‘यूज अँड थ्रो’चा चक्रव्यूह…

पुण्यात कचरा हा राक्षस बनलाय, शब्दश: राक्षस! ओसांडून वाहतोय, पेटवला जातोय. त्याच्या घातक धुराने फुफ्फुसं भरली जाताहेत.. या सगळ्याचं मूळ आहे, आपल्या बेशिस्तबेफिकीर वागण्यात अन् डोळे झाकून घेण्याच्या वृत्तीत. याची सुरूवात होते घरापासून. म्हणूनच एकदा वापरून फेकून देण्याच्या वस्तू घरात आणण्यापूर्वी चार वेळा विचार करा. सर्वत्र सर्वाधिक कचरा असतो तो अशाच यूज अँड थ्रोवस्तूंचाच! या चक्रव्यूहानं आपल्याला पुरतं घेरलंय

W04

आजपासून कानाला खडा. इकोफ्रेंडली असो, कागदी असो, प्लास्टिकचे नाहीतर आणखी कसलेही.. एकदा वापरण्याचे कुठलेच कप, प्लेट, पेले घरात आणायचे नाहीत. इतके दिवस म्हणतच होतो, पण एकदा अनुभव घेतला, आता बस्स.

तुम्ही म्हणाल, एवढं काय झालं?

घरगुती कार्यक्रम होता. मुलाचा वाढदिवस. त्यानिमित्त जवळपासची लहान मुलं, लोक येणार होते. शंभरेक जण असतील. नियोजन घाईगडबडीत झालं. कार्यक्रम म्हटलं की खाणं आलं, पदार्थ आलेते कशात द्यायचं तेही आलं. घरात नेहमीच्या बारातेरा प्लेट. लोक घरी आलेले असताना पुन्हा पुन्हा कोण धुत बसणार? मग ठरलं कागदीच आणू.. त्यातली त्यात इकोफ्रेंडली! प्लेट, द्रोण आणि दुधासाठी ग्लास. शंभरचा सेट आणला. प्रत्येकाचा लहानसा गठ्ठा.

"यूज अँड थ्रो"च्या वस्तू वापरण्यापूर्वी किती छान, गोंडस दिसतात ना..

“यूज अँड थ्रो”च्या वस्तू वापरण्यापूर्वी किती छान, गोंडस दिसतात ना..

कार्यक्रम छान पार पडला. लहान मुलांचा दंगा, हसणंखेळणं, खाणं, आईवडील, आजीआजोबांच्या गप्पा. एकेक करून प्लेट, द्रोण, कप संपत होते. वापरले की कचऱ्याच्या डब्यात पडत होते. साडेतीनचार तास कसे गेले समजलंच नाही. घरची जेवणं झाली, मग आवराआवर.

कचऱ्याचा डबा ओसांडून वाहत होता. प्लेट, द्रोण, कप, त्याला चिकटलेले खरकटे पदार्थ, चमचेसगळंच एकत्र. खरकट्याचा वास यायला सुरुवात झाली. आता घरातच कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. कारण कचरा फक्त ओला नव्हता, फक्त कोरडाही नव्हता.

ना ओला, ना सुका कचरा... सारं एकत्र असल्याने त्रासच होता.

ना ओला, ना सुका कचरा… सारं एकत्र असल्याने त्रासच होता.

एक सोपा मार्ग होताडबा तसाच उचलून घराबाहेर ठेवण्याचा! पण ते मनाला पटणारं नव्हतं. मग स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. साधारण रात्रीचे साडेअकरा वाजले होते. मी आणि पत्नी सविता. प्लेट, द्रोण, कप वेगळे करणं, त्याला चिकटलेलं खरकटं काढलं, ते धुवून घेणं आणि निथळून ठेवणंद्रोणाला, कपला चिकटून घट्ट झालेलं दूधखरकटं काढणं कठीण होतं. ते कागदाचे असल्याने पूर्णपणे पाण्यात बुडवता येत नव्हते. काम हळूहळू पुढं सरकत होतं. शेवटी सारं उरकलं. तीन प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या डब्यात अन् खरकटं ओल्या कचऱ्याच्या डब्यात! घड्याळ पाहिलं मध्यरात्र उलटून गेली होती. दोन वाजत आले होते. दिवसभर दमलो होतो, पण हे करणं आवश्यक होतं. एकत्रित कचरा, खरकटं यांचे डबे घराबाहेर ठेवून मोकळं होता आलं असतं. पण ते बेजबाबदार ठरलं असतं. त्यामुळे वेळ गेला तरी समाधान होतं.. असो!

कचऱ्याची विभागणी आणि वस्तू स्वच्छ करण्याची आमची मोहीम..

कचऱ्याची विभागणी आणि वस्तू स्वच्छ करण्याची मोहीम..

आता विचार केला, हा व्याप कशामुळं वाढला?.. एकदाच वापर करण्याच्या वस्तू आणल्या की हे होणारच. त्या जागी स्टीलच्या, काचेच्या, अगदी जाड प्लास्टिकच्या वस्तू असत्या तरी परवडलं असतं. कारण त्या व्यवस्थित धुता येतात, धुवून पुन्हा पुन्हा वापरता येतात. कित्येक वर्षं सेवा देतात. पण अशा वस्तूंचा पाचपन्नासचा संच घरात असणार कसा?.. नेमकं इथंच दुष्टचक्र सुरू होतं.

त्या भाड्याने मिळतात का? सहज उपलब्ध होतील का? कोण आणून देणार? आपल्याला हव्या तशा असणार का?.. असे अनेक प्रश्न, अनेक अडचणी. मग सोपा मार्ग म्हणून वापरून फेकून देण्याच्या प्लेट, ग्लास, द्रोण, कप घरात येतात.. अर्थातच मग त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या त्याहून मोठी बनते.

मोहीम फत्ते... पण मध्यरात्र उलटून गेली.

मोहीम फत्ते… पण मध्यरात्र उलटून गेली.

अशा यूज अँड थ्रोवस्तूंशिवाय खरंच जमत नाही का आपलं? पूर्वी कुठं होत्या या वस्तू? तरीपण कार्यक्रम व्हायचेच की! त्यामुळे अशा वस्तू घरी आणायच्या नाही म्हटलं की काही तरी मार्ग निघतोच.

विचार केला, काय करता येईल? कार्यक्रमापुरत्या शेजारच्यांकडून ताटवाट्या आणायच्या का? आसपासच्या लोकांनी मिळून स्टील / क्क्या प्लास्टिकच्या प्लेट, द्रोण, ग्लास यांचा सेट आणायचा का? ऐपत असेल तर स्वत: असा सेट आणून तो इतरांनाही वापरायला देता येईल का? तो जवळपास मिळत असेल तर भाड्याने आणता येईल का?.. एक मात्र नक्कीठरवलं की मार्ग निघतो. पण आपल्यामुळं उद्भवणाऱ्या समस्येकडं पाहायचंच नसेल तर? तर प्रश्नच मिटतो.. अर्थात आपल्यापुरता!

पुण्याच्या सर्वच रस्त्यांवर सध्या कचऱ्याचे असे  ढीग साचलेले दिसतात..

पुण्याच्या सर्वच रस्त्यांवर सध्या कचऱ्याचे असे ढीग साचलेले दिसतात..

हे एवढं का लिहतोय? त्याला तितकंच गंभीर कारण आहे. मी हे लिहित असताना आसपास, पुण्यात कचरा हा राक्षस बनलाय, शब्दश: राक्षस! कोणत्याही रस्त्याने जा. जागोजागी ढीग साचलेतअस्ताव्यस्त पडलेला कचरा, दुर्गंधी आणि घाणीघाण. त्यावर उपाय काय?.. तर रात्र झाल्यावर किंवा सकाळी सकाळी त्याला काडी लावायची. मग तासन् तास कचरा धुमसत राहतो. धुरानं परिसर व्यापून जातो. आज पुण्याचं हे चित्र आहे. प्रत्येक पुणेकराची फुफ्फुसं या घातक धुरानी भरली जाताहेत.. हे पुण्यात आहे, म्हणून इतरांनी निश्चिंत राहण्याचं कारण नाही. आज पुणं जात्यात आहे, तर इतर सुपात! हाच काय तो फरक.

या सगळ्याचं मूळ कशात आहे?.. आपल्या बेशिस्त आचरणात, बेफिकीर वागण्यात अन् डोळे झाकून घेण्याच्या वृत्तीत. याची सुरूवात होते घरापासून. म्हणूनच एकदा वापरून फेकून देण्याच्या वस्तू घरात आणण्यापूर्वी चार वेळा विचार करायचा. त्या वापरण्यापूर्वी तर दहा वेळा.. कार्यक्रम घरगुती किंवा बाहेरचा असू देत, त्यात सर्वाधिक कचरा असतो तो अशा यूज अँड थ्रोवस्तूंचाच.

कचरा जाळणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर..! हे सध्या पुण्यात सुरू आहे.

कचरा जाळणे म्हणजे
रोगापेक्षा इलाज भयंकर..!
हे सध्या पुण्यात सुरू आहे.

असंही वाटतं की, या उत्पादनांवर बंदी आणली तर? तर खरंच बरं होईल. फक्त त्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हायला हवी. दोषींवर कडक कारवाई व्हावी.. बंदी आणली म्हणून फार काही गैरसोय होणार नाही. कारण लोक कशातूनही मार्ग काढतात हो. मला लहानपण आठवतंय. गावी लग्न असलं की एक पद्धत होती. गावातल्या लोकांनी जेवणासाठी आपापलं ताट, वाटी, तांब्या आणायचा. कारण काहीही असेल, पण या पद्धतीमुळं असा कचराच निर्माण होत नव्हता.

सध्या परिस्थिती विपरित आहे. कचऱ्याबद्दल आम्ही बोलतो खूप, पण प्रत्यक्ष उपाय करायला फार कोणी पुढं येत नाही. खरं तर कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं, तर व्यवस्थित उत्पन्न मिळेल. दुर्लक्ष केलं तर मात्र या समस्येमुळं कुत्रं हाल खाणार नाही!

कचऱ्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकता येणार नाही. त्यासाठी सुरूवात स्वत:पासून करू. आधी आपल्या घरातून ‘यूज अँड थ्रोहद्दपार करू. मग इतरांना सांगू.. त्यावर सरकारनं बंदी घातली तर उत्तमच. पण तोवर आपण वाट कशासाठी पाहायची?

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com