पाण्यामुळं प्रजननक्षमता हरवली (उजनीच्या पाण्याचं दुष्टचक्र)

पुणे, पिंपरी-चिचंवड या मोठ्या शहरांचं घाणेरडं पाणी नदीवाटे वाहतं. ते जमा होतं, भीमा नदीवर असलेल्या उजनी धरणात. या दूषित पाण्याचे अनेक परिणाम आतापर्यंत माहीत आहेतच.. पण याच पाण्यामुळं जनावरांची प्रजननक्षमता घटली, अशी लोकांची तक्रार आहे. पशुवैद्यकही त्यात तथ्य असल्याचं सांगतात. नेमकी काय समस्या आहे ही?

– अभिजित घोरपडे

हो.. हे आहे उजनी धरणाचं पाणी. हे पाहिल्यावर त्याच्या प्रदूषणाबद्दल वेगळं सांगायची गरज आहे का??

हो.. हे आहे उजनी धरणाचं पाणी.
हे पाहिल्यावर त्याच्या प्रदूषणाबद्दल वेगळं सांगायची गरज आहे का??

अहो, जनावरांना आता गाभ राहत नाही. राहिला तरी अचानक गर्भपात होतो. पूर्वी जनावरं वेत झाल्यानंतर पुन्हा तीन महिन्यांत गाभण राहायची. आता वर्ष झालं तरी त्यांना गाभ राहत नाही. गेल्या चारपाच वर्षांमध्ये हे जाणवू लागलंय…”

माढा तालुक्यात फुटजवळगाव नावाचं गाव आहे. तिथले शेतकरी संजय हांडे सांगत होते.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे उजनी धरण. त्याच्या पाण्याची अवस्था पाहण्यासाठी आम्ही फिरत होतो. महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेचे संस्थापक आणि पाण्याच्या क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते अनिल पाटील सोबत होते. सकाळपासून बरीच ठिकाणं पाहून झाली होती. दुपारच्या वेळी हांडे यांच्याकडे गेलो. धरणाच्या जलाशयाला लागूनच त्यांचं गाव. घाणेरडा वास सुटला होता. जलाशय जवळ असल्याचा तो पुरावा होता. हांडे यांच्या घरात गेलो. समोर पाण्याचा ग्लास आला.

पाणी फिल्टरचंय ..” त्यांनी आवर्जून सांगितलं.

पाठोपाठ दुधाचा कप आला. हांडे सांगू लागले

जनावरांना गाभ धरत नाही. आधी वाटायचं चाऱ्यात वेगळं काही येतंय का? तसं काही नव्हतं. मग जनावरं बदलली. तरी तीच कथा. शेवटी जनावरं दुसऱ्या गावाला, बार्शीला पाठवली. तिथं ती वेळेत गाभण राहू लागली. तेव्हा लक्षात आलं, दोष पाण्यामध्ये आहे. उजनीच्या दूषित पाण्यामुळंच हे होतंय…”

हांडे उजनी धरणाच्या काठचे. त्यांना उजनी धरणाचंच पाणी वापरावं लागतं. या पाण्यामुळे जनावरांची प्रजननक्षमताच धोक्यात आलीय, असं ते सांगत होते. त्यांच्या म्हणण्यावर पटकन् विश्वास बसत नव्हता. पण ते नाकारताही येत नव्हतं. कारण ते स्वत:चा अनुभव सांगत होते. त्यामुळे कोणाचा विश्वास बसतो की नाही, याला फारसा अर्थच नव्हता.

हांडे सर्वसामान्य शेतकरी नाहीत. ते प्रगत, सधन शेतकरी आहेत . उत्कृष्ठ गोपालकसुद्धा! त्यांनी पशुपालनामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. त्यांना विविध व्यासपीठांवर आदर्श पशुपालक म्हणून गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे ते सांगत असलेली माहिती महत्त्वाची होती.

फूटजवळगाव... उजनीच्या पाणवठ्यालगतचं गाव. इथं अनेक समस्या भेडसावतात.

फूटजवळगाव… उजनीच्या पाणवठ्यालगतचं गाव. इथं अनेक समस्या भेडसावतात.

त्यांचा अनुभव बरंच काही सांगणारा होता. ६ वर्षांपूर्वी त्यांना शंका आली, पाण्यामुळे जनावरं गाभण राहत नाहीत. शंका आल्यावर तीन संकरित गायी बार्शीला पाठवल्या. तिथं त्या नियमित गाभण राहू लागल्या. पाठोपाठ त्यांनी इतर गायी, खोंडंही तिकडं पाठवून दिली.

उजनीचं पाणी दूषित आहेच. या पाण्यावर उगवलेल्या गवतालासुद्धा वास येतो. जनावरं पाण्याला तोंड लावत नाहीत. त्यांना पाजायला दुसरं पाणीच नसतं. शेवटी तीपण सवय करून घेतात. या पाण्यामुळे जनावरांच्या दुधाला वास येतो…” हांडे उजनीच्या पाण्याची कहाणी सांगत होतं.

स्वाभाविकपणे माझी कपातल्या दुधाकडं नजर गेली.

त्यावर ते म्हणाले, “साखर घालून वास घालवावा लागतो.”

इतकंच नाही. या भागात पूर्वी मोठ्या संख्येनंफुलपाखरं, काजवे दिसायचे. ते आता दिसेनासे झालेतइतर अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यांचा संबंधही दूषित पाण्याशी जोडला जात होता.

हांडे यांची निरीक्षणं थेट होती. त्यांच्या माहितीकडं दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. तरीही दूषित पाण्याचा जनावरांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत असेल, हे म्हणणं पटत नव्हतं. त्यामुळे इतर गावातील लोकांचे अनुभव ऐकायचं ठरवलं. त्याच भागात पटवर्धनकुरोली गावात अशीच समस्या ऐकायला मिळाली. या गावचे तात्या चंदनकर यांचाही तसाच अनुभव. ते शेळी फार्म चालवतात. त्यांना शेळ्यांच्या माध्यमातून ही समस्या भेडसावते. तेसुद्धा दूषित पाण्याकडंच बोट दाखवतात.

हे पाणी शुद्ध करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. माणसांना पिण्यापुरतं ते शुद्ध करणं जमेल. पण जनावरांसाठी या पाण्याची चैन कशी परवडेल?” चंदनकर प्रश्न करतात. त्याचे परिणाम भोगावे लागतात. शेळ्यांच्या वेतामध्येही अंतर पडू लागलंय. गर्भपात होऊ लागले आहेतपरिसरातील शेतकरी, जनावरं पाळणाऱ्यांची पाण्याबद्दल तक्रार आहे.

भीमा उजनी धरण...

भीमा उजनी धरण…

”हो, दूषित पाण्याचाच संबंध!”

या भागातील पशुवैद्यकही या समस्येशी पाण्याचा संबंध जोडतात. त्या भागातील पशुवैद्यक उपासे स्पष्ट करतात

जनावरं दूषित पाणी पिवोत, नाहीतर अशा पाण्याच्या संपर्कात असोत, परिणाम होतोच. नराची शुक्रनिर्मिती आणि मादीची स्त्रीबीजनिर्मिती यांच्यावर विपरित परिणाम होतो. गाभ राहण्यातही अडथळे येतात. दुसरं असं की, दूषित पाण्यामुळं जनावरांमध्ये हगवण, अपचन, पोटाचे वेगवेगळे रोग वाढतात. या विकारांमुळं त्यांना सतत कुंथावं लागतं. त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते. अलीकडे उजनीच्या परिसरात ही समस्या वाढल्याचं दिसतं.”… पशुवैद्यकानंच हे सांगितल्यामुळं परिस्थितीचं गांभीर्य वाढत होतं.

उजनीच्या प्रदूषणामुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतात. हगवण, त्वचेचे विकार, कावीळ, इतर संसर्ग हे नेहमीचंच. दूषित पाणी अन् भूजलामुळं मुतखड्याचे रुग्ण जास्त आहेत. काही गावांमध्ये तर घरटी ही समस्या भेडसावतेपण जनावरांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत असेल, तर समस्येची तीव्रता वाढते. जनावरांसाठी पाणी तरी कुठून आणणार? पूर्वी विहिरीचं पाणी वापरण्याचा पर्याय होता. आता तोसुद्धा राहिला नाही. कारण सर्वच भागात उजनीचं दूषित पाणी पोहोचलंय. वेगवेगळ्या पिकांच्या निमित्ताने ते पसरलं. आता भूजलसुद्धा प्रदूषित झालंय. उजनीच्या परिसरात, पुढं भीमा नदीद्वारे हेच पाणी वापरलं जातं. या पट्ट्यात ऊस, इतर बागायती पिकं आहेत. उजनीचं दूषित पाणी सर्वत्र फिरलं आहे, पाझरलं आहे, खोलवर मुरलं आहेत्यामुळे या पाण्यापासून लवकर मुक्तीही शक्य नाही.

– अभिजित घोरपडे

ई मेल : abhighorpade@gmail.com