आंबा विरुद्ध आंबा…

तऱ्हतऱ्हेच्या रंगछटा, चव, आकार, इतर वैशिष्ट्य असलेले आंबे आता दिसतात का? ही विविधता आपल्या डोळ्यांदेखत नष्ट होत आहे. याचं कारण आहेहापूस तसेच, पायरी, केशर, दशहरा, तोतापुरी अशा ठराविकच आंब्यांचं वाढलेलं महात्म्य! या आंब्यांनी बाजार व्यापून टाकला, तशा इतर जाती नष्ट होत गेल्या. एकाच्या मुळावरच जणू दुसरा उठावा. अगदी त्याप्रमाणे..

अभिजित घोरपडे

M01

एखादा गोल गरगरीत, एखादा लांबट केळासारखा, एखादा लिंबाएवढा बारीक, एखादा चपटा, एखाद्याला चोचीसारखं टोक, एखाद्याचं तोंड आवळलेलं!…

रंगसुद्धा तऱ्हतऱ्हेचेकोणी हिरवागार, कोणी काळपट हिरवा, कोणी शेंद्री, पिवळा, तांबूस, सफरचंदाच्या रंगाचा, संत्र्याच्या रंगाचा, पेरूच्या रंगाचा, वर पिवळा खाली हिरवा, संपूर्ण पिवळा बनलेला, ठिपक्याठिपक्यांनी सजलेला!…

चवी तर विचारूच नका.. असंख्य ! खोबऱ्याच्या चवीचा, शेपूच्या चवीचा, आंबट गोड, रसाळ गोड, फिकट गोड, मधासारखा गोड, आंबटपणाचेही कितीतरी प्रकार

इतकंच नव्हेजास्त केसर असलेला, केसर नसलेला, कोयीला गर असणारा, सालीवर गर साचणारा, पातळ रस असलेला, घट्ट रस असलेला, कापून खाण्यास योग्य, चोखून खाण्यास योग्य, तोंड आवळल्यामुळे इतर कुठून तरी फोडावा लागणारा, झाडावर पिकणारा, आडीत चांगला पिकणारा, जास्त पिकला तरी खराब न होणारा, झाडावरच खराब होणारा

यादी मारूतीच्या शेपटसारखी लांबलचक होतेय ना? पण हे काहीच नाही. चार जाणत्या माणसांसोबत बसलं ना.. तर मग विचारायलाच नको. शेकडो प्रकार निघतील आंब्याचे. प्रत्येक भागातला आणि प्रत्येक गावातलासुद्धा.

 

M09M02

काही शंका राहून राहून मनात येतात. आता यातल्या किती जाती उरणार? त्यासुद्धा किती काळ?.. कारण याबाबत परिस्थिती बरी नाही. आंब्यामधली विविधता आपल्या डोळ्यांदेखत नष्ट होत आहे. विविधता संपली.. पण आंबा खायचं प्रमाण फारसं कमी झालेलं नाही.. मग घोड कुठं पेंड खातं? याचं उत्तर आहेहापूस. काही प्रमाणात पायरी, केशर, दशहरा, तोतापुरी अशा ठराविकच आंब्यांचं वाढलेलं महात्म्य! या आंब्यांनी बाजार व्यापून टाकला, सोबत इतर जाती नष्ट होत गेल्या.. एकाच्या मुळावरच जणू दुसरा उठावा. अगदी त्याप्रमाणे.

 

M10M03लहानपणीचे दिवस आठवतात. सातारा जिल्ह्यात गावी किंवा आजोळी. आंबे उतरवले की अंधाऱ्या खोलीत पिकायला ठेवायचे. पिकले की खोलीभर पसरायचे. मग पाहिजे ते आंबे उचलायचे, पाटीत भरायचे आणि दिवसभर चोखत राहायचे. कधी या चवीचा, तर कधी त्या. मी खाल्लेले आणि आठवत असलेली नावंही बरीच आहेतकाळ्या, लोद्या, गोटी, खोबऱ्या, शेपू, केळ्या, शेंद्री, लाल्याप्रत्येक जात दुसऱ्यापेक्षा वेगळी. रंग, चव, आकार, साल, कोयीचा आकार, गर कमीजास्त असणं, लवकर पाड लागणं, झाडावरच पिकणं, लोणच्याचा, आमरसाचा.. फरक दाखवणारे सतराशे घटक.

छोटीशी का असेना, प्रत्येकाला स्वत:ची ओळख होती.

हापूस... खरंच देखणा आणि चविष्ट, पण त्याच्यामुळे इतर आंब्यांकडे कोणी पाहिनासे झालेय.

हापूस… खरंच देखणा आणि चविष्ट, पण त्याच्यामुळे इतर आंब्यांकडे कोणी पाहिनासे झालेय.

त्या वेळी हापूसचं नाव नुसतं ऐकायला मिळायचं. पुण्यात आलं की बघालाही मिळायचा. पण तो खायला मिळायचा नाही. तशी गरजही वाटयची नाही.. आणि आता??

आता सगळीकडं हापूस आणि पायरी! त्याच्या पलीकडं विश्वच नाही. पुण्यामुंबईपासून ते थेट ग्रामीण भागापर्यंत त्यांचा शिरकाव. चुकूनच कुठं तरी इतर आंब्याचं दर्शन घडतं.. शहर सोडून थोडंसं बाहेर गेलं किंवा एखाद्या गावच्या आठवडे बाजारात हिंडलं की हे आंबे दिसतात. तऱ्हतऱ्हेचे, पण बिना नावाचे. पाटीत अंग चोरून बसलेले आणि ग्राहकाच्या प्रतिक्षेत पडून राहिलेले. काही दिसायला अतिशय आकर्षक असतात. हापूसपायरीच्या गर्दीत ते लक्षही वेधून घेतात.

अलीकडेच सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन या संस्थेनं एक सर्वेक्षण केलं. पश्चिम घाटातील आंब्याच्या जातींची नोंद केली. त्यासाठी शाळांमधील इको क्बलस्च्या विद्यार्थ्यांची मदत घेतली. त्यात त्यांना दोनशेहून जास्त जाती नोंदवता आल्या. अर्थात हे मुलांच्या मदतीनं केलेलं काम. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी जास्त जाती आहेत. त्यांना आढळलेल्या जातींमध्येही तऱ्हतऱ्हेची वैशिष्ट्यं आहेत. रंग, आकार, चव, दिसणं यावरून अनेक प्रकार आहेत. खूपच छान उपक्रम होता हा.

"सेंटर फॉर एन्व्हायन्मेंट एज्युकेशन"च्या सर्वेक्षणात स्थानिक आंब्यांच्या दोनशेहून अधिक जातींची नोंद करण्यात आली..

“सेंटर फॉर एन्व्हायन्मेंट एज्युकेशन”च्या सर्वेक्षणात स्थानिक आंब्यांच्या दोनशेहून अधिक जातींची नोंद करण्यात आली..

या आंब्यांच्या जातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न होतही आहेत. त्यांची रोपं तयार करून ती लावली जात आहेत. त्याने फरक पडेल, पण तो फार मोठा नसेल. या विविधतेबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करायला पाहिजे. त्यांना ते पटवून दिलं पाहिजे. पण या गोष्टी टिकण्यामध्ये अर्थकारण महत्त्वाचं ठरतं. सगळीकडं हापूस, पायरी, केशरचा बोलबाला कशामुळे झाला? तर त्यांच्यामुळे पैसे मिळतात या एकाच कारणामुळे. म्हणूनच तर गेल्या दोनअडीच दशकांपासून सगळीकडंच एक बदल दिसतो. इतर झाडं काढून हापूस लावण्याची पद्धत रूढ झाली. अनेकांना असं करणं आवडलंही नसेल. तरीही हे होत गेलं. कारण ज्याला बाजार आहे, ते स्वीकारणं स्वाभाविक आहे. मुद्दाम जपायचं म्हणून काही जण प्रयत्न करतीलही, पण ते मोजकेच असतील.

मग यावर उत्तर काय? सरकारी किंवा संस्थात्मक पातळीवर यावर प्रयत्न व्हायला हवेत. या जातींची विविधता जपण्यासाठी उपक्रम हवेत. तसे कुठं कुठं होतही आहेत. पण आपणही त्यात हातभार लावू शकतो. ग्राहक राजा बनून खारीचा वाटा उचलू शकतो. नुसतंच हापूस, पायरीच्या लाटेत कशासाठी वाहत जायचं? स्थानिक जातीच्या आंब्याची एखादी पाटी खरेदी करा, मग बघा तो आंबा बाजारात टिकून राहील.. आणि शेतातसुद्धा !

केवळ हापूस उरला, तर आंबा चोखून खाल्ला जातो.. हे कोणाला पटणारही नाही..

केवळ हापूस उरला, तर आंबा चोखून खाल्ला जातो.. हे कोणाला पटणारही नाही..

 

या जाती कमी होऊन शेवटी फक्त हापूस उरला तर.. तर वाटतंआंबे चोखूनही खाल्ले जातात, हे पुढं फक्त पुस्तकात वाचावं लागेल. पुरावा म्हणून त्याचं प्रात्यक्षिक दाखवणारी एखादी क्लिप पाहावी लागेल.. कदाचित !

 

 

 

(ता..-

हापूस, पायरीची चव उत्तमच आहे. त्याबाबत वादच नाही, पण आंब्याच्या स्थानिक जातींचीसुद्धा आपली आपली मजा आहे.. ती चवही चाखायला पाहिजे, टिकायला पाहिजे. इतकंच!)

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com

(छायाचित्रे@ सौजन्य- सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन, पुणे)