हिवरे-बाजार… एक आदर्श गाव. ‘तात्याबाची बोर‘ ही एकेकाळी त्याची ओळख होती. या बोरीची चव चाखली नाही, असा माणूस गावात सापडायचा नाही. तिला फळं कधी लागतात याकडं पोरं डोळे लावून असायची. तात्याबाचंही बोरीवर तेवढंच लक्ष. तो काठी घेऊनच बोरीखाली मुक्काम ठोकायचा… पुढं काळाच्या ओघात गावातली झाडं तुटली. तात्याबाची बोरसुद्धा छाटली गेली. तिचा नुसता बुंदाच उरला..
आता ४० वर्षांनी ती पुन्हा फळांनी भरून गेलीय… पण का आणि कशी?
– अभिजित घोरपडे
”लहानपणीच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्या आठवल्या की आजही आम्ही त्या काळात पोहोचतो. त्या वेळची झाडं, विहिरी, ओढे, पाणी, निसर्ग कुठं हरवला? याची हळहळ वाटायची. ते सगळं परत आणायचा प्रयत्न केला. ते शक्यही झालंय…” पोपटराव पवार सांगत होते.
पोपटराव पवार यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. एक सरपंच काय किमया करू शकतो.. याचं जिवंत उदाहरण म्हणजे पोपटराव! प्रसिद्ध हिवरे बाजार गावचे ते सरपंच. गेली २५ वर्षं याच पदावर आहेत. गाव सोडून वर सरकण्याचा मोह त्यांनी टाळला. त्यामुळेच ते गावाला पूर्णपणे बदलू शकले. गावात पाऊस पडतो– इनमीन ३०० मिलिमीटर. पण म्हणजे किती? वाळवंटी राजस्थानइतका किंवा इस्रायलमध्ये पडतो इतकाच. काही वर्षी तर त्यांच्यापेक्षाही कमी! तरीसुद्धा हिवरे बाजार खातं–पितं आहे, पाण्याच्या बाबतीत समृद्ध आहे. हे गाव अनेक बाबतीत प्रसिद्ध आहेच. सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं आणि पुढ जाणं.. ही या गावची खासियत!
या गावाची वेगळी बाजू पोपटराव यांच्याकडून ऐकायला मिळाली.. आठ–दहा दिवसांपूर्वीच हिवरे बाजारला गेलो होतो. सोबत होते, प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ. गाव पाहताना, जुन्या काळाचा विषय निघाला. त्या वेळी पोपटरावांकडून “तात्याबाच्या बोरी“चा उल्लेख झाला. वेगळं काही तरी ऐकल्यामुळे माझे कान टवकारले. त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली.. जे ऐकलं ते आगळं–वेगळं होतं. सुखावणारं होतं. असंही घडू शकतं..? याबाबत तोंडात बोट घालायला लावणारं होतं.
‘तात्याबाची बोर‘ ही गावची ओळख होती. ते एक बोराचं झाड; तात्याबा नावाच्या माणसाच्या मालकीचं. या बोरांची चव चाखली नाही, असा माणूस गावात सापडायचा नाही. ही बोर इतकी चवदार होती की, फळं कधी लागतात याची वाट पाहत लहान मुलं टपूनच असायची. तात्याबाचंही झाडावर तेवढंच लक्ष. तो होता वयस्कर. पण काठी घेऊन बोरीखालीच मुक्काम ठोकायचा… पुढं काळाच्या ओघात गावातली झाडं तुटली– काही जळणासाठी, तर काही इतर कारणांसाठी. तात्याबाची बोरसुद्धा छाटली गेली. तिचा नुसता बुंदाच उरला होता.
ज्यानं जुनं गाव अनुभवलंय, त्याच्यासाठी हे रुखरुख लावणारं होतं. म्हणून गावाला पुन्हा जुनी ओळख मिळवून द्यायचं ठरलं. जे जे प्रसिद्ध होतं, ते पुन्हा उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यातूनच ‘तात्याबाची बोर‘ पुन्हा उभी राहिली. आता ती पुन्हा फळांनी लघडली आहे. हजारो बोरं अंगावर घेऊन डौलात उभी आहे. या बोरीची कथा ऐकल्यावर आम्ही तिची चव चाखली नसती तरच नवल! पोपटरावांबरोबर मुद्दाम ती बोर पाहायला गेलो. बोराच्या झाडाला कसलं सौंदर्य. पण हे बाकदार होतं.. सुंदर भासलं. झाडाखाली बोरांचा सडाच पडला होता. वरही असंख्य फळं. मुठी भरभरून फळं चाखली. आंबट–गोड चव. कथा माहीत झाल्यानं गोडी आणखीच वाढली.. अशी ही तात्याबाची बोर!
या बोरीप्रमाणंच गावातला जुना झरा– नाग झरा हासुद्धा पुनरुज्जीवित केलाय. हा झरा थंडगार, गोड्या पाण्यासाठी प्रसिद्ध होता. इथं यायचं आणि तोंड लावून पाणी प्यायचं.. हजारो लोकांनी त्याची चव चाखलीय. पण मधल्या काळात तो वाहिनासा झाला होता. आता तो पुन्हा वाहू लागलाय. त्याचं पाणी अाहे– पूर्वीसारखंच गोड, थंडगार..
इतकंच नाही, तर गावात पूर्वी रानमोगरा फुलायचा, त्याचा दरवळ पसरायचा. मधल्या काळात तो संपला होता, तोसुद्धा आता फुलू लागलाय.

हिवरे बाजारचा नागझरा..
पुन्हा पहिल्यासारखा वाहू लागलाय- गोड, थंडगार पाण्यासह.
त्याचं पाणी चाखताना पोपटराव पुन्हा लहानपणात पोहोचतात.
गावातले मळे (शेतजमिनी) वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. बऱ्याच मळ्यांना झाडांची नावं होती– चिंचेचा मळा, आंब्याचा मळा, लिंबाचा मळा, जांभळीचा मळा,पिंपळाचा मळा, कवठाचा मळा, पळसाचं लवान, आपट्याचं लवान, भोकरीचा माळ, हिवराचं रान… नावं झाडांची, पण तिथं ती झाडंच उरली नव्हती. मग आता तिथं मुद्दाम अशी झाडं लावली. त्या मळ्यांना त्यांची जुनी ओळख मिळाली, काहींना अजून मिळते आहे.
असं जुनं रूप मिळवण्यासाठी हिवरे–बाजारमध्ये अजूनही काही गोष्टी प्रतिक्षेत आहेत– बहुतांश लोक जिच्या पाण्यात डुंबले आहेत ती विहीर, कधीही न आटणारा गावचा ओढा अर्थात झरोना…
अहो, हे झालं हिवरे बाजारचं.. पण तुमच्या गावात अशा गोष्टी जुनं रूप मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहेत का??
– अभिजित घोरपडे
ई–मेल : abhighorpade@gmail.com