…डेटॉल डेटॉल हो !

गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू  ‘पचवायची ‘ क्षमता शरीरात निर्माण होते . त्यासाठी ‘हँड सॅनिटायझर ‘चा अट्टाहास  करण्यापेक्षा स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं . सॅनिटायझरवर पैसे परी पैसे जातात, शिवाय रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन अपाय होतो तो वेगळाच. हे प्रकरण इथंच थांबत नाही तर ते वारंवार वापरून त्वचेवरील उपयुक्त जीवाणूंचा थर निघून जातो, त्वचा कोरडी पडते आणि ती बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्याला बळी पडते… तरीही सॅनिटायझरचा सोस कशासाठी?

– अभिजित घोरपडे

hand-sanitizer1

हँड सॅनिटायझर… किती फायद्याचा, किती तोट्याचा?

आमचा इंद्रजीत. वय वर्षे चार. जाहिरातींच्या लयबद्ध ‘झिंगल’ ऐकल्या की टीव्हीकडं धावतो. आयपीएलच्या गेल्या हंगामातल्या ‘…वाह भाई वाह’ या झिंगलनं तर त्याला वेड लावलं होतं. ती गुणगुणत नाचत राहायचा. मग तो आणि मी मिळून त्यातून वेगळी गमतीशीर कडवी रचायचो.. आणि मग मोठ्यानी हसायचो.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका झिंगलनं त्याचं लक्ष वेधून घेतलंय ‘…डेटॉल डेटॉल हो!’ जाहिरातीतली ती लहान मुलं आणि वर ही झिंगल. आजूबाजूला कानोसा घेतल्यावर समजलं की, घराघरातली अनेक लहान मुलं-मुली या झिंगलची फॅन झालीत. शाळेच्या गणवेशातली दोन मुलं. बाहेर आईस्क्रीम घ्यायला हात पुढं करतात. त्यातल्या एकाला आईचे बोल आठवतात- हात धुतल्याशिवाय काही खायचं नाही. मग तो बॅगेतून ‘हँड सॅनिटायझर’ बाहेर काढतो आणि त्याचे चार थेंब हातावर घेऊन हातावर चोळतो. मग आईस्क्रीमवर ताव मारतो.. पार्श्वभूमीवर झिंगल सुरूच असते.

रुग्णालय ते मंगल कार्यालय…

आतापर्यंत फक्त डॉक्टरांकडं असा सॅनिटायझर पाहायला मिळायचा. तेव्हा त्याच्याबद्दल आकर्षणही वाटायचं. पण आता त्याचा प्रसार सर्वत्र झालाय. गेल्याच महिन्यातलं उदाहरण. पुण्यात “शुभारंभ लॉन्स” या मंगल कार्यालयात एका लग्नासाठी गेलो होतो. जेवणाची उत्तम व्यवस्था होती. जेवणाच्या हॉलमध्ये प्रवेश करताच हात धुण्यासाठी पिंप ठेवलेले होते, शिवाय लिक्विड हँडवॉश. हात धुवून ताट घ्यायला गेलो, तर तिथं दोन मुली. मी ताट उचलणार, इतक्यात म्हणाल्या, “एक्सक्यूज मी सर, सॅनिटायझर?” …मी क्षणभर गोंधळलो. मग नकार देऊन ताट उचललं. जेवण संपेपर्यंत मनात विचार होता- च्यायला, हात धुतल्यावर परत सॅनिटायझर कशाला? अजूनही मनाच्या कोपऱ्यात हा प्रश्न कायम आहे.

हे ‘सॅनिटायझर’ प्रकरण अजूनही डोक्यातून गेलेलं नाही. त्यामुळे मुद्दाम काही डॉक्टरांशी बोललो. त्यापैकी एक आमचे वरिष्ठ मित्र. साहित्यिक असलेले आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. सदानंद बोरसे. ‘जेवणापूर्वी साबणाने हात धुतल्यावर या सॅनिटायझरची काहीही आवश्यकता नाही. जेवढी अति काळजी घ्याल, तितकी रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार हे निश्चित…’ इति डॉ.बोरसे. डॉक्टरांनी रुग्णाला हात लावल्यावर सॅनिटायझर वापरणं ठीक, पण आपण? हा प्रश्न पिच्छा सोडत नव्हता. कारण भविष्यात याचे अनेक परिणाम संभवतात. बाटलीबंद पाणी पिणं हे आता जसं ‘स्टेटस् सिंबॉल’ झालंय, त्याच मार्गावर हे सॅनिटायझर प्रकरण घेऊन जाईल. मग पुढं पाण्याच्या बाटलीबरोबर सॅनिटायझरची बाटलीसुद्धा घेऊन फिरावं लागेल, नाहीतर तुम्हाला मागास ठरवलं जाईल.. या प्रकरणाचे याच्याही पलीकडं गंभीर परिणाम आहेत.

hand-sanitizer3

जीवाणूंशिवाय पोटातील अन्न पचू शकत नाही…

खोटं सांगा, नाहीतर अर्धसत्य सांगा

जाहिराती किती अर्धसत्य किंवा खोटी माहिती ठोकून देतात, याचं हे उत्तम उदाहरण. अशा उत्पादनांच्या जाहिराती बऱ्याचदा तुम्हाला जीवाणूंची (बॅक्टेरिया) भीती घालत असतात. त्यांचा बागूलबुवा उभा करायचा आणि आपली उत्पादनं खपवायची.. हा त्यांचा धंदा. पण जीवाणू आपल्याला जगण्यासाठी किती उपयुक्त ठरतात, हे मात्र बेमालूमपणे लपवून ठेवतात. कल्पना आहे का- आपल्या शरीरावर कुठं-कुठं असतात हे जीवाणू? आणि किती गरजेचे असतात ते? जीवाणू संपूर्ण शरीरावर आणि पोटातसुद्धा ते असतात. इथं सगळीकडं त्रासदायक जीवाणूंपेक्षा उपयुक्त जीवाणूंची संख्या जास्त असते. त्यामुळेच तर आपल्या शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित सुरू राहतात. उदाहरणच द्यायचं तर पोटात जीवाणू नसतील तर आपण खाल्लेल्या अन्नाचा एकही घास पचू शकणार नाही. कारण पचण्याची क्रिया पोटातील जीवाणूंमुळेच पार पडते.. त्वचेवरचे जीवाणूसुद्धा बाहेरच्या वातावरणापासून आपलं संरक्षण करतात. हे वास्तव असताना जाहिराती आपल्या माथी काय मारतात?.. तर आहेत नाहीत ते जीवाणू मारून टाका!

सॅनिटायझरचा उपयोग काही प्रमाणात निश्चित आहे, पण तो काही प्रमाणातच. संसर्गजन्य आजाराची साथ पसरलेली असताना बाहेर हात धुण्याची सोय नसेल तर तो काही प्रमाणात नक्कीच उपयुक्त ठरतो. तसेच, अशा रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांसाठीही तो उपयोगाचा आहे, पण तो तेवढ्यापुरताच. त्याची सर्रास सवय लावून घेणं घातक आहे. स्पर्श केल्याने होणारा संसर्ग सॅनिटायझरमुळे टाळता येतो, पण शिंकल्यावर, खोकल्यावर किंवा इतर कारणाने हवेतून पसरणारा संसर्ग तो रोखू शकत नाही. ही त्याची मर्यादा लक्षात घ्यायला हवी. त्याचे थेट अपायही आहेत. अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ने सॅनिटायझरच्या उपयुक्ततेबाबत शंका घेतल्या आहेत आणि कंपन्यांना त्यांची उपयुक्तता सिद्ध करण्यास सांगितले आहे. सॅनिटायझर वारंवार वापरणे हे त्वचेसाठी घातक आहे, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. ( https://www.webmd.com/cold-and-flu/news/20160629/fda-asks-how-safe-is-that-hand-sanitizer )

सॅनिटायझरमुळे जीवाणू का मरतात?

सॅनिटायझरमध्ये असलेलं अल्कोहोल हे जीवाणू मारण्याचं कार्य सिद्धिस नेतं. आपण साबण आणि पाण्याने हात धुतो तेव्हा जीवाणू मरतात आणि ते पाण्यासोबत वाहून जातात. सॅनिटायझरच्या पद्धतीत मात्र अल्कोहोल त्वचेवरच थांबून राहतं. त्याचं बाष्पीभवन होतं, त्यावेळी हातावरील जीवाणू मारते जातात.  त्यासाठी सॅनिटायझरमध्ये किमान ६० टक्के अल्कोहोल असावं लागतं.

सॅनिटायझरमुळे नेमकं काय-काय होतं?

सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे त्वचा कोरडी पडते. नैसर्गिक तेल निघून जाते. सॅनिटायझरच्या वारंवार वापरामुळे त्वचेचे नैसर्गिक संरक्षणच निघून जाते. त्यामुळे कालांतराने आपले शरीर बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्यासाठी अधिक प्रवण बनते. सॅनिटायझरमध्ये सुगंधासाठी कोणती रसायने वापरली जातात हे अनेकदा बाटलीवर लिहले जात नाही. त्याची अॅलर्जी येऊ शकते, ती त्रासदायक ठरू शकतात. हे सॅनिटायझर किती प्रमाणात वापरावं हे लहान मुलांना समजत नाही. ‘स्वच्छता, अधिक स्वच्छता…’ या हेतूने ते भसाभस वापरलं की त्याच्यामुळे होणारा त्रास आणखी वाढतो. ( https://www.annmariegianni.com/why-you-should-avoid-hand-sanitizer/ )

Staphylococcus aureauMagnification 20,000

त्वचेवर आणि शरीरात उपयुक्त जीवाणूंची संख्या नेहमीच जास्त असते..

याच्याही पुढं जाऊन माझा नेहमीचा मुद्दा म्हणजे- आपण किती नाजूक व्हायचं हे ठरवायला हवं. गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू ‘पचवायची’ क्षमता शरीरात निर्माण होते ना. आणि स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं की. मग कशाला हा अट्टाहास? या उत्पादनांवर पैसे गेल्याचं दु:ख आहेच, शिवाय रोगप्रतिकारकक्षमता कमी होऊन अपाय होतो ते वेगळाच.
असा काळ सोकावू द्यायचा का, हाच आपल्यासारख्या सूज्ञ जनांपुढचा प्रश्न आहे. ‘जाऊ द्या ना, त्यात काय एवढं..’ असं म्हणून हे वापरायला लागलो तर उद्या कदाचित काळ माफ करणार नाही..
एवढंच!!!

– अभिजित घोरपडे
abhighorpade@gmail.com

(या लेखात वापरलेले ‘डेटॉल’ हे उत्पादनाचे नाव प्रातिनिधिक आहे, हे मुद्दे अशा प्रकारच्या सर्वच उत्पादनांना लागू होतात.)

 

जांभा सांगतोय, प्राचीन हवामानाचा इतिहास!

सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा पट्टा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथं कोणे एके काळी कोकणासारखा धोधो पाऊस पडायचा. हा इतिहास उलगडलायतिथं सापडणाऱ्या जांभा नावाच्या खडकाने. तिथं हा जांभा खडक जागोजागी भेटतो आणि स्वत:च्या निर्मितीची कहाणीच सांगतो! तिथं इतका पाऊस पडायचा असं सांगितलं तरी आजच्या दुष्काळी स्थितीत दिलासा वाटावा

अभिजित घोरपडे

J5

सांगली जिल्ह्यात विटा-खानापूर रस्त्यावर असलेल्या तामखडी गावात सर्वत्र अशी लालेलाल माती आहे. कारण एकच- तिथं आढळणारा जांभा !

 

दंडोबा.. सांगलीजवळ असलेला हा एक डोंगर. प्रसिद्ध पर्यटनस्थळ! निसर्गप्रेमी, भाविक, तरुणतरुणी, ट्रेकिंग करणारे अशा साऱ्यांचं आवडतं ठिकाण. कोणी सहलीसाठी जातात, कोणी वृक्षारोपण करण्यासाठी, कोणी गुहेतील मंदिराच्या दर्शनासाठी, तर कोणी इतर कारणांसाठीयात्रा किंवा काही सणांचे दिवस सोडले तर फारशी वर्दळ नसते. त्यात या डोंगराचा पसारा बराच मोठा. त्यामुळे थोडीफार गर्दी असली तरी ती जाणवत नाही. वाहणारा वारा, निवांतपणा अनुभवण्यासाठीच हे एक उत्तम ठिकाण!

J4

दंडोबावर असलेलं मंदिर असं जांभा खडकामध्ये कोरलेल्या गुहेत आहे.

मी या डोंगराद्दल बरंच ऐकलं होतं. त्यातल्या एका वेगळ्या गोष्टीचं मला कुतूहल होतं. इतकं की प्रत्यक्ष जाऊन ते कधी पाहतो, असं झालं होतं. तीनचार वर्षांपूर्वी योग आला. आणि ते पाहून खरंच आश्चर्यचकित झालो. ऐकलं होतं, तरीही ते प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. असं काय होतं तिथं?.. तर वैशिष्ट्यपूर्ण खडक! तिथले खडक पाहिले की वाटावं, आपण कोकणात तर नाही ना! इतका वेगळा. कसला खडक?… तर लालपिवळ्या रंगाचा, झीज झालेला आणि पाणी वाहून जाईल असा सछिद्र. हा तर जांभाकोकणाची ओळख असलेला!

दंडोबा डोंगराच्या माथ्याचा संपूर्ण थर याच प्रकारच्या खडकाचा. तोच खडक कोरून गुहा केलेली आणि त्या गुहेत एक मंदिर. आजूबाजूला खडकाच्या भल्या मोठ्या शिळा पडलेल्या. त्या साऱ्या लालपिवळ्या रंगाच्या म्हणजेच जांभ्याच्या!

माझ्यासाठी ही नवलाई होती. कारण कोकण सोडून इथं जांभा कसा? तो सुद्धा सांगलीसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात! तसा यापूर्वी पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी तुरळक प्रमाणात जांभा पाहिला होता, पण हे इतके मोठाले खडक आणि संपूर्ण जांभ्याचा थर पहिल्यांदाच पाहात होतो. ते पाहून आश्चर्य वाटण्याचं कारण हे की जांभा खडक विशिष्ट हवामानातच निर्माण होतो. त्याच्यासाठी कोकणासारखी जास्त पावसाची आणि भरपूर आर्द्रता असलेली स्थिती आवश्यक असते. दंडोबा डोंगरावर हवामानाची स्थिती नेमकी याच्या विरुद्ध आहे. तिथला प्रदेश कमी पावसाचा आणि कोरड्या हवामानाचा. तरीही इथं जांभा आढळणं हे आगळं होतं. बरं, असंही नव्हतं की, इथं कोणी इतर ठिकाणाहून जांभा आणला असेल किंवा तो पाण्यासोबत वाहत आला असेल. तो तिथलाच होता, तिथंच तयार झालेला.

J2

घराच्या भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले… बेडग गावाजवळचं हे कच्चं घर

 

हे केवळ दंडोबा डोंगरापुरतं मर्यादित नव्हतं. या परिसरात, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा जांभा पाहायला मिळतो. नेमकेपणानं सांगायचं तर मिरज तालुक्यात बेडग हे गाव. तिथून जवळ असलेल्या रेल्वे मार्गालगत एक कच्चं घर दिसलं. छप्पर म्हणून पत्रा आणि भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले. एरवी कोकणात जांभ्याच्या चिरांची सुंदर घर पाहिली होती, पण जांभ्याचे दगड रचलेलं हे इथलं घर. या घराजवळून लाल माती काढून ती रेल्वेमार्गावर पसरलेली दिसली. तिथूनच हे दगडसुद्धा काढलेले होते.

एवढंच नाही, तर खानापूरविटा रस्त्यावर वेगळा प्रकार पाहायला मिळाला. या रस्त्यावर खानापूरपासून ६ किलोमीटर अंतरावर तामखडी नावाचं गाव आहे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तांबडी माती दिसली. आजूबाजूच्या मातीपासून स्पष्ट फरक लक्षात यावा, इतकी तांबडी! शेतंच्या शेतं या तांबड्या मातीत. त्यातच नांगरट केलेली आणि त्यातच उभी पिकं. या तांबड्या मातीचं रहस्यसुद्धा तिथं सापडणाऱ्या लाल जांभा खडकात होतं. तामखडीमध्ये जांभा आढळतो, त्यानंच तिथल्या लाल मातीला जन्म दिला आहे. तामखडी सोडून आणखी पुढं गेलं की प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे. हे मंदिरसुद्धा जांभा खडकावरच वसलं आहे. मंदिराच्या मागं गेलं की तिथं लालपिवळसर रंगाचं टेकाड याची माहिती देतं.

J6

रेवणसिद्ध मंदिराच्या परिसरातही लाल-पिवळा जांभा दर्शन देतो.

याची आणखी एक तऱ्हा जत तालुक्यात पाहायला मिळाली. जत म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांत दुष्काळी तालुक्यांपैकी एक. कर्नाटकच्या सीमेवर. जतपासून कर्नाटकात अथनी या गावाला एक रस्ता जातो. या रस्त्याने जाताना उजव्या हाताला टेकडीवर मोठमोठाल्या पवनचक्क्या दिसल्या. ते पाहण्यासाठी थांबलो, तर संपूर्ण टेकडीच लालेलाल खडकाची दिसली. ती टेकडी जांभा खडकाची होती. तीच नव्हे तर आसपासच्या ओळीने साऱ्या टेकड्या जांभ्याच्याच होत्या. काही लाल रंगाच्या, तर काही लालबरोबरच पिवळसर झाक असलेल्या!

J3

जतकडून कर्नाटकात अथनीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना जांभ्याच्या टेकड्या दिसतात. त्यावरचा लालबुंद रस्ता कोकणची आठवण करून देतो.

याचा अर्थ हा जांभा याच भागातला मूळ निवासी. तो कुठून तरी आलेला / आणलेला किंवा पाण्यासोबत वाहत आलेला अजिबात नाही. हा सांगितलेला सारा भाग येतो दुष्काळी पट्ट्यातकाही माणदेशात, तर काही त्याला लागून असलेल्या भागात. हे वास्तव असेल तर ते मोठा प्रश्न उपस्थित करतं. कोकणच्या हवामानातला जांभा या दुष्काळी पट्ट्यात कसा?

सामान्यांना प्रश्न पडेल, पण अभ्यासक, विशेषत: पुराहवामानतज्ज्ञ / भूशास्त्राचे अभ्यासक याचं उत्तर देतात. ही मंडळी प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करतात. त्यावरून त्या काळातील हवामान आणि त्यात झालेला बदल याची माहिती मिळवतात. पुण्यातील डॉ. शरद राजगुरू हे असेच वरिष्ठ तज्ज्ञ. त्यांच्यासोबतच मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात सासवडजवळ आढळणारे जांभ्याचे खडक पाहिले होते. या तज्ज्ञांचा निष्कर्ष असा, की सांगली जिल्ह्यात आढळणाऱ्या जांभ्याची निर्मिती काही हजार किंवा काही लाख वर्षांपूर्वी झाली आहे. तो तयार झाला तेव्हा तिथं कोकणासारखं हवामान होतं. म्हणजेचभरपूर पाऊस आणि आर्द्र हवा. तेसुद्धा थोड्याथोडक्या काळापुरतं नव्हे तर किमान काही हजार वर्षं!

आता सर्वच भाग अतिशय कमी पावसाचा. महाराष्ट्राचा दुष्काळी भाग म्हटलं की या भागाचं नाव आधी घेतलं जातं. त्यामुळे तिथं कधी काळी भरपूर पाऊस पडत होता हे सांगितलं तरी दिलासा मिळावाहवामान आणि त्याचं चक्र एकसारखं नसतं, ते सतत बदलत असतं. त्याची गती संथ असते इतकंच.

J1

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जागोजागी असे जांभ्याचे खडक  पाहायला मिळतात.

आताच या विषयावर लिहायचं कारण असं की सध्या दुष्काळी वर्ष आहे. पाण्याची ओरड आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कमी पडलेला पाऊस हे कारण आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गातील व्यवस्था नष्ट केल्या आहेत. उदा. नैसर्गिक प्रवाह, भूजलाची व्यवस्था, त्याचं पुनर्भरण करण्यास उपयुक्त ठरणारा झाडोरा, वगैरे. निसर्गसुद्धा बदल घडवून आणतो, पावसाचं प्रमाण कमी करतो. म्हणून तर सांगलीत पूर्वीचा जांभा दिसतो, तर आता दुष्काळ! पण निसर्गातील बदल संथ गतीने होतात, तर आपली गाडी सुसाट सुटते. निसर्गाच्या वेगाशी जुळवून घेणं काही प्रमाणात शक्य असतं, पण आपल्या या वेगाचं काय?

याचं भान यावं यासाठी हे सारं!

अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

पर्यावरण पत्रकार

फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन

संपादक, भवताल मॅगझीन

http://www.abhijitghorpade.wordpress.com

धरणामुळे भूकंप की… (कोयना भूकंप पुराण ३)

कोयना धरण १९६३ साली पूर्ण झालं. त्यात पाणी अडवणं सुरू झालं. पाठोपाठ तिथं भूकंपांची संख्या वाढल्याचं लक्षात आलं. चारच वर्षांनी तिथं महाराष्ट्रातला तोपर्यंतचा सर्वांत मोठा भूकंप झाला. रिश्टर मापनावर ६.५ इतका. मग चर्चा सुरू झाली, धरण आणि भूकंप यांच्या संबंधाची. खरंच त्यांचा एकमेकांशी सबंध आहे? की त्याला ओढून ताणून जोडलेला बादरायण संबंध म्हणायचं??

अभिजित घोरपडे

भूकंप लहरी

भूकंप लहरी

भूकंप आणि धरण यांचा संबंध हा वादग्रस्त विषय. त्यात थेट दोन टोकाची मतं मांडली जातात. हे या ध्रुवावर, तर ते त्या ध्रुवावर.. अधे मधे कोणीच नाही. कुठून निर्माण झाला हा वाद?? त्याची पार्श्वभूमी रंजक तर आहेच, काहीशी रहस्यमयसुद्धा. जगाच्या इतर भागात तोपर्यंत हा विषय होताच. पण महाराष्ट्रात आला, १९६७ नंतर. त्या वर्षी ११ डिसेंबरला कोयना धरणाचा परिसर भूकंपामुळे हादरला. जमीन हादरलीच, त्याच्या जोडीने अनेक भूशास्त्रज्ञसुद्धा ! कारण या भूकंपाने अभ्यासकांच्या तेव्हापर्यंतच्या समजुतीला मोठा धक्का दिला होता.

या भूकंपाच्या आधी असे समजले जात होते की, भारताच्या द्वीपकल्पीय भागात मोठ्या भूकंपाची शक्यता नाही. हा द्वीपकल्पीय भाग म्हणजे मध्य भारतापासून दक्षिणेला असलेला साधारणत: त्रिकोणी आकाराचा भूभाग. त्यात आपला महाराष्ट्रसुद्धा येतो. हा भाग प्राचीन काळातील कठीण खडकांपासून बनलेला आहे. तिथं भूकवचाची प्रमुख कमकुवत क्षेत्रं नाहीत. त्यामुळे तिथं मोठ्या भूकंपाला वावच नाही, असे मानले जात होते. मात्र, १९६७ च्या भूकंपाने या समजुतीला मुळापासूनच हादरा दिला.

भारतीय द्वीपकल्प... या भागात मोठे भूकंप होणार नाहीत, असे भू-शास्त्रज्ञ मानत होते.

भारतीय द्वीपकल्प… या भागात मोठे भूकंप होणार नाहीत, असे भू-शास्त्रज्ञ मानत होते.

योगायोगाचा भाग म्हणा किंवा आणखी काही. या भूकंपाच्या आधी चारच वर्षांपूर्वी म्हणजे १९६३ साली कोयना धरण पूर्ण झालं. त्यात पाणी साठवायला सुरुवात झाली होती. त्यानंतर लहानमोठ्या भूकंपांची संख्या वाढली. या नोंदी नाशिक येथील महाराष्ट्र इंजिनिअरिंग रीसर्च इन्टिट्यूट (मेरी) या संस्थेकडे सविस्तर उपलब्ध आहेत.

पाठोपाठ हा १९६७ चा भूकंप. रिश्टर मापनावर त्याची नोंद होती ६.. विशेष म्हणजे या मोठ्या भूकंपाआधी तीनच महिन्यांपूर्वी असाच मोठा भूकंप झाला होता. तारीख होती, १३ सप्टेंबर १९६७. नोंद होती  ५.८ रिश्टर. मग स्वाभाविकपणे शंका घेतली गेली, भूकंपांचा संबंध धरणातील पाणीसाठ्याशी तर नसेल?

अमेरिकेतील हूवर धरणाच्या निमित्तानेसुद्धा हा मुद्दा तापला होता- धरणामुळे भूकंप होण्यास मदत मिळते का?

अमेरिकेतील हूवर धरणाच्या निमित्तानेसुद्धा हा मुद्दा तापला होता- धरणामुळे भूकंप होण्यास मदत मिळते का?

पण अनेक अभ्यासक हे म्हणणं फेटाळून लावतात. त्यांच्या मते असं काही असूच नाही. त्या खडकाची ताकत किती प्रचंड! त्यावर साठणाऱ्या पाण्याचा कसला आलाय भार? माशीच्या वजनामुळं हत्ती खाली बसल्याचं ऐकलंय का कधी? धरणाच्या पाण्याचा आपल्या खालच्या खडकाशी एवढाच काय तो संबंध असू शकतो. त्यामुळे या निरर्थकसिद्धांतावर कशाला वेळ घालवायचा?? असा सवाल करणारे अभ्यासक आहेत. मग धरण बांधल्याचा आणि भूकंपांची संख्या वाढण्याचा काहीच संबंध नाही का?? या मुद्द्यालाही या मंडळींकडं उत्तर आहे.

ते म्हणतात, “अहो, धरण होण्यापूर्वी तिथं भूकंपांच्या नोंदी घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे लहानमोठे भूकंप झाले तरी ते माहीत व्हायचे नाहीत. धरण बांधल्यावर बारीकसारीक नोंदी घेणंसुरू झालं, लहानमोठे भूकंपही नोंदवले जाऊ लागले. म्हणूनच त्यांची संख्या वाढल्याचं दिसू लागलंप्रत्यक्षात तसं काही झालंच नाही!”

कोयनेत १९६७ साली झालेल्या भूकंपात धरणाजवळच्या वसाहतीत अशी पडझड झाली होती.

कोयनेत १९६७ साली झालेल्या भूकंपात धरणाजवळच्या वसाहतीत अशी पडझड झाली होती.

हे वादप्रतिवाद कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. पुढेही होत राहतील. त्यावर अभ्यास करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. त्यांची सुरुवात अगदी कोयनेच्या १९६७ सालच्या भूकंपापासून झाली. या भूकंपानंतर भारत सरकारने तज्ज्ञ समितीची स्थापना केली. त्यात भूशास्त्रज्ञ, अभियंता, भूकंपतज्ज्ञ आणि भूभौतिकी शास्त्रज्ञांचा समावेश होता. याशिवाय युनेस्को पथकातील तज्ज्ञ म्हणून विविध देशांमधील अभ्यासकांचाही त्यात समावेश होता. या समितीने अनेक गोष्टींचा अभ्यास केला. या भूकंपाचा, धरणातील पाणीसाठ्याशी किंवा त्यातील पाण्याची पातळी कमीजास्त होण्याशी संबंध आहे का, हा मुद्दाही त्यांनी अभ्यासला.

या समितीला त्या वेळी तरी धरणातील पाणीसाठा आणि भूकंपाचा संबंध आढळला नाही. त्यामुळे त्यांनी ही शक्यता निकालात काढलीमात्र, हैदराबादच्या नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचा (एन.जी.आर.आय.) कोयना परिसरात याबाबत अभ्यास सुरूच आहे. त्यासाठीच सात किलोमीटर खोलीचं ड्रिल खणलं जाणार आहे. त्यातून नेमकं पुढं येईल, याबाबत मोठी उत्सुकता आहेबस्स, त्यासाठी आणखी पाचेक वर्षं धीर धरावा लागेल.

कोणास ठाऊक? कदाचित भलतंच गुपित उलगडून आपल्या समोर येऊन उभं राहील !!!

अभिजित घोरपडे

 (आपल्या भागात पूर्वी भूकंप होत नव्हते असं सांगितलं जातं, पणशिवाजी महाराजांच्या काळातही आपल्याकडं भूकंप झाले आहेत..

त्याची माहिती करून घ्यायला विसरू नकाअर्थातच, दोन-तीन दिवसांनंतर अन् इथंच.

वाट पाहा– “कोयना भूकंप पुराण ४“)

मित्रांनो,

हा ब्लॉग वाचकांनी चांगलाच उचलून धरलाय. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे आपल्या प्रतिक्रियांची. आपल्याकडून दोन गोष्टी हव्या आहेत.

. एक तर या ब्लॉगमध्ये काय चांगलं आहे आणि काय सुधारण्याजोगं आहे, हे सांगा.

. दुसरं म्हणजेहा ब्लॉग आणखी कोणापर्यंत पोहोचायला हवा आणि त्यासाठी काय करायला हवं, हेसुद्धा सुचवा.

कृपया वेळ काढून ब्लॉगवर लिहा किंवा ई-मेल पाठवातुमची सक्रिय साथ असेल तरच पुढं लांबचा पल्ला गाठता येईल !

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

अभिजित घोरपडे

पिक्चर अभी बाकी है.. (कोयना भूकंप पुराण २)

कोयना धरणाजवळ ड्रिल खणताना आपण काळ्या खडकाचा तळ कधी गाठला ते कळलंच नाही. जे घडलं ते केवळ काही शे वर्षांत पहिल्यांदा घडत नव्हतं, हजार वर्षांतलं नव्हतं, काही लाख वर्षांतलं नव्हतं.. तर तब्बल साडेपाच ते साडेसहा कोटी वर्षांत पहिल्यांदा घडलं होतं. पण तिथं जे होणार आहे, ते भयंकर रोमांचक आहे… “यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है !”

कोयना धरणाच्या परिसरात घेतले जाणारे ड्रिल..

कोयना धरणाच्या परिसरात घेतले जाणारे ड्रिल..

– अभिजित घोर- अभिजित घोरपडे

..अखेर गुपित उलगडलं. आपण ज्याच्यावर राहतो, त्या काळ्या पाषाणाच्या (बेसॉल्ट) तळाशी काय दडलंय हे माहीत झालं. हे माहीत झालंच, त्याच्याबरोबर आणखीही माहिती मिळाली… “एकावर एक फ्रीमिळावी तशी.

हे शक्य झालं कोयना धरणाच्या परिसरातील भूकंपांच्या अभ्यासामुळं. कोयनेच्या परिसरात भूकंप का होतात, हे मूळ कोडं. ते उलगडण्यासाठी हैदराबादच्या एनजीआरआय संस्थेने प्रकल्प आखला. त्यासाठी दीड किलोमीटर खोलीचे ड्रिल खणले, दहा ठिकाणी. भविष्यात तिथं भूकंपाचा अभ्यास करणारी उपकरणं बसतील. पण ही ड्रिल खणताना आपण काळ्या खडकाचा तळ कधी गाठला हे कळलंच नाही. जेव्हा कळालं, तेव्हा एक ऐतिहासिक घटना घडली होती. ऐतिहासिक कसली? खरं तर अति अति अति ऐतिहासिक. कारण जे घडलं ते केवळ काही शे वर्षांत पहिल्यांदा घडत नव्हतं, हजार वर्षांतलं नव्हतं, काही लाख वर्षांतलं नव्हतंतर तब्बल साडेपाच ते साडेसहा कोटी वर्षांत पहिल्यांदा घडलं होतं.

आपल्या खडकाच्या खाली त्याचाच भाऊबंद असलेला ग्रॅनाईट आहे. भाऊबंद अशासाठी म्हणायचं की हे दोन्ही खडक लाव्हारसापासून तयार झाले आहेत. आपला खडक गडद रंगाचा, तर ग्रॅनाईट काहीसा फिक्या रंगाचा. याशिवाय नाइसेसखडकही मिळाले. ते रूपांतरित प्रकार. म्हणजे पृथ्वीच्या पोटात उष्णता व दाब यांच्यामुळे तयार होणारे.

कोयना परिसरातील ड्रिलमधून बाहेर आलेल्या खडकांचे नमुने..

कोयना परिसरातील ड्रिलमधून बाहेर आलेल्या खडकांचे नमुने..

हे गुपित उलगडणं इतकं महत्त्वाचं का?? तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्याच भूशास्त्राची नव्याने ओळख झाली.

प्रमुख गोष्टी दोन.

. एकतर आपल्या खडकाची जाडी. याबाबत आतापर्यंतचे समज वेगळे होते. त्याची जाडी समजली जात होतीसाधारणत: तीन किलोमीटर. ती प्रत्यक्षात निघाली फक्त ९०० मीटर. कुठं शेदोनशे मीटरने कमीजास्त, खडकाची कुठं कशी झीज झाली त्याप्रमाणे. पण ती तीन किलोमीटर इतकी नक्कीच नाही.

ढोबळमानाने सांगायचं तर आपला खडक समुद्रसपाटीच्या खाली तीनशे मीटरपर्यंत आहे, त्याच्या खाली दुसरे खडक आहेत.. त्यामुळे कित्येक वर्षांची समजूत निकालात निघाली, आम्हाला खरीखुरी माहिती मिळाली.

. दुसऱ्या बाबतीत, म्हटलं तर निराशा झाली. आपल्या खडकाखाली काय असेल, याबाबत अनेक तर्क होते. गाळाचे खडक असतील का? त्यात खनिज तेल मिळेल का? अशीसुद्धा एक शक्यता व्यक्त केली जायची. पण खाली ग्रॅनाईट व नाईसेस मिळाल्यामुळे आता ती शक्यता कायमची मावळली. निदान कोयनेच्या प्रयोगाने तरी हेच सांगितलंय.

हे फायदेतोटे आहेतच, पण सर्वांत “एक्साइटिंग” गोष्ट म्हणजे आपण आपल्या खडकाचा तळ गाठला. पण हे इथंच संपत नाही. कारण हा कोयनेच्या भूकंपअभ्यासाचा पहिला टप्पा आहे. “ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…” पुढच्या टप्प्यात कोयनेच्या परिसरात तब्बल सात किलोमीटर खोलीचे ड्रिल घेतले जाणार आहेखल्लास!!

कोयना धरणाच्या परिसरात दीड किलोमीटर खोलीची ड्रिल घेतली जात आहेत...

कोयना धरणाच्या परिसरात दीड किलोमीटर खोलीची ड्रिल घेतली जात आहेत…

आणि गंमत माहितीए? हे ड्रिल कुठं घ्यायचं हे ठरवण्यासाठीच आता दीड किलोमीटरची ड्रिल्स घेतली गेली. तिथे भूकंपमापक यंत्रणा बसवली की ठरेलसात किलोमीटर खोलीचं ड्रिल नेमकं कुठं घ्यायचं.

विचार करा.. दीड किलोमीटच्या “ड्रिल्स”नी इतकी माहिती दिली. मग सात किलोमीटर खोलीपर्यंत गेल्यावर काय काय आढळेल?

अहो, ही कल्पनाच रोमांचित करणारी आहे !

अभिजित घोरपडे

(पण मित्रांनो, मूळ प्रश्न उरतोच कीधरणाचा आणि भूकंपाचा संबंध खरंच असतो का..?

काय? माहीत नाही…?

अजून दोनच दिवस वाट पाहा आणि इथंच वाचा

कोयना भूकंप पुराण ३“)

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

एका रहस्याच्या शोधात.. (कोयना भूकंप पुराण १)

कोयना धरणाजवळ निसर्गातल्या एका रहस्याचा शोध घेतला जातोय. पण एकाचा शोध घेताना भलतीच गोष्ट हाती लागावी.. अशा प्रमाणे दुसरंच रहस्य उलगडलं. ध्यानी मनी नसताना अचानक समोर येऊन उभं राहावं, अगदी तस्सं! महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या प्रत्येकाला ते माहीत असायलाच पाहिजेपण खरंच किती जणांना त्याची कल्पना आहे??

– अभिजित घोरपडे

कोयना धरण

कोयना धरण

कोयनेचा भूकंपहा सर्वांच्याच कुतुहलाचा विषय. ज्याला त्यातलं कळतं तो त्याच्याबद्दल बोलतोच, पण ज्याला काही कळत नाही तोसुद्धा इकडचंतिकडचं ऐकून मतं मांडतो, तीसुद्धा ठासून ! या विषयाने काहींना प्रसिद्धी मिळवून दिली, तर काहींना त्याच्या अभ्यासासाठी बराच पैसा दिला.. याच भूकंपामुळे काहींची करियरसुद्धा घडली.

पण एवढं करून काय?… गमतीचा भाग असा की, मूळ प्रश्न अजूनही कायम आहे.

प्रश्न कोणता?… तर कोयना धरणाच्या विस्तृत जलाशयामुळे भूकंप होतात का किंवा भूकंप होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते का?

११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना धरणाजवळ आतापर्यंतचा सर्वांत मोठा भूकंप झाला. त्याला आता ४६ वर्षे उलटून गेली, तरीही त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं नेमकेपणाने मिळालेली नाहीत. कदाचित आणखी काही दशकं ती मिळणारही नाहीत..

या प्रश्नाची चर्चा नंतर करूच, पण आधी थोडं या गोंधळातून बाहेर आलेल्या रहस्याबद्दल!

हैदराबादला एक महत्त्वाची संस्था आहेएन.जी.आर.आय. तिचं संपूर्ण नाव, नॅशनल जीओफिजिकल रीसर्च इन्स्टिट्यूट अर्थात राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्था! या संस्थेनं सतत एक धोशा लावलाय, तो म्हणजेकोयनेतील भूकंपांचा धरणाच्या पाणीसाठ्याशी संबंध आहे. याच दृष्टिने त्यांनी संशोधन केलं. ते संशोधन वैज्ञानिक समुदायापुढं मांडलं. त्यावर टीकाटिप्पणी झाली. तरीही ही संस्थेनं हा मुद्दा सातत्यानं लावून धरला आहे. त्याला आता फळ आलंय. खुद्द केंद्र सरकारनं त्यात लक्ष घालून अभ्यासासाठी निधी उपलब्ध करून दिलाय. आतापर्यंत ४५० कोटी रुपये मंजूर झालेत.. पुढे आणखीही होतील. तिथले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. हे डॉ. राव नुकतेच पुण्यात आलेले असताना त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि या प्रकल्पाची सविस्तर माहिती झाली.

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या अभ्यासासाठी खोलवर ड्रिल घेण्याचे काम सुरू आहे...

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या अभ्यासासाठी खोलवर ड्रिल घेण्याचे काम सुरू आहे…

विषय तोचकोयना धरणाच्या जलाशयाचा भूकंपाशी संबंध आहे का..? पण त्यासाठीचा अभ्यास वरवरचा नसेल. प्रत्यक्ष भूगर्भात जाऊन निरीक्षणं घेतली जाणार आहेत. सुरुवातीला कोयना धरणाच्या चहूबाजूंनी, दहा ठिकाणी ड्रिलमारली जात आहेत. काही झालीत, उरलेली पुढच्या काही महिन्यांत पूर्ण होतील. त्यांची खोली असेल, साधारणत: १५०० मीटर म्हणजे दीड किलोमीटर. ही ड्रिलघेतल्यावर तितक्या खाली भूकंपमापक आणि जमिनीत होणाऱ्या हालचाली टिपणारी यंत्रणा ठेवली जाणार आहे. त्याद्वारे अनेक नवनव्या गोष्टी माहीत होतील, त्यामुळे कोयना धरणाचा भूकंपाशी संबंध आहे का, याच्या उत्तराजवळ पोहोचता येईल.

ही ड्रिलखणल्यावर त्यातून जे काही बाहेर आलंय.. ते भूकंप अभ्यासाच्या मूळ उद्देशापेक्षाही रंजक आहे. त्याच्यामुळे तब्बल पाचसहा कोटी वर्षांपूर्वीपासून जे झाकलेलं आहे, त्याच्यावरचा पडदा पहिल्यांदाच दूर झाला. आणि खाली दडलेलं रहस्य अलगद बाहेर आलं.

काय आहे हे रहस्य?… आपण ज्या खडकावर राहतो, तो आहे काळा पाषाण अर्थात बेसॉल्ट! ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस थंड झाल्यामुळे त्याची निर्मिती झाली. पण हा काळा पाषाण तयार झाला, त्याच्या आधीसुद्धा आपल्या भूमीत खडक होतेच की. ते कोणते असावेत, याबाबत बरेच अंदाज बांधले जात होते. पण प्रत्यक्षात खाली काय आहे, याचा उलगडा अद्याप झाला नव्हता. कारण आपल्या खडकाची जाडी सुमारे तीन किलोमीटर इतकी असावी असं मानलं जात होतं. ती काही ठिकाणी कमी आहे, तर काही ठिकाणी जास्त. तरीसुद्धा या काळ्या पाषाणाच्या तळापर्यंत जाणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे त्याच्या खाली नेमकं काय आहे, हे माहीत व्हायला मार्गच नव्हता.

काळ्या पाषाणाच्या खाली असलेला ग्रॅनाईट आणि नाईसेस या खडकांचे पुरावे सापडले आहेत.

काळ्या पाषाणाच्या खाली असलेला ग्रॅनाईट आणि नाईसेस या खडकांचे पुरावे सापडले आहेत.

कोयनेतील भूकंपाच्या अभ्यासाच्या निमित्ताने जे ड्रिलखणले गेले, त्याद्वारे पहिल्यांदाच आपल्या खडकाचा तळ गाठणे शक्य झाले. त्याच्या तळाशी असलेल्या खडकांचे नमुनेसुद्धा आपल्या हाती लागले. त्यात ग्रॅनाईटहा अग्निजन्य खडक आणि काही नाइसेसप्रकारचे रूपांतरित खडक असल्याचे आता आपल्याला ठामपणे माहीत झालं आहे.

(पण हे गुपित उलगडल्यामुळे काय बरंवाईट झालंय..?

समजून घ्यायचंय..?

फक्त दोनच दिवस वाट पाहा..

कुणी तरी म्हटलंय ना–  सब्र का फल मीठा होता है !)

अभिजित घोरपडे

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

( पुढच्या पोस्टमध्ये जरूर वाचा…   कोयना भूकंप पुराण- २ )

किती ही पाणीपट्टी !!

शेंबड्या पोराच्या चॉकलेटवर आम्ही रोज कितीतरी पैसे खर्च करतो. पण पुरेशा पाण्यासाठी रोज एक रुपया द्यायला खळखळ करतो. आमच्या वतीने गळे काढणारे नगरसेवक, सेवाभावी संस्था व माध्यमं हे तरी हिशेब समजून घेतात का? कुठं जात आहोत आपण?

पाणी.. रस्त्यावरून वाहणारे जीवन ??

पाणी.. रस्त्यावरून वाहणारे जीवन ??

दोन रुपये आणि पन्नास पैसे! या अडीच रुपयांना आज किंमत काय? काय मिळतं इतक्या पैशात?.. एक कटिंग चहा, वडापाव, एक केळं, संत्रं, फुटाण्याची पुडी, बिस्टिकचा लहानात लहान पुडा, क्रिम रोल, एक सिगारेट, पान मसाल्याची पुडी, स्कूटरच्या दोन चाकांत हवा, एक दाढी, दाढी करण्यासाठी ब्लेड???

कोणी विचारत नाही अडीच रुपयांना. इतकी टीप ठेवली तर एस.टी. कॅन्टिनमधला वेटरसुद्धाहात लावत नाही आता. साध्यातलं साधं चॉकलेट खायचं म्हटलं तरी पाच रुपये मोजावे लागतात.. पण दोस्तांनो, विरोधाभास किती पाहाआपल्याला शुद्ध प्यायचं पाणी एवढ्या पैशात मिळतं. एकट्याला नाही अख्ख्या कुटुंबाला. तेसुद्धा भरपूर.. दोनदा अंघोळ करता येईल, वाट्टेल तेवढ्यांदा संडासच्या फ्लशमध्ये सोडता येईल इतकं. अट एकच. तुम्ही पिंपरीचिंचवड महापालिकेच्या हद्दीत राहत असला पाहिजे.

इथं अडीच रुपयात ,००० लिटर शुद्ध पाणी घरपोच मिळतं. शहरी माणसाला घरगुती वापरासाठी जास्तीत जास्त १३५ लिटर पाणी लागतं, असं मानलं जातं. आता हा आकडा आणखी खाली आला आहे. पण आपण श्रीमंतआहोत.. त्यामुळे माणसी २०० लिटर लागतं, असं मानू. म्हणजे पाच जणांच्या कुटुंबाला दररोज अडीच रुपयाचं पाणी. एका माणसाला पन्नास पैसे. स्वच्छशुद्ध, आपल्या सर्व गरजा भागवणाऱ्या पाण्यासाठी एक माणूस पन्नास पैसे मोजतो.. हल्ली भिकारीसुद्धा पन्नास पैसे घेत नाही. हे नाणं व्यवहारातूनही निघून जायच्या वाटेवर आहेत. हो,ती आदिली मोजतो आपण पाण्यासाठी!

५० पैशाला आता कोण विचारतं?

५० पैशाला आता कोण विचारतं?

पिंपरीचिंचवड शहरातलं गरिबातलं गरीब घर घ्या. शेंबड्या पोराच्या चॉकलेटवर रोजचा किती खर्च होतो? त्याच्या दोनपाच टक्केसुद्धा पैसे पाण्यासाठी द्यावे लागत नाहीत आपल्याला. बिसलेरीच्या एका बाटलीला आपण जे १५ रुपये मोजतो, तेवढ्यात महिन्याभराचं पाणी मिळतं आपल्यालाऐकावं ते नवलच ना!

गंमत अशी. हे पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचा खर्च तरी निघतो का यातून?.. अजिबात नाही. त्याचा हिशेब साधा सरळ आहे. महापालिकेला पाणी अतिशय नाममात्र दराने मिळतं. फुकटच म्हणा ना. महापालिकेला खर्च येतो, हे पाणी शुद्ध करण्यासाठी आणि ते घरोघरी पोहोचवण्यासाठी. एकूण खर्च आहे, .९५ रुपये. प्रत्येक हजार लिटरला. आपण मोजतो, हजार लिटरला अडीच रुपये. याचा अर्थ, पाणी पोहोचवण्याची नाममात्र किंमतही आपण मोजत नाही. त्याच्या निम्मीसुद्धा देत नाही. तरीही आपण थाटात म्हणतो, पाणी मौल्यवान आहे. पाणी हे जीवन आहे

नमनाला हे घडीभर पाणी (नव्हे तेल!) कशासाठी? कारणही तसंच आहे. अलीकडे याच पिंपरीचिंचवडमध्ये पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा प्रस्ताव होता. अडीच रुपयांऐवजी साधारणपणे पाच रुपये आकारावेत, असं सुचवलं होतं. एक हजार लिटरला. जेणेकरून पाणीपुरवठा व्यवस्थेच्या देखभालदुरुस्तीचा खर्च निघेल. सध्या संगणकीकृत यंत्रणा आहे, तिचा पुढचा टप्पा गाठता येईल. या दरवाढीमुळे एका माणसाला किती पैसे मोजावे लागतील?.. पन्नास पैशांऐवजी एक रुपया!

पाण्यासाठी आपण फारच कमी किमत मोजतो..

पाण्यासाठी आपण फारच कमी किमत मोजतो..

पण गंमत अशी की हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.. का? तर लोकांवर कराचा बोजा वाढतो म्हणून. खरं कारण वेगळंच आहे.. असं सांगतात. दरवाढ हे दाखवायचं कारण! निर्णय घेणाऱ्यांचे हात ओले” (पाण्याने नव्हे!) झाले नाहीत.. हे खरं कारण. पाण्यासाठीसुद्धा ओल्यासुक्याचे निर्लज्ज व्यवहार इथं चालतात, हे इथलं नागडं वास्तव! असोपाणीपट्टीच्या दरवाढीचं निमित्त करून सभेत नगरसेवक गोंधळ घालतात. पण दरवाम्हणजे नेमकी किती याचा विचार कोण करतो? लोकांचे कैवारी असल्याचं दाखवायचं, पण नेमका किती बोजा पडणार, याची माहिती आहे का कुणाला? काही स्वयंसेवी संस्थासुद्धा दरवाढीचा मुद्दा घेऊन नाचतात. प्रसिद्धिमाध्यमंसुद्धा नागरिकांवर अन्याय झाल्याचं मांडतात..

Pani06

आपण पाण्याची काहीच किंमत करत नाही..

पण अन्याय म्हणजे काय? आणि बोजा म्हणजे किती? हे सविस्तकोणीच मांडत नाही. कदाचित लक्षातही घेत नाही. नाहीतर दिवसभराच्या पाण्यासाठी एक रुपया मोजायला लागणार.. यावरून एवढा गदारोळ व्हायचं कारण ते काय? वाट्टेल त्याच्यावर पैसे घालवायला आम्ही तयार असतो, पण पाण्यासाठी एक रुपया मोजायला एवढी खळखळ! खरंतर लोकांना हे समजून सांगितलं तर त्यांच्याकडून फारसा विरोध होणार नाही. पण त्याच्या वतीने भांडणारे मात्र मोठ्याने गळे काढतात.

आपले प्राधान्यक्रम ठरवण्याची आज नितांत गरज आहे. पाण्याची व्यवस्था निर्धोकपणे चालावी, असे वाटत असेल तर तिच्या देखभालदुरुस्तीसाठी पुरेसे पैसे द्यावेच लागतील. व्यवस्थेची दुरुस्ती झाली नाही तर पाण्याची गळती होते. त्यातून खूप पाणी वाया जातं. आपल्या देशातली शहरं तर त्यासाठी कुप्रसिद्धआहेत. सरासरी ४० टक्क्यांपर्यंत पाणी वाया जात असल्याचंबोललंजातं . (बोललं जातं अशासाठी म्हणायचं की, नेमका आकडाही माहीत नाही आम्हाला. सारेच अंदाज!) काही ठिकाणी हा आकडा ६० टक्क्यांपर्यंतही पोहोचतो. म्हणजे १०० लिटर द्यायचं. त्यापैकी फक्त ४० लिटर पोहोचवायचं तिथं जाणार. हे आताच्या काळात परवडणारं नाही. त्यासाठी काही तरी किंमत मोजावीच लागेल.. ही रक्कम बोजा वाटावी इतकी नाहीच मुळी.

किती पाण्याची गळती होते याची आपल्याला कल्पनाच नाही..

किती पाण्याची गळती होते याची आपल्याला कल्पनाच नाही..

दुसरी बाब अशी की, पाणी हा मर्यादित स्रोत आहे. अलीकडं त्याची टंचाई जाणवू लागली आहे. ती वाढतच जाण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पाण्याच्या वापरावर किमान काही बंधनं आणावीलागतील. पाण्याची किंमत हाही त्याचा एक मार्ग असायला हवा. अगदी जीवनावश्यक म्हणून लागणारं काही पाणी मोफत द्या. त्याहून जास्त वापरणाऱ्यांना काही किंमत आकारा. आणि त्याहून जास्त वापरणाऱ्यांना खूपच जास्त दर असावेत. जेणेकरून विनाकारण पाणी वापरणाऱ्यांवर अंकुश येईल. नुसतेच जास्त पैसे आकारून चालणार नाही, तर विशिष्ट मर्यादेनंतर पाणीवापरावर बंदी असावी. तो गुन्हाही ठरावा.

जीवनावश्यक पाणी किती? याबाबत काही निकष आहेत. शहरांसाठी, ग्रामीण भागासाठीसुद्धा. आपल्या गरजा व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन त्यात काही बदल करता येतील. पण हे निकष असायलाच हवेत. त्यांच्याशिवाय काही करणं हा नुसता सावळा गोंधळ ठरेल. म्हणूनच पुरेशी पाणीपट्टी देणं गरजेचं ठरतं. सर्व गरजा भागवणाऱ्या शुद्ध पाण्यासाठी रोजचा एक रुपया.. इतकं स्वस्त जगात दुसरं काही असू शकतं..? हा अन्याय वाटत असेल तर आपण नादान आहोत. यासाठी गळा काढणारे तर त्याहून मोठे भोंदू आहेतआपण असेच वागलो तर शिस्त बिघडेल. मग पाणी हे जीवन नव्हे, मरण ठरेल!

– अभिजित घोरपडे

(ता..-

पिंपरीचिंचवड हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सगळीकडे हाच सावळा गोंधळ सुरू आहे. पिंपरीचिंचवडचे पाण्याचे दर तुलनेने जास्त आहेत. पुण्यात ते यापेक्षा कमी आहेत. मुंबईसुद्धा याला अपवाद नाही. सर्वच ठिकाणी पाणीपट्टीत वाढ करण्याचा मुद्दा येतो, तेव्हा तो अन्याय वाटतो. पुण्यातही याला विरोध झाला, होतो. इथं तर कोणाला पाण्याचे मीटरच नको आहेत. शेतीला मीटरविना पाणी दिलं जातं, यावर गळ्याच्या शिरा ताणून टीका करायची, पण मग पुण्यासारख्या शहरांचं काय??)

महाबळेश्वरच्या थंडीचा लोचा…

महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण. हिवाळ्यात इथं बर्फ साचल्याच्या बातम्या येतात, त्याच वेळी हवामान विभागाच्या नोंदी तिथं १० / ११ अंश सेल्सिअस तापमान असल्याचं सांगतात.. हे असं कसं ? लोक हवामान खात्याची अक्कल काढतात.. पण हे असं का घडतं ? हे गौडबंगाल आहे तरी काय ??

हिवाळ्यात वेण्णा तलावाच्या परिसरात बर्फ साचल्याच्या बातम्या येतात…

कालचीच गोष्ट. महाबळेश्वरचं कमीत कमी तापमान होतं ११.५ अंश, तर पुण्याचं होतं ८.१ अंश.. पुन्हा आज पाहिलं, तर महाबळेश्वर १४.६ आणि पुणं १०.३ अंश..

याचा अर्थ पुणं महाबळेश्वरपेक्षा थंड.. हे जरा उलटंच झालं म्हणायचं.. नाही का???

भूगोलाचं पुस्तक तर सांगतं, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. पण हवामान खात्याचे आकडे वेगळंच काही तरी सांगतात. आकड्यांवर विश्वास ठेवायचा तर, महाबळेश्वरपेक्षा पुणे, नगर, नाशिक, सातारा ही ठिकाणं थंड आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत तर सावळा गोंधळ असतो. महाबळेश्वरमध्ये बर्फ साचल्याच्या बातम्या येतात. त्याच वेळी हवामान विभागाच्या नोंदी सांगतात, तिथं १० / ११ अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे.. हे असं कसं? मग लोक हवामान खात्याची अक्कल काढतात. स्वाभाविकच आहे ते. बर्फ साचतं, तेव्हा तिथं तापमान १० अंश असेलच कसं?

हवामानातली विविधता मी जाणून होतो. डोंगरी भागात तर ती खूप जास्त असते, हेही माहीत होतं. पण महाबळेश्वरच्या थंडीचं हे गुपित उकलण्यासाठी त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. पुणे वेधशाळेत महाबळेश्वरच्या तापमानाच्या जुन्या नोंदी चाळल्या. मग महाबळेश्वर गाठलं. तिथल्या वेधशाळेत पोहोचलो. ती आहे, तिथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात. ‘सर माल्कम बाबा’ नावाच्या स्तंभाला लागून. हे महाबळेश्वरमधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच ठिकाण. तिथलं माल्कम बाबा प्रकरणही भन्नाट आहे. त्याच्या नावाने तिथं उत्सव भरतो. त्याला कोंबडं-दारूसुद्धा वाहिली जाते.  असो..

वेधशाळेच्या इमारतीवरून संपूर्ण महाबळेश्वर दिसतं. डोंगर-दऱ्या, तलाव, वाऱ्याला अडवणारी टेकाडं, झाडी, शेतं.. जवळपास इतकी विविधता. ती तापमानातही उतरते. मग समजतं, इथं ठिकठिकाणी वेगवेगळं तापमान असणार! तिथल्या तापमानाची नोंद जिथं होते, ते “ऐतिहासिक” तापमापक पाहिले. सोबत त्या वेधशाळेचा प्रमुख अधिकारी विशाल रामचंद्रन होता. तरुण, उत्साही अधिकारी. त्याच्याकडून बरंच काही ऐकायला मिळालं.

हवामान विभागाची महाबळेश्वर येथील वेधशाळा..

महाबळेश्वरमध्ये जागोजागी वेगवेगळं तापमान आढळतं. एकीकडं बर्फ साचतं, तर दुसरीकडे वातावरण उबदार असतं.. हे एकाच वेळी घडतं. बर्फ साचतं म्हणजे, तिथले दवबिंदू गोठतात. त्याची ठिकाणं ठरलेली आहेत- वेण्णा तलाव, लिंगमळा धबधबा, गहू गेरवा संशोधन केंद्र. तलावातील बोटींवर, गवताच्या पात्यांवर दवबिंदू जमा होतात. ते थंडीमुळं गोठतात. ते गोठतात याचा अर्थ तिथं थोड्या काळासाठी का होईना, पण तापमान शून्य अंशांपर्यंत पोहोचतं.  हे घडतं, सकाळी सूर्य उगवताना किंवा पहाटेच्या वेळी. त्यामुळे पर्यटकांना ते सहज पाहायला मिळतं. स्वाभाविकपणे त्याची भरपूर चर्चाही होते.

गंमत म्हणजे त्याच वेळी वेधशाळेजवळ म्हणजे माल्कम बाबा स्तंभाजवळ वेगळी स्थिती असते. तिथं पारा खरंच १०-११ अशांच्या जवळपास असतो. म्हणजे ‘बर्फ साचतं’ हे वास्तव आहे आणि १०-११ अंश तापमान हेसुद्धा!.. पण मग प्रश्न उरतो, हा फरक का??

त्याचीही विशिष्ट कारणं आहेत.

Mahableshwar2
महाळेश्वरच्या वेधशाळेतील उपकरणे..Mahableshwar4

महाबळेश्वरमधली वेधशाळा आणि वेण्णा तलाव इथं तापमानात फरक असतो. विशाल याने काही कारणं सांगितली, अगदी सोप्या पद्धतीनं..

१. सूर्यप्रकाश (सन शाईन)-

वेधशाळेचं ठिकाण उंचावर आहे. तिथं जास्त वेळ सूर्याचं दर्शन होतं, सूर्यप्रकाश जास्त काळ असतो. त्यामानाने वेण्णा तलाव खोलगट भागात आहे. तिथं दिवसासुद्धा पूर्ण वेळ ऊन पडत नाही. तिथं सूर्यप्रकाश मिळण्याचं प्रमाण तुलनेत कमी आहे.

२. सूर्यास्ताच्या वेळा-

वेधशाळेचं ठिकाण (सर माल्कम बाबा) उंचावर आहे. ते वेण्णा तलावाच्या तुलनेत दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैर्ऋत्य दिशेला आहे. त्यामुळे तिथं तुलनेत सूर्यास्त उशिरा होतो; वेण्णा तलावाच्या मानाने १५ मिनिटं ते अर्धा तास उशिरा. म्हणून वेधशाळेच्या ठिकाणाला जास्त उष्णता मिळते. तिथं तापमान जास्त राहतं.

३. भूरचना व वाऱ्यांचा प्रवाह-

थंड वारे मुख्यत: उत्तरेकडून येतात. ते वेण्णा तलाव व जवळच्या खोलगट भागात उतरतात, तेव्हा अधिक बोचरे बनतात. पुढं वेधशाळेपर्यंत, माल्कम बाबा टेकडीवर येईपर्यंत काहीसे उबदार बनतात.

महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा तलाव

महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा तलाव

४. तलाव-

माल्कम बाबा टेकडी व वेण्णा तलाव या दोन ठिकाणांमधील आणखी एक फरक म्हणजे पाण्याचं सानिध्य. वेण्णा तलाव हा जलाशय आहे. त्यामुळे परिसरातील गारवा वाढतो.

५. पिकांची लागवड-

वेण्णा तलावाच्या खालच्या बाजूला स्ट्रॉबेरी व इतर पिके घेतली जातात . त्यांना पाणी दिलं जातं. त्यामुळेही त्या परिसरात गारवा असतो. अशी स्थिती वेधशाळेजवळ नाही.

महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

६. रासायनिक खतं-

या पिकांना पाण्याबरोबरच खतंसुद्धा दिली जातात, ती फवारल्यामुळेसुद्धा परिसरातील तापमान काही प्रमाणात कमी होतं.

पाचगणी पूर्वेला आहे. महाबळेश्वरची भूरचना अशी आहे की, पाचगणीकडून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जास्त गारठा असतो. तितका तो विरुद्ध बाजूला म्हणजे पश्चिमेला नसतो.

विशाल राहतो पाचगणीला. त्याने वैयक्तिक अनुभव सांगितला. तो सकाळी लवकर ऑफिसला येतो. त्याला वेण्णा तलावाजवळून यावं लागतं. तिथून येताना खूप थंडी वाजते, पण तलाव ओलांडून आलं की ती कमी होते. वेधशाळेजवळ तर चांगलीच ऊब जाणवते.

महाबळेश्वरमधील डोंगररांगा…

डोंगराळ प्रदेशाचं वैशिष्ट्यच हे. अगदी जवळच्या अंतरावरसुद्धा तापमानात बरीच तफावत असते.. तेच महाबळेश्वरमध्येही अनुभवायला मिळतं. म्हणून तर तिथं एकीकडे बर्फ साचतं अन् दुसरीकडे १०-११ अंश तापमान असतं.. हे दोन्ही एकाच वेळी!

(ता.क.–  मागं एकदा आमची अशीच फसगत झाली. महाबळेश्वरमध्ये बर्फ साचल्याचं ऐकायला मिळालं. बर्फ पाहण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या काही सहकाऱ्यांसोबत रात्री महाबळेश्वरला पोहोचलो. हवेत गारवा होता. पण सकाळी उठलो तर ना बर्फ-ना थंडीचा कडाका. दुपारी तर उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता.. काय करणार ? हात हलवत मघारी परतलो. पुढं बरेच दिवस अधून मधून तिथली थंडी आणि बर्फाचा विषय चघळत खळखळून हसत राहिलो.)

(सर्व छायाचित्रे- c@ अभिजित घोरपडे)