आडांसोबत काय काय गमावलं? (आटपाडीचे शापित आड- ४)

आटपाडीतले आड गेले, सोबत तिथल्या ओढ्याचं रूपरंग घेऊन गेले, भूजलाची व्यवस्था उलथून गेले, एक जलसंस्कृती तोडून मोडून गेले, आम्हाला परावलंबी करू गेले अन् आमचं शहाणपणही घेऊन गेले.

अभिजित घोरपडे

आटपाडीचे आड गेलेच.. सोबत बरंच काही घेऊन गेले..

आटपाडीचे आड गेलेच.. सोबत बरंच काही घेऊन गेले..

आडपाडीचे आड तर गेलेच.. पण ते एकटे गेले नाहीत, सोबत अनेक गोष्टी घेऊन गेले.. त्यांनी नेल्या असं म्हणण्यापेक्षा आपणच या साऱ्यांवर पाणी सोडलं.

आडांचं अस्तित्व स्वतंत्र नव्हतं. ते एका व्यवस्थेचा भाग होते. व्यवस्था होती पाण्याची, भूजलाची. ही व्यवस्था टिकून होती म्हणूनच आड टिकून होते, वापरण्याजोगे होते. आता आड उरले नाहीत, त्यामुळे ते ज्या व्यवस्थेचा भाग होते तीसुद्धा दुर्लक्षिली गेली, हळूहळू बिघडून गेली. आटपाडीत हे सविस्तर पाहायला मिळतं.

हा पार्किंग लॉट नाही, ओढा आहे.. पण त्याचा वापर वाहनं उभी करण्यासाठी होतो.

हा पार्किंग लॉट नाही, ओढा आहे.. पण त्याचा वापर वाहनं उभी करण्यासाठी होतो.

आटपाडी गावातून शुक्रनावाचा ओढा वाहायचा. ‘वाहायचाअसं म्हणायचं कारण आता तो कधीतरीच वाहताना दिसतो. हा ओढा इथला पाण्याचा स्रोत होता. पाण्याची व्यवस्थाही साधी सरळ. ओढ्याचा उगम जवळच्या डोंगरात. ओढा वर्षभर वाहायचा, पावसाळ्यात दुथडी भरून. गावातले लोक वाहत्या पाण्याच्या आवाजाच्या आठवणी सांगतात. पूर आला की पाण्याचा वेग मोठा. तो ओलांडणं मुश्किल बनायचं. ‘आईसाहेब मंदिराजवळ तर पाण्याचा आवाज इतका असायचा की रात्रीच्या वेळी धडकीच भरायची‘.. इति श्री. केशव देशपांडे. तिथंच मोठा डोह होता. त्यात वर्षभर डुंबायला मिळायचं. पाणी कधीच आटायचं नाही, अशा अनेक आठवणी मागच्या पिढीतले लोक सांगतात.

या ओढ्यामुळं भूजलाचं पुनर्भरण व्हायचं. भूजलाची पातळी वाढली की आपोआपच आडांनाही पाणी टिकून राहायचं. आडांच्या पाण्याचा स्रोत म्हणून ओढा महत्त्वाचा! त्यामुळे त्याची काळजी घेतली जायची. तो वाहता राहील, पात्रात अतिक्रमणं होणार नाहीत, ते उथळ होणार नाही.. याची खबरदारी घेतली जायची.. ते स्वाभाविकच होतं. पण हे कधीपर्यंत?.. आड वापरात असेपर्यंत.

आडांचा वापर बंद झाल्यावर त्यांना पाणी देणाऱ्या स्रोताशी काय देणंघेणं? आडांकडं दुर्लक्ष झालं, त्याहून जास्त ओढ्याकडं झालं. सगळीकडंच होतं ते आडपाडीतही झालं. ओढ्यावर अतिक्रमण झालं. काही ठिकाणी त्याचं पात्र बुजवलं गेलं, काठ संपले, ओढा उथळ बनला. परिसरातली भूजलाची पातळी खाली गेली, त्यामुळे ओढा वाहायचा थांबला. फक्त पावसाळ्यातच त्याचं अस्तित्व दिसू लागलं. तो वाहिलानाही वाहिला तरी फार फरक पडत नव्हता.. आपोआपच तो दुर्लक्षित बनला, नावापुरताच उरला.

पूर्वी वाहता असलेला ओढा आता असा कोरडा ठणठणीत असतो..

पूर्वी वाहता असलेला ओढा आता असा कोरडा ठणठणीत असतो..

आटपाडी मुक्कामात या ओढ्याचं विदारक चित्र दिसलं. त्याला ना रूप उरलं, ना रंग.. पात्र उथळ. पाण्याचा पत्ता नाही. कडेला झाडी नाही. वाहनं उभी करण्यासाठी उपयोग! जुने लोक ओढ्याच्या छान आठवणी सांगतात. त्या खऱ्या आहेत का असा प्रश्न पडावा, इतकी विदारक अवस्था!

आड गेले ते या शुक्र ओढ्याचं रूपरंग घेऊन गेले.

आड गेले ते भूजलाची व्यवस्था उलथून गेले.

आड गेले ते आपली पाण्याबद्दलची आस्था घेऊन गेले.

आड गेले ते एक जलसंस्कृती तोडून मोडून गेले.

आड गेले ते आम्हाला परावलंबी करू गेले.

आड गेले ते आमचं शहाणपणही घेऊन गेले.

आड गेले ते गेले.. पण आपल्याला बरंच काही शिकवूनही गेले. त्यातून आपण काही शिकणार का? हाच कळीचा मुद्दा आहे.

अभिजित घोरपडे

मेल : abhighorpade@gmail.com