मेलेल्या नजरा अन् कोरडा विकास (उत्तरार्ध)

गोष्ट आजची नाही. सम्राट अशोकाचा काळ असो, नाहीतर शिवाजी महाराजांचा.. शतकानु शतकं आपले पूर्वज झाडं लावायचे ते पुण्यकर्म मानूनआता कायदा असूनही तो पाळला जात नाही.. म्हणूनच विकास होतोय खरा, पण कोरडा आणि रूक्षच !

अभिजित घोरपडे

पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळजवळील प्राचीन पाणपोई .. आता अंग चोरून उभी आहे.

पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळजवळील प्राचीन पाणपोई .. आता अंग चोरून उभी आहे.

रस्त्याच्या कडेची झाडं तोडण्याबाबत भावनिक मुद्दे घडीभर बाजूला ठेवू. आता मुद्दा कायद्याचा. तो कुठं गुंडाळून ठेवला जातो, हे विचारायलाच नको. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत.. रस्ता करण्यासाठी वृक्ष काढावे लागले, तर त्यांचं त्याच परिसरात त्यांचे पुनर्रोपण करा. हे आदेश पाळण्याच्या दृष्टिने आपण आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले नाहीच. ते इतर कुठून मिळवलेही नाही. परिणाम काय?.. काढले जाणारे किती वृक्ष रस्त्याच्या कडेला पुन्हा उभे केलेले दिसतात? नाशिकधुळे रस्त्यासारखा एखादा अपवाद सोडला, तर इतर रस्त्यांसाठी उत्तर आहे शून्य‘!

बरं, समजा झाडाचं पुनर्रोपण नाही शक्य झालं. तर काय? एकाच्या बदल्यात तीन झाडं लावावी लागतात. तीसुद्धा स्थानिक झाडं आणि त्याच परिसरात. एवढंच नाही तर ती सहा फुटापेक्षा जास्त वाढलेली असावी लागतात. म्हणजे ती जगण्याची शक्यता वाढते. महामार्गांच्या दुतर्फा तर प्रत्येक दहा मीटर अंतरावर स्थानिक वृक्ष असावा लागतो. राज्यभरासाठी असा नियम आहे.

शिरवळ येथील पाणपोईमध्ये असलेले जुने दगडी रांजण..

शिरवळ येथील पाणपोईमध्ये असलेले जुने दगडी रांजण..

स्थानिकच झाडं कशासाठी? कारण त्यांची मुळं खोल जाऊ शकतात, ती बराच काळ टिकू शकतात. त्यांच्या आधाराने परिसरातील जैवविविधता बहरू शकते. कडूलिंब, चिंच, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ या स्थानिक वृक्षांनी हे दाखवून दिलंय. आता महामार्गांवर कुठं दिसतात दहा मीटरवर झाडं?

कोरडे आहात की रूक्ष आहात, हे मुद्दे राहू द्या.. आहे तो कायदा तरी पाळा बेट्यांनो !

कोणाला पाणी पिण्यासाठी झाडाची सावली मिळाली नाही. तर ते गौण समजू हवं तर. पण एखादा अपघात झाला तर जखमीला बसवणार कुठं? त्यासाठी तरी आहे सावली रस्त्याच्या कडेला?

या संदर्भात जरा इतिहासात डोकावलं तर आता आपलीच लाज वाटेल. सम्राट अशोकाचा काळ म्हणजे किमान तेवीसशे वर्षं मागे जावं लागतं. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावण्याचे आदेश होते. असे अनेक संदर्भ सापडतात. झाडंच नाही, तर तेव्हा वाटसरूंसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था केली जायची.

अनेक ठिकाणी घाट चढून आल्यावर माथ्यावर पूर्वी पाण्याची व्यवस्था असायची..

अनेक ठिकाणी घाट चढून आल्यावर माथ्यावर पूर्वी पाण्याची व्यवस्था असायची..

बहुतांश घाट चढून गेल्यावर, नाक्यांवर पाणपोया असायच्या. तेच पुढं शतकानु शतके चालत आलं होतं. त्याचं एक उदाहरण बारामतीजवळ सुपे गावानजिक पाहायला मिळतं. घाट चढून वर आलं की माथ्यावर जुनी पाणपोई आहे.. मंदिर बांधावं अगदी तशी बांधलेली. तिचं नावपोईचं मंदिर‘. तिच्या नावातच मंदिर आहे, तिथंच सारं काही आलं. त्या काळी पाण्याचं काम पुण्यकर्म मानलं जायचं; आताच्या रगील टोलनाक्यांसारखं सक्तीचं म्हणून नव्हे.

पुणेसातारा रस्त्यावरही शिरवळजवळ एक पाणपोई दिमाखात उभी होती. आता पडझड झालीय. रस्त्याचा पसारा वाढलाय. त्यात अंग चोरून उभी आहे. पण तिच्यातले दगडी रांजण तिच्या काळाची साक्ष देतात.

आपण सर्वच जण उठता बसता, शिवरायांचं नाव घेतो. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे दाखले देतो. त्यांनी वृक्ष आणि पाणी याच्याबद्दल खूप खोलवर विचार केला होता. तो नुसता वांझोटा विचार नव्हता, तर त्यावर अंमलही केला होता. तेव्हा आताइतकी निकडही नव्हती. सारंच विपुल होतंपाणी आणि झाडंसुद्धा! तरीपण त्यांनी हे राखलं.. रस्त्याच्या दुतर्फा झाडांबाबतचा दाखला माहीत नाही, पण वृक्ष कसे राखावेत, गडावर पाणी कसं राखावं, याचे उल्लेख सापडतात. त्यांच्या आज्ञापत्रात हे सविस्तर वाचायला मिळतं.

दुतर्फा झाडं आणि त्यांनी रस्त्यावर अशी केलेली कमान.. हे दृश्य बऱ्याच रस्त्यांवरून आता इतिहासजमा झालंय.

दुतर्फा झाडं आणि त्यांनी रस्त्यावर अशी केलेली कमान.. हे दृश्य बऱ्याच रस्त्यांवरून आता इतिहासजमा झालंय.

आता मात्र, बुडत्याचा पाय खोलात..! नैसर्गिक संसाधनांची टंचाई असतानाही आम्ही त्यांचा विचार करत नाही.

नियोजनकर्त्यांना एकच सांगावं वाटतं. नाहीतरी सर्व रस्त्यांनी प्रवास करताना आम्ही टोल भरतोच आहोत. पुण्यकर्म वगैरे राहू द्या.. निदान कायदा तरी पाळा. नियमाप्रमाणे झाडं लावाजरा कोरडेपणा झटका. मग बघा हेच रस्ते जिवंतहोतील. पुन्हा ते भरभरून देतीलसगळ्यांचाच प्रवासही सुखकर करतील!

अभिजित घोरपडे

Email- abhighorpade@gmail.com

Blog- www.abhijitghorpade.wordpress.com