एका रहस्याच्या शोधात.. (कोयना भूकंप पुराण १)

कोयना धरणाजवळ निसर्गातल्या एका रहस्याचा शोध घेतला जातोय. पण एकाचा शोध घेताना भलतीच गोष्ट हाती लागावी.. अशा प्रमाणे दुसरंच रहस्य उलगडलं. ध्यानी मनी नसताना अचानक समोर येऊन उभं राहावं, अगदी तस्सं! महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या प्रत्येकाला ते माहीत असायलाच पाहिजेपण खरंच किती जणांना त्याची कल्पना आहे??

– अभिजित घोरपडे

कोयना धरण

कोयना धरण

कोयनेचा भूकंपहा सर्वांच्याच कुतुहलाचा विषय. ज्याला त्यातलं कळतं तो त्याच्याबद्दल बोलतोच, पण ज्याला काही कळत नाही तोसुद्धा इकडचंतिकडचं ऐकून मतं मांडतो, तीसुद्धा ठासून ! या विषयाने काहींना प्रसिद्धी मिळवून दिली, तर काहींना त्याच्या अभ्यासासाठी बराच पैसा दिला.. याच भूकंपामुळे काहींची करियरसुद्धा घडली.

पण एवढं करून काय?… गमतीचा भाग असा की, मूळ प्रश्न अजूनही कायम आहे.

प्रश्न कोणता?… तर कोयना धरणाच्या विस्तृत जलाशयामुळे भूकंप होतात का किंवा भूकंप होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते का?

११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना धरणाजवळ आतापर्यंतचा सर्वांत मोठा भूकंप झाला. त्याला आता ४६ वर्षे उलटून गेली, तरीही त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं नेमकेपणाने मिळालेली नाहीत. कदाचित आणखी काही दशकं ती मिळणारही नाहीत..

या प्रश्नाची चर्चा नंतर करूच, पण आधी थोडं या गोंधळातून बाहेर आलेल्या रहस्याबद्दल!

हैदराबादला एक महत्त्वाची संस्था आहेएन.जी.आर.आय. तिचं संपूर्ण नाव, नॅशनल जीओफिजिकल रीसर्च इन्स्टिट्यूट अर्थात राष्ट्रीय भूभौतिकी संशोधन संस्था! या संस्थेनं सतत एक धोशा लावलाय, तो म्हणजेकोयनेतील भूकंपांचा धरणाच्या पाणीसाठ्याशी संबंध आहे. याच दृष्टिने त्यांनी संशोधन केलं. ते संशोधन वैज्ञानिक समुदायापुढं मांडलं. त्यावर टीकाटिप्पणी झाली. तरीही ही संस्थेनं हा मुद्दा सातत्यानं लावून धरला आहे. त्याला आता फळ आलंय. खुद्द केंद्र सरकारनं त्यात लक्ष घालून अभ्यासासाठी निधी उपलब्ध करून दिलाय. आतापर्यंत ४५० कोटी रुपये मंजूर झालेत.. पुढे आणखीही होतील. तिथले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. हे डॉ. राव नुकतेच पुण्यात आलेले असताना त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि या प्रकल्पाची सविस्तर माहिती झाली.

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या अभ्यासासाठी खोलवर ड्रिल घेण्याचे काम सुरू आहे...

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या अभ्यासासाठी खोलवर ड्रिल घेण्याचे काम सुरू आहे…

विषय तोचकोयना धरणाच्या जलाशयाचा भूकंपाशी संबंध आहे का..? पण त्यासाठीचा अभ्यास वरवरचा नसेल. प्रत्यक्ष भूगर्भात जाऊन निरीक्षणं घेतली जाणार आहेत. सुरुवातीला कोयना धरणाच्या चहूबाजूंनी, दहा ठिकाणी ड्रिलमारली जात आहेत. काही झालीत, उरलेली पुढच्या काही महिन्यांत पूर्ण होतील. त्यांची खोली असेल, साधारणत: १५०० मीटर म्हणजे दीड किलोमीटर. ही ड्रिलघेतल्यावर तितक्या खाली भूकंपमापक आणि जमिनीत होणाऱ्या हालचाली टिपणारी यंत्रणा ठेवली जाणार आहे. त्याद्वारे अनेक नवनव्या गोष्टी माहीत होतील, त्यामुळे कोयना धरणाचा भूकंपाशी संबंध आहे का, याच्या उत्तराजवळ पोहोचता येईल.

ही ड्रिलखणल्यावर त्यातून जे काही बाहेर आलंय.. ते भूकंप अभ्यासाच्या मूळ उद्देशापेक्षाही रंजक आहे. त्याच्यामुळे तब्बल पाचसहा कोटी वर्षांपूर्वीपासून जे झाकलेलं आहे, त्याच्यावरचा पडदा पहिल्यांदाच दूर झाला. आणि खाली दडलेलं रहस्य अलगद बाहेर आलं.

काय आहे हे रहस्य?… आपण ज्या खडकावर राहतो, तो आहे काळा पाषाण अर्थात बेसॉल्ट! ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हारस थंड झाल्यामुळे त्याची निर्मिती झाली. पण हा काळा पाषाण तयार झाला, त्याच्या आधीसुद्धा आपल्या भूमीत खडक होतेच की. ते कोणते असावेत, याबाबत बरेच अंदाज बांधले जात होते. पण प्रत्यक्षात खाली काय आहे, याचा उलगडा अद्याप झाला नव्हता. कारण आपल्या खडकाची जाडी सुमारे तीन किलोमीटर इतकी असावी असं मानलं जात होतं. ती काही ठिकाणी कमी आहे, तर काही ठिकाणी जास्त. तरीसुद्धा या काळ्या पाषाणाच्या तळापर्यंत जाणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे त्याच्या खाली नेमकं काय आहे, हे माहीत व्हायला मार्गच नव्हता.

काळ्या पाषाणाच्या खाली असलेला ग्रॅनाईट आणि नाईसेस या खडकांचे पुरावे सापडले आहेत.

काळ्या पाषाणाच्या खाली असलेला ग्रॅनाईट आणि नाईसेस या खडकांचे पुरावे सापडले आहेत.

कोयनेतील भूकंपाच्या अभ्यासाच्या निमित्ताने जे ड्रिलखणले गेले, त्याद्वारे पहिल्यांदाच आपल्या खडकाचा तळ गाठणे शक्य झाले. त्याच्या तळाशी असलेल्या खडकांचे नमुनेसुद्धा आपल्या हाती लागले. त्यात ग्रॅनाईटहा अग्निजन्य खडक आणि काही नाइसेसप्रकारचे रूपांतरित खडक असल्याचे आता आपल्याला ठामपणे माहीत झालं आहे.

(पण हे गुपित उलगडल्यामुळे काय बरंवाईट झालंय..?

समजून घ्यायचंय..?

फक्त दोनच दिवस वाट पाहा..

कुणी तरी म्हटलंय ना–  सब्र का फल मीठा होता है !)

अभिजित घोरपडे

www.abhijitghorpade.wordpress.com

abhighorpade@gmail.com

( पुढच्या पोस्टमध्ये जरूर वाचा…   कोयना भूकंप पुराण- २ )

महाबळेश्वरच्या थंडीचा लोचा…

महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण. हिवाळ्यात इथं बर्फ साचल्याच्या बातम्या येतात, त्याच वेळी हवामान विभागाच्या नोंदी तिथं १० / ११ अंश सेल्सिअस तापमान असल्याचं सांगतात.. हे असं कसं ? लोक हवामान खात्याची अक्कल काढतात.. पण हे असं का घडतं ? हे गौडबंगाल आहे तरी काय ??

हिवाळ्यात वेण्णा तलावाच्या परिसरात बर्फ साचल्याच्या बातम्या येतात…

कालचीच गोष्ट. महाबळेश्वरचं कमीत कमी तापमान होतं ११.५ अंश, तर पुण्याचं होतं ८.१ अंश.. पुन्हा आज पाहिलं, तर महाबळेश्वर १४.६ आणि पुणं १०.३ अंश..

याचा अर्थ पुणं महाबळेश्वरपेक्षा थंड.. हे जरा उलटंच झालं म्हणायचं.. नाही का???

भूगोलाचं पुस्तक तर सांगतं, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. पण हवामान खात्याचे आकडे वेगळंच काही तरी सांगतात. आकड्यांवर विश्वास ठेवायचा तर, महाबळेश्वरपेक्षा पुणे, नगर, नाशिक, सातारा ही ठिकाणं थंड आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत तर सावळा गोंधळ असतो. महाबळेश्वरमध्ये बर्फ साचल्याच्या बातम्या येतात. त्याच वेळी हवामान विभागाच्या नोंदी सांगतात, तिथं १० / ११ अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे.. हे असं कसं? मग लोक हवामान खात्याची अक्कल काढतात. स्वाभाविकच आहे ते. बर्फ साचतं, तेव्हा तिथं तापमान १० अंश असेलच कसं?

हवामानातली विविधता मी जाणून होतो. डोंगरी भागात तर ती खूप जास्त असते, हेही माहीत होतं. पण महाबळेश्वरच्या थंडीचं हे गुपित उकलण्यासाठी त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. पुणे वेधशाळेत महाबळेश्वरच्या तापमानाच्या जुन्या नोंदी चाळल्या. मग महाबळेश्वर गाठलं. तिथल्या वेधशाळेत पोहोचलो. ती आहे, तिथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात. ‘सर माल्कम बाबा’ नावाच्या स्तंभाला लागून. हे महाबळेश्वरमधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच ठिकाण. तिथलं माल्कम बाबा प्रकरणही भन्नाट आहे. त्याच्या नावाने तिथं उत्सव भरतो. त्याला कोंबडं-दारूसुद्धा वाहिली जाते.  असो..

वेधशाळेच्या इमारतीवरून संपूर्ण महाबळेश्वर दिसतं. डोंगर-दऱ्या, तलाव, वाऱ्याला अडवणारी टेकाडं, झाडी, शेतं.. जवळपास इतकी विविधता. ती तापमानातही उतरते. मग समजतं, इथं ठिकठिकाणी वेगवेगळं तापमान असणार! तिथल्या तापमानाची नोंद जिथं होते, ते “ऐतिहासिक” तापमापक पाहिले. सोबत त्या वेधशाळेचा प्रमुख अधिकारी विशाल रामचंद्रन होता. तरुण, उत्साही अधिकारी. त्याच्याकडून बरंच काही ऐकायला मिळालं.

हवामान विभागाची महाबळेश्वर येथील वेधशाळा..

महाबळेश्वरमध्ये जागोजागी वेगवेगळं तापमान आढळतं. एकीकडं बर्फ साचतं, तर दुसरीकडे वातावरण उबदार असतं.. हे एकाच वेळी घडतं. बर्फ साचतं म्हणजे, तिथले दवबिंदू गोठतात. त्याची ठिकाणं ठरलेली आहेत- वेण्णा तलाव, लिंगमळा धबधबा, गहू गेरवा संशोधन केंद्र. तलावातील बोटींवर, गवताच्या पात्यांवर दवबिंदू जमा होतात. ते थंडीमुळं गोठतात. ते गोठतात याचा अर्थ तिथं थोड्या काळासाठी का होईना, पण तापमान शून्य अंशांपर्यंत पोहोचतं.  हे घडतं, सकाळी सूर्य उगवताना किंवा पहाटेच्या वेळी. त्यामुळे पर्यटकांना ते सहज पाहायला मिळतं. स्वाभाविकपणे त्याची भरपूर चर्चाही होते.

गंमत म्हणजे त्याच वेळी वेधशाळेजवळ म्हणजे माल्कम बाबा स्तंभाजवळ वेगळी स्थिती असते. तिथं पारा खरंच १०-११ अशांच्या जवळपास असतो. म्हणजे ‘बर्फ साचतं’ हे वास्तव आहे आणि १०-११ अंश तापमान हेसुद्धा!.. पण मग प्रश्न उरतो, हा फरक का??

त्याचीही विशिष्ट कारणं आहेत.

Mahableshwar2
महाळेश्वरच्या वेधशाळेतील उपकरणे..Mahableshwar4

महाबळेश्वरमधली वेधशाळा आणि वेण्णा तलाव इथं तापमानात फरक असतो. विशाल याने काही कारणं सांगितली, अगदी सोप्या पद्धतीनं..

१. सूर्यप्रकाश (सन शाईन)-

वेधशाळेचं ठिकाण उंचावर आहे. तिथं जास्त वेळ सूर्याचं दर्शन होतं, सूर्यप्रकाश जास्त काळ असतो. त्यामानाने वेण्णा तलाव खोलगट भागात आहे. तिथं दिवसासुद्धा पूर्ण वेळ ऊन पडत नाही. तिथं सूर्यप्रकाश मिळण्याचं प्रमाण तुलनेत कमी आहे.

२. सूर्यास्ताच्या वेळा-

वेधशाळेचं ठिकाण (सर माल्कम बाबा) उंचावर आहे. ते वेण्णा तलावाच्या तुलनेत दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैर्ऋत्य दिशेला आहे. त्यामुळे तिथं तुलनेत सूर्यास्त उशिरा होतो; वेण्णा तलावाच्या मानाने १५ मिनिटं ते अर्धा तास उशिरा. म्हणून वेधशाळेच्या ठिकाणाला जास्त उष्णता मिळते. तिथं तापमान जास्त राहतं.

३. भूरचना व वाऱ्यांचा प्रवाह-

थंड वारे मुख्यत: उत्तरेकडून येतात. ते वेण्णा तलाव व जवळच्या खोलगट भागात उतरतात, तेव्हा अधिक बोचरे बनतात. पुढं वेधशाळेपर्यंत, माल्कम बाबा टेकडीवर येईपर्यंत काहीसे उबदार बनतात.

महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा तलाव

महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा तलाव

४. तलाव-

माल्कम बाबा टेकडी व वेण्णा तलाव या दोन ठिकाणांमधील आणखी एक फरक म्हणजे पाण्याचं सानिध्य. वेण्णा तलाव हा जलाशय आहे. त्यामुळे परिसरातील गारवा वाढतो.

५. पिकांची लागवड-

वेण्णा तलावाच्या खालच्या बाजूला स्ट्रॉबेरी व इतर पिके घेतली जातात . त्यांना पाणी दिलं जातं. त्यामुळेही त्या परिसरात गारवा असतो. अशी स्थिती वेधशाळेजवळ नाही.

महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

६. रासायनिक खतं-

या पिकांना पाण्याबरोबरच खतंसुद्धा दिली जातात, ती फवारल्यामुळेसुद्धा परिसरातील तापमान काही प्रमाणात कमी होतं.

पाचगणी पूर्वेला आहे. महाबळेश्वरची भूरचना अशी आहे की, पाचगणीकडून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जास्त गारठा असतो. तितका तो विरुद्ध बाजूला म्हणजे पश्चिमेला नसतो.

विशाल राहतो पाचगणीला. त्याने वैयक्तिक अनुभव सांगितला. तो सकाळी लवकर ऑफिसला येतो. त्याला वेण्णा तलावाजवळून यावं लागतं. तिथून येताना खूप थंडी वाजते, पण तलाव ओलांडून आलं की ती कमी होते. वेधशाळेजवळ तर चांगलीच ऊब जाणवते.

महाबळेश्वरमधील डोंगररांगा…

डोंगराळ प्रदेशाचं वैशिष्ट्यच हे. अगदी जवळच्या अंतरावरसुद्धा तापमानात बरीच तफावत असते.. तेच महाबळेश्वरमध्येही अनुभवायला मिळतं. म्हणून तर तिथं एकीकडे बर्फ साचतं अन् दुसरीकडे १०-११ अंश तापमान असतं.. हे दोन्ही एकाच वेळी!

(ता.क.–  मागं एकदा आमची अशीच फसगत झाली. महाबळेश्वरमध्ये बर्फ साचल्याचं ऐकायला मिळालं. बर्फ पाहण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या काही सहकाऱ्यांसोबत रात्री महाबळेश्वरला पोहोचलो. हवेत गारवा होता. पण सकाळी उठलो तर ना बर्फ-ना थंडीचा कडाका. दुपारी तर उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता.. काय करणार ? हात हलवत मघारी परतलो. पुढं बरेच दिवस अधून मधून तिथली थंडी आणि बर्फाचा विषय चघळत खळखळून हसत राहिलो.)

(सर्व छायाचित्रे- c@ अभिजित घोरपडे)