…डेटॉल डेटॉल हो !

गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू  ‘पचवायची ‘ क्षमता शरीरात निर्माण होते . त्यासाठी ‘हँड सॅनिटायझर ‘चा अट्टाहास  करण्यापेक्षा स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं . सॅनिटायझरवर पैसे परी पैसे जातात, शिवाय रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन अपाय होतो तो वेगळाच. हे प्रकरण इथंच थांबत नाही तर ते वारंवार वापरून त्वचेवरील उपयुक्त जीवाणूंचा थर निघून जातो, त्वचा कोरडी पडते आणि ती बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्याला बळी पडते… तरीही सॅनिटायझरचा सोस कशासाठी?

– अभिजित घोरपडे

hand-sanitizer1

हँड सॅनिटायझर… किती फायद्याचा, किती तोट्याचा?

आमचा इंद्रजीत. वय वर्षे चार. जाहिरातींच्या लयबद्ध ‘झिंगल’ ऐकल्या की टीव्हीकडं धावतो. आयपीएलच्या गेल्या हंगामातल्या ‘…वाह भाई वाह’ या झिंगलनं तर त्याला वेड लावलं होतं. ती गुणगुणत नाचत राहायचा. मग तो आणि मी मिळून त्यातून वेगळी गमतीशीर कडवी रचायचो.. आणि मग मोठ्यानी हसायचो.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका झिंगलनं त्याचं लक्ष वेधून घेतलंय ‘…डेटॉल डेटॉल हो!’ जाहिरातीतली ती लहान मुलं आणि वर ही झिंगल. आजूबाजूला कानोसा घेतल्यावर समजलं की, घराघरातली अनेक लहान मुलं-मुली या झिंगलची फॅन झालीत. शाळेच्या गणवेशातली दोन मुलं. बाहेर आईस्क्रीम घ्यायला हात पुढं करतात. त्यातल्या एकाला आईचे बोल आठवतात- हात धुतल्याशिवाय काही खायचं नाही. मग तो बॅगेतून ‘हँड सॅनिटायझर’ बाहेर काढतो आणि त्याचे चार थेंब हातावर घेऊन हातावर चोळतो. मग आईस्क्रीमवर ताव मारतो.. पार्श्वभूमीवर झिंगल सुरूच असते.

रुग्णालय ते मंगल कार्यालय…

आतापर्यंत फक्त डॉक्टरांकडं असा सॅनिटायझर पाहायला मिळायचा. तेव्हा त्याच्याबद्दल आकर्षणही वाटायचं. पण आता त्याचा प्रसार सर्वत्र झालाय. गेल्याच महिन्यातलं उदाहरण. पुण्यात “शुभारंभ लॉन्स” या मंगल कार्यालयात एका लग्नासाठी गेलो होतो. जेवणाची उत्तम व्यवस्था होती. जेवणाच्या हॉलमध्ये प्रवेश करताच हात धुण्यासाठी पिंप ठेवलेले होते, शिवाय लिक्विड हँडवॉश. हात धुवून ताट घ्यायला गेलो, तर तिथं दोन मुली. मी ताट उचलणार, इतक्यात म्हणाल्या, “एक्सक्यूज मी सर, सॅनिटायझर?” …मी क्षणभर गोंधळलो. मग नकार देऊन ताट उचललं. जेवण संपेपर्यंत मनात विचार होता- च्यायला, हात धुतल्यावर परत सॅनिटायझर कशाला? अजूनही मनाच्या कोपऱ्यात हा प्रश्न कायम आहे.

हे ‘सॅनिटायझर’ प्रकरण अजूनही डोक्यातून गेलेलं नाही. त्यामुळे मुद्दाम काही डॉक्टरांशी बोललो. त्यापैकी एक आमचे वरिष्ठ मित्र. साहित्यिक असलेले आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. सदानंद बोरसे. ‘जेवणापूर्वी साबणाने हात धुतल्यावर या सॅनिटायझरची काहीही आवश्यकता नाही. जेवढी अति काळजी घ्याल, तितकी रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार हे निश्चित…’ इति डॉ.बोरसे. डॉक्टरांनी रुग्णाला हात लावल्यावर सॅनिटायझर वापरणं ठीक, पण आपण? हा प्रश्न पिच्छा सोडत नव्हता. कारण भविष्यात याचे अनेक परिणाम संभवतात. बाटलीबंद पाणी पिणं हे आता जसं ‘स्टेटस् सिंबॉल’ झालंय, त्याच मार्गावर हे सॅनिटायझर प्रकरण घेऊन जाईल. मग पुढं पाण्याच्या बाटलीबरोबर सॅनिटायझरची बाटलीसुद्धा घेऊन फिरावं लागेल, नाहीतर तुम्हाला मागास ठरवलं जाईल.. या प्रकरणाचे याच्याही पलीकडं गंभीर परिणाम आहेत.

hand-sanitizer3

जीवाणूंशिवाय पोटातील अन्न पचू शकत नाही…

खोटं सांगा, नाहीतर अर्धसत्य सांगा

जाहिराती किती अर्धसत्य किंवा खोटी माहिती ठोकून देतात, याचं हे उत्तम उदाहरण. अशा उत्पादनांच्या जाहिराती बऱ्याचदा तुम्हाला जीवाणूंची (बॅक्टेरिया) भीती घालत असतात. त्यांचा बागूलबुवा उभा करायचा आणि आपली उत्पादनं खपवायची.. हा त्यांचा धंदा. पण जीवाणू आपल्याला जगण्यासाठी किती उपयुक्त ठरतात, हे मात्र बेमालूमपणे लपवून ठेवतात. कल्पना आहे का- आपल्या शरीरावर कुठं-कुठं असतात हे जीवाणू? आणि किती गरजेचे असतात ते? जीवाणू संपूर्ण शरीरावर आणि पोटातसुद्धा ते असतात. इथं सगळीकडं त्रासदायक जीवाणूंपेक्षा उपयुक्त जीवाणूंची संख्या जास्त असते. त्यामुळेच तर आपल्या शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित सुरू राहतात. उदाहरणच द्यायचं तर पोटात जीवाणू नसतील तर आपण खाल्लेल्या अन्नाचा एकही घास पचू शकणार नाही. कारण पचण्याची क्रिया पोटातील जीवाणूंमुळेच पार पडते.. त्वचेवरचे जीवाणूसुद्धा बाहेरच्या वातावरणापासून आपलं संरक्षण करतात. हे वास्तव असताना जाहिराती आपल्या माथी काय मारतात?.. तर आहेत नाहीत ते जीवाणू मारून टाका!

सॅनिटायझरचा उपयोग काही प्रमाणात निश्चित आहे, पण तो काही प्रमाणातच. संसर्गजन्य आजाराची साथ पसरलेली असताना बाहेर हात धुण्याची सोय नसेल तर तो काही प्रमाणात नक्कीच उपयुक्त ठरतो. तसेच, अशा रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांसाठीही तो उपयोगाचा आहे, पण तो तेवढ्यापुरताच. त्याची सर्रास सवय लावून घेणं घातक आहे. स्पर्श केल्याने होणारा संसर्ग सॅनिटायझरमुळे टाळता येतो, पण शिंकल्यावर, खोकल्यावर किंवा इतर कारणाने हवेतून पसरणारा संसर्ग तो रोखू शकत नाही. ही त्याची मर्यादा लक्षात घ्यायला हवी. त्याचे थेट अपायही आहेत. अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ने सॅनिटायझरच्या उपयुक्ततेबाबत शंका घेतल्या आहेत आणि कंपन्यांना त्यांची उपयुक्तता सिद्ध करण्यास सांगितले आहे. सॅनिटायझर वारंवार वापरणे हे त्वचेसाठी घातक आहे, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. ( https://www.webmd.com/cold-and-flu/news/20160629/fda-asks-how-safe-is-that-hand-sanitizer )

सॅनिटायझरमुळे जीवाणू का मरतात?

सॅनिटायझरमध्ये असलेलं अल्कोहोल हे जीवाणू मारण्याचं कार्य सिद्धिस नेतं. आपण साबण आणि पाण्याने हात धुतो तेव्हा जीवाणू मरतात आणि ते पाण्यासोबत वाहून जातात. सॅनिटायझरच्या पद्धतीत मात्र अल्कोहोल त्वचेवरच थांबून राहतं. त्याचं बाष्पीभवन होतं, त्यावेळी हातावरील जीवाणू मारते जातात.  त्यासाठी सॅनिटायझरमध्ये किमान ६० टक्के अल्कोहोल असावं लागतं.

सॅनिटायझरमुळे नेमकं काय-काय होतं?

सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे त्वचा कोरडी पडते. नैसर्गिक तेल निघून जाते. सॅनिटायझरच्या वारंवार वापरामुळे त्वचेचे नैसर्गिक संरक्षणच निघून जाते. त्यामुळे कालांतराने आपले शरीर बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्यासाठी अधिक प्रवण बनते. सॅनिटायझरमध्ये सुगंधासाठी कोणती रसायने वापरली जातात हे अनेकदा बाटलीवर लिहले जात नाही. त्याची अॅलर्जी येऊ शकते, ती त्रासदायक ठरू शकतात. हे सॅनिटायझर किती प्रमाणात वापरावं हे लहान मुलांना समजत नाही. ‘स्वच्छता, अधिक स्वच्छता…’ या हेतूने ते भसाभस वापरलं की त्याच्यामुळे होणारा त्रास आणखी वाढतो. ( https://www.annmariegianni.com/why-you-should-avoid-hand-sanitizer/ )

Staphylococcus aureauMagnification 20,000

त्वचेवर आणि शरीरात उपयुक्त जीवाणूंची संख्या नेहमीच जास्त असते..

याच्याही पुढं जाऊन माझा नेहमीचा मुद्दा म्हणजे- आपण किती नाजूक व्हायचं हे ठरवायला हवं. गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू ‘पचवायची’ क्षमता शरीरात निर्माण होते ना. आणि स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं की. मग कशाला हा अट्टाहास? या उत्पादनांवर पैसे गेल्याचं दु:ख आहेच, शिवाय रोगप्रतिकारकक्षमता कमी होऊन अपाय होतो ते वेगळाच.
असा काळ सोकावू द्यायचा का, हाच आपल्यासारख्या सूज्ञ जनांपुढचा प्रश्न आहे. ‘जाऊ द्या ना, त्यात काय एवढं..’ असं म्हणून हे वापरायला लागलो तर उद्या कदाचित काळ माफ करणार नाही..
एवढंच!!!

– अभिजित घोरपडे
abhighorpade@gmail.com

(या लेखात वापरलेले ‘डेटॉल’ हे उत्पादनाचे नाव प्रातिनिधिक आहे, हे मुद्दे अशा प्रकारच्या सर्वच उत्पादनांना लागू होतात.)

 

जांभा सांगतोय, प्राचीन हवामानाचा इतिहास!

सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा पट्टा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथं कोणे एके काळी कोकणासारखा धोधो पाऊस पडायचा. हा इतिहास उलगडलायतिथं सापडणाऱ्या जांभा नावाच्या खडकाने. तिथं हा जांभा खडक जागोजागी भेटतो आणि स्वत:च्या निर्मितीची कहाणीच सांगतो! तिथं इतका पाऊस पडायचा असं सांगितलं तरी आजच्या दुष्काळी स्थितीत दिलासा वाटावा

अभिजित घोरपडे

J5

सांगली जिल्ह्यात विटा-खानापूर रस्त्यावर असलेल्या तामखडी गावात सर्वत्र अशी लालेलाल माती आहे. कारण एकच- तिथं आढळणारा जांभा !

 

दंडोबा.. सांगलीजवळ असलेला हा एक डोंगर. प्रसिद्ध पर्यटनस्थळ! निसर्गप्रेमी, भाविक, तरुणतरुणी, ट्रेकिंग करणारे अशा साऱ्यांचं आवडतं ठिकाण. कोणी सहलीसाठी जातात, कोणी वृक्षारोपण करण्यासाठी, कोणी गुहेतील मंदिराच्या दर्शनासाठी, तर कोणी इतर कारणांसाठीयात्रा किंवा काही सणांचे दिवस सोडले तर फारशी वर्दळ नसते. त्यात या डोंगराचा पसारा बराच मोठा. त्यामुळे थोडीफार गर्दी असली तरी ती जाणवत नाही. वाहणारा वारा, निवांतपणा अनुभवण्यासाठीच हे एक उत्तम ठिकाण!

J4

दंडोबावर असलेलं मंदिर असं जांभा खडकामध्ये कोरलेल्या गुहेत आहे.

मी या डोंगराद्दल बरंच ऐकलं होतं. त्यातल्या एका वेगळ्या गोष्टीचं मला कुतूहल होतं. इतकं की प्रत्यक्ष जाऊन ते कधी पाहतो, असं झालं होतं. तीनचार वर्षांपूर्वी योग आला. आणि ते पाहून खरंच आश्चर्यचकित झालो. ऐकलं होतं, तरीही ते प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. असं काय होतं तिथं?.. तर वैशिष्ट्यपूर्ण खडक! तिथले खडक पाहिले की वाटावं, आपण कोकणात तर नाही ना! इतका वेगळा. कसला खडक?… तर लालपिवळ्या रंगाचा, झीज झालेला आणि पाणी वाहून जाईल असा सछिद्र. हा तर जांभाकोकणाची ओळख असलेला!

दंडोबा डोंगराच्या माथ्याचा संपूर्ण थर याच प्रकारच्या खडकाचा. तोच खडक कोरून गुहा केलेली आणि त्या गुहेत एक मंदिर. आजूबाजूला खडकाच्या भल्या मोठ्या शिळा पडलेल्या. त्या साऱ्या लालपिवळ्या रंगाच्या म्हणजेच जांभ्याच्या!

माझ्यासाठी ही नवलाई होती. कारण कोकण सोडून इथं जांभा कसा? तो सुद्धा सांगलीसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात! तसा यापूर्वी पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी तुरळक प्रमाणात जांभा पाहिला होता, पण हे इतके मोठाले खडक आणि संपूर्ण जांभ्याचा थर पहिल्यांदाच पाहात होतो. ते पाहून आश्चर्य वाटण्याचं कारण हे की जांभा खडक विशिष्ट हवामानातच निर्माण होतो. त्याच्यासाठी कोकणासारखी जास्त पावसाची आणि भरपूर आर्द्रता असलेली स्थिती आवश्यक असते. दंडोबा डोंगरावर हवामानाची स्थिती नेमकी याच्या विरुद्ध आहे. तिथला प्रदेश कमी पावसाचा आणि कोरड्या हवामानाचा. तरीही इथं जांभा आढळणं हे आगळं होतं. बरं, असंही नव्हतं की, इथं कोणी इतर ठिकाणाहून जांभा आणला असेल किंवा तो पाण्यासोबत वाहत आला असेल. तो तिथलाच होता, तिथंच तयार झालेला.

J2

घराच्या भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले… बेडग गावाजवळचं हे कच्चं घर

 

हे केवळ दंडोबा डोंगरापुरतं मर्यादित नव्हतं. या परिसरात, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा जांभा पाहायला मिळतो. नेमकेपणानं सांगायचं तर मिरज तालुक्यात बेडग हे गाव. तिथून जवळ असलेल्या रेल्वे मार्गालगत एक कच्चं घर दिसलं. छप्पर म्हणून पत्रा आणि भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले. एरवी कोकणात जांभ्याच्या चिरांची सुंदर घर पाहिली होती, पण जांभ्याचे दगड रचलेलं हे इथलं घर. या घराजवळून लाल माती काढून ती रेल्वेमार्गावर पसरलेली दिसली. तिथूनच हे दगडसुद्धा काढलेले होते.

एवढंच नाही, तर खानापूरविटा रस्त्यावर वेगळा प्रकार पाहायला मिळाला. या रस्त्यावर खानापूरपासून ६ किलोमीटर अंतरावर तामखडी नावाचं गाव आहे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तांबडी माती दिसली. आजूबाजूच्या मातीपासून स्पष्ट फरक लक्षात यावा, इतकी तांबडी! शेतंच्या शेतं या तांबड्या मातीत. त्यातच नांगरट केलेली आणि त्यातच उभी पिकं. या तांबड्या मातीचं रहस्यसुद्धा तिथं सापडणाऱ्या लाल जांभा खडकात होतं. तामखडीमध्ये जांभा आढळतो, त्यानंच तिथल्या लाल मातीला जन्म दिला आहे. तामखडी सोडून आणखी पुढं गेलं की प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे. हे मंदिरसुद्धा जांभा खडकावरच वसलं आहे. मंदिराच्या मागं गेलं की तिथं लालपिवळसर रंगाचं टेकाड याची माहिती देतं.

J6

रेवणसिद्ध मंदिराच्या परिसरातही लाल-पिवळा जांभा दर्शन देतो.

याची आणखी एक तऱ्हा जत तालुक्यात पाहायला मिळाली. जत म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांत दुष्काळी तालुक्यांपैकी एक. कर्नाटकच्या सीमेवर. जतपासून कर्नाटकात अथनी या गावाला एक रस्ता जातो. या रस्त्याने जाताना उजव्या हाताला टेकडीवर मोठमोठाल्या पवनचक्क्या दिसल्या. ते पाहण्यासाठी थांबलो, तर संपूर्ण टेकडीच लालेलाल खडकाची दिसली. ती टेकडी जांभा खडकाची होती. तीच नव्हे तर आसपासच्या ओळीने साऱ्या टेकड्या जांभ्याच्याच होत्या. काही लाल रंगाच्या, तर काही लालबरोबरच पिवळसर झाक असलेल्या!

J3

जतकडून कर्नाटकात अथनीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना जांभ्याच्या टेकड्या दिसतात. त्यावरचा लालबुंद रस्ता कोकणची आठवण करून देतो.

याचा अर्थ हा जांभा याच भागातला मूळ निवासी. तो कुठून तरी आलेला / आणलेला किंवा पाण्यासोबत वाहत आलेला अजिबात नाही. हा सांगितलेला सारा भाग येतो दुष्काळी पट्ट्यातकाही माणदेशात, तर काही त्याला लागून असलेल्या भागात. हे वास्तव असेल तर ते मोठा प्रश्न उपस्थित करतं. कोकणच्या हवामानातला जांभा या दुष्काळी पट्ट्यात कसा?

सामान्यांना प्रश्न पडेल, पण अभ्यासक, विशेषत: पुराहवामानतज्ज्ञ / भूशास्त्राचे अभ्यासक याचं उत्तर देतात. ही मंडळी प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करतात. त्यावरून त्या काळातील हवामान आणि त्यात झालेला बदल याची माहिती मिळवतात. पुण्यातील डॉ. शरद राजगुरू हे असेच वरिष्ठ तज्ज्ञ. त्यांच्यासोबतच मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात सासवडजवळ आढळणारे जांभ्याचे खडक पाहिले होते. या तज्ज्ञांचा निष्कर्ष असा, की सांगली जिल्ह्यात आढळणाऱ्या जांभ्याची निर्मिती काही हजार किंवा काही लाख वर्षांपूर्वी झाली आहे. तो तयार झाला तेव्हा तिथं कोकणासारखं हवामान होतं. म्हणजेचभरपूर पाऊस आणि आर्द्र हवा. तेसुद्धा थोड्याथोडक्या काळापुरतं नव्हे तर किमान काही हजार वर्षं!

आता सर्वच भाग अतिशय कमी पावसाचा. महाराष्ट्राचा दुष्काळी भाग म्हटलं की या भागाचं नाव आधी घेतलं जातं. त्यामुळे तिथं कधी काळी भरपूर पाऊस पडत होता हे सांगितलं तरी दिलासा मिळावाहवामान आणि त्याचं चक्र एकसारखं नसतं, ते सतत बदलत असतं. त्याची गती संथ असते इतकंच.

J1

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जागोजागी असे जांभ्याचे खडक  पाहायला मिळतात.

आताच या विषयावर लिहायचं कारण असं की सध्या दुष्काळी वर्ष आहे. पाण्याची ओरड आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कमी पडलेला पाऊस हे कारण आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गातील व्यवस्था नष्ट केल्या आहेत. उदा. नैसर्गिक प्रवाह, भूजलाची व्यवस्था, त्याचं पुनर्भरण करण्यास उपयुक्त ठरणारा झाडोरा, वगैरे. निसर्गसुद्धा बदल घडवून आणतो, पावसाचं प्रमाण कमी करतो. म्हणून तर सांगलीत पूर्वीचा जांभा दिसतो, तर आता दुष्काळ! पण निसर्गातील बदल संथ गतीने होतात, तर आपली गाडी सुसाट सुटते. निसर्गाच्या वेगाशी जुळवून घेणं काही प्रमाणात शक्य असतं, पण आपल्या या वेगाचं काय?

याचं भान यावं यासाठी हे सारं!

अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

http://www.abhijitghorpade.wordpress.com