कोयना धरण १९६३ साली पूर्ण झालं. त्यात पाणी अडवणं सुरू झालं. पाठोपाठ तिथं भूकंपांची संख्या वाढल्याचं लक्षात आलं. चारच वर्षांनी तिथं महाराष्ट्रातला तोपर्यंतचा सर्वांत मोठा भूकंप झाला. रिश्टर मापनावर ६.५ इतका. मग चर्चा सुरू झाली, धरण आणि भूकंप यांच्या संबंधाची. खरंच त्यांचा एकमेकांशी सबंध आहे? की त्याला ओढून ताणून जोडलेला बादरायण संबंध म्हणायचं??
– अभिजित घोरपडे
भूकंप आणि धरण यांचा संबंध हा वादग्रस्त विषय. त्यात थेट दोन टोकाची मतं मांडली जातात. हे या ध्रुवावर, तर ते त्या ध्रुवावर.. अधे मधे कोणीच नाही. कुठून निर्माण झाला हा वाद?? त्याची पार्श्वभूमी रंजक तर आहेच, काहीशी रहस्यमयसुद्धा. जगाच्या इतर भागात तोपर्यंत हा विषय होताच. पण महाराष्ट्रात आला, १९६७ नंतर. त्या वर्षी ११ डिसेंबरला कोयना धरणाचा परिसर भूकंपामुळे हादरला. जमीन हादरलीच, त्याच्या जोडीने अनेक भूशास्त्रज्ञसुद्धा ! कारण या भूकंपाने अभ्यासकांच्या तेव्हापर्यंतच्या समजुतीला मोठा धक्का दिला होता.
या भूकंपाच्या आधी असे समजले जात होते की, भारताच्या द्वीपकल्पीय भागात मोठ्या भूकंपाची शक्यता नाही. हा द्वीपकल्पीय भाग म्हणजे मध्य भारतापासून दक्षिणेला असलेला साधारणत: त्रिकोणी आकाराचा भूभाग. त्यात आपला महाराष्ट्रसुद्धा येतो. हा भाग प्राचीन काळातील कठीण खडकांपासून बनलेला आहे. तिथं भूकवचाची प्रमुख कमकुवत क्षेत्रं नाहीत. त्यामुळे तिथं मोठ्या भूकंपाला वावच नाही, असे मानले जात होते. मात्र, १९६७ च्या भूकंपाने या समजुतीला मुळापासूनच हादरा दिला.
योगायोगाचा भाग म्हणा किंवा आणखी काही. या भूकंपाच्या आधी चारच वर्षांपूर्वी म्हणजे १९६३ साली कोयना धरण पूर्ण झालं. त्यात पाणी साठवायला सुरुवात झाली होती. त्यानंतर लहान–मोठ्या भूकंपांची संख्या वाढली. या नोंदी नाशिक येथील महाराष्ट्र इंजिनिअरिंग रीसर्च इन्टिट्यूट (मेरी) या संस्थेकडे सविस्तर उपलब्ध आहेत.
पाठोपाठ हा १९६७ चा भूकंप. रिश्टर मापनावर त्याची नोंद होती ६.५. विशेष म्हणजे या मोठ्या भूकंपाआधी तीनच महिन्यांपूर्वी असाच मोठा भूकंप झाला होता. तारीख होती, १३ सप्टेंबर १९६७. नोंद होती ५.८ रिश्टर. मग स्वाभाविकपणे शंका घेतली गेली, भूकंपांचा संबंध धरणातील पाणीसाठ्याशी तर नसेल?

अमेरिकेतील हूवर धरणाच्या निमित्तानेसुद्धा हा मुद्दा तापला होता- धरणामुळे भूकंप होण्यास मदत मिळते का?
पण अनेक अभ्यासक हे म्हणणं फेटाळून लावतात. त्यांच्या मते असं काही असूच नाही. त्या खडकाची ताकत किती प्रचंड! त्यावर साठणाऱ्या पाण्याचा कसला आलाय भार? माशीच्या वजनामुळं हत्ती खाली बसल्याचं ऐकलंय का कधी? धरणाच्या पाण्याचा आपल्या खालच्या खडकाशी एवढाच काय तो संबंध असू शकतो. त्यामुळे या “निरर्थक” सिद्धांतावर कशाला वेळ घालवायचा?? असा सवाल करणारे अभ्यासक आहेत. मग धरण बांधल्याचा आणि भूकंपांची संख्या वाढण्याचा काहीच संबंध नाही का?? या मुद्द्यालाही या मंडळींकडं उत्तर आहे.
ते म्हणतात, “अहो, धरण होण्यापूर्वी तिथं भूकंपांच्या नोंदी घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे लहान–मोठे भूकंप झाले तरी ते माहीत व्हायचे नाहीत. धरण बांधल्यावर बारीक–सारीक नोंदी घेणंसुरू झालं, लहान–मोठे भूकंपही नोंदवले जाऊ लागले. म्हणूनच त्यांची संख्या वाढल्याचं दिसू लागलं… प्रत्यक्षात तसं काही झालंच नाही!”
हे वाद–प्रतिवाद कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. पुढेही होत राहतील. त्यावर अभ्यास करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. त्यांची सुरुवात अगदी कोयनेच्या १९६७ सालच्या भूकंपापासून झाली. या भूकंपानंतर भारत सरकारने तज्ज्ञ समितीची स्थापना केली. त्यात भूशास्त्रज्ञ, अभियंता, भूकंपतज्ज्ञ आणि भू–भौतिकी शास्त्रज्ञांचा समावेश होता. याशिवाय युनेस्को पथकातील तज्ज्ञ म्हणून विविध देशांमधील अभ्यासकांचाही त्यात समावेश होता. या समितीने अनेक गोष्टींचा अभ्यास केला. या भूकंपाचा, धरणातील पाणीसाठ्याशी किंवा त्यातील पाण्याची पातळी कमी–जास्त होण्याशी संबंध आहे का, हा मुद्दाही त्यांनी अभ्यासला.
या समितीला त्या वेळी तरी धरणातील पाणीसाठा आणि भूकंपाचा संबंध आढळला नाही. त्यामुळे त्यांनी ही शक्यता निकालात काढली… मात्र, हैदराबादच्या नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचा (एन.जी.आर.आय.) कोयना परिसरात याबाबत अभ्यास सुरूच आहे. त्यासाठीच सात किलोमीटर खोलीचं ड्रिल खणलं जाणार आहे. त्यातून नेमकं पुढं येईल, याबाबत मोठी उत्सुकता आहे… बस्स, त्यासाठी आणखी पाचेक वर्षं धीर धरावा लागेल.
कोणास ठाऊक? कदाचित भलतंच गुपित उलगडून आपल्या समोर येऊन उभं राहील !!!
– अभिजित घोरपडे
(आपल्या भागात पूर्वी भूकंप होत नव्हते असं सांगितलं जातं, पण… शिवाजी महाराजांच्या काळातही आपल्याकडं भूकंप झाले आहेत..
त्याची माहिती करून घ्यायला विसरू नका… अर्थातच, दोन-तीन दिवसांनंतर अन् इथंच.
वाट पाहा– “कोयना भूकंप पुराण ४“)
मित्रांनो,
हा ब्लॉग वाचकांनी चांगलाच उचलून धरलाय. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे आपल्या प्रतिक्रियांची. आपल्याकडून दोन गोष्टी हव्या आहेत.
१. एक तर या ब्लॉगमध्ये काय चांगलं आहे आणि काय सुधारण्याजोगं आहे, हे सांगा.
२. दुसरं म्हणजे– हा ब्लॉग आणखी कोणापर्यंत पोहोचायला हवा आणि त्यासाठी काय करायला हवं, हेसुद्धा सुचवा.
कृपया वेळ काढून ब्लॉगवर लिहा किंवा ई-मेल पाठवा… तुमची सक्रिय साथ असेल तरच पुढं लांबचा पल्ला गाठता येईल !
www.abhijitghorpade.wordpress.com
– अभिजित घोरपडे