सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळाचा पट्टा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथं कोणे एके काळी कोकणासारखा धो–धो पाऊस पडायचा. हा इतिहास उलगडलाय– तिथं सापडणाऱ्या जांभा नावाच्या खडकाने. तिथं हा जांभा खडक जागोजागी भेटतो आणि स्वत:च्या निर्मितीची कहाणीच सांगतो! तिथं इतका पाऊस पडायचा असं सांगितलं तरी आजच्या दुष्काळी स्थितीत दिलासा वाटावा…
अभिजित घोरपडे
सांगली जिल्ह्यात विटा-खानापूर रस्त्यावर असलेल्या तामखडी गावात सर्वत्र अशी लालेलाल माती आहे. कारण एकच- तिथं आढळणारा जांभा !
दंडोबा.. सांगलीजवळ असलेला हा एक डोंगर. प्रसिद्ध पर्यटनस्थळ! निसर्गप्रेमी, भाविक, तरुण–तरुणी, ट्रेकिंग करणारे अशा साऱ्यांचं आवडतं ठिकाण. कोणी सहलीसाठी जातात, कोणी वृक्षारोपण करण्यासाठी, कोणी गुहेतील मंदिराच्या दर्शनासाठी, तर कोणी इतर कारणांसाठी… यात्रा किंवा काही सणांचे दिवस सोडले तर फारशी वर्दळ नसते. त्यात या डोंगराचा पसारा बराच मोठा. त्यामुळे थोडी–फार गर्दी असली तरी ती जाणवत नाही. वाहणारा वारा, निवांतपणा अनुभवण्यासाठीच हे एक उत्तम ठिकाण!

दंडोबावर असलेलं मंदिर असं जांभा खडकामध्ये कोरलेल्या गुहेत आहे.
मी या डोंगराद्दल बरंच ऐकलं होतं. त्यातल्या एका वेगळ्या गोष्टीचं मला कुतूहल होतं. इतकं की प्रत्यक्ष जाऊन ते कधी पाहतो, असं झालं होतं. तीन–चार वर्षांपूर्वी योग आला. आणि ते पाहून खरंच आश्चर्यचकित झालो. ऐकलं होतं, तरीही ते प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. असं काय होतं तिथं?.. तर वैशिष्ट्यपूर्ण खडक! तिथले खडक पाहिले की वाटावं, आपण कोकणात तर नाही ना! इतका वेगळा. कसला खडक?… तर लाल–पिवळ्या रंगाचा, झीज झालेला आणि पाणी वाहून जाईल असा सछिद्र. हा तर जांभा… कोकणाची ओळख असलेला!
दंडोबा डोंगराच्या माथ्याचा संपूर्ण थर याच प्रकारच्या खडकाचा. तोच खडक कोरून गुहा केलेली आणि त्या गुहेत एक मंदिर. आजूबाजूला खडकाच्या भल्या मोठ्या शिळा पडलेल्या. त्या साऱ्या लाल–पिवळ्या रंगाच्या म्हणजेच जांभ्याच्या!
माझ्यासाठी ही नवलाई होती. कारण कोकण सोडून इथं जांभा कसा? तो सुद्धा सांगलीसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात! तसा यापूर्वी पुणे जिल्ह्यात एका ठिकाणी तुरळक प्रमाणात जांभा पाहिला होता, पण हे इतके मोठाले खडक आणि संपूर्ण जांभ्याचा थर पहिल्यांदाच पाहात होतो. ते पाहून आश्चर्य वाटण्याचं कारण हे की जांभा खडक विशिष्ट हवामानातच निर्माण होतो. त्याच्यासाठी कोकणासारखी जास्त पावसाची आणि भरपूर आर्द्रता असलेली स्थिती आवश्यक असते. दंडोबा डोंगरावर हवामानाची स्थिती नेमकी याच्या विरुद्ध आहे. तिथला प्रदेश कमी पावसाचा आणि कोरड्या हवामानाचा. तरीही इथं जांभा आढळणं हे आगळं होतं. बरं, असंही नव्हतं की, इथं कोणी इतर ठिकाणाहून जांभा आणला असेल किंवा तो पाण्यासोबत वाहत आला असेल. तो तिथलाच होता, तिथंच तयार झालेला.

घराच्या भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले… बेडग गावाजवळचं हे कच्चं घर
हे केवळ दंडोबा डोंगरापुरतं मर्यादित नव्हतं. या परिसरात, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा जांभा पाहायला मिळतो. नेमकेपणानं सांगायचं तर मिरज तालुक्यात बेडग हे गाव. तिथून जवळ असलेल्या रेल्वे मार्गालगत एक कच्चं घर दिसलं. छप्पर म्हणून पत्रा आणि भिंतीसाठी जांभ्याचे दगड रचलेले. एरवी कोकणात जांभ्याच्या चिरांची सुंदर घर पाहिली होती, पण जांभ्याचे दगड रचलेलं हे इथलं घर. या घराजवळून लाल माती काढून ती रेल्वेमार्गावर पसरलेली दिसली. तिथूनच हे दगडसुद्धा काढलेले होते.
एवढंच नाही, तर खानापूर–विटा रस्त्यावर वेगळा प्रकार पाहायला मिळाला. या रस्त्यावर खानापूरपासून ६ किलोमीटर अंतरावर तामखडी नावाचं गाव आहे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तांबडी माती दिसली. आजूबाजूच्या मातीपासून स्पष्ट फरक लक्षात यावा, इतकी तांबडी! शेतंच्या शेतं या तांबड्या मातीत. त्यातच नांगरट केलेली आणि त्यातच उभी पिकं. या तांबड्या मातीचं रहस्यसुद्धा तिथं सापडणाऱ्या लाल जांभा खडकात होतं. तामखडीमध्ये जांभा आढळतो, त्यानंच तिथल्या लाल मातीला जन्म दिला आहे. तामखडी सोडून आणखी पुढं गेलं की प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर आहे. हे मंदिरसुद्धा जांभा खडकावरच वसलं आहे. मंदिराच्या मागं गेलं की तिथं लाल–पिवळसर रंगाचं टेकाड याची माहिती देतं.

रेवणसिद्ध मंदिराच्या परिसरातही लाल-पिवळा जांभा दर्शन देतो.
याची आणखी एक तऱ्हा जत तालुक्यात पाहायला मिळाली. जत म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वांत दुष्काळी तालुक्यांपैकी एक. कर्नाटकच्या सीमेवर. जतपासून कर्नाटकात अथनी या गावाला एक रस्ता जातो. या रस्त्याने जाताना उजव्या हाताला टेकडीवर मोठमोठाल्या पवनचक्क्या दिसल्या. ते पाहण्यासाठी थांबलो, तर संपूर्ण टेकडीच लालेलाल खडकाची दिसली. ती टेकडी जांभा खडकाची होती. तीच नव्हे तर आसपासच्या ओळीने साऱ्या टेकड्या जांभ्याच्याच होत्या. काही लाल रंगाच्या, तर काही लालबरोबरच पिवळसर झाक असलेल्या!

जतकडून कर्नाटकात अथनीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना जांभ्याच्या टेकड्या दिसतात. त्यावरचा लालबुंद रस्ता कोकणची आठवण करून देतो.
याचा अर्थ हा जांभा याच भागातला मूळ निवासी. तो कुठून तरी आलेला / आणलेला किंवा पाण्यासोबत वाहत आलेला अजिबात नाही. हा सांगितलेला सारा भाग येतो दुष्काळी पट्ट्यात– काही माणदेशात, तर काही त्याला लागून असलेल्या भागात. हे वास्तव असेल तर ते मोठा प्रश्न उपस्थित करतं. कोकणच्या हवामानातला जांभा या दुष्काळी पट्ट्यात कसा?
सामान्यांना प्रश्न पडेल, पण अभ्यासक, विशेषत: पुराहवामानतज्ज्ञ / भूशास्त्राचे अभ्यासक याचं उत्तर देतात. ही मंडळी प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करतात. त्यावरून त्या काळातील हवामान आणि त्यात झालेला बदल याची माहिती मिळवतात. पुण्यातील डॉ. शरद राजगुरू हे असेच वरिष्ठ तज्ज्ञ. त्यांच्यासोबतच मी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात सासवडजवळ आढळणारे जांभ्याचे खडक पाहिले होते. या तज्ज्ञांचा निष्कर्ष असा, की सांगली जिल्ह्यात आढळणाऱ्या जांभ्याची निर्मिती काही हजार किंवा काही लाख वर्षांपूर्वी झाली आहे. तो तयार झाला तेव्हा तिथं कोकणासारखं हवामान होतं. म्हणजेच– भरपूर पाऊस आणि आर्द्र हवा. तेसुद्धा थोड्याथोडक्या काळापुरतं नव्हे तर किमान काही हजार वर्षं!
आता सर्वच भाग अतिशय कमी पावसाचा. महाराष्ट्राचा दुष्काळी भाग म्हटलं की या भागाचं नाव आधी घेतलं जातं. त्यामुळे तिथं कधी काळी भरपूर पाऊस पडत होता हे सांगितलं तरी दिलासा मिळावा… हवामान आणि त्याचं चक्र एकसारखं नसतं, ते सतत बदलत असतं. त्याची गती संथ असते इतकंच.

सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात जागोजागी असे जांभ्याचे खडक पाहायला मिळतात.
आताच या विषयावर लिहायचं कारण असं की सध्या दुष्काळी वर्ष आहे. पाण्याची ओरड आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कमी पडलेला पाऊस हे कारण आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण निसर्गातील व्यवस्था नष्ट केल्या आहेत. उदा. नैसर्गिक प्रवाह, भूजलाची व्यवस्था, त्याचं पुनर्भरण करण्यास उपयुक्त ठरणारा झाडोरा, वगैरे. निसर्गसुद्धा बदल घडवून आणतो, पावसाचं प्रमाण कमी करतो. म्हणून तर सांगलीत पूर्वीचा जांभा दिसतो, तर आता दुष्काळ! पण निसर्गातील बदल संथ गतीने होतात, तर आपली गाडी सुसाट सुटते. निसर्गाच्या वेगाशी जुळवून घेणं काही प्रमाणात शक्य असतं, पण आपल्या या वेगाचं काय?
याचं भान यावं यासाठी हे सारं!
– अभिजित घोरपडे
abhighorpade@gmail.com
पर्यावरण पत्रकार
फेलो (पर्यावरण आणि शाश्वतता), प्राज फाऊंडेशन
संपादक, भवताल मॅगझीन