…डेटॉल डेटॉल हो !

गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू  ‘पचवायची ‘ क्षमता शरीरात निर्माण होते . त्यासाठी ‘हँड सॅनिटायझर ‘चा अट्टाहास  करण्यापेक्षा स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं . सॅनिटायझरवर पैसे परी पैसे जातात, शिवाय रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन अपाय होतो तो वेगळाच. हे प्रकरण इथंच थांबत नाही तर ते वारंवार वापरून त्वचेवरील उपयुक्त जीवाणूंचा थर निघून जातो, त्वचा कोरडी पडते आणि ती बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्याला बळी पडते… तरीही सॅनिटायझरचा सोस कशासाठी?

– अभिजित घोरपडे

hand-sanitizer1

हँड सॅनिटायझर… किती फायद्याचा, किती तोट्याचा?

आमचा इंद्रजीत. वय वर्षे चार. जाहिरातींच्या लयबद्ध ‘झिंगल’ ऐकल्या की टीव्हीकडं धावतो. आयपीएलच्या गेल्या हंगामातल्या ‘…वाह भाई वाह’ या झिंगलनं तर त्याला वेड लावलं होतं. ती गुणगुणत नाचत राहायचा. मग तो आणि मी मिळून त्यातून वेगळी गमतीशीर कडवी रचायचो.. आणि मग मोठ्यानी हसायचो.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका झिंगलनं त्याचं लक्ष वेधून घेतलंय ‘…डेटॉल डेटॉल हो!’ जाहिरातीतली ती लहान मुलं आणि वर ही झिंगल. आजूबाजूला कानोसा घेतल्यावर समजलं की, घराघरातली अनेक लहान मुलं-मुली या झिंगलची फॅन झालीत. शाळेच्या गणवेशातली दोन मुलं. बाहेर आईस्क्रीम घ्यायला हात पुढं करतात. त्यातल्या एकाला आईचे बोल आठवतात- हात धुतल्याशिवाय काही खायचं नाही. मग तो बॅगेतून ‘हँड सॅनिटायझर’ बाहेर काढतो आणि त्याचे चार थेंब हातावर घेऊन हातावर चोळतो. मग आईस्क्रीमवर ताव मारतो.. पार्श्वभूमीवर झिंगल सुरूच असते.

रुग्णालय ते मंगल कार्यालय…

आतापर्यंत फक्त डॉक्टरांकडं असा सॅनिटायझर पाहायला मिळायचा. तेव्हा त्याच्याबद्दल आकर्षणही वाटायचं. पण आता त्याचा प्रसार सर्वत्र झालाय. गेल्याच महिन्यातलं उदाहरण. पुण्यात “शुभारंभ लॉन्स” या मंगल कार्यालयात एका लग्नासाठी गेलो होतो. जेवणाची उत्तम व्यवस्था होती. जेवणाच्या हॉलमध्ये प्रवेश करताच हात धुण्यासाठी पिंप ठेवलेले होते, शिवाय लिक्विड हँडवॉश. हात धुवून ताट घ्यायला गेलो, तर तिथं दोन मुली. मी ताट उचलणार, इतक्यात म्हणाल्या, “एक्सक्यूज मी सर, सॅनिटायझर?” …मी क्षणभर गोंधळलो. मग नकार देऊन ताट उचललं. जेवण संपेपर्यंत मनात विचार होता- च्यायला, हात धुतल्यावर परत सॅनिटायझर कशाला? अजूनही मनाच्या कोपऱ्यात हा प्रश्न कायम आहे.

हे ‘सॅनिटायझर’ प्रकरण अजूनही डोक्यातून गेलेलं नाही. त्यामुळे मुद्दाम काही डॉक्टरांशी बोललो. त्यापैकी एक आमचे वरिष्ठ मित्र. साहित्यिक असलेले आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. सदानंद बोरसे. ‘जेवणापूर्वी साबणाने हात धुतल्यावर या सॅनिटायझरची काहीही आवश्यकता नाही. जेवढी अति काळजी घ्याल, तितकी रोगप्रतिकारक क्षमता कमी होणार हे निश्चित…’ इति डॉ.बोरसे. डॉक्टरांनी रुग्णाला हात लावल्यावर सॅनिटायझर वापरणं ठीक, पण आपण? हा प्रश्न पिच्छा सोडत नव्हता. कारण भविष्यात याचे अनेक परिणाम संभवतात. बाटलीबंद पाणी पिणं हे आता जसं ‘स्टेटस् सिंबॉल’ झालंय, त्याच मार्गावर हे सॅनिटायझर प्रकरण घेऊन जाईल. मग पुढं पाण्याच्या बाटलीबरोबर सॅनिटायझरची बाटलीसुद्धा घेऊन फिरावं लागेल, नाहीतर तुम्हाला मागास ठरवलं जाईल.. या प्रकरणाचे याच्याही पलीकडं गंभीर परिणाम आहेत.

hand-sanitizer3

जीवाणूंशिवाय पोटातील अन्न पचू शकत नाही…

खोटं सांगा, नाहीतर अर्धसत्य सांगा

जाहिराती किती अर्धसत्य किंवा खोटी माहिती ठोकून देतात, याचं हे उत्तम उदाहरण. अशा उत्पादनांच्या जाहिराती बऱ्याचदा तुम्हाला जीवाणूंची (बॅक्टेरिया) भीती घालत असतात. त्यांचा बागूलबुवा उभा करायचा आणि आपली उत्पादनं खपवायची.. हा त्यांचा धंदा. पण जीवाणू आपल्याला जगण्यासाठी किती उपयुक्त ठरतात, हे मात्र बेमालूमपणे लपवून ठेवतात. कल्पना आहे का- आपल्या शरीरावर कुठं-कुठं असतात हे जीवाणू? आणि किती गरजेचे असतात ते? जीवाणू संपूर्ण शरीरावर आणि पोटातसुद्धा ते असतात. इथं सगळीकडं त्रासदायक जीवाणूंपेक्षा उपयुक्त जीवाणूंची संख्या जास्त असते. त्यामुळेच तर आपल्या शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित सुरू राहतात. उदाहरणच द्यायचं तर पोटात जीवाणू नसतील तर आपण खाल्लेल्या अन्नाचा एकही घास पचू शकणार नाही. कारण पचण्याची क्रिया पोटातील जीवाणूंमुळेच पार पडते.. त्वचेवरचे जीवाणूसुद्धा बाहेरच्या वातावरणापासून आपलं संरक्षण करतात. हे वास्तव असताना जाहिराती आपल्या माथी काय मारतात?.. तर आहेत नाहीत ते जीवाणू मारून टाका!

सॅनिटायझरचा उपयोग काही प्रमाणात निश्चित आहे, पण तो काही प्रमाणातच. संसर्गजन्य आजाराची साथ पसरलेली असताना बाहेर हात धुण्याची सोय नसेल तर तो काही प्रमाणात नक्कीच उपयुक्त ठरतो. तसेच, अशा रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांसाठीही तो उपयोगाचा आहे, पण तो तेवढ्यापुरताच. त्याची सर्रास सवय लावून घेणं घातक आहे. स्पर्श केल्याने होणारा संसर्ग सॅनिटायझरमुळे टाळता येतो, पण शिंकल्यावर, खोकल्यावर किंवा इतर कारणाने हवेतून पसरणारा संसर्ग तो रोखू शकत नाही. ही त्याची मर्यादा लक्षात घ्यायला हवी. त्याचे थेट अपायही आहेत. अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ने सॅनिटायझरच्या उपयुक्ततेबाबत शंका घेतल्या आहेत आणि कंपन्यांना त्यांची उपयुक्तता सिद्ध करण्यास सांगितले आहे. सॅनिटायझर वारंवार वापरणे हे त्वचेसाठी घातक आहे, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. ( https://www.webmd.com/cold-and-flu/news/20160629/fda-asks-how-safe-is-that-hand-sanitizer )

सॅनिटायझरमुळे जीवाणू का मरतात?

सॅनिटायझरमध्ये असलेलं अल्कोहोल हे जीवाणू मारण्याचं कार्य सिद्धिस नेतं. आपण साबण आणि पाण्याने हात धुतो तेव्हा जीवाणू मरतात आणि ते पाण्यासोबत वाहून जातात. सॅनिटायझरच्या पद्धतीत मात्र अल्कोहोल त्वचेवरच थांबून राहतं. त्याचं बाष्पीभवन होतं, त्यावेळी हातावरील जीवाणू मारते जातात.  त्यासाठी सॅनिटायझरमध्ये किमान ६० टक्के अल्कोहोल असावं लागतं.

सॅनिटायझरमुळे नेमकं काय-काय होतं?

सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे त्वचा कोरडी पडते. नैसर्गिक तेल निघून जाते. सॅनिटायझरच्या वारंवार वापरामुळे त्वचेचे नैसर्गिक संरक्षणच निघून जाते. त्यामुळे कालांतराने आपले शरीर बाहेरच्या जीवाणूंच्या हल्ल्यासाठी अधिक प्रवण बनते. सॅनिटायझरमध्ये सुगंधासाठी कोणती रसायने वापरली जातात हे अनेकदा बाटलीवर लिहले जात नाही. त्याची अॅलर्जी येऊ शकते, ती त्रासदायक ठरू शकतात. हे सॅनिटायझर किती प्रमाणात वापरावं हे लहान मुलांना समजत नाही. ‘स्वच्छता, अधिक स्वच्छता…’ या हेतूने ते भसाभस वापरलं की त्याच्यामुळे होणारा त्रास आणखी वाढतो. ( https://www.annmariegianni.com/why-you-should-avoid-hand-sanitizer/ )

Staphylococcus aureauMagnification 20,000

त्वचेवर आणि शरीरात उपयुक्त जीवाणूंची संख्या नेहमीच जास्त असते..

याच्याही पुढं जाऊन माझा नेहमीचा मुद्दा म्हणजे- आपण किती नाजूक व्हायचं हे ठरवायला हवं. गेले चार जीवाणू पोटात आणि पडलो आजारी तर बिघडलं कुठं? पुढच्या वेळेला तेच जीवाणू ‘पचवायची’ क्षमता शरीरात निर्माण होते ना. आणि स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टी पाळल्या तरी भागतं की. मग कशाला हा अट्टाहास? या उत्पादनांवर पैसे गेल्याचं दु:ख आहेच, शिवाय रोगप्रतिकारकक्षमता कमी होऊन अपाय होतो ते वेगळाच.
असा काळ सोकावू द्यायचा का, हाच आपल्यासारख्या सूज्ञ जनांपुढचा प्रश्न आहे. ‘जाऊ द्या ना, त्यात काय एवढं..’ असं म्हणून हे वापरायला लागलो तर उद्या कदाचित काळ माफ करणार नाही..
एवढंच!!!

– अभिजित घोरपडे
abhighorpade@gmail.com

(या लेखात वापरलेले ‘डेटॉल’ हे उत्पादनाचे नाव प्रातिनिधिक आहे, हे मुद्दे अशा प्रकारच्या सर्वच उत्पादनांना लागू होतात.)