कुठं गेल्या पेरूच्या बागा?

पुण्यातून बाहेर पडताना सर्वच रस्त्यांवर पेरूच्या बागा होत्यासिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, बाणेर रस्ता, सूस रस्ता, पाषाण रस्ताअगदी पुणे शहरातसुद्धा! आता नावालाही बाग दिसत नाही. गेल्या दहावीस वर्षांत केवढा बदल झालाय हा.. पण तो जाणवतोय का आपल्याला?… आणि इतर शहरांचं काय?

– अभिजित घोरपडे

Peru01

अंगारकी चतुर्थीचा दिवस. पुण्यात बिबवेवाडी भागात डॉक्टरांकडं गेलो होतो. खांदा दुखावल्यामुळे अजूनही गाडी चालवत नव्हतो. बसस्टॉपकडं चालतच निघालो. वाटेत पेरूवाला दिसला. सायकलवर पाटी लावलेली. त्यात तजेलदार पेरू! रस्त्याच्या कडेला सावलीला थांबला होता. मी किती दिवस पेरू खाल्लाच नव्हताअलीकडं सफरचंद, संत्री, मोसंबी यांचे ढीगच्या ढीग असतात, पण पेरू पहिल्यासारखा दिसत नाही. निदान पुण्यात तरी हे चित्र आहे.. इतर भागातून आलेल्या फळांनी पेरूला परका करून टाकलाय. किती?.. तर काश्मीर, हिमाचलपासून वॉशिंग्टन, चिली, इराणची सफरचंद गाड्यागाड्यांवर दिसतात, पेरू मात्र शोधत फिरावं लागतं.

सध्या सफरचंद, संत्री, मोसंबी यासारख्या फळांचंच राज्य आहे.. त्यात पेरू चुकून कुठं तरी अंग चोरून बसलेला दिसतो..

सध्या सफरचंद, संत्री, मोसंबी यासारख्या फळांचंच राज्य आहे.. त्यात पेरू चुकून कुठं तरी अंग चोरून बसलेला दिसतो..

इथं माझ्या समोर पेरूवाला होता. तरतरीत नाक, खुरटी दाढी, कपाळावर टिळा, तोंडात तंबाखूचा बार आणि भाषेत मराठवाडी हेल!

कसा दिला?”

दहा रुपये, पंधरा रुपये आणि वीस रुपयेघ्या. गोडाय बगा.”

एवढ्या लहान पेरूला दहा रुपये द्यायचे?.. मनात क्षणभर पुणेरी विचार आला. पण तो लगेच झटकून पेरू निवडला. त्यानं तिखटमीठ भरून पेरू दिला. चवदार होता. गप्पा सुरू झाल्या. मनात म्हटलं, पुढच्या काळात असे पेरूवाले इतिहासजमाच होतील. घ्या आत्ताच बोलून. तो पण बोलका होता. भरभरून बोलू लागला.

मनोहर म्हेत्रे.. दहा वर्षांपूर्वी लातूरहून पुण्याला आला. तेव्हापासून पेरू विकतोय..

मनोहर म्हेत्रे..
दहा वर्षांपूर्वी लातूरहून पुण्याला आला. तेव्हापासून पेरू विकतोय..

मनोहर म्हेत्रे. वय पस्तीशीच्या आसपास. मूळचा लातूरचा. दहा वर्षांपूर्वी पुण्यात आला, तेव्हापासून पेरूच विकतोय. ‘अप्परला राहतो. (अप्पर म्हणजे अप्पर इंदिरानगर नावाची झोपडपट्टी!) घरी बायको, दोन मुलं.

तो धंद्याबद्दल सांगू लागला. ते ऐकताना पुण्याच्या परिसरात झालेला बदल माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.. मीसुद्धा त्याचा साक्षीदार होतो. आज म्हेत्रेशी बोलताना त्याची तीव्रता प्रकर्षानं जाणवली. पुण्यातून बाहेर पडताना जवळजवळ सर्वच रस्त्यांवर पेरूच्या बागा होत्या.. अगदी पुण्यातसुद्धा! सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता, बाणेर रस्ता, सूस रस्ता, पाषाण रस्तापुणे शहरातसुद्धा बागा होत्या. कोथरूडच्या सिटी प्राइड सिनेमाजवळ अजूनही एक मोठी बाग तग धरून आहे. पिंपरीचिंचवड परिसरात गुरवपिंपळे भागातली बाग आजही आठवते. बागेत जाऊन वाट्टेल तेवढे पेरू खायचे. घरी नेण्यासाठी तेवढे विकत घ्यायचेअर्थात हा काळ २५३० वर्षांपूर्वीचा!

पुण्यातल्या पेरूच्या बागा जवळजवळ संपल्या..

पुण्यातल्या पेरूच्या बागा जवळजवळ संपल्या..

आता पुणं किती तरी बदललंय. म्हेत्रे सांगतो, कात्रजजवळ आंबेगाव पठारावर पेरूच्या बागा होत्या. कोंढव्यात होत्या, दत्तनगरला होत्या, जांभूळवाडीला होत्या. त्यामुळे दुपारी पेरू विकून झाले की, सायकलला टांग मारून आंबेगावला नाहीतर कोंढव्यात गोकुळनगरला जायचा. पाटी भरून पुन्हा विक्रीसाठी गावात यायचा. आता ते शक्य नाही, कारण तिथल्या बागा संपल्या.. पेरूसाठी सोलापूर रोडला पाटसपर्यंत जावं लागतं. सकाळी एकच फेरी होते. पेरू विकून झाले की थेट घर गाठायचं.. पुन्हा दुसऱ्याच दिवशी.

एवढंच कशाला? पुण्याच्या आसपास सर्वांत चांगला होता पेरू खेड-शिवापूरचा, पण तिथंसुद्धा आता घरात खाण्यापुरती झाडं राहिलीत.. बागा संपल्या.

सायेब, आपन उभं हाव ना तित पन बाग हुती पिरूची..” कसा बदल होत गेलाय याच्यावर म्हेत्रेनं व्यवस्थित बोट ठेवलं. बागा संपल्या. तिथं इमारती झाल्या. काळी माती होती ३०३० फूट. कितीही खणलं तरी मुरूम लागायचा नाय. तिथंसुद्धा इमारती झाल्या. त्याचं सांगणं पटत होतं. मी आता राहतोय तिथं, आंबेगावातही पेरूच्या बागा होत्या.. आता आहे इमारतींचं जाळं! सिंहगड रोडची आठवणही अशीच. लहानपणी बसनं सिहंगडला जायचो. प्रवासात आकर्षण असायचंया रस्त्यावरच्या पेरूच्या बागांचंच. सिंहगड रस्ता लागला की थोड्याच अंतरावर बागा सुरू व्हायच्या, त्या बराच वेळ संपायच्याच नाहीत. रस्त्यावर पाट्यांमध्ये पेरू विकायला असायचे. आता अधेमधे पेरूच्या पाट्या दिसतात, पण बाग काही दिसत नाही.

Peru02या आठवणींनी मनात अनेक प्रश्न उभे केले. पूर्वी चहुबाजूंनी पेरूच्याच बागा का होत्या? इतके पेरू खपायचे तरी कुठं? आणि आता सर्व बागा गेल्या तरी लोकांवर फरक कसा पडला नाही?… मान्य आहेबदल हे होतातच, होणारच. पण दहावीस वर्षांत पेरूच्या सर्वच्या सर्व बागा खल्लास व्हाव्यात? हे चांगलं की वाईट.. या प्रश्नात जात नाही, पण जमिनवापरामध्ये झालेला बदल जाणवतोय का आपल्याला? म्हटलं तर हा विषय विसरून जावा असा होता, म्हटलं तर अतिशय गहन.

काही क्षण शांतपणे विचार केला, तेव्हा हा बदल फारच मोठा वाटला. डोक्यात आलं, पुण्यासारखं इतरत्रसुद्धा असं काही झालं असेल का?

च्यायला, मी इकडं विचारात होतो. म्हेत्रे मात्र मला सुन्न करून स्वत: “पेरू….वालाम्हणत निघूनही गेला होता.

अभिजित घोरपडे

ई-मेल : abhighorpade@gmail.com