजनी धरण. भीमा नदीवर बांधलेलं. त्याच्या प्रदूषणामुळं काय होतंय, हे गेल्या लेखात जाणून घेतलं. त्याचे आर्थिक परिमाणही आहेत. हे पाणी शुद्धच करून प्यावं लागतं. त्यासाठी या पट्ट्यात शहरं, तालुक्याची गावं, लहान गावांमध्येही घरोघरी यंत्रणा बसवल्या आहेत. त्यावर लोकांचा बराच खर्च होतो. जे ही व्यवस्था करत नाहीत, त्यांचे आरोग्य बिघडते. त्यांचा आजारावर खर्च होतोअसा नाहीतर तसा भुर्दंड आलाच, त्यातून कोणाचीही सुटका नाही.

खरं तर उजनी जलाशयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं येणारे विविध प्रकारचे आकर्षक पक्षी. पण तिथल्या पाण्याच्या प्रदूषणाची स्थिती भयावह आहे.

उजमीचा परिसर संपूर्ण ग्रामीण. पण इथली पाणी शुद्ध करण्याच्या घरगुती संचांबाबतची आकडेवारी चक्रावून सोडते. शहरातही नसतील, इतक्या प्रमाणात इथं हे संच वापरले जातात. टेंभूर्णी हे इथलं मोठं गाव. ते सोलापूरच्या माढा तालुक्यात येतं. ‘आर..’ (रिव्हर्स ओसमॉसिस), ‘सॉफ्टनरहे शब्द इथं रोजच्या बोलण्यातले. पाणी शुद्ध करण्याचे संच पुरवणारे अनेक व्यावसायिक इथं सापडतात. ‘अॅक्वागार्ड‘, ‘केंटअसे ब्रॅन्डही या भागात पोहोचले आहेत. त्या सर्वांच्या वितरकांचा व्यवसाय उत्तम चालू आहे. टेंभूर्णीच्या ४० हजार लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्के लोक अशी यंत्रणा वापरतात. आसपासच्या गावांमध्येही हे लोण पसरलंय. अर्थात, ज्यांना परवडतं, तेच याचा वापर करतात. लहान गावांमध्ये जेमतेम १५२० टक्के लोकांकडून त्याचा वापर होतो. उरलेले आहे तसंच पाणी पितात. त्याचे परिणाम आजाराच्या रूपाने दिसून येतात.

घरातले हे शुद्धिकरण संच. शिवाय व्यावसायिकांना कॅनमधून भरून शुद्ध पाणी विकलं जातं. हा व्यवसायही इथं फोफावला आहे. वीस लिटरच्या कॅनला ६० ते ८० रुपये. टेंभूर्णीच्या आसपास असे चार मुख्य व्यावसायिक आहेत. त्यांची आर्थीक स्थिती कमालीची बदललीय. थोड्याच दिवसांत त्यांच्याकडे मोटारी आल्या आहेत

हिरवं पाणी, त्यावर प्रदूषित घटकांचा तवंग आणि घाणेरडा वास... ही उजनीच्या पाण्याची आजची ओळख आहे.

हिरवं पाणी, त्यावर प्रदूषित घटकांचा तवंग आणि घाणेरडा वास… ही उजनीच्या पाण्याची आजची ओळख आहे.

दूषित पाण्याचा परिणाम टेंभूर्णीच्या चौकात दिसतो. दुकानं, छोटी हॉटेल्स, पानपट्टी, टपऱ्या, अगदी हातगाडीवरही बाटलीबंद पाणी विक्रीसाठी असलेलं दिसतं. आणि ते खपतंसुद्धा. लग्नकार्यं, इतर समारंभांमध्येही या पाण्याला मोठी मागणी आहे... ही सारी उजनीच्या दूषित पाण्याचीच कृपा!

कारणीभूत कोण, जबाबदारी कोणाची?

उजनीच्या प्रदूषणाची समस्या भयंकर आहे. त्याला कारणीभूत कोण? याचा थेट दोष जातोपुणे आणि पिंपरीचिचंवड या दोन महानगरपालिकांवर. बारामती, दौंड, जुन्नर, भोर, खेड, शिरूर, आळंदी, चाकण, इंदापूर, तळेगावदाभाडे अशा दहा नगरपालिकांवर. कुरकुंभच्या रासायनिक औद्योगिक वसाहतीसह एकूण दहा औद्योगिक वसाहतींवर तसेच अनेक साखर कारखाने, आसवनी (डिस्टिलरी), इतर कारखाने यांच्यावरसुद्धा.

या सर्वांचं बेजबाबदार वागणं त्यात भरच टाकतं. या सर्वांची सर्व प्रकारची घाण उजनी जलाशयात येते, तिथं साठून राहते. यापैकी काही जण हे मान्य करतात. काही जण मात्र कागदावर आकडेवारी दाखवून हात वर करतात. त्यात मुख्यत: पुणे, पिंपरीचिंचवड महापालिकांचा समावेश होतो. पिंपरीचिंचवड पालिका सांगते की, आमची सांडपाणी शुद्ध करण्याची क्षमता १०० टक्के आहे. हे खरं मानलं तर मग या शहरातून बाहेर पडणाऱ्या मुळा, पवना या नद्या स्वच्छ असायला हव्यात. प्रत्यक्षात वेगळीच स्थिती आहे. या नद्यांचा संगम दापोडी येथे होतो. तिथून त्या पिंपरीचिंचवडच्या हद्दीतून पुण्याच्या हद्दीत येतात. या परिसरात दुर्गंधी असते. ती नदी जवळ असल्याची आठवण करून देते. या नद्यांमध्ये अधूनमधून मोठ्या संख्येने मासे मरतात.. मग पिंपरीचिंचवडच्या आकडेवारीवर विश्वास कसा ठेवायचा?

पुणे महापालिकेच्या हद्दीत एवढंही नाही. तिथल्या सांडपाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया करण्याची क्षमता नाही. आहे ती क्षमता पुरेपूर वापरली जात नाही. त्यामुळे पुण्याच्या हद्दीतून बाहेर पडणारी मुळामुठा नदी प्रदूषणाने विद्रूप बनली आहे.

U4

महाराष्ट्र विकास केंद्रया संस्थेचा उजनी धरणाच्या प्रदूषणाबाबतचा अलीकडचा अहवाल सद्यस्थिती सांगतो. या धरणाच्या पाण्यात मिथेन, हायड्रोजन सल्फाईड यासारख्या विषारी वायूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. या वायूंचे फवारे उडताना तेथील शेतकरी, मच्छिमार अनेकदा पाहतात. उजनीच्या दूषित पाण्यात तब्बल पाच हजार टन मिथेन वायूची निर्मिती होते, असेही हा अहवाल सांगतो.

इतर नगरपालिका, मोठी गावं या प्रदूषणात भर घालतात. भीमा नदीच्या पट्ट्यातील औद्योगिक वसाहती हाही प्रदूषणाचा मोठा स्रोत. कुरकुंभ, बारामती येथील उद्योगांचा त्यात मोठा वाटा आहे. काय काय आहे त्यात? साखर कारखानेआसवनींमधून बाहेर पडणारा स्पेंट वॉश, उद्योगांनी वर्षभर साठवलेलं प्रदूषित घटक पावसाळ्यात नदीत सोडणं, घातक रसायने भूजलात सोडणं अशा अनेक गोष्टी नदीला दूषित करत आहेत. उजनीच्या वर औद्योगिक क्षेत्रात दरवर्षी तब्बल २५०० टन टाकाऊ पदार्थांची निर्मिती होते. त्यांची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे ते जमिनीत गाडले जातात. त्यांच्यामुळे भूजल प्रदूषित होतं. किंवा हे पदार्थ थेट नदीत जाऊन तिला नासवतात. त्यांच्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका आहेअसा इशारा महाराष्ट्र विकास केंद्राचा अहवाल देतो.

उजनी धरणाची निर्मिती १९८० सालची. तेव्हपासून थेंबे थेंबेप्रदूषण वाढतच आहे. आता त्याने घातक टप्पा गाठला आहे. वरच्या बाजूच्या लोकांनी केलेल्या पापाचं ओझं आता हा जलाशय वाहत आहे. त्याचे परिणाम खालच्यांना भोगावे लागत आहेत. पाण्याचा दर्जा सुधारण्याबाबत फार कोणी बोलत नाही, काही करतही नाही. प्रदूषणामुळं पोळलेलेही फारसं बोलत नाहीत. बोललं तरी त्यांचा आवाज लहान. त्यांचं म्हणणं योग्य तिथं पोहोचतही नाही. आणि पोहोचलं तरी त्याकडं गांभीर्यानं पाहिलं जात नाहीत्यामुळे घाण करणारा करत राहतो, भोगणाराही भोगत राहतो; वर्षानुवर्षं!

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

ब्लॉग : http://www.abhijitghorpade.wordpress.com